आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Pig Heart Transplant To Human | 57 Year Old Man Receives 1st Genetically Modified Pig Heart Transplant

वैज्ञानिक चमत्कार:अमेरिकेत मानवी शरीरामध्ये वराहाच्या हृदयाचे प्रत्यारोपण, पहिल्यांदाच 57 वर्षीय पुरुषात लावले डुकराचे हृदय

मेरीलँड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील डॉक्टरांनी वैज्ञानिक संशोधनात आणखी एक पाऊल टाकत चक्क माणसाच्या शरीरात डुकराचे हृदय प्रत्यारोपित करून दाखविले आहे. तत्पूर्वी डुकरात जेनेटिकल मॉडिफिकेशन (अनुवांशिक बदल) करण्यात आले होते. 57 वर्षांच्या एका पुरुषामध्ये हे हृदय लावण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी जाहीर केली आहे. तब्बल 7 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या शरीरात सुधारणा होत आहेत. तरीही हे प्रत्यारोपण कितपत यशस्वी ठरले हे आताच सांगणे योग्य ठरणार नाही.

मेरिलँड येथे राहणारे डेविड बेनेट गेल्या कित्येक वर्षांपासून हृदयरोगाच्या समस्येला तोंड देत होते. त्रास इतका वाढला की मृत्यू अटळ होता. त्यातच संशोधकांनी पर्याय म्हणून वराहाचे हृदय प्रत्यारोपित करण्याचा निर्णय घेतला. डेविड यांच्याकडे मृत्यू स्वीकारणे किंवा जगातील पहिल्याच अशा पद्धतीच्या ट्रान्सप्लांटचा प्रयोग स्वतःवर अजमावून पाहणे हे दोनच पर्याय होते. डेविड यांनी जगण्याची उमेद सोडली नाही. तसेच या ट्रान्सप्लांटला होकार दिला. हा प्रयोग आंधारात बाण सोडण्यासारखा होता. त्यानुसार, शुक्रवारी डेविड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.

दशकांपासून वराहाच्या वॉल्वचा वापर होतोच

सर्जरी करणारे डॉ. बार्टली ग्रिफिथ यांनी सांगितले, की सर्जरी केल्यानंतर आम्हाला रोज नवीन माहिती मिळत आहे. प्रत्यारोपणाच्या निर्णयानंतर आणि त्यातही रुग्णाच्या चेहऱ्यावर फुललेले हसू पाहून आम्ही समाधानी आहोत. आतापर्यंत डुकराच्या वॉल्वचा वापर मानवी शरीरासाठी करण्यात येत होता. पूर्ण हृदय त्याच जनावराचे लावण्याची ही पहिली वेळ आहे.

डॉक्टरांनी पुढे सांगितल्याप्रमाणे, हा प्रयोग पुढे जाऊन यशस्वी ठरल्यास हा एक वैज्ञानिक चमत्कार मानला जाईल. यासोबतच, गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या प्रयोगांमध्ये ही शस्त्रक्रिया मैलाचा दगड ठरेल. ट्रान्सप्लांट झाले तेव्हापासूनच आम्ही रुग्णावर आणि त्या हृदयावर नजर ठेवून आहेत. आतापर्यंत सर्व काही योग्यरित्या काम करत आहे. येत्या काही दिवसांत येणारे परिणाम यात सर्वात महत्वाचे ठरणार आहेत.

वराहाचेच हृदय का?

ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या रिपोर्टनुसार, इतर प्राण्यांच्या तुलनेत डुकराचे हृदय मानवी शरीरात प्रत्यारोपित करण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे. परंतु, वराहांच्या सेल्समध्ये एक अल्फा-गल शुगर सेल असतो. या सेल्स मानवी शरीर स्वीकारत नाही. डुकराचे ऑर्गन जशास तसे लावल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे, या समस्येचे समाधान काढताना आधीच डुकरात जेनेटिक मॉडिफिकेशन करण्यात आले होते.

FDA कडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

जगभरातील प्रयोगशाळांमध्ये मानवी शरीरात प्रत्यारोपित करण्यासाठी कृत्रिम अंग विकसित करण्याचे प्रयोग सुरू आहेत. त्यात डुकराचे मॉडिफाइड ऑर्गन वापरण्याचा पर्याय उपयुक्त ठरत आहे. या ऑपरेशनमध्ये वापरण्यात आलेले वराहाचे हृदय युनायटेड थेरेप्यूटिक्सची सहाय्यक कंपनी रेविविकोरच्या एका लॅबमधून आले होते. अमेरिकेतील Foods And Drugs Administration (FDA) ने याच्या वापरासाठी आपत्कालीन मंजुरी दिली होती.

1984 मध्ये लावले होते वानराचे हृदय

मेरीलँड विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मुहंमद मोहिउद्दीन यांनी सांगितले, की शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्यास लाखो लोकांच्या जगण्याचा मार्ग मोकळा होईल. यापूर्वी अशा प्रकारचा एकही प्रयोग यशस्वी ठरलेला नाही. 1984 मध्ये मुलाच्या शरीरात बबून (वानराचा एक प्रकार) हृदय प्रत्यारोपित करण्यात आले होते. परंतु, तो मुलगा सर्जरीनंतर केवळ 21 दिवस जगू शकला.

एका लाखापेक्षा जास्त अमेरिकन लोक ऑर्गनच्या प्रतीक्षेत

अमेरिकेत सद्यस्थितीला 1 लाख 10 हजारांपेक्षा अधिक लोकांना ऑर्गनच्या प्रतीक्षेत आहेत. अमेरिकेत दरवर्षी 6 हजार रुग्णांचा ट्रान्सप्लांटसाठी ऑर्गन नसल्याने मृत्यू होतो. युनायटेड नेटवर्क फॉर ऑर्गन शेअरिंगच्या आकडेवारीप्रमाणे, गेल्या वर्षभरात अमेरिकेत 3800 पेक्षा अधिक लोकांचे ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले आहे.

न्यूयॉर्कमध्ये डुकराच्या किडनीचा प्रयोग

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्कमध्ये झालेले प्रत्यारोपण जगभरात चर्चेचा विषय ठरले होते. यामध्ये एका ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात जेनेटिकली मॉडिफाइड डुकराची किडनी लावण्यात आली होती. या किडनीने काही तास कामही केले होते. परंतु, हा प्रयोग हवा तसा यशस्वी झाला नाही. न्यूयॉर्कमध्ये एक्सपेरिमेंट टीमचे नेतृत्व करणारे डॉ. रॉबर्ट मोंटगोमेरी स्वतः हृदयाच्या समस्येला सामोरे जात आहेत. अमेरिकेत झालेल्या डुकराच्या हृदयचे ट्रान्सप्लांट यासंदर्भात ऐकले तेव्हापासून खूप उत्साही असल्याचे ते म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...