आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापप्पाकडं फार मुद्दे नव्हते. ‘ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं’ असं काहीतरी हताशपणे बोलत तो मोटारसायकल लोटत हाळावर घेऊन गेला. स्टँडला लावून गाडीचा एक एक पार्ट घासून धूत बसला. हे जग मला नीट समजून द्यायला पप्पाकडं शब्द नाहीत, हे मला कळत होतं...
‘तू नोकरी धर. कंपनीत हायेत वळखीचे दोघं जण. पंधरा हजार स्टार्ट मिळेल म्हणले.’ ‘नाय परवडणार ते. त्यांनाच सोळा हजार मिळतात. चार वर्षं झाले. त्यात दोन वर्षं करोनात गेले. मला कशाला पंधरा देतील पप्पा?’ ‘इथं राहून काय करणार? कांदा टिकाव धरायला तयार नाय. धा सालाआधी जेवढे मिळायचे तेवढेच मिळत्यात हल्ली शेतीत. तवा श्रीमंती वाटायची. आता तीच गरिबी वाटाया लागलीय..’ ‘नोकरी जगू देत नाय नि मरूही तं नाय..’ ‘परक्या गावात गरिबी खपून जाते. आपन आनंदात हावोत की दु:खात, कोणाला कळत नसतं तिथं..’ ‘मला आपल्याच गावात धंदा टाकायचा हाय. हायवेला धा किलोमीटरवर नवीन हॉटेल होतंय कौलारू. तिथं पानटपरी टाकायचं चाललंय..’ ‘पानटपरी चालवणार? शिक्षण गेलं का उडत मंग?’ ‘हजाराचा गल्ला कुठंच गेला नाय रोजचा. बिअर बारपण असणार हाय तिथं. सुदामभाऊंचंच हाय त्ये.’ ‘उद्या लग्नाचं पाह्यचं ठरवल्यावर काय सांगू? पोरगा एम. कॉम. हाय अन् पानटपरी चालवतो?’ ‘मग शिटीत जाऊन पंधरा हजाराची नोकरी करू? खोलीभाडं, खाण्यापिण्यावर, पेट्रोलपाण्यावर धा-बारा हजार खर्च करू? हातात काय? तीस हजार रुपये देईल पानटपरी. खर्च किती? जेमतेम धा हजार महिना. वर्षाला अडीच लाख. वावर किती देतं? खर्च जाऊन?’ ‘शेतीत, नोकरीत उत्पन्न कमी मिळालं तरी प्रतिष्ठा राहतीय..’ ‘गावं भकास व्हायला सोडायचं नि शिट्या बकाल व्हायला तिथं जायचं. कोण रमलं आजपावतो तिथं या गावातलं? आयुष्य शहरात गेलं, तरी तिथं गेलेले इथली लोकं शहरी झाले नाहीत. दसरा-दिवाळीला सुटीत शहरातून इथं त्या चार-पाच आल्टो- स्विफ्ट गाड्या आल्या की तुम्हाला प्रगती दिसायला लागते. रिटायर होईस्तो एका घराचं कर्ज फेडत राहायचं नि मग रिटायरमेन्टच्या पैशांतून पोरासाठी, त्याच्या बायकोसाठी अजून एक घर घेऊन द्यायचं. संपलं जगणं. मी जाणार नाय शिटीत. पाच एकर शेती हाय. महिना पंधरा हजार कमवून पाच वर्षांनी शहरात पन्नास लाखाचा फ्लॅट घ्यायचं स्वप्न बघण्यापेक्षा इथं तीस हजार कमवून दोन वर्षांत वावरात बंगला बांधीन.’ ‘अजून जग नाय पायलं तू, म्हणून आसं बोलतोय..’ ‘तुम्ही तं लय पायलंय ना जग इथं राहून? मग काय झालं तुमचं?’ पप्पाकडं फार मुद्दे नव्हते. ‘ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं’ असं काहीतरी हताशपणे बोलत तो मोटारसायकल लोटत हाळावर घेऊन गेला. स्टँडला लावून गाडीचा एक एक पार्ट घासून धूत बसला. हे जग मला नीट समजून द्यायला पप्पाकडं शब्द नाहीत, हे मला कळत होतं. ‘शहरात नोकरी-धंदा कर’ या पलीकडं त्याच्याजवळ फार वरं नव्हती. त्याच घरात, त्याच वावरात, त्याच गावात राहून मला तापाच्या गोळ्या माहीत झाल्या होत्या, मला मोहावरच्या फवारणीचं टेक्निक माहीत झालं होतं, नांगरायला भाड्यानं ट्रॅक्टर आणलं तर ते चालवता येत होतं, मोटार बिघडली तर स्वत: वायरिंग करून रिपेअर करता येत होती.. यातलं पप्पाला काहीच येत नव्हतं. घाबरत राह्यला सतत. कांदे इकायला दोनदा सुरतला, भाजीपाल्याच्या गाडीत बसून चारदा नाशिक मार्केटला, गावातल्या लोकांसोबत एकदा द्वारकेच्या यात्रेला... अजून थोडं कुठंमुठं.. या पलीकडं गेलाच नाय. त्यानं जग पाह्यलं नाय तं नाय, जगाला पण हा दिसला आसंल का नाय, याची शंकाच हाय. त्याला लय टायमाला सांगून झालं, की पप्पा आपण या नव्या जगात फार किरकोळ माणसं आहोत. आपलं या जगात असणं - नसणं याच्यानं काहीच बिघडत नाय जगाचं. आपलं नाव साधं इथल्या ग्रामपंचायत सदस्याला पण पटकन् घेता यायचं नाय. हा मळा अजून पण तुमच्या आजोबाच्या नावानं वळखला जातो. आता पप्पाचा आजोबा काही संत तुकाराम महाराज नव्हे. लोकांनी वळखायला. एकेकाळी शंभर एकर जमीन असणाऱ्या आजोबाच्या पणतूनं त्याच गावाच्या रस्त्यावर पानटपरी टाकल्यानं अशी कोणती मऱ्हाटशाही बुडायची बाकी राहिलीय? ‘चालू व्हईना मोटारसायकल..’ ‘पाणी गेलं आसंल प्लगमधी. मी करतो चालू. जा तुम्ही घरात, मम्मी जेवायला बोलवतेय..’ पप्पा अपयशी हालचालींनी घरात गेला. जाता जाता चार वेळा मोटारसायकलकडं बघत गेला. मग मी स्टँडवरून गाडी काढली. उताराला पळवत नेऊन स्टार्ट केली. एक राउंड मारून रेस करत घराच्या अंगणात आलो. ‘मी जाऊन येतो. वेल्डिंगवाला तिथं आलाय. हॉटेलवर. टपरीचं कामै..’ ‘जेवण आल्यावर करशील का? उशीर करू नको..’ मम्मी अजून काहीतरी बोलली, पण मोटारसायकलच्या आवाजात ऐकू नाही आलं. हायवेनं दहा किलोमीटर अंतर धा मिन्टात कापलं. अंधार पडायला आलेला. हॉटेलचं काम जोरात चाललेलं. वेल्डिंगचा उजेड आणि हायवेच्या गाड्यांच्या उजेडात तो निराळाच प्रदेश वाटायला लागला होता. ‘टपरी का वेल्डिंग आज खतम हो जायेगा. अंदर लकडीवाला फर्निचर बनाने का ना?’ ‘हां, देवराम मिस्तरी को बता दिया हय. कल आ जायेगा..’ ‘लोकेसन अच्छा है साब. उत्तर की तरफ आयेगा आपकी दुकान का शटर.’ वेल्डिंगवाल्यानं पानटपरीवाल्याला साब म्हणल्यामुळं मला बरं वाटलं. ‘नाम क्या रखोगे दुकान का?’ ‘जय तुकोबा पान मंदिर..’ ‘तुम्हारे भगवान का नाम है?’ ‘वो, पंजोबा थे! क्या बोलते हय वो - परदादा..’ मग तो काम करत बरंच बोलत राहिला. पानाची त्यांच्याकडची रेसिपी सांगत राहिला. वेल्डिंगनं एकेक तुकडा जोडताना जो लखलखाट होई, त्यातून क्षणभर समोरचं सारंच अदृश्य होऊन जाई. तो उजेड डोळ्यात साठवत मी घराकडं निघालो.. आठवडाभरात ही टपरी आकाराला येईल. मग रंगरंगोटी करू. लायटिंग करू. मध्ये लायटिंगची मोठी फ्रेम लावू महाराजांची ऐटदार. बाजूला तिरुपती बालाजींची. पाच एकर वावराएवढी जागा मिळूनही अंतिम ध्येय पिढ्यान््पिढ्या कोणाला सापडलं नाय. या पाच बाय पाच जागेत पुढच्या जगण्याची सगळी स्वप्नं मावतील तंबाखू, विड्या, सिगारेट्ससोबत.. शेतात उगवणाऱ्या हजारो हिरव्यागार पानांना काही किंमत नव्हती. इथं एकेक पान धा-वीस रुपये किमतीला विकलं जाईल.. अंतिम ध्येय इतकं सोपं नि सुटसुटीत असतं? आपल्याला कॉलेजला जाताना वाटायचं, की अंतिम ध्येय गाठायचं तर आपल्याला मुंबई, पुणे किंवा दिल्लीही जिंकावी लागंल. सीए होऊन किंवा बँकेचा मॅनेजर होऊन सारी घरातली पिढीच सालं वरच्या लेवलला घेऊन जायची होती आपल्याला.. पप्पाला जे बोलता येत नव्हतं, ते हेच होतं.. घर आलं. गाडी लावली. ‘स्टॅन्डखाली चपटा दगड घाल. भुसभुशीत जागाय..’ वाट बघत असूनही न बघत असल्यागत दाखवत पप्पा बोलला. ‘अन् ते सकाळी माल घ्यायला जाताना पैशे घेऊन जा. मम्मीकडं दिलेत.. पंचवीस हजार.’ वर्षानुवर्षे लाखो रुपयांचा व्यापार करीत असल्याच्या आनंदी ताठ्यात पप्पा बोलला.. मी ओट्यावर खिळलो. एखाद्या लखोपतीगत काडीनं बेफिकीर दात कोरत अंधाराकडं बघत बसलेल्या पप्पाकडं नि आत टीव्हीत गुंग झालेल्या मम्मीकडं पाहून मी हसलो नि हाक मारली– ‘मम्मी, जेवायला दे मला!’
दत्ता पाटील dattapatilnsk@gmail.com संपर्क : 9422762777
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.