आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:‘श्रद्धा’ जपण्यासाठी ‘सबुरी’ही हवी...

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा वालकर या तरुणीच्या क्रूर हत्येनंतर अनेक प्रश्न आपल्याभोवती घोंगावत आहेत. या प्रश्नांच्या वावटळीत भरकटण्याऐवजी भविष्यातील वादळांचा सामना कसा करायचा, याचे उत्तर आता साऱ्यांनी शोधायलाच हवे. नुसता त्रागा करून काहीच साध्य होणार नाही. कारण येणारा काळ कदाचित याहून वाईट असू शकतो. तेव्हा त्यावर आपणच मार्ग काढले पाहिजेत. समाज आणि कुटुंब व्यवस्थेने ज्या मुली, स्त्रियांकडून जाणते-अजाणतेपणी चूक घडते, त्यांच्यासाठी एक दार सदैव उघडे ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या दृष्टिकोनात बदल घडवण्याची हीच वेळ आहे.

व सईची तरुणी श्रद्धा वालकर हिच्या प्रियकराने दिल्लीत राहत्या घरी तिचा अमानुष खून केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरलाय. श्रद्धा आणि आफताब हे ‘लिव्ह-इन’ रिलेशनमध्ये राहत होते. श्रद्धाच्या खुनानंतर आता लिव्ह-इन रिलेशनशिप ही संकल्पना टीकेची धनी होतेय. भारतीय कायद्यानुसार लिव्ह इन रिलेशनशिप ही मान्यताप्राप्त संकल्पना असली, तरी प्रत्यक्षात अनेकदा कुटुंबातून याला विरोध केला जातो. ‘लिव्ह -इन’ची कायदेशीर व्याख्या पाहिल्यास, कोणताही वैवाहिक दर्जा नसताना जेव्हा एखादे जोडपे दीर्घ काळासाठी एकत्र राहते आणि लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणेच वावरते, तर याला लिव्ह इन रिलेशन म्हटले जाते. हे नाते रोमँटिक किंवा लैंगिक स्वरूपाचे असू शकते. याला वेळेचे बंधन नाही. म्हणजे लिव्ह - इन रिलेशन हे कायमस्वरूपीसुद्धा असू शकते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, विवाह, लिंग आणि धर्माच्या बाबतीत बदलत्या सामाजिक भूमिकांमुळे ही प्रथा अनेक देशांत प्रचलित झाली. भारतात लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडप्याला विशिष्ट अधिकार देणाऱ्या कायद्यांचा अभाव आहे. काही वर्षांपूर्वी एस. खुशबू विरुद्ध कन्निअम्मल आणि एनआर प्रकरणासंदर्भात निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने , ‘लिव्ह इन रिलेशनशिप धार्मिक आणि पुराणमतवादी समजुतीनुसार अनैतिक मानली जाऊ शकते, परंतु ती बेकायदेशीर नाही,’ असा निकाल दिला होता. अर्थात भारतात अशा रिलेशनशिपपेक्षा विवाह पद्धतीला महत्त्व आहे, हे महत्त्वाचे.

आपल्याकडे उघडपणे लिव्ह इनमध्ये राहण्याचे प्रमाण कमी आहे. कारण बदलत्या काळात शहरी भागामध्ये ही प्रथा प्रचलित होत असली, तरी तिला समाजमान्यता मिळत नाही. लिव्ह-इन रिलेशनशिप हा जबाबदारी आणि वचनबद्धता टाळण्याचा मार्ग आहे, शिवाय त्यामुळे नात्यात बेजबाबदारपणा येऊ शकतो, असे सांगितले जाते. लिव्ह-इन रिलेशनमधील महिलांचे घरगुती हिंसाचारापासून रक्षण करण्यासाठी कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. वास्तवात असेच संरक्षण वा याहून अधिक हक्क विवाहित स्त्रियांना कायद्याने बहाल केले असले, तरी त्यायोगे विवाहित स्त्रिया हिंसेतून मुक्त झाल्या का, याचे उत्तर नकारार्थीच येते. स्त्रीच्या वाट्याला कोणतेही नाते आले, तरी हिंसा चुकलेली नाही. लोक यासाठी विविध कारणे पुढे करत असले, तरी यामागची पार्श्वभूमी तेवढी एकच नसते. जसे की श्रद्धाचा प्रियकर आफताब याने ‘डेक्स्टर' नावाची वेब सीरीज पाहिल्यानंतर त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचली, हे जसे एक निमित्त आहे किंवा नोएडा बलात्कार प्रकरणातील आरोपी नेहमी वेब सीरीज पाहत असत, हा एक युक्तिवाद आहे किंवा नुकतेच उत्तर प्रदेशात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला धर्म बदलण्यास नकार दिल्याच्या कथित कारणापायी चौथ्या मजल्यावरून फेकून देण्यामागे त्याच्या वाचनात असलेली पुस्तके असोत; हे सर्व मुख्य मुद्दे वा प्रमुख कारणे नसतात. तरीही आपला समाज नि मीडिया त्यालाच गडद छटेत रंगवतो! असं करण्यामागे मूळ प्रश्नाला बगल देण्याचा, त्यापासून पळून जाण्याचा छुपा हेतू असतो. आपल्या देशात प्रेम अन् प्रेमामधील मालकी हक्क यामधली गल्लत, नात्यातले गैरसमज, प्रेमभंग नि एकतर्फी प्रेम अशा कारणापायी रोज आठ हत्या होतात आणि एकवीस जण आत्महत्या करतात. हे सर्व लोक काय वेब सीरीजच पाहत असतील काय? किंवा हे सर्वच जण लिव्ह-इनमध्ये राहत असतील का? खचितच नाही. विधिवत विवाह केल्यानंतरही अनेकदा महिलांवर अत्याचार होतात, प्रसंगी हत्याही होतात. त्यामुळे साप समजून भुई थोपटण्याऐवजी वास्तवाचा सामना करायला हवा.

अशा घटना घडल्या की आपले नॅरेटिव्ह सेट करणारे पब्लिक कामाला लागते, विविध राजकीय पक्ष, धार्मिक संघटना त्यात तेल ओतत राहतात आणि मूळ मुद्दा भरकटून नेहमीप्रमाणे भेदाभेद नि द्वेष पोसला जातो. अलीकडच्या काळातली ठळक घटना असे ज्याचे वर्णन करता येईल त्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणापासून ते हाथरस, कठुआच्या पीडितांचे पुढे काय झाले? लोकांनी त्यांना आपल्याला हवे असलेले धर्मरंग दिले! जे जे कुणी कुठल्याही शोषणाचे वा गुन्ह्याचे समर्थन करतात, त्यांना इतर गुन्ह्यांत आपल्या हिताची पोळी भाजण्यास अवरोध असायला हवा. मात्र, अशा घटना घडल्या की सगळ्यांची नैतिकता उफाळून येते, हे वास्तव आहे. श्रद्धाच्या आधीही अनुपमा गुलाटीचा मृत्यू अशाच प्रकारे झाला. २०१० मध्ये तिचा नवरा राजेश गुलाटी याने तिचे ७० तुकडे करून फ्रीझरमध्ये ठेवून नंतर ते फेकले होते. आफताब श्रद्धाचा छळ करत होता, तरीही तिने त्याला संधी दिली होती. तद्वतच अनुपमानेही राजेशला एक संधी दिली होता. मात्र, त्याने तिची हत्या केली. दिल्लीतील सुशील शर्मा याने १९९५ मध्ये आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या देहाचे तुकडे हॉटेलमधील तंदूर भट्टीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रातिनिधिक नोंदी आहेत. पुरुषी वर्चस्वाखाली दबलेल्या व्यवस्थेत स्त्रीला चिरडण्याची मोडस ऑपरेंडी तीच आहे. मात्र, तिचे लेबल बदलले आहे, कारण त्याआडून पुरुष आणि समाज मोकाट राहतो, त्याच्यावर कोणताही ठपका येत नाही. वरून त्याला विविध रंग दिले, की समाजाचे नि धर्माचे ठेकेदार खऱ्या प्रेमीजीवांना दांभिक नैतिकतेचे धडे द्यायला मोकळे होतात. हे वाईट आहे.

स्त्रियांनी मात्र वर्षानुवर्षे हाच राग आळवण्यात अर्थ नाही. प्रियकर, पती, मित्र, वडील, भाऊ, मुलगा यापैकी ज्याही नात्यातला पुरुष आश्वासक न वाटता शोषक वाटू लागतो, तेव्हा त्या नात्यातून स्वतःला मुक्त करून घेण्याची वृत्ती अंगी बाणवली पाहिजे. स्त्रियांना फसवणारे वा भुलवणारे हे बहुतांश करून त्यांचे मित्र, परिचित, शेजार परिसरातील वा नात्यातीलच असतात. सुरुवात मध्यस्थापासून होते, जी बहुतांश मैत्रीण वा त्या पुरुषाची परिचित असते. सर्व संवाद रेकॉर्ड करून ठेवले जातात, चॅट केले असेल, तर त्याचे स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवले जातात. मग आउटिंग म्हणजे बाहेर फिरणं होतं. इथे सर्वाधिक फसगत होते. इथे तिसरा कुणी तरी आधीच उपस्थित असतो, ज्याने सर्व शूट केलेलं असतं वा त्या मुलानेच कधी कळतेपणी, तर कधी नकळत सेल्फी घेतलेली असते, कधी व्हिडिओ शूट केलेला असतो. मुलीचे पालकांशी विश्वासाचे संबंध असले की समस्या निपटली जाऊ शकते. मात्र, असं खूप कमी घडतं. या मुली मग दिशाहीन होतात आणि अशातच कुणी एक गाठ पडतो, जो नितांत प्रेमाचे नाटक करतो. या वेळी मुलगी अजूनच गाळात रुतून बसते. आपली मुलगी काय करते? तिच्या फोनचा वापर ती कसा करते? ती कोणाशी बोलते? तिची क्लोज फ्रेंड खरेच क्लोज आहे का? तिची मैत्रीण / मित्र कोण नि कसे आहेत? ती बाहेर कुठेही गेली तरी तिच्या येण्याजाण्याची खरी तंतोतंत माहिती बहुतांश पालकांना नसते. मुलीला त्यांना हे सर्व सांगावे वाटते, पण कधी भीती आड येते, कधी आई-वडील जुनाट विचारांचे वाटतात, तर कधी कसं सांगायचं हा मुद्दा असतो.

कधी ‘थ्रिल’ची अनुभूती खुणावत असते, कधी तारुण्यसुलभ भावनांनी तिच्या भावना आवेगांवर ताबा मिळवलेला असतो, तर कधी पालकांनी धाकदपटशाचा अवलंब केलेला असतो! याहीव्यतिरिक्त आणखी बरीच कारणे असतात, जसे की पालकांचेच आपसात पटत नसते, घरात सतत कलह सुरू असतात, मुलींना प्रायव्हसी नसते आदी. या वयातील मुलींना कुणी दूषणे देत असेल, तर त्या व्यक्तीची कीव करावी वाटते. कारण मुलींवर दोषाचे खापर फोडून झाले की समाज, कुटुंबव्यवस्था आपले हात झटकण्यास मोकळी झालेली असते! हे वास्तव लक्षात घेता, या पिढीतील मुलींशी त्यांना समजेल अशा पद्धतीने आणि रुचेल अशा शैलीनेच बोलले पाहिजे. किंबहुना, नुसतं बोलण्यावर न थांबता त्यांना बोलतं केलं पाहिजे. काय योग्य, काय अयोग्य हे समजावून सांगितलं पाहिजे. कोणती खबरदारी घेतली पाहिजे, विश्वास टाकण्याआधी कोणत्या बाबी तपासून घेतल्या पाहिजेत, हे मुलींना अगदी सहजी समजवता येतं. नुसता त्रागा करून काहीच साध्य होणार नाही. कारण येणारा काळ कदाचित याहून वाईट असू शकतो. तेव्हा आपणच मार्ग काढले पाहिजेत. समाज आणि कुटुंबव्यवस्थेने ज्या मुली, स्त्रियांकडून जाणते-अजाणतेपणी चूक घडते, त्यांच्यासाठी एक दार सदैव उघडे ठेवले पाहिजे. त्यासाठी आपल्या दृष्टिकोनात बदल घडवण्याची हीच वेळ आहे. अखेर कुटुंबातली ‘श्रद्धा’ जपायची, तर जाणत्यांना नात्यामध्ये ‘सबुरी’ही आणावी लागेल.

समीर गायकवाड sameerbapu@gmail.com

बातम्या आणखी आहेत...