आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • On The Second Day Of Bhumi Pujan, The Number Of Visitors To Ramallah Increased Sixfold; Pooja Stones Kept Safe, Construction Starts From 9 August

अयोध्या:भूमिपूजनाच्या दुसऱ्या दिवशी रामलल्लाचे दर्शन घेणारे सहापट वाढले; पूजा केलेल्या शिळा सुरक्षित ठेवल्या, उद्यापासून बांधकाम सुरू

विजय उपाध्याय | अयोध्या3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सकाळी रामलल्ला... - Divya Marathi
गुरुवारी सकाळी रामलल्ला...
  • भूमिपूजन साेहळ्यात ड्यूटीवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही घेतले रामलल्लाचे दर्शन
  • पायाचे खोदकाम, तो भरण्यास 18 महिने लागणार; परवानगी याच आठवड्यात

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या सहापट वाढली. गुरुवारी रामलल्लाचा भव्य शृंगार करण्यात आला. कोरोनामुळे येथील बंधने पाहता रोज सुमारे ५०० भाविक येत असत. मात्र, गुरुवारी सायंकाळी ७ पर्यंत ३००० लोकांनी दर्शन घेतले. हनुमानगढीतही हीच स्थिती होती. येथे ८ हजार लोकांनी दर्शन घेतले. सकाळी दर्शन घेणाऱ्यांमध्ये येथे ड्यूटीवर आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीच संख्या अधिक होती. दरम्यान, ट्रस्टने मंदिराच्या पायाभरणीत ठेवलेल्या पवित्र शिळा आणि इतर साहित्य विधिपूर्वक सुरक्षित ठेवले. पायाभरणीसाठी उभारण्यात आलेला मंडप आणि सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर शनिवारपासून मंदिराच्या कामाला प्रारंभ होईल, अशी शक्यता आहे. बुधवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले होते.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय बन्सल यांनी गुरुवारी मंदिर उभारणी करणाऱ्या एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिसराची पाहणी केली. अगोदर पाया खोदला जाईल. पावसामुळे हे काम थोडे मंद गतीने होऊ शकते. यांनतर पायाभरणी आणि तळमजल्यापर्यंतचे काम पूर्ण होण्यास १८ महिने लागू शकतात. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांचे काम पूर्ण होण्यास १४ ते १८ महिने लागतील. शेवटची कलाकारी आणि सजावट होण्यास सहा महिने लागू शकतात. यात १६१ फूट उंच कळसाच्या कामाचाही समावेश आहे. मंदिरावर पाच कळस असतील. अशा पद्धतीने मंदिराचे काम पूर्ण होण्यास सुमारे साडेतीन वर्षे लागू शकतात. मंदिराची रचना ठरली आहे. याच्या परवानगीसाठी पुढील आठवड्यात अयोध्या विकास प्राधिकरणाकडे नकाशा सोपवला जाईल. यासाठी दोन कोटी शुल्काची रक्कम वेगळी ठेवण्यात आली आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवजी म्हणाले, बांधकाम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वेळ न दवडता सर्व औपचारिकता पूर्ण करावयाच्या आहेत. यासाठी या महिन्यातच बैठक बोलावली असून जमिनीच्या कागदपत्रांवर आता श्रीरामलल्ला विराजमान आणि ट्रस्टचे नाव लावले गेले आहे.