आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक टपाल दिन विशेष:मोबाइल खिशात व्हायब्रेट होतो, पण गदगदून हलवू शकतं ते पत्र...कवी, पटकथालेखक अरविंद जगताप यांनी खुला केला हृदयाचा हळवा कप्पा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरविंद जगताप (प्रसिद्ध कवी, पटकथालेखक)
ई-मेल, व्हॉट्सअॅपच्या युगात अवघ्या एका सेकंदात संदेश पोहोचवला जातोय. पण कधी काळी आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या पत्रांनी प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतला. जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध कवी, गीतकार पटकथालेखक अरविंद जगताप यांनी पत्राच्या माध्यमातून हृदयाचा हळवा कप्पा ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी खुला केला तो त्यांच्याच शब्दांत….

पत्र आणि माझं नातं खास आहे. शाळेत असल्यापासून मी मोठमोठ्या लेखकांना पत्र पाठवायचो. त्यांचं पत्र आलं की किती आनंद व्हायचा. लहानपणी खूप नातेवाइक, शेजाऱ्यांना पत्र लिहून देत असे. पण आता माझ्या शब्दांचा आवाज झाला. आता माझ्या पत्रांना खूप मोठी ओळख मिळाली. इथे मला माझ्या पत्रांविषयी नाही सांगायचं. पत्र या आपल्या आयुष्यातल्या हळव्या कप्प्यात डोकवायचंय.अजूनही कुणी पत्रं पाठवंल की खूप छान वाटतं. सुंदर अक्षरवाल्या माणसांचा केवढा अभिमान असायचा. आता लोक हस्ताक्षराकडे लक्ष देतील असं वाटत नाही. मेल वाचून खूपदा माहिती कळते. मनाचा अंदाज येत नाही. अक्षर वाचून यायचा. तुम्ही कधी अनुभवयलंय की नाही माहीत नाही, पण पत्र लिहिताना अख्खं घर असायचं सोबत. प्रत्येकाचा आशीर्वाद, नमस्कार आणि दंडवत लिहावा लागायचा. खुर्चीत बसलेले आजोबा, स्वयंपाकघरात असलेली आई, देव घरासमोर असलेली आजी, ऑफिसचं काम करणारे बाबा असे सगळे पत्र लिहिताना किंवा वाचताना सोबत असायचे. जप करता करता थांबून आजी सांगायची की माझ्यासाठी तपकीर आणायला सांग किंवा रात्री झोपताना थंड दूध पीत जा अशी सूचना तरी लिहायला सांगायची. तुम्हाला आठवतंय असा मेल कधी तुम्ही लिहिलाय? सगळ्यांनी मिळून. कधी कधी तंत्रज्ञान बल्बसमोर रॉकेल लावून लटकावलेल्या कागदासारखं वाटतं. किड्यांसारखं आपण सगळे झेप घेतो त्या कागदाच्या दिशेने आणि नष्ट करतोय अस्तित्व, अशी भीती वाटते. तंत्रज्ञान शाप आहे असं नाही. पण कृत्रिमता आपल्याला तेवढ हळुवार करत नाही. अस्वस्थ करत नाही. मेसेजचा रिंगटोन पत्र येण्याआधीची हुरहूर निर्माण करू शकत नाही. ई-मेलचं नोटिफिकेशन पोस्टमन काकांना आपल्या घराकडे येताना बघून जी भावना निर्माण व्हायची ती निर्माण नाही करू शकत.

जग बदलत चाललंय. जुन्या गोष्टी उगाळत बसणं चूक असतं. पण काळासोबत तंत्रज्ञान बदलणं ठीक आहे. माणसं बदलायचं काय कारण आहे? भावनांमध्ये बदल होण्याचं काय कारण आहे? आपण कुरियरवाल्याशी किती तटस्थपणे वागतो. एकूणच विचारपूस बंद झालीय. खूप ठिकाणी चौकशी करणारी माणसं गावंढळ वाटतात लोकांना. शेजारी बसणाऱ्या माणसाला एखादा प्रश्न जास्त विचारला तर तो त्याला त्याच्या प्रायव्हसीवर हल्ला वाटतो. आपण खूप वेगाने बदल घडताना पाहतोय.

संवाद ही आपली संस्कृती होती. आता माणसं खासगी होत चाललीत. मी आणि माझा मोबाइल हे विश्व होत चाललंय. बरं मोबाइलमधून ज्या जगाशी संवाद साधायचाय ते कृत्रिम आहे.

सोशल मिडियावर निषेध नोंदवला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं लोकांना वाटतं. गावातला माणूस गेला की गाव गोळा व्हायचं. शहरात सोसायटी गोळा व्हायची. आज ‘आर आय पी’ म्हणून विषय संपतो.

पत्रांच्या आशेवर जगण्याचं बळ : पत्रांचं एक आणखी विशेष असतं. कधी काळी जी पत्रं वाचून तुम्ही खूप रडलेला असता ती पत्र काही काळाने पुन्हा वाचली की हसू येऊ शकतं. कधी काळी जी पत्रं वाचून तुम्ही खूप हसला होता ती पत्र वाचून कालांतराने भाऊक व्हायला होतं. पत्र वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या भावना बनून जातात. प्रेम पत्रांची तर गोष्टच वेगळी. प्रेम ही जगातली सगळ्यात गूढ गोष्ट आहे. ती जेवढी हवीहवीशी आहे तेवढीच गूढ आहे. केवळ पत्रांची वाट बघत कित्येक जोडप्यांना वर्षानुवर्ष वाट बघताना पाहिलंय. अविवाहित राहिलेलं पाहिलय. कित्येक सैनिकांच्या बायकांना केवळ पत्रांच्या आशेवर जगण्यांचं बळ मिळालेलं पाहिलंय. कित्येक समस्या केवळ वर्तमानपत्रात वारंवार पत्र लिहिणाऱ्या माणसांमुळे सुटलेल्या पाहिल्यात. कित्येक प्रेमकथा केवळ पत्रातल्या भाषेवर खूश होऊ सुरू झाल्यात. पत्राने अनेक गोंधळ घातलेत. पण पत्राने जेवढी भावनिक आंदोलनं निर्माण केलीत मनामनात तेवढी खरी आंदोलनं झालेली नसतील.

पत्राने चळवळी केल्या माेठ्या : पत्र जगण्याचा आधार होता कित्येक जीवांचा. पत्र शेवटच्या घटका मोजणाऱ्या माणसांची आशा होती. पत्र जगण्याचं बळ होत. गावाहून आलंलं आई बापाचं पत्र होस्टेलवर शिकणाऱ्या पोरांना आणखी कित्येक रात्री उपाशी पोटी काढण्याच बळ देणारं असायचं. पोरगा शहरात मन लावून अभ्यास करतोय हे पत्रात वाचून घरच्यांना शेतात दुप्पट राबायला बळ यायचं. घरात डांबून ठेवलेल्या मुलीला प्रियकराचे शब्द विद्रोहाचं बळ देणारे असायचे. कित्येक चळवळी मोठ्या करण्यात पत्रांचा मोठा वाटा आहे. क्रांतीची सुरूवात आहेत पत्रं. शांतीचं कारण आहेत पत्रं. पत्रं आपण एकटे असताना छातीशी ठेवून हळूवार होऊ शकतो. बाकी काही नसंतं एवढ्या जवळ घेण्यासारखं. मोबाइल फक्त खिशात व्हायब्रेट होऊ शेतो. पण गदगदून हलवू शकतं ते पत्र. हां मोबाइललचं बिंल अंगावर काटा आणू शकतं. पण पत्रातलं एक वाक्य सुद्धा अंगावर शहारा आणू शकतो. पत्र खरंतर खाजगी गोष्ट असते. एकट्याने वाचण्याची. एकट्याने लहिण्याची. पण लोकांच्या प्रतिसादामुळे पत्रं जाहीरपणे वाचली गेली. ऐकली गेली. टीव्हीवर सहसा पुस्तकातल्या गोष्टी असतात. टीव्हीवरच्या गोष्टीचं पुस्तक होणं आपल्याकडे दुर्मिळ आहे. हा योग पत्रावरील प्रेमामुळे जुळून आला. वाचता वाचता अचानक पेन घेऊन तुमच्यातला कुणी आपल्या आवडीच्या माणसाला पत्र लिहायला बसेल तेव्हा आपलं लिखाण नेमक्या पत्त्यावर पोचलंय याचं मला समाधान होईल…. धन्यवाद….

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser