आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथार्थ:नक्षलबारी : एक दाहक प्रवास

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याबरोबरच लाभलेली समस्यांची मांदियाळी ही तशी आपल्या देशाची खास ओळख. त्यामध्ये भर पडली ती नक्षलवाद किंवा माओवादाची. सर्वसामान्य जनतेच्या भाळी लागलेल्या या दाहक मळवटाची विविधांगी, अंगावर शहारे आणणारी करुण कहाणी म्हणजेच ही सुरेश पाटील लिखित ‘नक्षल’ बारी... ही कादंबरी!

नव्वदोत्तर कालखंडात जे धडाडीचे काही लेखक पुढे आले त्यापैकीच सुरेश पाटील हेही एक. साहित्य विश्वात काहींसं वादग्रस्त नाव. अनेकदा वादग्रस्तपणा वा धाकटी पाती असणं हाही शाप ठरतो, तसंच काहीसं या पाटलांच्या बाबतीतही जाणवतं. पाटील यांनी मुंबईमध्ये मराठी माणूस का पाठीमागे पडला याचा सडेतोड लेखाजोखा मांडणारी ‘दाह’ ही सामाजिक कादंबरी लिहिली. काहीशी दाहक, रोखठोक असूनही साहित्य क्षेत्रानं तिची म्हणावी अशी दखल घेतली नाही, त्यातच सारे काही आले.

तर, याच सुरेश पाटील यांची ‘नक्षलबारी’ ही दुसरी कादंबरी. हिला कादंबरी म्हणत एका विशिष्ट साच्यात चाकोरीबद्ध करणं, वा दशकातील श्रेष्ठ कादंबरी म्हणत तिला सीमित करणंही योग्य नव्हे. नक्षलवाद म्हणजे गोळीबार, भूसुरुंगाचे स्फोट इतक्या पांढरपेशा संकुचित विचारधारेच्या चिंधड्या उडवण्याबरोबरच नक्षलवाद नेमका काय आहे, त्याची उपांगं काय आहेत, ती कशी बांडगुळासारखी फोपावत आहेत हे ही कादंबरी सांगतेच; पण त्याच्यावरचा उपायही सुचवते, तोही मूळ कथानकाला कोणताही धक्का न लागता! शिवाय कादंबरी काल-आजचा धांडोळा घेत उद्याचा नक्षलवाद कसा असेल, यावरही कठोर भाष्य करते. एखाद्या ललित कलाकृतीकडून सहसा असं घडत नाही. लेखकाकडे आव्हान पेलण्याची ताकद असेल, सामाजिक समस्येकडे सर्वंकष दृष्टीने पाहण्याचा, तळापर्यंत जाण्याचा वकुब असेल, विषयाच्या खोल खोल डोहात उतरण्याची हिंमत असेल तर आणि तरच ‘नक्षलबारी’सारखं असं काहीतरी भव्यदिव्य घडून येतं. लेखकाने या विषयाचा किती सखोल अभ्यास केला आहे याची प्रचिती कादंबरीतील प्रत्येक प्रसंग, घटना देतात. चिंतनात्मक पातळीवर लेखक प्रत्येक शब्दाशी तादात्म पावला आहे. विषयाचे गांभीर्य, त्याचा समाजातील प्रत्येक घटकांशी असलेला संबंध लक्षात घेऊन संयम व संतुलितपणा राखताना लेखकाचा कस लागला आहे.

कादंबरीच्या विषयात-मांडणीत कमालीचं द्वंद्व आहे, अंतर्विरोध आहे. संघर्ष तर पदोपदी जाणवतो. संघर्ष म्हणजे बंदुकीची गोळी नव्हे, वा इतक्या इतक्यांना यमसदनी धाडलं असा नव्हे. क्षुल्लक गोष्टही संघर्षाने लिप्त असल्याने संघर्ष हा कादंबरीचा मुलभूत गुण ठरला असून त्यामुळे तिला धार आली आहे.

शहरी संस्कृतीच्या प्रभावाखाली आदिवासी संस्कृती आल्याने या समाजाच्या मानसिकतेमध्ये कमालीचा बदल झाले आहेत, होत आहेत ही बाब नाकारून चालणार नाही. कपडे-लत्त्यांपासून खानपानातही मोठे बदल होऊ लागले आहेत. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातही मका, सोयाबीनसारख्या पिकाखाली हजारो एकर शेती आली. कधीकाळी टीचभर कपड्यालाही महाग असणाऱ्या आदिवासींची मजल टी शर्टपासून कोट वापरण्यापर्यंत गेली आहे. रस्ते, वीटभट्टीच्या कामावर येणारे आदिवासी पॅण्ट-टी-शर्ट, शर्ट घालूनच आता काम करतात! वीज पोहोचलेल्या जंगल भागातील ठिकाणांपर्यंत शीतपेये, बेकरी प्रॉड्नट, लेजसारख्या खानपानाच्या वस्तू मिळत आहेत. एकंदरीतच एखादी संस्कृती हळूहळू कशी नामशेष होत राहते, याचं भेदक चित्रण नक्षलबारीमध्ये असून ते सुन्न करणार आहे. एकीकडे झपाट्याने बदलणारी संस्कृती व दुसरीकडे आदिवासींचा विकास या गोंडस नावाखाली नक्षलवाद्यांनी लादलेली बंदुकीची भाषा या अडकित्त्यामध्ये अडकलेल्या आदिवासींची घुसमट, तडफड, परवड प्रभावीपणे समोर आणण्याचं काम ही कादंबरी करते.

नक्षलवादावर आतापर्यंत झालेलं लेखन बहुदा एकांगी झाल्याचं दृष्टोत्पतीस येते. मात्र, समतोलपणा व वास्तवतेची कास पकडलेल्या या कादंबरीची वाटचाल गतीमान आहे, सर्वंकष आहे. मानवी प्रश्नांकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन व्यापक आहे. त्याला चिंतनाची जोड मिळाल्याने कादंबरीला अंगभूतच उंची लाभली आहे. एखाद्या स्फोटक सामाजिक विषयावर इतकी सर्वंकष, विविधांगी कादंबरी माझ्यातरी पाहण्यात वा वाचनात आलेली नाही. सर्वसामान्यपणे आपण कादंबरी वाचण्याचं काम करतो; पण ‘नक्षलबारी’च्या बाबतीत उलटं घडत जातं. ही कादंबरीच वाचकाला अक्षरशः फरफटत पुढे घेऊन जाते. कमालीचा चित्रदर्शीपणा हा या कादंबरीचा ‘अ‍ॅसेट’ असल्याने भारून जाणं म्हणजे काय, याचा सतत प्रत्यय येत राहतो. या प्रवासात कधी मळभ, उत्तेजना, विरक्ती, कधी दिढ्मूढ होणं, उसासे टाकणं(प्रेमाचे नव्हे), असे मनाचे नानाविध खेळ इथं घडतात.

ढोबळ अर्थानं कादंबरीला एखादा नायक असतो; पण इथं नक्षलवाद हाच नायक असून त्या केंद्राभोवती कादंबरी फिरत राहते. रक्ताला चटावलेला हा प्रवास रोचक आहे. नक्षलवाद म्हणजे काय, त्यापाठीमागच्या विचारधारा, या विचारांमध्येही असलेले भेद, संघटनेत सामील झालेल्या महिलांचं शोषण, नक्षलवादाचं तरुणाईला असलेलं आकर्षण, परप्रांतातील नक्षलींचा झालेला भरणा-त्यांची दांडगाई, भरडला जाणारा आदिवासी समाज, नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्या परिसरात उतरलेली राज्य व केंद्र सरकारची सुरक्षा दलं, त्यांच्या अडचणी-प्रश्न, नक्षलवादाशी संबंधीत राज्य-केंद्र सरकाचे दृष्टीकोन, नक्षलवादाला लाभलेलं आंतरराष्ट्रीय पाठबळ, बुद्धिवाद्यांची लुडबूड, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, धर्म अशा अनेक घटकांचा परामर्श अत्यंत संवेदनशीलपणे समोर येतो. शासकीय पातळीवर होणारा भ्रष्टाचार ते नक्षलवाद्यांकडून उकळली जाणारी खंडणी, नक्षलग्रस्त भागात काम करण्यास अनुत्सुक असलेले सरकारी कर्मचारी ते आदिवासी भागातील तरुणांनी पोलीस विभागात भरती होऊ नये म्हणून नक्षलवाद्यांकडून होत असलेला आटापिटा, या द्वंदात थांबलेला विकास व जीव मुठीत धरून जगणारी जनता... असा विषयाचा कोणताही कोन लेखकाच्या नजरेतून सुटलेला नाही. आशय, अभिव्यक्ती, जीवनदृष्टीच्या दृष्टीने कादंबरीने अत्युच्च पातळी गाठली आहे.

भूसुरुंगाचा स्फोट होऊन २३ सुरक्षा कर्मचारी, अधिकारी मारले जातात. तो धक्का राज्य शासनाला खडबडून जाग आणतो व खंबीर समजल्या जाणाऱ्या महेंद्र वाघरा नावाच्या पोलीस अधीक्षकाची त्या विभागात पाठवणी होते, अन् ‘नक्षलबारी’च्या खेळाला सुरुवात होते. प्रत्येक कादंबरीत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे काही उत्कट बिंदू असतात. नक्षलबारीमध्ये मात्र पानापानांवर ते पसरले आहेत व दाहक असले तरी एखाद्या रत्नहारासारखी त्यांची गुंफण सुंदर झाली आहे. नक्षलवादी असलेली दुर्गा दांडेची बहीण जेव्हा दुर्गाला भेटते, संदीप गजरे नावाच्या पीएसआयची नक्षलभागात बदली झाली म्हणजे त्याचं प्रेतच परत येणार या भावनेने त्याला शेवटचा निरोप द्यायला जमलेले त्याचे नातेवाईक, केटीनं एके ४७ च्या साहाय्यानं उडवलेलं खवल्या मांजर... असे असंख्य प्रसंग मानवी मनाचे कप्पे खोलतात तेव्हा अंतर्मुख व्हायला होतं. ही मांडणी वैश्विकतेला कवेत घेणारी आहे.

कादंबरीची भाषा सखोल व प्रवाही आहे. ‘या हाताने अनेकांचे गळे चिरले. गोळ्या घातल्या. त्यामध्ये शिक्षक होते, पोलीस होते, ग्रामसेवक, सरपंच, संशयीत खबरे, सावकार, ठेकेदार... किती सांगू?’ किंवा ‘माणूस नोकरी करतो, तेव्हा त्याच्या हाताकडे पाठीमागच्यांचे डोळे लागलेले असतात. अन् आम्ही तर क्रांतिवीर...! इत्तक्या वर्षांत आम्ही त्यांना काय दिलं?’ हे केशासारख्या खूंखार नक्षलीचे संवाद एखाद्या बाणासारखे हृदयाचा ठाव घेतात. ‘शेवटी शासन म्हणजे तरी कोण? तीही माणसंच... मात्र त्यामध्ये हपापलेल्यांची, भुकेल्यांची संख्या मोठी होती,’ किवा ‘पिढ्यानपिढ्या तुमच्या याच शासन यंत्रणेनं त्यांना गुलामापेक्षा वाईट वागणूक दिली. हक्काचं रेशनिंग दिलं नाही. दवाखाने नाहीत. चांगलं शिक्षण नाही. रस्ते नाहीत. पोलीस, वन खात्यापासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्या बायका-मुली वापरल्या...’ ही निर्मल गुणवंतनं मांडलेली वास्तवता अंतर्मुख करते. ‘कंत्राटावरही कंत्राट निघाल्याशिवाय लोकशाहीची विश्वासार्हता टिकत नाही’, ‘विकासाबरोबरच पैशाच्या गंगेत शासकीय अधिकारी मनसोक्त न्हातात’, ‘स्वामी, सरकारी पैसा कधी आदिवासींपर्यंत पोहोचत नाही. आपल्या बायका-मुलांच्या गांडी सुजलाम-सुफलाम होण्यासाठी तो आधीच जिरतो’, ‘भ्रष्टाचाराच्या वाळवीनं मंत्रालयाचं दालन न् दालन पोखरलं होतं’ अशी वस्तुस्थितीदर्शक निरीक्षणं व ओढलेले कोरडे कादंबरीचं बलस्थान आहेत. ‘आदिवासींसाठी मंजूर झालेल्या योजना, प्रकल्पांसाठी येणारा पैसा प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत पोहोचला असता तर आज त्यांच्या घराघरांवर सोन्याची तोरणं लोंबली असती, कदाचित येथील तरुण अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्येही दिसले असते...’ ही कुंडास्वामींनी व्यक्त केलेली खंत वस्तुस्थिती किती भयावह आहे, याचं प्रत्यंतर देते.

कादंबरीत माही, केशा, केटी, ढोल्या, कुंडास्वामी, संदीप गजरे, बयाक्का, दुर्गा दांडे, किरण, शंभू हेळा, साधना मोकल, गजानन खापरे अशी अनेक पात्रं असली तरी प्रत्येक पात्राला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. पात्रांमधील मनोव्यापार तर मानसशास्त्रीयदृष्ट्या स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरावा. ही सर्वच पात्रं महाभारतातील पात्रांसारखी वाचकाच्या मनात ठाण तर मांडतातच; पण कादंबरी वाचल्यानंतरही दीर्घकाळपर्यंत मनात रेंगाळत राहतात. उद्या या पात्रांचंही रसग्रहण झालं, तर ते नाविन्य ठरणार नाही. कादंबरीमध्ये आलेला निसर्ग, जंगल, जंगली प्राणी हासुद्धा स्वतंत्र दखल घेण्याचा विषय आहे. नक्षलवादावर पेटलेलं राजकारण, राजकीय कुरघोड्या तर नक्षलींनी झाडलेल्या गोळींपेक्षा भयावह आहेत. त्या सद्यस्थितीतील राजकारणाचं वस्त्रहरण करतानाच जनतेला सावधानतेचा संदेशही देतात.

कादंबरी एकदा वाचायला सुरुवात केल्यानंतर कधी संपते हेही कळून येत नाही. भानामती केल्यासारखी ती अक्षरशः भारून टाकतेे. शिवाय शैलीदार लेखन म्हणजे काय असते, त्याचं प्रत्यंतरही इथं पाहायला मिळतं. एकंदरीतच उद्या साहित्यात पाटीलसंप्रदाय तयार झाला, तर आश्चर्य वाटायला नको इतकी ताकद या शैलीत आहे. समाजमन ढवळून काढण्याची किमया ही कादंबरी साधते. कादंबरीचा आवाका अवाढव्य असून त्याची मांडणी नितांत सुंदर झाली आहे. मराठी साहित्यात एक मैलाचा दगड म्हणूनच या कादंबरीकडे पाहावं लागेल.

कादंबरी - नक्षलबारी
लेखक - सुरेश पाटील
प्रकाशन - संस्कृती प्रकाशन
पाने- ६२४, किं.- ६८० रु.
----------------
प्रदीप वानखेडे
pradipwankhede52@gmail.com

बातम्या आणखी आहेत...