आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रसिक'ची दशकपूर्ती:"रसिक' मुळे मी पूल झालो - प्रदीप आवटे

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रखरखीत माळरानात खोल खोल ओल शोधत जावं किंवा विखारी उन्हात घनगर्द मायाळू सावलीचा पाठलाग करावा तसा मी एकेका गोष्टीच्या वाटेवरुन धावत गेलो. एके रात्री केरळचा कुणी मोइद्दीन माझ्या वस्तीला आला. त्याच्यावर देहभान हरपून प्रेम करणारी कांचना मला भेटली. हृदयाच्या तळाशी वेदना घेऊन मात्र आकंठ प्रेमात बुडालेल्या आणि व्यापक मानवतेचं स्वप्न पाहणाऱ्या कांचनाची गोष्ट मला सांगावी वाटली आणि रसिकच्या संपादकीय टीमला ती पाठवताच त्यांना ती भावली आणि रसिकला या गोष्टींचा कॉलम सुरु झाला हा मणिकांचन योग.

सुरुवातीला कॉलमची कल्पना "रसिक'ने मांडली तेव्हा इतक्या साऱ्या अनोख्या गोष्टी कुठं शोधणार, असा माझ्यासमोर प्रश्न होता पण शोधत गेलो तर लक्षात आलं की अवतीभवती प्रेमाची सुंदर गाणी गाणारी शेकडो माणसं आहेत. त्यांच्या आयुष्यात जीवन-मरणाचे प्रश्न आहेत पण जगण्यातल्या साऱ्या लौकिकाला भेदून निळंशार प्रेमाचं आकाश ते कवेत घेताहेत आणि हे दृश्य माझ्यासाठी कमालीचं विलोभनीय होतं. मला माणूस म्हणून समृद्ध करणारं, श्रीमंत करणारं होतं.

या कॉलमवर प्रेम करणारे रसिकचे खरेखुरे रसिक भेटले ते यामुळेच. असे रसिक एका बाजूला आणि ‘ढाई आखर प्रेम के’ सांगणारा कबीर दुसऱ्या बाजूला, मधल्या पुलावर मी उभा, या मनोज्ञ चित्राने मी अक्षरशः भरुन पावलो. लालबुंद हिंसक नेपथ्यावर शांततेचे रंग पसरण्याची कुणी असाइनमेंट दिल्यागत मी आनंदलो. युद्धखोर विखार मातृभाषा होत असताना बुद्धमय स्निग्धता ल्यायला मिळावी याहून मोठा आनंद तो काय !

युद्ध, जमातवाद, पुरुषसत्ताकता, हिंसा नाकारत, ‘तो- ती’ या पठडीबाज युगुल प्रेमाला लांघत अडीच अक्षरांच्या गोष्टींनी अनवट वाटेवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या सुट्या सुट्या लेखांचं एकत्ररित्या पुस्तक प्रकाशित होणं ही आनंदाची बाब होतीच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकामुळेच राज्यभरातल्या शेकडो सहृदयी माणसांची मोट बांधली गेली. मंदार काळे, अभिजीत वैद्य, वॉटरमार्क प्रकाशन या सगळ्याशी जोडून घेता आलं हे खरंच; पण त्यासोबतच या पुस्तकामुळे सकारात्मकतेचा, सर्जनाचा गुणाकार झाला आणि ठायीठायी डोळस सहृदयी माणसं माझ्या खात्यात ॲड झाली. अडीच अक्षरांची ही जादू सर्वांना अनुभवता आली ती ‘रसिक’ सारख्या सशक्त पूलामुळे. हा पूल असण्याचा, दूत असण्याचा ऐतिहासिक रोल मलाही त्यामुळे निभावता आला, याचं मोल शब्दातीत आहे.

अडीच अक्षरांची गोष्ट
लेखक - प्रदीप आवटे
प्रकाशक - वॉटरमार्क पब्लिकेशन
मूल्य - २०० रु.
संपर्क - ९४२३३३७५५६

बातम्या आणखी आहेत...