- Marathi News
- Dvm originals
- Pegasus Spyware Claims To Have Spied On More Than 40 Journalists Of India, Know Everything About This Spyware
एक्सप्लेनर:पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून भारतात 40 हून अधिक पत्रकारांची हेरगिरी केल्याचा दावा, जाणून घ्या या स्पायवेअरबद्दल A to Z
- याविषयी जाणून घेऊयात सविस्तर...
2019 मध्ये राज्यसभेत चर्चेचे कारण ठरलेले पेगासस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 'द वायर' या न्यूज पोर्टलने आपल्या अहवालात दावा केला आहे की, भारत सरकारने 2017 ते 2019 याकाळात सुमारे 300 भारतीयांची हेरगिरी केली आहे. या लोकांमध्ये पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी नेते आणि बिझनेसमन यांचा समावेश आहे. सरकारने पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून या लोकांचे फोन हॅक केले. या अहवालानंतर सरकारने सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
2019 च्या निवडणुकीपूर्वी शोधपत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींची हेरगिरी सुरू झाली
‘फॉरबिडन स्टोरीज’ आणि ‘अॅमनेस्टी इंटरनॅशनल’ नुसार, भारतात ज्या लोकांची हेरगिरी झाली त्यात काही ज्येष्ठ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी ही हेरगिरी सुरू
करण्यात आली. यात बहुतांश पत्रकार शोधपत्रकारिता करणारे होते. वॉशिंग्टन पोस्टनुसार, या पत्रकारांची नावे लवकरच जाहीर होतील. या पत्रकारांच्या मोबाइलमध्ये स्पायवेअरचे ट्रेस सापडले आहेत.
या माध्यमातूनच त्यांच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती लीक होत राहिली.
पेगासस यापूर्वी बर्याच वेळा चर्चेत आला होता. 2019 मध्ये, व्हाट्सअॅपने पेगासस बनविणार्या कंपनीवरही दावा ठोकला होता.
पेगासस म्हणजे काय? त्याच्या चर्चेत येण्याचे नवीन कारण काय आहे? हे स्पायवेअर कसे कार्य करते? आणि यापूर्वी पेगासस बद्दल कोणते वाद आहेत, याविषयी जाणून घेऊयात सविस्तर...
सर्वप्रथम हे प्रकरण काय आहे आणि का पेगासस चर्चेत आले आहे?
- फ्रान्सची संस्था ‘फॉरबिडन स्टोरीज’ आणि ‘अॅमनेस्टी इंटरनॅशनल’ यांनी मिळून सर्व माहिती एकत्रित केली आहे. यानुसार, यांच्याकडे जवळपास 50,000 फोन नंबरची यादी आहे. या संस्थांचा असा दावा आहे की, हे सर्व फोन नंबर पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून हॅक करण्यात आले आहेत.
- या दोन्ही संस्थांनी ही यादी जगभरातील 16 मीडिया संस्थांसोबत शेअर केली आहे. अनेक आठवड्यांच्या तपासानंतर हे उघड झाले आहे की, इस्रायली कंपनी एनएसओचे स्पायवेअर 'पेगासस’च्या माध्यमातून जगभरातील सरकारे पत्रकार, नेते, जज, वकील, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी करत आहेत.
- या यादीत भारताचे नावही आहे. 'द वायर' या न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, हेरगिरी केलेल्या लोकांमध्ये 300 भारतीय लोकांची नावे समाविष्ट आहेत. इस्त्रायली कंपनीने बनविलेले स्पायवेअर पेगासस हेरगिरीसाठी वापरले जाते.
ग्रीक पौराणिक कथेतील पेगासस हा पंख असलेला घोडा आहे. इस्त्रायली सॉफ्टवेअरने आपल्या कंपनीचा लोगोही या काल्पनिक घोड्यावर बनविला आहे. काहीवर्षांपूर्वी फेसबुकने ही कंपनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे.
पेगासस म्हणजे काय?
- पेगासस हे एक स्पायवेअर आहे. स्पायवेअर म्हणजे हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर. याद्वारे कोणताही फोन हॅक केला जाऊ शकतो. हॅकिंगनंतर त्या फोनचा कॅमेरा, माईक, मेसेजेस आणि कॉल यासह सर्व माहिती हॅकरवर जाते. हे स्पायवेअर इस्त्रायली कंपनी NSO ग्रुपने बनवले आहे.
- या यादीमध्ये भारतात कोणाची नावे समाविष्ट आहेत? वॉशिंग्टन पोस्ट आणि द गार्डियन यांच्यानुसार, आतापर्यंत 40 भारतीय पत्रकार, तीन प्रमुख विरोधी नेते, मोदी सरकारमधील दोन मंत्री आणि एका न्यायमूर्तींची हेरगिरी झाल्याच्या वृत्ता दुजारा मिळाला आहे. पण त्यांची नावे सांगण्यात आलेली नाही.
- पण काही बातम्यांत असे समोर येत आहे की, हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेसच्या प्रमुख पत्रकारांची हेरगिरी झाली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दावा केला आहे की, भारतात हिंदुस्तान टाइम्सचे शिशिर गुप्ता आणि द वायरचे सिद्धार्थ वरदराजन यांची हेरगिरी झाली आहे.
यापूर्वी पेगासस कधी चर्चेत होता?
- पेगासस सर्वप्रथम 2016 मध्ये चर्चेत आला होता. युएईचे मानवाधिकार कार्यकर्ते अहमद मन्सूर यांना अज्ञात क्रमांकावरून अनेक एसएमएस आले होते, ज्यात अनेक लिंक पाठविण्यात आल्या होत्या.
- जेव्हा अहमद यांना या मेसेजबद्दल शंका आली तेव्हा त्यांनी हे मेसेज सायबर तज्ज्ञांकडून तपासले. तपासात असे समोर आले आहे की, जर अहमद यांनी मेसेजवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले असते तर पेगासस त्यांच्या फोनमध्ये डाउनलोड झाला असता.
- 2 ऑक्टोबर 2018 रोजी सौदी अरेबियन पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाच्या चौकशीत पेगाससचे नावही समोर आले होते. जमाल खाशोगी यांच्या हत्येपूर्वी त्यांची हेरगिरी केली जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता.
- 2019 मध्येही पेगासस चर्चेत होता. तेव्हा व्हॉट्सअॅपने म्हटले होते की, पेगाससच्या माध्यमातून सुमारे 1400 पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची व्हॉट्सअॅप माहिती त्यांच्या फोनवरून हॅक केली गेली. हे प्रकरण काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेत उचलून धरले होते आणि सरकारवर अनेक आरोप केले होते.
- याशिवाय हे स्पायवेअर बेकायदेशीरपणे वापरल्याचा आरोपही मेक्सिकन सरकारवर करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर भारत सरकारचे काय म्हणणे आहे?
- या संपूर्ण प्रकरणावर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत एक मजबूत लोकशाही आहे आणि ते आपल्या नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकारासाठी पूर्णपणे समर्पित आहे. सरकारवर हेरगिरी करण्याचे आरोप निराधार आहेत.
या प्रकरणात सरकारची काय भूमिका आहे?
- पेगासस सॉफ्टवेअर इस्त्रायलची कंपनी एनएसओच विकते. कंपनीने सांगितल्यानुसार, हे सॉफ्टवेअर कोणत्याही खासगी कंपनीला विकत नाही, केवळ सरकार आणि सरकारी संस्थांना वापरण्यासाठी देते. याचा अर्थ असा आहे की, जर याचा वापर भारतात केला गेला असेल तर कुठेतरी सरकार किंवा सरकारी संस्था यात सामील आहेत.
पेगासस कसे काम करतो?
- सायबर सुरक्षा संशोधन गट सिटीझन लॅबच्या म्हणण्यानुसार, एखाद्या डिव्हाइसवर पेगासस इंस्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या पद्धती वापरतात. याचा एक मार्ग म्हणजे टार्गेट डिव्हाइसवर मेसेजद्वारे "एक्सप्लॉइट लिंक" पाठविली जाणे. यूजरने या लिंकवर क्लिक करताच फोनवर पेगासस इंस्टॉल होते.
- एसएमएस, व्हॉट्सअॅप, आय मेसेज यापैकी एका माध्यमातून स्पायवेअर फोनमध्ये येतो. पेगाससच्या माध्यमातून ज्याला लक्ष्य करायचे असते, त्याच्या फोनवर एसएमएस, व्हॉट्सअॅप, आय मेसेज (आयफोनवर) किंवा इतर प्रकारे लिंक पाठवली जाते. अशा संदेशातून लिंक पाठवल्या जातात की, त्यावर ती व्यक्ती एक वेळ क्लिक करेल.
- एका क्लिकवर स्पायवेअर फोनमध्ये अॅक्टिव होतो. एकदा अॅक्टिव्ह झाला की, तो फोनमधील एसएमएस, ई-मेल, व्हॉट्सअॅप चॅट, कॉन्ट्रॅक्ट बुक, जीपीएस डाटा, फोटो, व्हिडिओ लायब्ररी, कॅलेंडर असेप्रत्येक अॅप भेदतो.
- एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅट, फोन/व्हिडिओ, अॅक्टिव्ह मायक्रोफोन, अॅक्टिव्ह कॅमेरा, कॉल रेकॉर्डिंग, जीपीएस डाटा, कॅलेंडर, कॉन्टॅक्ट बुक मधील महत्त्वाची माहिती नियमित लीक होत राहते.
- 2019 मध्ये, जेव्हा पेगासस व्हाट्सअॅपद्वारे डिव्हाइसवर इंस्टॉल केले गेले, तेव्हा हॅकर्सने एक वेगळी पद्धत अवलंबली होती. त्यावेळी हॅकर्सनी व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉल फीचरमधील एका उणीवे (बग)चा फायदा घेतला. बनावट व्हॉट्सअॅप अकाउंटद्वारे हॅकर्सनी टार्गेट फोनवर व्हिडिओ कॉल केले. याच वेळी एका कोडद्वारे पेगासस फोनमध्ये इंस्टॉल केले गेले होते.
एकदा आपल्या फोनवर पेगासस इंस्टॉल होताच तुमची कोणकोणती माहिती चोरली जाते?
- एकदा तुमच्या फोनवर पेगासस इंस्टॉल झाल्यावर पेगाससला हॅकर कमांड आणि कंट्रोल सर्व्हरद्वारे सूचना दिली जाऊ शकते.
- तुमचे पासवर्ड, कॉन्टॅक्ट नंबर्स, लोकेशन, कॉल्स आणि मेसेजेस देखील रेकॉर्ड केले जाऊ शकतात आणि कंट्रोल सर्व्हरवर पाठविले जाऊ शकतात.
- पेगासस तुमच्या फोनचा कॅमेरा आणि माईकसुद्धा आपोआप चालू करू शकतो. तुमचे रिअल टाइम लोकेशनदेखील हॅकरला माहित असते.
- यासह, हॅकरकडे तुमच्या ई-मेल, एसएमएस, नेटवर्क डिटेल्स, डिव्हाइस सेटिंग्ज, ब्राउझिंग हिस्ट्रीची देखील माहिती असते. म्हणजेच एकदा तुमच्या डिव्हाइसवर पेगासस स्पायवेअर इंस्टॉल झाल्यानंतर, तुमची सर्व माहिती हॅकरसाठी उपलब्ध असते.
पेगासस इतके प्रसिद्ध का आहे?
- एकदा इंस्टॉल झाल्यानंतर पेगासस फोनवर कोणतेही फुटप्रिंट सोडत नाही. म्हणजेच आपला फोन हॅक झाल्यास आपणास कळणारदेखील नाही.
- हे कमी बँडविड्थवर देखील काम करू शकते. यासह, फोनची बॅटरी, मेमरी आणि डेटा देखील कमी वापरला जातो जेणेकरून फोन हॅक झाल्याबद्दल शंका येत नाही.
- अँड्रॉइडपेक्षा अधिक सुरक्षित समजल्या जाणार्या आयफोनच्या आयओएसलाही हे हॅक करता येऊ शकते.फोन लॉक केलेला असतानाही पेगासस आपले काम करत राहतो.