आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सांगतो ऐका...:एक दिवस!

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नितीन चालतोय, त्याच रस्त्यानं म्हातारा पुन्हा एकदा येताना दिसतोय. नितीनच्या मागेच काही अंतरावर. आता नितीनच्या चेहऱ्यावर चिंता वाढलीय. अचानक त्याला एक रिकामं घर दिसतं. दाराला कुलूप नाही. नितीन त्या घरात शिरतो. घरात काहीच सामान नाही. भिंतीवर देवाचे फोटो. दुसऱ्या भिंतीवर धोनीचे फोटो. नितीन ते बघत बसलाय. एकाएकी त्याला दारात हालचाल दिसते. नितीन खिडकीतून बघतो. म्हातारा त्या घराच्या दारात उभा आहे...

व डगाव. किंवा आणखी कुठलं नाव असलं असतं, तरी फरक पडला नसता. चार गावांसारखं हे गाव. कधी मिळून मिसळून राहणारे लोक, कधी भांडणारे लोक. त्याच गावातला एक छोटा मुलगा नितीन. पाचवीत शिकणारा. शाळेतून घरी येतोय. भरदुपारची वेळ. उन्हामुळं नितीन जास्तच थकलेला वाटतोय. उन्हाळा असता तर सगळं भकास दिसलं असतं. पण थंडीचे दिवस आहेत. भोवती असलेले डोंगर हिरवे आहेत. रस्त्याच्या कडेला गवत आहे. झाडावर पक्ष्यांचा आवाज आहे. पण तरीही नितीन उदास दिसतोय. शाळेत मास्तरांनी शिक्षा दिल्यासारखा चेहरा घेऊन नितीन चालतोय. दप्तराचं ओझं जास्तच जाणवतंय, असं त्याच्याकडं बघून कुणीही सांगेल. एरवी शाळा सुटल्यावर मुलं धूम ठोकतात घराकडं. पण नितीनची चाल अतिशय संथ आहे. गावात शिरतानाच असलेलं भलंथोरलं वडाचं झाड दिसतंय. एरवी नितीन त्या वडाच्या पारंबीला लटकत राहतो दहा - पंधरा मिनिटं. मन भरल्यावर मग घराकडं निघतो. पण, आज त्यानं पारंब्या बघितल्याही नाहीत. पारंब्या पण कुठला तरी गुंता झाल्यासारख्या एकमेकींना बिलगून असलेल्या दिसताहेत.

नितीन चालत चालत मंदिरापाशी आलाय. अजूनपर्यंत त्याला एकही माणूस नजरेला पडला नाही. भयाण शांतता आहे. मंदिराबाहेर सतत काही ना काही गोंधळ चालू असतो. भजन किंवा खेळणारी मुलं दिसतात. पण आज कुणी नाही. नितीन गोंधळून जातो. मंदिराच्या दारात जातो. जाळीचं दार आहे. दाराला मोठं कुलूप आहे. एरवी महादेवाच्या मंदिराला एवढ्या शांततेची सवय नसते. महादेव क्रोधाने हिमालयात निघून गेले, तर कदाचित अशी शांतता असेल. नितीन काही वेळ मोठ्या मुंगळ्याकडं बघत बसला. त्याला एकदा मुंगळा चावला होता, तेव्हापासून तो मुंगळा दिसला की घाबरून जातो. मुंगळा त्याला शत्रू वाटतो. मुंगळा बघून कंटाळून गेल्यावर नितीन पायऱ्या उतरून चालू लागतो. मंदिराच्या समोर ग्रामपंचायतीचं ऑफिस आहे. कुलूप लावलेलं. नितीन त्यासमोरून चालतोय. अचानक त्याला एका पडक्या वाड्याच्या पायरीवर एक म्हातारा बसलेला दिसतो. जोशीचा वाडा अशी त्या पडक्या वाड्याची ओळख आहे. पण नितीन काय, त्याच्या वडिलांनी पण जोशीला पाहिलेलं नाही. जोशी पन्नास वर्षे आधी गाव सोडून पुण्यात गेलेत. त्यांच्या कुटुंबातलं कुणी कधी गावी आलं नाही. त्यांच्या ओळखीचा माणूस येतो आणि त्या पडक्या वाड्याला पाहून जातो. उद्देश फक्त एवढाच की कुणी त्यावर काही अतिक्रमण तर केलं नाही? पण गावात मुबलक जागा आहे. वाड्याचे जुने दगड लोकांनी वापरले. कुणी धुण्यासाठी. कुणी पायरी म्हणून. बाकी वाडा तसाच आहे. त्यावर झाडं उगवलीत. सापांचा वावर असतो. त्यामुळं त्या वाड्यापाशी लहान मुलं जात नाहीत. तो म्हातारा नेमका तिथंच बसला होता. काळा गॉगल घातलेला म्हातारा. नितीन येत होता, त्याच्या विरुद्ध दिशेला बघत बसलेला. पण अचानक शेजारच्या गल्लीतून आलेलं कुत्रं भुंकू लागलं आणि म्हातारा उठून उभा राहिला. नितीन येत होता, त्या दिशेनं चालू लागला. नितीन वेगात शेजारी असलेल्या गल्लीत शिरला. आता नितीनच्या चालण्याचा वेग वाढला. म्हातारा पण घाईत चालू लागला. अंदाज घेत. नितीन गल्लीच्या टोकाला जाऊन पोचला. टोकाला असलेल्या घराच्या आड लपून बघू लागला. म्हातारा सरळ रस्त्यानं निघून गेला. गल्ली ओलांडून. नितीन जरा निवांत झाला. एका गल्लीतून चालू लागला. सगळ्या घरांना कुलूप दिसतंय. नितीन जत्रेत हरवल्या मुलासारखा प्रत्येक घराकडं बघतोय. निराश.

म्हातारा पुन्हा एकदा नितीन चालतोय, त्याच रस्त्यानं येताना दिसतोय. नितीनच्या मागेच काही अंतरावर. आता नितीनच्या चेहऱ्यावर चिंता वाढलीय. अचानक त्याला एक रिकामं घर दिसतं. दाराला कुलूप नाही. नितीन त्या घरात शिरतो. घरात काहीच सामान नाही. भिंतीवर देवाचे फोटो. दुसऱ्या भिंतीवर धोनीचे फोटो. पेपरमध्ये आलेले. नितीन ते बघत बसलाय. एकाएकी त्याला दारात हालचाल दिसते. नितीन खिडकीतून बघतो. म्हातारा त्या घराच्या दारात उभा आहे. भिंतीच्या आड. शांतपणे. नितीन बाहेर येण्याची वाट पाहतोय असा सावध. नितीन घाबरतो. विचार करतो. घरातून बाहेर पडायला दुसरा रस्ता नाही. अतिशय छोटं घर. नितीन तणावात. अचानक धोनीच्या फोटोपाशी जातो. फोटो बघून हुरूप आल्यासारखा. म्हातारा आता आत शिरणार एवढ्यात नितीन वेगात त्या दारातून पळत सुटतो. थेट उजव्या बाजूला वळून धूम ठोकतो ते गल्ली संपेपर्यंत मागं वळून बघतच नाही.

म्हातारा भिंतीला चाचपडत पुढं येतो. आता लक्षात येतं, की म्हातारा आंधळा आहे. रस्त्यात आल्यावर म्हातारा अंदाज घेतोय की नितीन नेमका कुठे गेलाय? म्हातारा नितीन गेला त्याच्या विरुद्ध दिशेनं चालू लागतो. नितीन किराणा दुकानाशेजारी असलेला पिंपळ गाठतो. दुकान पण बंद आहे. पण तिथं एक माठ ठेवलेला असतो. नितीन त्यातून पाणी पितो. म्हातारा दोन-तीन गल्ल्या फिरून पिंपळ आहे, तिथं येतो. पण, आता नितीन तिथं दिसत नाही. म्हातारा चहुबाजूला बघू लागतो. पण सगळे रस्ते निर्मनुष्य. अचानक म्हातारा खाली वाकतो आणि दगड हातात घेतो. वेगवेगळ्या दिशांकडं दगड फेकून मारण्याची नक्कल करू लागतो. एका वेळी नेमका ज्या फांदीवर नितीन आहे, त्याच दिशेने त्याचा हात जातो. नितीन घाबरून ओरडतो. म्हातारा हसू लागतो. जोरजोरात. आणि झाडाला मिठी मारतो. खोडाला घट्ट धरून बसलाय म्हातारा. आता नितीनला झाडावरून उतरायचं, तर तो म्हाताऱ्याच्या तावडीत सापडणार होता. नितीन घाबरलेल्या अवस्थेत फांदीला धरून उभा. म्हातारा तसाच झाडाला चिकटून. एका क्षणी नितीन धाडस करून फांदीवरून उडी मारतो. कसाबसा उठू लागतो. म्हातारा त्याच्या दिशेने येतोय. नितीन उठून पळणार एवढ्यात त्याचा पाय म्हाताऱ्याच्या हाती येतो. पण, नितीन अतिशय सफाईनं पुढं उडी मारतो आणि पळू लागतो. म्हातारा हात झटकत नितीन गेलाय, त्या दिशेकडं बघत बसलाय.

सूर्य मावळताना दिसतोय. म्हातारा कुठे दिसत नाही. नितीन हातात कोयता घेऊन फिरताना दिसतोय. आता नितीन कुणाला तरी शोधतोय. अंधार पडतोय तसा नितीन घाबरलाय. वेगात पावलं टाकत चालतोय. त्या रिकाम्या घरापाशीसुद्धा जातो. पण त्याला कुणी दिसत नाही. नितीन थकलाय. रडवेला झालाय. अचानक त्याला म्हातारा मंदिराच्या पायरीपाशी बसलेला दिसतो. नितीन चोरपावलांनी कोयता घेऊन त्याच्या मागं जातो. मंदिरापाशी असलेल्या लाइटमुळं नितीनची सावली म्हाताऱ्याच्या समोर पडतेय. पण म्हाताऱ्याला काही दिसत नाही. तो शांत. नितीन म्हाताऱ्याच्या मागे जाऊन उभा. अचानक म्हाताऱ्याला घट्ट मिठी मारतो. म्हातारा घाबरल्यासारखा दाखवतो. नितीन जोरजोरात हसतो. जिंकल्यासारखे हात हवेत उडवतो. म्हातारा खिशातला एक रुपया त्याला देतो. नितीन आणि म्हातारा रोज हा खेळ खेळतात. गावात पाच-सहाच लोक उरलेत. सगळे ऊसतोडीसाठी दूर गावी गेलेत. दोन-तीन म्हातारे आणि नितीनसारखी दोन-तीन मुलं. शाळेसाठी गावात थांबलेले. दिवसभर काय करणार? उगाच एकमेकांना शोधायचा खेळ खेळतात. नितीन दिवसभर लपून बसतो. आजोबा दिवसभर त्याला शोधत फिरतो. शेवटी रोज नितीन जिंकतो. आजोबा हरतात. आजोबा त्याला एक रुपया देतात. नितीन रात्री अभ्यासाला बसतो. शेजारच्या घरातली म्हातारी शेतावरून येते. भाकरी थापते. आजोबा आणि नितीन दोघे एका ताटात जेवतात. नितीन आजोबाला भरवतो. आजोबा नितीनला भरवतात. झोपायच्या आधी नितीन न चुकता तो एक रुपया आजोबाच्या खिशात टाकतो. कारण त्याला उद्या पुन्हा जिंकायचं असतं.

सकाळी भांडं धुताना नितीन अस्वस्थ होतो. त्या ताटात त्याला ऊस तोडणारी आई दिसू लागते. कितीही पुसलं, कितीही पाणी ओतलं, तरी आईचं चित्र ताटात तसंच ठळक दिसत राहतं. ऊस तोडणारी आई आहे म्हणून ताट आहे. पोटासाठी पाचशे किलोमीटर दूर लोकांच्या शेतात ऊस तोडायला गेलेले आई-बाप त्याला दिसत राहतात ताटात. त्यानं मागच्या वेळी आईला हे सांगितलं होतं. आई म्हणाली होती, ताटात मी ऊस तोडताना दिसतेय, हे ठीकंय. पण तू ऊस तोडताना दिसू नको. स्वप्नात पण. शाळा शीक. नितीनला हे रोज आठवतं. मग तो ताट बाजूला ठेवतो. दप्तर घेऊन शाळेच्या दिशेनं चालू लागतो. काही महिने त्या गावात आजोबा आणि नातवाचं जगणं असंच चालू असतं. मी त्यातल्या फक्त एका दिवसाची गोष्ट सांगितली.

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com

बातम्या आणखी आहेत...