आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Ordnance Production In The State Will Double To Rs 20,000 Crore, Maharashtra Leads In Defense Production In The Country With 25% Production

आत्मनिर्भर भारत:राज्यातील आयुध निर्मितीची उलाढाल दुपटीने वाढून 20 हजार कोटींवर जाणार, भुसावळ, चंद्रपूर, पुणे, अंबाझरी येथील आयुध उत्पादन वाढणार

प्रदीप राजपूत | जळगावएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
खडकी फॅक्टरीतून बीएसएफला बॅरल ग्रेनेड लाँचर - Divya Marathi
खडकी फॅक्टरीतून बीएसएफला बॅरल ग्रेनेड लाँचर
 • देशात संरक्षण साहित्य निर्मितीत 25% उत्पादनासह महाराष्ट्र अव्वल

सोमवारपासून सुरू झालेल्या संरक्षण मंत्रालयाच्या ‘आत्मनिर्भर भारत सप्ताह’मध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १०१ आयुधांना आयातबंदी करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे देशातील ४१ आयुध निर्मिती कारखान्यांत नव्याने चैतन्य आले आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह निर्यातीची संधी असल्याने देशातील आयुध कारखाने खासगी स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. यात सर्वाधिक २५ ते ३० टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. भुसावळ आणि चंद्रपूर येथील ‘पिनाका पॉड’ या रॉकेट लाँचर प्रकल्पासह अंबाझरी, भंडारा आणि पुण्यातील खडकी येथील आयुध प्रकल्प तयारीला लागले आहेत. यामुळे राज्यातील १० आयुध निर्मितीची उलाढाल दुपटीने वाढून २० हजार कोटींवर जाईल.

दुसरे महायुद्ध आणि कारगिलसारख्या युद्धांत मोठी भूमिका बजावलेल्या आयुध कारखान्यांना तब्बल २१८ वर्षांची परंपरा आहे. संरक्षण क्षेत्रात भूदल, नौदल आणि वायुदलानंतर चौथा स्तंभ म्हणून

आयुध कारखान्यांचे महत्त्व आहे. परंतु सद्य:स्थितीमध्ये शासनाने संरक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणूक ७४ टक्क्यांपर्यंत वाढवणे, कॉर्पोरेशन, खासगीकरणाच्या हालचाली सुरू केल्या होत्या. जवळपास १ लाख कोटींचे बजेट असलेली ७० टक्के आयुध आयात होत असल्याने देशात केवळ ३० टक्के उत्पादन सुरू होते. त्यामुळे या कारखान्यांची उपयोगीता कमी होऊन उत्पादन क्षमता अवघ्या ५० टक्क्यांवर आले. शिवाय वाढत्या खर्चामुळे अस्तित्व धोक्यात आले होते. मात्र, शासनाच्या आत्मनिर्भर अभियानाने या कारखान्यांना स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

देशात ७० उत्पादने शक्य ... :

आयातीवर बंदी घातलेल्या १०१ उत्पादनांमध्ये आर्टिलरी गन, असॉल्ट रायफली, कोरवेट, सोलार सिस्टीम, मोठ्या बंदुका, मिसाइल, रॉकेट लॉन्चर, बॉम्ब लॉन्चर, ट्रान्सपोर्ट एअरक्रॉफ्ट, एलसीएच, रडार आणि मिलिटरीच्या शक्तिमान वाहनांसह अन्य साधनांचा समावेश आहे. यात शासकीय कारखान्यांमध्ये १०१ पैकी ७० उत्पादने शक्य आहे. २०१७मध्ये भुसावळ येथे पिनाका पॉड कारखाना उभारण्यात आला. सध्या येथे वार्षिक केवळ ६० लॉन्चर बनवले जात आहेत. आत्मनिर्भर मोहिमेनंतर या कारखान्याला वार्षिक ४५० लॉन्चरपर्यंत ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात बंदुका, तोफगोळ्यांसह रॉकेट लाँचरची निर्मिती

जळगावातील वरणगाव फॅक्टरी, नागपूर येथील अंबाझरी, भंडारा फॅक्टरी, चंद्रपूर फॅक्टरी, पुण्यातील खडकी आणि देहुरोड येथील फॅक्टरीमध्ये अत्याधुनिक क्षमतेचे गोळाबारूद, बंदुका, तोफगोळ्यासह बंदुकीच्या गोळ्या बनवल्या जातात. भुसावळ आणि चंद्रपूर येथील पिनाका पॉड प्रकल्पात उच्च क्षमतेचे रॉकेट लाँचर बनवले जातात. सर्वोत्तम गुणवत्तेमुळे या लाँचरला खासगी बाजारात स्पर्धक नसल्याने हे दोन्ही कारखाने नव्या ऑर्डरसाठी सज्ज झाले आहेत. आत्मनिर्भर अभियानाची घोषणा होताच डेहराडून येथील फॅक्टरीला संरक्षण मंत्रालयाची पहिली ऑर्डर मिळाली आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातील कारखाने सज्ज झाले आहेत.

 • १० राज्यांमध्ये एकूण ४१ आयुध कारखाने
 • ८३ हजार कामगारांना मिळतो आहे रोजगार
 • १० कारखाने सर्वाधिक एकट्या महाराष्ट्रात
 • २५ ते ३० टक्के महाराष्ट्राचा वाटा आयुध निर्मितीत
 • आयुध निर्मितीत सध्या ७ ते १० हजार कोटी रुपयांची उलाढाल.
 • आत्मनिर्भर मोहिमेमुळे २० हजार कोटींपर्यंत जाऊ शकते.

आयुध कारखाने सक्षम, समृद्ध होण्यास मदत

आत्मनिर्भर अभियानाची सुरुवात २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमातून झाली होती. देशातील आयुध कारखान्यांची क्षमता मोठी आहे. या निर्णयामुळे परकीय चलन वाचेल आणि देशातील आयुध कारखानेदेखील सक्षम, समृद्ध, आत्मनिर्भर होतील. -खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री.

आत्मनिर्भर मोहिमेचा फायदा होईल, संधी मिळाली आहे... सोने करूच

केंद्र शासनाने आयुध कारखान्यांना स्वावलंबी बनण्याची संधी दिली आहे, त्या संधीचे सोने करू. कारखान्यांची मालकी संरक्षण विभागाची आहे. कॉर्पोरेशन झाले तर नफेखोरी घुसेल. आत्मनिर्भर मोहिमेचा नक्कीच मोठा फायदा होईल. त्यादृष्टीने सुरुवात देखील झाली आहे. - किशोर सूर्यवंशी, जेसीएम मेंबर, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ.

बातम्या आणखी आहेत...