आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Politics In Maharashtra |The BJP's Emphasis On The Disgruntled Front, The Emphasis Of The Ruling Party On Removing The Displeasure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:भाजपची भिस्त आघाडीतील नाराजांवर, सत्ताधाऱ्यांचा भर नाराजी दूर करण्यावर

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार पडणार की तरणार... चर्चा सुरूच, संभ्रम कायम
  • फड रंगणार : शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच सरकार पाडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. सत्ताधारी आघाडीच्या तीन पक्षांत समन्वय नसल्याचे सांगत भाजप सातत्याने सरकार पाडण्याचा मुहूर्त सांगत आहे. नाराज आमदारांशी भाजपचा संपर्क वाढला आहे, तर सत्ताधारी आघाडी तिन्ही पक्षांतील तसेच पक्षांतर्गत नाराजी दूर करत सत्तेचा खुंटा बळकट करत आहे. या चर्चेला उधाण आलेले असतानाच सरकार पडणार की तरणार... हा संभ्रम मात्र कायम आहे. गेल्या पंधरा दिवसांत राज्यातील प्रमुख चारही राजकीय पक्षांत त्यादृष्टीने घडामोडी घडत आहेत.

शिवसेना : अंतर्गत नाराजीचा मुद्दा ऐरणीवर

आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले. मात्र, शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. त्यातूनच ‘पारनेर’ घडले. पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर शरद पवार, अजित पवार व ठाकरे यांच्या बैठका झाल्या. सेनेच्या नगरसेवकांची घरवापसी झाली.या फोडाफोडीमुळे शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी : अजित पवारांचे उपद्रवमूल्य

उपमुख्यमंत्रिपद मिळूनही अजित पवार यांना फारसे महत्त्व दिले जात नसल्याने ते नाराज आहेत. राष्ट्रवादीतील अजितदादा गटही यामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. लॉकडाऊनच्या काळातही मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधतात त्या वेळीही अजित पवार यांचा उल्लेखही नसतो. यामुळेही नाराजी आहे. पारनेर प्रकरणात अजित पवार यांनी आपले उपद्रवमूल्य दाखवले.

काँग्रेस : सत्तेत असूनही महत्त्व नसल्याने नाराज

काँग्रेसला आघाडीत महत्त्व दिले जात नसल्याचे त्या पक्षाचे नेतेच उघडपणे म्हणत आहेत. शिवसेनेकडून होणारे दुर्लक्ष आणि राष्ट्रवादीकडून होणारी कोंडी यामुळे काँग्रेसची गोची झाल्याची भावना त्या पक्षात आहे. काँग्रेसने वारंवार मागणी करूनही अद्याप आघाडीत समन्वयासाठी कोअर समिती नेमलेली नाही. अंतर्गत वादांतूनही काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

भाजप : प्रत्येक वेळी संधी साधण्याचा प्रयत्न

भाजपने आघाडीतील विसंवाद आणि नाराजांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यात सरकारला अपयश येत असल्याचा ठपका ठेवत आघाडीविरोधी वातावरणनिर्मिती करण्यात सध्या विरोधी पक्षनेते गुंतले आहेत. त्याच आधारे राज्यभर दौरा काढत त्या त्या मतदारसंघातील नाराजांची चाचपणी करण्यावर भाजपचा भर आहे.

आघाडी सरकार : नाराजी अन् संघर्ष

1. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या गळाला लागू शकतात अशा चर्चा आहेत. शिंदे शिवसेनेत नाराज आहेत हे खरे. कारण, आता शिंदे यांची पक्षातली स्पेस कमी झाली आहे.

2. हा धोका ओळखूनच उद्धव यांनी शिंदे यांना ठाण्याचे पालकमंत्रिपद, नगरविकास विभाग मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती दिली आहेत. तसेच मुलास खासदार केले आहे.

3. शिवसेनेतील आमदार फोडू शकेल असा सेनेत एकही नेता नाही. एकनाथ शिंदे यांच्या मागे २०-२५ आमदार येतील अशी स्थिती सध्या नाही.

4. दोन काँग्रेससोबतच्या सरकारपेक्षा भाजपबरोबर ते चालवावे, अशी इच्छा असणारा शिवसेनत मोठा गट आहे. कारण, या आमदारांचा त्यांच्या मतदारसंघात काँग्रेस अन् राष्ट्रवादीबरोबर संघर्ष आहे.

5. मुंबई, ठाण्यातल्या सेनेच्या आजी-माजी नगरसेवकांना सेना-भाजपचे सरकार हवे आहे. कारण, २०२२ च्या पालिका निवडणुकांत महाआघाडी झाल्यास अनेकांना ‘सीट’ मिळणार नाही.

6. राष्ट्रवादी व शिवसेनेत बदल्यांवरून संघर्ष आहे. प. महाराष्ट्रात सेनेने, तर मुंबई-ठाण्यात राष्ट्रवादीने ढवळाढवळ करू नये असे दोघांना वाटते.

सरकार तरणार : चर्चेतील कारणे

> नाराज आमदारांचे संख्याबळ भाजपस सत्तेसाठी अपुरे

> कोणत्याही निवडणुका नजीकच्या टप्प्यात नाहीत

> शरद पवारांची प्रतिष्ठा राष्ट्रीय पातळीवर पणाला

सरकार पडणार : चर्चेतील कारणे

> तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसणे, कोअर कमिटी कार्यान्वित नसणे

> अर्थ व नियोजन खाते असलेल्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसची आर्थिक कोंडी

बातम्या आणखी आहेत...