आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:​​​​​​​पॅरानोया : समकालीन जगण्याची अनिवार्य नोंद

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्वदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी अशी हेमंत दिवटे यांची ओळख आहे. ‘चौतीशीपर्यंतच्या कविता’, ‘थांबताच येत नाही’ आणि ‘या रुममध्ये आलं की लाइफ सुरु होतं’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांचा नुकताच ‘पॅरानोया’ या शीर्षकाचा नवीन कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. जेमतेम ८२ पृष्ठांचा आणि तीसेक कवितांचा हा संग्रह ‘पॅरानोया’, ‘लाइफ ऑफ पर्पस’, ‘शापच आहे आपल्याला सांगत राहण्याचा’ आणि ‘नदी घेऊन सोबत आलोय’ या चिंतनाच्या चार सूत्रात विभागला गेला आहे.

नव्वदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी अशी हेमंत दिवटे यांची ओळख आहे. ‘चौतीशीपर्यंतच्या कविता’, ‘थांबताच येत नाही’ आणि ‘या रुममध्ये आलं की लाइफ सुरु होतं’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांचा नुकताच ‘पॅरानोया’ या शीर्षकाचा नवीन कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. जेमतेम ८२ पृष्ठांचा आणि तीसेक कवितांचा हा संग्रह ‘पॅरानोया’, ‘लाइफ ऑफ पर्पस’, ‘शापच आहे आपल्याला सांगत राहण्याचा’ आणि ‘नदी घेऊन सोबत आलोय’ या चिंतनाच्या चार सूत्रात विभागला गेला आहे. या संग्रहाच्या शेवटी संजीव खांडेकर यांचे एक छोटेशे टिपण जोडले आहे. पॅरानोया म्हणजे काय? असा वाचकांच्या मनातला जर थोडाफार गोंधळ असेल तर, तो गोंधळ या टिपणामुळे दूर होवू शकतो. ‘पॅरानोया म्हणजे आपल्याला कुणीतरी इजा करेल, मारून टाकेल असं वाटणारी (काल्पनिक) भीती. पॅरानोया म्हणजे खोट्याला खरे ठरवण्याचा केलेला प्रयत्न. पॅरानोया झालेल्या माणसाची भीती वाटण्याची गोष्ट जरी खरी असली तरी, ज्याची भीती वाटते, ती गोष्ट मात्र भासमानच असते.’

कवीच्या नेणीवेत हा पॅरानोया का घुसला? किंवा त्याला हा पॅरानोया का छळतोय? असे प्रश्न वाचकाला पडू शकतील. ‘मी लिहायला बसलोय आणि घरातले लोक दहशतीत वावरताहेत’ ही आठ शब्दांची कविता समकाळातल्या अनेक गोष्टींचे सूचन करते. वर्तमानाचा स्वभावधर्म स्पष्ट करण्यास पुरेशी ठरावी इतकी ती अर्थपूर्ण आहे. आपण आपल्या काळाची काही पाने उलटत थोडे मागे गेलो तरी या दहशतीचा अर्थ आपल्याला सहज उमगू शकेल. कारण अनेक प्रकारचे दृश्य- अदृश्य दबाव आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करू पाहणाऱ्या विविध स्वरूपाच्या निर्बंधांनी सध्याचा अवकाश व्यापला आहे. मूल्यहीन आदर्शवादाच्या ढोंगी आचारसंहितानी सर्वसामान्यांच्या समोर जगण्याचा एक नवा पेच तयार झाला आहे. भौतिक स्वातंत्र्य असलं तरी ते मानसिक स्तरावर उपभोगताच येवू नये इतकी टोकदार आणि अति भयप्रद सामाजिक संरचना आकाराला आली आहे. अशा संरचनेत जगणाऱ्या एका ‘कॉमनमॅन’चं हे सर्वव्यापी सांगणं आहे. जनमाणसात प्रस्थापित झालेल्या मन:स्थितीचा हा एक प्रभावी कोलाज आहे. ज्याची पार्श्वभूमी नकारात्मक पूर्वग्रहांची आणि वर्चस्वाची आहे. अशा काळात स्वतंत्रपणे बोलण्याची, विचार करण्याची क्षमताच आपण गमावून बसतो की काय? अशी भीती वाटते. राजकीय सत्तांतर घडणे हे लोकशाहीत अपेक्षितच असले तरी सत्तांतर घडल्यानंतर जो एक वैचारिक अंतर्विरोधाचा पूल तयार होतो, तो कोणत्याही लोकशाही राष्ट्रात धोकादायक असतो.

एखाद्या राजकीय विचारधारेतून हेतूपुरस्सर भीती निर्माण केली जाणे आणि दुर्दैवाने त्या विचारधारेचा प्रतिवाद करण्याची क्षमताच आपण गमावून बसणे या घटनेकडे खूप गांभीर्याने बघण्याची गरज आहे. हेमंत दिवटे यांची ही कविता वाचकाला या वास्तवाची जाणीव करून देते. या कवितेतलं अनुभवविश्व क्वचितप्रसंगी आत्यंतिक व्यक्तिगत वाटत असले तरी तो खरेतर सामुहिक सहवेदनेचा अंत:प्रवास आहे. अत्यंत सूचकपणे, प्रतिकात्मकतेने कवीने विविध गुंत्यात अडकलेल्या माणसांचा जसा चरित्रशोध घेतला आहे, तसाच ‘सेल्समन’ सारख्या कवितेतून स्वत:चं भूतकालीन जगणंही मांडलं आहे. ‘आणि ही सिगारेट संपली की/ एकटेपणा सुरु होईल/ बॉम्बच्या वातीसारखा जळत राहील/ एकटेपणा’(पृ. ३८) किंवा ‘मी काय गुन्हा केलाय की, सारखे सारखे भास होताहेत मला/ की बॉम्बस्फोट होणार आहे आत्ताच/ मॉलच्या पार्किंगमध्ये’ (पृ. १५) अशा अनामिक मानसिक भितीचाही पट उलगडला आहे. भोवताल समजून घेणारा आणि त्याचवेळी भोवतालाचं आकलन मांडणारा पॅरानोया हा एक दृष्टिकोन आहे. अर्थात हे आकलन सरळ सरळ नाही किंवा रूढ स्वरूपाचे नाही. तात्त्विक तर अजिबातच नाही. पण समस्यांच्या अतिप्राचीन प्रश्नांचे हे एक व्यापक अधोरेखन आहे. नव्या जीवनशैलीचं अधोरेखन. न्यूनगंडाच्या चिंचोळ्या पोकळीत जगणाऱ्या माणसांच्या अस्तित्वाचाच प्रश्न ही कविता ठळक करते.

वेगाने वाढत चाललेलं कार्पोरेट कल्चर आणि विविध इझमचा पडत चाललेला प्रभाव या सगळ्या घटनांनी सांस्कृतिक, भाषिक आंतरप्रक्रिया कमालीची प्रभावित झाली आहे. ‘विचारायचं नाहीये की / वस्तीतल्या सतत चिवचिवणाऱ्या चिमण्या / कुणी लावल्याहेत उडवून’ (पृ. १९) हा केवळ कवीच्या संवेदनशील मनातून उगवलेला प्रश्न नाही, तर सार्वत्रिक आणि गुंतागुंतीच्या दृश्य वास्तवाचं हे एक मानसिक संवेदन आहे. म्हणजे काहीतरी बदलतंय. जे बदलतंय ते दिसतंय. पण हे सगळं का घडतंय? याचं उत्तर कुणाकडेच नाही. ऐकणाऱ्याने असे प्रश्न निमूटपणे ऐकावेत आणि भाबडे प्रश्न म्हणून दुर्लक्ष करावं. असं काहीतरी घडत चाललंय. विविध स्वरूपाचे अहंकार बळावत चालले आहेत. कवी या वास्तवाला भिडतो. म्हणूनच या सगळ्या कथनाला एक विशिष्ट संदर्भ आहे. परिमाण आहे. जागतिकीकरण वगैरे आता जुनं झालं. त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी. म्हणजे नकारात्मक वास्तवाचा हा अनुभव आहे. गिळंकृत करणारा तीव्र आंतर्विरोध यात आहे. स्वतःचे स्वातंत्र्य, स्वत:च्या आस्थाही अबाधित राहणार नसतील तर त्रागा होणे अस्वाभाविक नाही. ‘हेही नसेल जमत तर / मीडियामध्ये नोकरी करायची न्यूज मेकरना चाटत बसायचं / पाळलेल्या कुत्र्याला गॉड म्हणायचं’ (पृ.२१) हा राजकारण आणि प्रसारमाध्यमाचाच तीव्र उपहास आहे असे नाही, तर आपल्या एकूणच सामाजिक जगण्याचाही उपहास आहे.

कवी अत्यंत उद्वेगाने समकाळाचा दांभिक चेहरा उजागर करतो. एकाअर्थाने भौतिक स्थित्यंतरासोबतच झालेल्या मानसिक, भावनिक स्थित्यंतराचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या घुसमटीचा, समकालीन अवकाशाचा हा उच्चार आहे. उत्तर आधुनिक काळातल्या अरेरावीचं, असहिष्णुतेचं पर्यावरण वेगाने आकाराला येत आहे. आणि दुर्दैवाने यात एक प्रकारचा अदृश्य उन्माद भरलेला आहे. ज्याचा कधीही, कोणत्याही निमित्ताने उद्रेक होवू शकतो. पॅरानोया हा याविषयीचा एक संताप आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं तर तो ‘पोएटिक जाळ’ आहे. जो अजिबातच निरर्थक वगैरे नाही. स्वतःच्या जगण्याचं ‘पर्पस’ शोधू पाहणारा आणि त्याचवेळी असंस्कृत, विघात्मक राजकारणाला, सामाजिकतेला पटलावर आणणाऱ्या या संतापाचा म्हणूनच खूप वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. कवीच्याच शब्दात सांगायचं तर शब्द, भाषा, मुलुख आणि नॅशनॅलिटीच्या पलीकडे जाऊन हे सगळं समजून घेण्याची गरज आहे. अन्यथा आपल्या अस्तित्वाच्या, स्वाभिमानाच्या संकल्पना बोथट व्हायला वेळ लागणार नाही. ‘लाइफ ऑफ पर्पस’ चा शोध हे त्याअर्थानेही खूप महत्त्वाचे आहे. ‘नैतिक अनैतिकतेच्या आरपार कवीचं आणि भाषेचं जे नातं असतं’ ते समजून घ्यायचं असेल तर तितक्याच संवेदनशीलतेने, तितक्याच आस्थेने आपल्याला कवीच्या या पोएटिक जाळात शिरावं लागतं. असाच पोएटिक जाळ खूप वर्षापूर्वी विद्रोही कवी तुकारामाने काढला होता. ज्याने मराठी भाषेची भिंत ढकलली होती आणि त्या ढकलण्यामुळे समकाळाला हादरे बसले होते. हेमंत दिवटे या कवीचं स्वतःच्या भाषेवर अपार प्रेम आहे. त्याचं तुकारामावरही प्रेम आहे. कारण तुकाराम हा आपला सांस्कृतिक पूर्वज आहे. म्हणून कवी भाषेच्या आधारानं या ढम्म भिंतीला पूर्ण ताकदीने ढकलण्याचा प्रयत्न करतो.

एका बाबीचा मुद्दामच उल्लेख करायला हवा. हेमंतची कवी म्हणून असलेली ओळख प्रामुख्याने महानगरी अशी आहे. आणि ते नाकारण्याचेही कारण नाही. पण महत्त्वाचं म्हणजे हेमंतच्या कवितेत जितक्या सहजतेने कार्पोरेट भाषा येते, तितक्याच सहजतेने देशी भाषाही येते. महानगरी वगैरे असूनही हा कवी भाषेच्या क्लिष्ट महाजालात अडकत नाही किंवा फिरत नाही, हे विशेष. विशेषतः ‘पॅरानोया’ हे शीर्षक वाचल्यावर ही कविता दुर्बोध वगैरे असेल असे उगीच वाटत राहते, पण तसे इथे अजिबातच घडत नाही. स्वतःची भाषा ही सर्वाधिक भरवशाची गोष्ट असते यावर कवीचा कमालीचा विश्वास आहे. आणि याचा प्रत्यय अनेक ओळींतून येतो. ‘बद्ध शरीराचं ओव्हर ऑईलिंग करून/ बंद पडलेल्या बॉडीतून/ पियानो आणि सतार वाजवून दिली जाते’ असं लिहिणारा कवी ‘नदी घेऊन आलोय सोबत’ या कवितेत ‘कवीच्या आईचं / खोल विहिरीच्या तळाला असलेल्या / किंचित झिरपत झिरपत येणाऱ्या / थेंबे थेंबे पाण्याशी / मायलेकीसारखं नातं होतं’ (पृ.६५) इतक्या उत्कट ओळी लिहितो. आई, विहीर, पाणी ही केवळ मानसिक घटनांची शृंखला नाही. तर भूतकालीन स्थितीगतीचं, आणि अभावाचंही एक संवेदन आहे. ‘पीरबाबाच्या उरुसात मी / विकली चनेचटपटी / तेव्हा मी होतो सहावीत’ (पृ.५४) हेही सत्याचं स्मरणदर्शनच आहे. कवीच्या आजच्या संपन्नतेचा अर्थ त्याच्या या पूर्वकालीन अस्वस्थतेत दडला आहे. हेमंतच्या या संग्रहात काही कविता अशा आहेत की, ज्यांची तपशीलात जावून चिकित्सा केली तर असह्य, विस्कळीत काळाचे आणि दु:खानुभवाचे कित्येक भावस्तर हाती लागतील.

‘गोष्टीच्या पठारावरच्या गवताचं नाक’ (१९), ‘बॉम्बच्या वातीसारखा जळत राहील एकटेपणा’ (३८), ‘प्रत्येक शहर एक दीर्घ कविता’ (४२), ‘मी हाडं तुटल्यासारखा हतबल’ (५६), ‘नैतिक अनैतिकतेच्या दरम्यानचा ताजा आवाज’ (५६) ‘निराश मनाची टोकदार सालं’ (६२) किंवा ‘जुनाट अभ्यास मंडळ’ (७६) अशा साध्या सोप्या प्रतिमांतून कवी अर्थाच्या वेगळ्या छटा निर्माण करतो. कारण कवीची भाषा ही खास त्याची आहे. त्याने घडवलेली आहे. या भाषेत अनुभवाची खोल संपन्नता सतत जाणवत राहते. ‘न्यू ब्रँडकविता’ आणि ‘अस्पष्टच बोलायचं तर’ या कविता तर समाज आणि राजकारणाचा सर्वोत्तम उपहास आहेत. अत्यंत कल्पकतेनं आणि भाषेच्या मोडतोडीचे प्रयोग करत कवीनं हे वास्तव मांडलय. तथाकथित राजकीय जाहीरनाम्याचं, घोषणाबाजीचं हे म्हटलं तर विडंबनही आहे. ‘अस्पष्टच बोलायचं तर तुम्ही अॅण्टि –एन्व्हारोमेंटल आहात / मुंबईचं फालतू सिंगापूर करायचं म्हणता? (पृ. ५९) या ओळीत सामान्य माणसाच्या मनातील भावना प्रकट तर होतेच, पण त्याचबरोबर महानगरीय कोलाहलाची दगदग आणि राजकीय भ्रष्टतेचे देखील सूचन होते. भरमसाठ औद्योगिकीकरण आणि त्यातून उभे राहत असलेल्या अनेक प्रश्नांच्या गाभ्यापर्यंत कवी वाचकाला घेवून जातो. त्याच्या अस्वस्थतेला गतिमान करतो. आणि शेवटी ‘रामायणात नसलेली गोष्ट’ पुढ्यात ठेऊन एक अनपेक्षित धक्का देतो. कारण ही कविता कवीच्या प्रकृतीच्या एकदम वेगळी ठरते. ‘रामायणातल्या शबरीची गोष्ट माहितये सर्वांनाच / पण तगरीची फक्त माहीत आहे मलाच’ (पृ.७७) असं म्हणत कवी एक अनोखी गोष्ट सांगतो. तर पॅरानोया म्हणजे जगण्याच्या अशा असंख्य स्तराची अनिवार्य नोंद आहे. ज्याच्यात भाषिक, सांस्कृतिक अवकाशाचे, नव्या जीवन जाणिवांचे आणि काळाचेही असंख्य संदर्भ एकवटले आहेत. या कवितांचा आशय अंतर्मुख करणारा आहे. म्हणूनच अलीकडच्या काळातला एक महत्त्वाचा कवितासंग्रह म्हणून ‘पॅरानोया’ची नोंद आवर्जून घ्यायला हवी. पॅरानोया (कवितासंग्रह ) हेमंत दिवटे प्रकाशक: पेपरवॉल मीडिया अँड पब्लिशिंग प्रा.लि. मुंबई प्रथमावृत्ती : सप्टेंबर २०२० किंमत : २५० रु. p_vitthal@rediffmail.com

बातम्या आणखी आहेत...