आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवतीर्थावर यंदा आवाज कुणाचा?:दसरा मेळाव्याचे 3 दावेदार! कोण मारणार बाजी? कुणाला मिळणार मैदान?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थापनेपासूनच शिवसेनेची ओळख असलेल्या शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याविषयी आता संभ्रम निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची तयारी केली जात आहे. तर मनसे नेत्यांनीही राज ठाकरेंनी दसरा मेळावा घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे आता ३ दावेदार निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. या स्थितीत शिवतीर्थावर येत्या दसऱ्याला कुणाचा आवाज घुमणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंकडून दसरा मेळाव्याची परंपरा पुढे
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे कायम ठेवली. २०१३ पासून उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेत आहेत. उद्धव ठाकरेंची भाषणाची शैली बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक नसल्याने त्यांच्या दसरा मेळाव्यातील पहिल्या भाषणाविषयी अनेक चर्चाही झाल्या. पण दसरा मेळाव्याविषयी काहीही प्रश्न यानंतर निर्माण झाले नव्हते. शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे उद्धव ठाकरे हेच पारंपरिक वारसदार ठरले आणि त्यांनी तो वारसा पुढे चालवलाही. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासमोर आता दोन आव्हाने निर्माण झाली आहेत. एक स्वतः शिंदे गटाचे आणि दुसरे आव्हान आहे मनसेचे.

मेळाव्यासाठी शिंदे गटाची तयारी

शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील असे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटाकडून या मेळाव्याच्या व्यासपीठावर मनसेप्रमुख राज ठाकरेंनाही आमंत्रित केले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबद्दल एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात अलिकडेच झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता शिंदे गटाकडून दसरा मेळावाही हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.

मनसे नेत्यांकडून दसरा मेळावा घेण्याची मागणी
शिंदे गटाच्या या तयारीपूर्वी मनसे नेत्यांकडून राज ठाकरेंनी दसरा मेळावा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी दसऱ्याला मेळावा घ्यावा अशी मागणी करणार असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटले होते. २०१२ पर्यंत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दसऱ्याच्या दिवशी विचारांचे सोने लुटायचे. २०१२ नंतर ही परंपरा खंडीत झाली. आज राज साहेबांच्या माध्यमातून हे विचार देशातील जनतेपर्यंत पोहोचत आहेत. बाळासाहेबांचे हेच विचार दसऱ्याच्या दिवशी ऐकायला मिळावे ही देशातील हिंदू जनतेची इच्छा आहे. म्हणून आम्ही राज साहेबांना ही विनंती करणार आहोत की त्यांनी दसऱ्याला देशातील हिंदू जनतेला संबोधित करावे असे देशपांडे म्हणाले होते. यासाठी स्थळ महत्वाचे नसून विचार महत्वाचा आहे. आणि ते कोण सांगते हे महत्वाचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या विनंतीवर दसरा मेळाव्याविषयी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदेंच्या दसरा मेळाव्यात जाणार की स्वतंत्र घेणार?
या घडामोडींमुळे आता राज ठाकरे शिंदेंनी निमंत्रण दिल्यास शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यास जातील काय? किंवा कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार वेगळा दसरा मेळावा घेतील? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

गुढीपाडवा मेळाव्याची परंपरा मोडणार राज?
विशेष म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढल्यानंतरही दसरा मेळावा न घेता गुढीपाडवा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. मात्र आता मनसेकडूनही दसरा मेळाव्याचे संकेत मिळत असल्याने उद्धव ठाकरेंसमोर हे नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्याची परंपरा मोडीत काढून दसरा मेळाव्याच्या रुपाने आव्हान उद्धव ठाकरेंना आव्हान देणार का? हे बघावे लागेल.

शिवतीर्थावर आवाज कुणाचा?

या सर्वात महत्वाचे आहे ते शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा होणार? त्यामुळे आता यात पुढे होणाऱ्या घडामोडींवर सर्वांचेच लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...