आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतरचना:ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था...

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य जनांच्या आयुष्यात संकटे येऊ नयेत, त्यांची सारी कार्ये निर्विघ्न पार पडावीत नि त्यांचे कल्याण व्हावे, यासाठी संतकवींनी अभंग, भजने, भारुडासारख्या रचनांमधून गणरायाची प्रार्थना केली. या कवींनी ईश्वराधनेच्या जोडीने निर्माण केलेली लोकप्रबोधनाची परंपरा पुढच्या काळातील लोककवी, शाहीर, लोककलावंतांनी आपल्या काव्य अन् कलेतून आणखी उत्कटपणे पुढे नेली.

भा रतात वैदिक आर्यांचे आगमन झाल्यावर येथील आर्येतर जमातींशी त्यांचा संघर्ष झाला. हा संघर्ष जसा दोन जमातीतील होता, तसाच तो दोन संस्कृतींमधीलही होता. या संघर्षात भूमीवरील स्वामित्व हे एक कारण होते, त्याप्रमाणेच कोणत्या गोष्टींना प्रमाण मानायचे, हेही एक कारण दडलेले होते. त्याचा परिणाम म्हणून वेद मानणारे आणि वेद न मानणारे अशी स्थिती उत्पन्न झाली. या आर्येतर जमातींना आर्यांनी असुर, दस्यू, राक्षस आणि लोक या नावांनी संबोधले. म्हणून जे वेदबाह्य वाङ्मय ते लोकवाङ्मय, जी वेदबाह्य संस्कृती ती लोकसंस्कृती अशी धारणा प्रारंभी निर्माण झाली. कोणत्याही संस्कृतीचा मूलाधार ‘लोक’ म्हणजे ‘जनता’ हाच असतो हे खरे; पण ही जनता आर्येतर जमातीची होती, हे विसरून चालणार नाही. अशा या आर्येतर संस्कृतीमध्ये म्हणजेच लोकसंस्कृतीमध्ये गणपतीचे आगमन झाले. लोकसाहित्याचे आविष्कार रूप असलेली लोककला आपल्या आद्य गणेशाला कशी विसरेल बरं! त्यामुळे आपल्या प्रत्येक लोककलेची सुरुवात ही गणपतीच्या स्तवनाने होते.

आपल्या संतांनी जनसामान्यांचे आध्यात्मिक उद्बोधन करण्यासाठी कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमाचा अवलंब केला. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ’सारख्या मंगलाचरणाने कीर्तनाची सुरुवात होते. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशाचे रूपक ‘ओंकारा'वर स्थित आहे. वेदादी सर्व विद्यांचा मूळ प्रणव ‘ओंकार’ आहे, सर्व विद्येचे ते विकसित रूप आहे, असे या रूपकात सूचित करण्यात आले आहे. संस्कृतमध्ये अथवा प्राकृतामध्ये धार्मिक ग्रंथाच्या प्रारंभी ‘श्री गणेशाय नम:’ असे लिहिलेले असते अथवा तसे लिहिले नसेल तरी ते मानूनच हे ग्रंथपठण होते. कीर्तनातूनच निर्माण झालेल्या ‘भारुड’ या लोककला प्रकारात मात्र.. तुज नमो नमो ओंकार स्वरूपा। ओंकार स्वरूपा देवा ओंकार स्वरूपा।। या गणाने सुरुवात होते. भारूड म्हणजे ते संत एकनाथांचेच असे मानले जाते. अनेक संतांनी भारुडे रचली, परंतु नाथांनी त्याचे दालन मोठे केले. त्यांची तत्त्वज्ञानाची दिशा जीव, जगत, ईश्वर आणि परमात्मा यांच्या अनोन्य संबंधांचा विचार करणारी आहे. इतर तत्त्वज्ञ आणि संतांप्रमाणे नाथांनीही आपली अनुभवयुक्त विचारसरणी दर्शित केली आहे.

परमात्मा निर्गुण, निराकार आहे. तो एक असूनही त्याने अनेक अवतार घेऊन या जगाचे कल्याण केले. त्याच्या शक्तीची संकल्पना आणि शक्तिरूपी प्रकृती यांनी समान अवस्था प्राप्त केली आणि परमात्म्याच्या आधारावर या त्रिगुण विश्वाची निर्मिती झाली. निर्मितीच्या या तत्त्वाला ‘ईश्वर’ संबोधतात. हा ईश्वरच जगाचा मायबाप आहे. जो जीव हे जाणत नाही तो अज्ञानी आहे आणि म्हणूनच तो परमपिता परमेश्वराचे रूप न ओळखता भौतिक सुखाच्या मोहात गुरफटून जातो. याच कारणामुळे त्या जीवाला जन्म-मरणाचे दु:खमय फेरे घ्यावे लागतात. त्यातून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी संतांनी त्या ईश्वराला साकडे घातले.

आपल्या परंपरेत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांप्रमाणेच एकनाथ, समर्थ रामदासांसह अनेक संतांनी ओव्या, अभंग, श्लोक, भजने, भारूड अशा विविध प्रकारांतून ईश्वररुपातील गणरायाची आराधना केली. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुज नमो।। नमो माया बापा, गुरुकृपा धना। तोडिया बंधना माया मोहा ।। मोहजाळ माझे कोण निरशील । तुजवीण दयाळा सद्गुरू राया।। नाथांनी या गणपती वंदनेत मायबाप आणि गुरूला वंदन केले आहे. त्यांना आद्यपूजेचा मान दिला आहे. तेही ओमकारातून निर्माण झाले आहे. मोहमायेचे बंधन तोडायचे असेल, तर आपल्या मायबापांना वंदन करून गुरूंच्या कृपादृष्टीचा लाभ मिळवायला हवा, असा संकेत त्यातून दिला आहे. सर्व सिद्धींचा कारक, विघ्नहर्ता गणपतीला लोककलेचा प्रयोग उत्तम व्हावा म्हणूनच नव्हे, तर साऱ्या जनांचे कल्याण व्हावे, यासाठी आवाहन केले जाते. सामान्य जनांच्या आयुष्यात संकटे येऊ नयेत, त्यांची सारी कार्ये निर्विघ्न पार पडावीत नि त्यांचे कल्याण व्हावे, यासाठी संतकवींनी अभंग, भजने, भारुडांसारख्या रचनांतूून गणरायाची प्रार्थना केली. या कवींनी ईश्वराधनेच्या जोडीने निर्माण केलेली लोकप्रबोधनाची परंपरा पुढच्या काळातील लोककवी, शाहीर, लोककलावंतांनी आपल्या काव्य अन् कलेतून आणखी उत्कटपणे पुढे नेली.

डॉ. मोनिका ठक्कर monikathakkar27@gmail.com संपर्क : 9987541555

बातम्या आणखी आहेत...