आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लक्षवेधी:दुधाची साय खातंय कोण? दुधाच्या भावात राजकारणाचे लोण; खासगी संघांचे ब्रँड वॉर, सहकारी संघांवर पुढाऱ्यांचा भार

गणेश देलमाडे | नगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकारने २६ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रतिदिन १० लाख लिटर दूध खरेदीची योजना जाहीर केली. मात्र, ७६ टक्के दूध खरेदी करणाऱ्या दूध कंपन्या त्यास जुमानत नसल्याच्या तक्रारी आहेत.
  • राज्यात दररोज 1 कोटी 30 लाख लिटर दुधाचे संकलन, पैकी केवळ 30 लाख लिटरची खरेदी सहकारी संघाची
  • ग्राहकांना मोजावे लागतात 47, शेतकऱ्यांना मिळतात 17 रूपये

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर शासनाने काढलेल्या दरवाढीचा आदेश राज्यातील दूध संघ केराच्या टोपलीत टाकत आहेत. ग्राहक ५० ते ६० रुपयांनी दूध खरेदी करीत असताना, शेतकऱ्याच्या हातात मात्र सरकारी दराचे २७ रुपयेही पडत नसल्याने खाजगी आणि सहकारी दूध संघ मधल्या रकमेेचा मलिदा खात असल्याच्या तक्रारी आहेत.

लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याने राज्यातील दूध संघांनी दुधाचे भाव पाडले. तेव्हापासून राज्यातील दूधाचा प्रश्न तापू लागला. १९ जून २०१७ ला शासनाने आदेश काढून दुधाला प्रतिलिटर २७ रुपयांचा भाव जाहीर केला. मात्र, त्याला न जुमानता खाजगी दूध संघ शेतकऱ्यांकडून १७ ते २० रुपयात दूध खरेदी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. राज्यात दररोज दूधाची उलाढाल १०० कोटींच्या घरात जाते, मात्र शेतकऱ्याला भाव पाडून मिळतो. दूध दरवाढीसाठी व दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी भाजप, माकप, किसान सभा, शेतकरी संघटनेने आंदोलने केली.

> राज्यात दररोज एक कोटी ३० लाख लिटर दुधाचे संकलन

> पैकी केवळ ३० लाख लिटरची खरेदी सहकारी संघाची

> ६०% खरेदी खासगी कंपन्यांतर्फे, सहकारी संघांतर्फे ३९ टक्के खरेदी

> ५०% दूध हे पिशवीबंद, २५ टक्के दुग्धजन्य पदार्थांसाठी वापर

> राज्यात दुधाचे २७२ ब्रँड आहेत

शेतकरी ते ग्राहक १५ रुपये खर्च

दुधाची प्रक्रिया, वाहतूक आणि वितरण यात लिटरमागे १५ रुपये खर्च येतो. ग्राहकांना सध्या किमान ४७ रुपयात दूध खरेदी करावे लागते. त्यातून १५ रुपये वजा करून शेतकऱ्यांना ३२ रुपये भाव मिळण्याची मागणी आहे. सध्या दूध संघ कमी भाव देऊन लूट करत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. दुधासाठी लिटरमागे दहा रुपये तर व पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे ही त्यांची मागणी आहे.

विरोधक : शेतकऱ्यांची लूट थांबवा - डॉ. अजित नवले, किसान सभा

लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे दुधाची मागणी पूर्वपदावर येत आहे. आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये भाव देण्यामध्ये कोणतीही अडचण शिल्लक राहिली नाही. तरीही अनेक दूध संघ २० रुपये दर देत आहेत. अशा दूध संघांच्या संकलन केंद्रावर प्रसंगी बहिष्कार टाकण्याची भूमिका दूध उत्पादकांना घ्यावी लागेल.

सत्ताधारी : शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच...- बाळासाहेब थोरात, कॅबिनेट मंत्री, काँग्रेस

लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याने दूध साठले आणि भाव पडले. अशावेळी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने दुधाची खरेदी केली आणि सहा लाख लिटर दुधाची पावडर केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे. खासगी कंपन्या दुधाचा भाव पाडतात.त्यावर सरकारचे नियंत्रण नाही.