आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाधारण 2001 सालची गोष्ट आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ भारताच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान ते दिल्लीतील दर्यागंजमधील नहरवाली हवेलीत पोहोचले. येथे 20 मिनिटे थांबले आणि अनेक वेळा भावूक झाले. वास्तविक ही हवेली मुशर्रफ यांचे वडिलोपार्जित घर होते. स्वातंत्र्यानंतर मुशर्रफ यांचे कुटुंब पाकिस्तानात गेले होते.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी दुबईत निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. एमायलॉयडोसिस आजारामुळे ते गेल्या तीन आठवड्यांपासून दुबईत रुग्णालयात दाखल होते. दिल्लीच्या दर्यागंजमध्ये बालपण घालवलेले मुशर्रफ, पाकिस्तानात जाऊन शक्तिशाली हुकूमशहा बनणे आणि नंतर आपल्याच देशातून पळून जाणे आणि दुबईत आश्रय घेणे हे चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये परवेझ मुशर्रफ यांचची कथा सांगणार आहोत की दिल्लीत बालपण घालवलेला मुलगा पाकिस्तानच्या सर्वोच्च पदावर कसा पोहोचला?
दिल्लीत जन्म, आजोबा टॅक्स कलेक्टर
परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी दिल्लीतील दर्यागंज भागातील एका अत्यंत श्रीमंत कुटुंबात झाला. त्याला दिल्लीचा जुना भाग म्हणतात. आजोबा टॅक्स कलेक्टर करणारे होते. वडीलही ब्रिटिश राजवटीत मोठे अधिकारी होते. आई अलीगड मुस्लिम विद्यापीठात शिकवायची. जुन्या दिल्लीत मुशर्रफ कुटुंबाची मोठी कोठी होती. मुशर्रफ त्यांच्या जन्मानंतर चार वर्षे येथेच राहिले.
परवेझ मुशर्रफ यांच्या आई बेगम जरीन मुशर्रफ यांनी 2005 मध्ये भारत भेटीदरम्यान लखनौ, दिल्ली आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला भेट दिली. जरीन 1940 मध्ये येथे शिकत होत्या.
फाळणीनंतर कुटुंब पाकिस्तानातील कराची येथे स्थायिक झाले
1947 मध्ये फाळणीनंतर मुशर्रफ यांचे कुटुंब कराचीला गेले. त्यावेळी मुशर्रफ अवघे 4 वर्षांचे होते. ब्रिटिशांसाठी काम करणारे मुशर्रफ यांचे वडील पाकिस्तानच्या नव्या सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी झाले. त्यांची काही काळासाठी तुर्कस्तानात बदलीही झाली होती. 1957 मध्ये संपूर्ण कुटुंब पुन्हा पाकिस्तानात परतले. अशा रीतीने पाकिस्तान या नव्या देशातही आपला प्रभाव निर्माण करण्यात त्याचे कुटुंब यशस्वी झाले.
वयाच्या 21 व्या वर्षी सैन्यात भरती, 1965 च्या युद्धात शौर्यासाठी पदक मिळाले
मुशर्रफ यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण लाहोरच्या फॉरमन ख्रिश्चन कॉलेजमध्ये केले. कॉलेजमधले ते उत्तम खेळाडू होते. ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजमध्येही त्यांनी शिक्षण घेतले. 1961 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी ते पाकिस्तानच्या मिलिटरी अकादमीत दाखल झाले. 3 वर्षांनंतर वयाच्या 21 व्या वर्षी परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी लष्करात कनिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाले.
1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सेकंड लेफ्टनंट होते. पाकिस्तान हे युद्ध हरला होता. असे असतानाही शौर्याने लढल्याबद्दल मुशर्रफ यांना पाकिस्तान सरकारने पदक दिले.
नवाझ शरीफ यांनी लष्करप्रमुख केले, त्यांनाच पदच्युत केले
1997 मध्ये पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून नवाझ शरीफ पंतप्रधान झाले. नवाज यांनी सत्तेत येताच प्रशासनापासून लष्करापर्यंत आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना स्थान दिले. 1998 मध्ये जनरल परवेश मुशर्रफ यांना पाकिस्तानचे लष्करप्रमुख बनवण्यात आले.
लष्कराची कमान हाती येताच मुशर्रफ यांनी नवाज यांना न सांगता कारगिल युद्धाचे नियोजन केले. त्यामुळे संतप्त झालेल्या नवाज यांनी कारगिलमधील पाकिस्तानच्या पराभवासाठी मुशर्रफ यांना जबाबदार धरले. मुशर्रफ यांच्याकडे लष्कराची कमान सोपवणे ही त्यांची सर्वात मोठी चूक असल्याचे ते म्हणाले.
मुशर्रफ आणि शरीफ यांच्यातील तणाव कमी होण्याऐवजी वाढतच गेला. 11 ऑक्टोबर रोजी मुशर्रफ यांना लवकरच पदावरून हटवले जाऊ शकते अशी माहिती मिळाली. यानंतर 12 ऑक्टोबर 1999 रोजी मुशर्रफ श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाले.
दुसरीकडे, मुशर्रफ यांना हटवण्यासाठी नवाज यांनी गुप्तचर विभागाचे प्रमुख जनरल झियाउद्दीन यांच्यासोबत इस्लामाबादमध्ये गुप्त बैठक घेतली. मुशर्रफ यांना याचा सुगावा लागताच त्यांनी आपले विश्वासू अधिकारी जनरल अझीझ खान, जनरल एहसान उल हक आणि जनरल महमूद यांना सत्तापालट करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर नवाझ शरीफ यांना मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली आणि दहशतवाद पसरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. नंतर त्यांना कुटुंबातील 40 सदस्यांसह सौदी अरेबियाला पाठवण्यात आले.
जनरल मुशर्रफ यांनी त्यांच्या 'इन द लाइन ऑफ फायर - अ मेमोयर' या चरित्रात लिहिले आहे की, त्यांनी कारगिल काबीज करण्याची शपथ घेतली होती, परंतु नवाझ शरीफ यांच्यामुळे ते ते करू शकले नाहीत.
मुशर्रफ यांनी शरीफ यांना कारगिल कटाचा सुगावा लागू दिला नाही
फेब्रुवारी 1999 मध्ये, भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोरला ऐतिहासिक बस प्रवास केला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि वाजपेयी यांची लाहोरमध्ये झालेली भेट जगभर चर्चेची ठरली.
वाजपेयींचा लाहोर बस प्रवास हा भारत-पाकिस्तान संबंधांना कलाटणी देणारा बिंदू मानला जातो. मात्र या बस प्रवासानंतर अवघ्या तीन महिन्यांतच दहशतवाद्यांच्या वेशात पाकिस्तानी लष्कराने कारगिल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तो भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देऊन हाणून पाडला.
3 मे ते 26 जुलै 1999 दरम्यान चाललेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्धाचे खरे सूत्रधार परवेझ मुशर्रफ यांना मानले जाते. कारगिल युद्धाकडे भारताच्या शांतता प्रयत्नांना बाधा आणण्याचा सर्वात मोठा प्रयत्न म्हणून पाहिले जाते.
कारगिल युद्धाच्या वेळी देशाचे लष्करप्रमुख असलेले वेद प्रकाश मलिक यांनी त्यांच्या 'फ्रॉम सरप्राइज टू व्हिक्टरी' या पुस्तकातील 'द डार्क विंटर' या अध्यायात लिहिले आहे की, परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल कटाचा सुगावा कोणालाही लागू दिला नाही. याबाबत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही अंधारात ठेवले होते.
मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट आखली होती
या पुस्तकानुसार कारगिल युद्धाची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट मुशर्रफ यांनी आखली होती. पाकिस्तानच्या नौदल आणि हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांच्या योजनेची माहिती नव्हती.
पुस्तकानुसार, मुशर्रफ यांच्या लक्षात आले की भारतीय गुप्तचर संस्था RAW ची पोहोच पाकिस्तानी लष्करात खूप खोलवर आहे. त्यामुळेच त्यांनी कारगिल योजनेची माहिती आपल्याच लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचू दिली नाही.
कारगिलशी संबंधित माहिती जितकी लोकांपर्यंत पोहोचेल तितकी ती लीक होण्याचा धोका अधिक असेल, हे मुशर्रफ यांना माहीत होते, त्यामुळे त्यांनी ती सर्वांपासून लपवून ठेवली, असे या पुस्तकात सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानी लष्करासोबतच दहशतवाद्यांच्या पथकांनीही नियंत्रण रेषा ओलांडली आहे, हे पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहीत नव्हते. भारतीय लष्कराची दिशाभूल करण्यासाठी मुशर्रफ यांनी दहशतवाद्यांना बाल्टी आणि पश्तो या स्थानिक भाषांमध्ये खोटे संदेश प्रसारित करायला लावले. जेणेकरून भारतीय गुप्तचर यंत्रणांना समजेल की कारगिलमध्ये केवळ दहशतवादीच आले आहेत, पाक सैन्य नाही.
कारगिल युद्धातील आपली भूमिका पाकिस्तानने नेहमीच नाकारली आहे. पण परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्या 'इन द लाइन ऑफ फायर' या आत्मचरित्रात कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराचाही सहभाग असल्याचे मान्य केले आहे.
मुशर्रफ यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कागरिल युद्धाची योजना आखल्याचं समजतं. एवढेच नाही तर कारगिलमधील पराभवाचा पेच टाळण्यासाठी मुशर्रफ यांनी आपल्या आत्मचरित्रात नवाझ शरीफ यांच्यावर पराभवाचा ठपका ठेवत शरीफ यांनी कारगिल युद्धातून माघार घेण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे.
मुशर्रफ यांच्या डोक्यातून निघालेल्या कारगिल युद्धाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले आणि शांतता प्रयत्नांना खीळ बसली.
हट्टी वृत्तीमुळे आग्रा परिषद अयशस्वी झाली
14 जुलै 2001 रोजी आग्रा शहरात अनेक ठिकाणी भारत आणि पाकिस्तानचा ध्वज एकत्र लावण्यात आला होता. 1999 च्या युद्धानंतर अवघ्या दोन वर्षांनी दोन्ही देशांचे झेंडे एकत्र पाहून जगाला धक्का बसला. वास्तविक, दोन्ही देशांचे झेंडे एकत्र लावून भारत आणि पाकिस्तानमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न झाला.
14 ते 16 जुलै दरम्यान आग्रा येथे झालेल्या या परिषदेत भारताकडून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भाग घेतला होता. या भेटीचे व्यासपीठ तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी तयार केले होते. या भेटीत दोन्ही देशांमध्ये मैत्री होता होता राहिली.
कारण ही परिषद एक प्रकारे अनिर्णितच राहिली. खरे तर आग्रा परिषदेत मुशर्रफ आणि अडवाणी यांच्यात चर्चेची पहिली फेरी होणार होती. या संवादादरम्यान अडवाणी आणि परवेझ मुशर्रफ या दोघांनीही दोन्ही देशांमध्ये लपून बसलेल्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मान्य केले होते.
यानंतर अडवाणी म्हणाले की, या कराराची औपचारिक अंमलबजावणी होण्यापूर्वी, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या दाऊद इब्राहिमला तुम्ही भारताकडे सुपूर्द केल्यास शांतता प्रक्रिया पुढे नेण्यास मोठी मदत होईल. पण हे ऐकून मुशर्रफ यांचे भाव बदलले आणि त्यांनी करार स्वीकारण्यास नकार दिला. अशा प्रकारे भारताशी मैत्री न होण्यामागे मुशर्रफ यांची हट्टी वृत्ती जबाबदार मानली जाते.
2019 मध्ये न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली, म्हटले - जर आधी मृत्यू झाला तर मृतदेह इस्लामाबादच्या चौकात 3 दिवस लटकवा.
परवेज मुशर्रफ यांना 2019 मध्ये इस्लामाबादमधील विशेष न्यायालयाने संविधान बदलल्यासाठी देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. देशाच्या इतिहासात मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले ते पहिले लष्करी शासक होते. न्यायालयाने सुमारे 167 पानांमध्ये आपला निर्णय तपशीलवार लिहिला होता.
जर परवेझ मुशर्रफ यांचा शिक्षेपूर्वी मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह तीन दिवस इस्लामाबादमधील डी चौकात ओढून लटकवण्यात येईल, असे या निर्णयात म्हटले आहे. मात्र, नंतर लाहोर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.