आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुछ दिल ने कहा:प्राण यांच्या औदार्याने पत्रकाराचे मन काबीज!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा कलाकार खऱ्या आयुष्यात नायकाचे मन कसे जिंकतो, याची कथा आजच्या सदरात आहे.

आजच्या कथेत मुख्य दोन पात्रे आहेत. एक- त्या काळातील एक मोठे खलनायक, ज्यांनी नंतर मनोजकुमार यांच्या ‘उपकार’ चित्रपटातील मलंग चाचाची भूमिका अजरामर करून एक सशक्त, तोडीचा सकारात्मक अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवली असे दिग्गज व्यक्तिमत्व - प्राण! दुसरे पात्र म्हणजे पत्रकार श्रीरामकृष्ण! ८ डिसेंबर १९६८ या दिवशी उत्तर प्रदेश पत्रकार संघाच्या सहाव्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यासाठी विविध चित्रपट कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या लांबलचक यादीत- चेतन आनंद, प्रिया राजवंश, सुनील दत्त, नूतन, कामिनी कौशल, चंद्रशेखर, केदार शर्मा, सुबोध मुखर्जी, हसरत जयपुरी, मदन पुरी, ‘आखिरी खत’मधून प्रसिद्धी आणि रसिकांचे प्रेम मिळाल्यानंतर स्टार झालेले बाल कलाकार बंटी आणि प्राण यांची नावे सामील होती.

अविभाजित उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल महामहीम डॉ. बेजावाडा गोपाल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाचे उद‌‌्घाटन तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री कोदरदास कालिदास शाह यांच्या हस्ते झाले. श्रीरामकृष्ण हे उत्तर प्रदेश पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या खांद्यावर आयोजनाची सर्व जबाबदारी होती. प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपले काम करणारे ते एक ज्येष्ठ व्यक्ती, एक पत्रकार होते आणि कदाचित त्यांच्या या गुणांमुळेच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज लखनौला पोहोचले. तेव्हा पत्रकार संघटनेकडे आजच्या तुलनेत निधीची खूपच कमतरता होती. पै-पै जोडून सगळी व्यवस्था केली होती. चित्रपटातील कलाकारांना घरच्या जावयापेक्षाही जास्त मान असतो, म्हणून श्रीरामकृष्णांनी त्यांची जमेल तशी बडदास्त ठेवली होती. पण, त्यांना ऐनवेळी समजले, की चेतन आनंद, कामिनी कौशल आणि प्राण यांना ‘हीर रांझा’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ९ डिसेंबरलाच पोहोचायचे आहे, चित्रीकरण अचानक ठरले असे काही नव्हते, पण कदाचित सांगण्या - ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असावी. पाहुण्यांना बोलावले असल्यामुळे त्यांना पाठवण्याची जबाबदारीही श्रीरामकृष्ण यांच्याच खांद्यावर होती आणि आतापर्यंत समारंभासाठी खूप पैसे खर्च झाले असल्यामुळे त्यांच्या खिशात पैसे नव्हते. लखनौ विमानतळ १९८६ मध्ये सुरू झाले. लखनौहून मुंबईला जाण्यासाठी दोनच मार्ग होते- एकतर रेल्वे किंवा बाय रोड. त्यामुळे ८ डिसेंबरच्या रात्री मेलने दिल्ली गाठणे आणि तेथून मुंबईला विमानाने जाणे हा एक पर्याय होता. तशी प्रत्येकाची लखनऊ-मुंबई मेलची दुसऱ्या दिवसाची परतीची तिकिटे आरक्षित होती. त्या काळात वातानुकूलित बोगीचे लखनौ-दिल्ली भाडे ८० रुपये होते, त्याप्रमाणे तीन तिकिटांचे एकूण २४० रुपये! पाहुण्यांना थर्ड क्लासमध्ये पाठवण्याइतके पैसेही श्रीरामकृष्ण यांच्या खिशात नव्हते. म्हणून काही पर्याय नसल्यामुळे त्यांनी एका सावकाराकडून हुंडी आणि प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करुन ३०० रुपयांचे कर्ज घेतले. शहरात त्यांना मान होता, पण कामाच्या जागी काम आणि मानाच्या जागी मान, हा तर जगाचा नियम. कर्ज दिले म्हणजे सावकाराने त्याचे व्याजही घेतले असेलच. एक म्हण आहे ना, ‘घोड़ा घास से यारी करेगा तो खाएगा क्या? भूखा मर जाएगा!’ एका अंदाजानुसार, त्या कर्जाला दरमहा १.५-२.५% व्याज असेल. म्हणजे वर्षाला ५४ ते ९० रुपयांपर्यंत. (गणिताचा विद्यार्थी असल्यामुळे हिशेब मांडला, त्यामुळे वाचकांना कदाचित हा हिशेब नीट समजू शकेल.) श्रीरामकृष्ण यांनी व्याजावर घेतलेल्या रकमेतून तिघांचेही वातानुकूलित बोगीत आरक्षण केले. श्रीरामकृष्ण यांनी या कर्जाबाबत कुणालाही कळू दिले नाही.

तरीही कार्यक्रम खूप यशस्वी झाला. सगळे आनंदी होते. श्रीरामकृष्ण यांना टाळ्या, आदर आणि यश मिळाले होते. त्यांना चेतन आनंद, कामिनी कौशल आणि प्राण यांना लखनौ रेल्वे स्थानकावरून निरोप द्यायचा होता. त्यामुळे लगेच चारबाग स्थानकाच्या दिशेने ते गेले. लखनौची मेल आली होती. पाहुण्यांना घाईतच रेल्वेत बसवावे लागले. प्रत्येक जण जड अंतःकरणाने निरोप घेत होते, तेवढ्यात प्राण श्रीरामकृष्ण यांच्याकडे आले आणि त्यांनी खिशात काहीतरी ठेवले. प्राणसाहेब काय करत आहेत, हे श्रीरामकृष्ण यांना समजलेच नाही. अरे, एवढ्या मोठ्या माणसाने या फकिराच्या खिशात हात घातला, तिथे काय मिळणार? काही नव्हतेच. इंजिनाची शिट्टी वाजल्यामुळे काही बोलायला किंवा ऐकायलाही वेळ नव्हता. श्रीरामकृष्ण डब्यातून खाली उतरले. पाहुण्यांना हात जोडून निरोप दिला. गाडी सुटली तेव्हा त्यांना वाटले की प्राण साहेबांनी खिशात काहीतरी ठेवले आहे. खिशात हात घातला आणि धक्का बसला. पत्रकार महोदय स्तब्धच झाले. त्यांच्या खिशातून ३०० रुपयांहून अधिक रक्कम निघाली! प्राण ८ डिसेंबरच्या संध्याकाळीच आले होते आणि ४ तासांनी निघूनही गेले, पण हे महाशय काय करुन गेले! चित्रपटात जसे खलनायकाला सारे काही अगोदरच कळते, त्याचप्रमाणे प्राण यांनाही परिस्थिती समजली होती! िचत्रपटातील खलनायक जीव घेतात, पण इथे त्यांनी जे दिले ते कुबेराच्या खजिन्यापेक्षा कमी नव्हते. खलनायक प्राण यांनी प्राण न घेता श्रीरामकृष्ण यांचे मनच काबीज केले होते.

आपल्या समाजाला प्रतिमेचे वेड आहे. तो प्रत्येकाला एका खास भूमिकेत, खास पोशाखात पाहत असतो. आदर आणि अपमानाची व्याप्ती देखील या परिमाणांमध्ये ठरत असते. तो किंवा ती यांची पर्सनॅलिटी कशी आहे, हे हा दृष्टिकोनच ठरवतो, पण हा ‘पर्सनॅलिटी’ शब्द लॅटिन आणि ग्रीक भाषेतील ‘पर्सोना’ या शब्दापासून आला आहे, परंतु दोन्ही भाषांमध्ये अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे मुखवटा किंवा मास्क; जो त्या काळातील कलाकार आपले खास पात्र रंगमंचावर साकारण्यासाठी लावायचे. ते कलाकाराचे खरे रूप किंवा चेहरा नव्हता. त्यामुळे माझ्या प्रिय वाचकांनो, आता ‘काय पर्सनॅलिटी आहे बॉस!’ असे म्हणण्यापूर्वी विचार करा, तुम्ही त्यांच्या बनावटी चेहऱ्याचे कौतुक करत आहात. आणि जाता जाता... ज्यांना चित्रपटात काम करायचे आहे त्यांच्यासाठी एक धडा- अभिनयात, तुम्हाला तुमचा खरा स्वभाव सोडून खोटे दिसायचे आहे आणि ते खरे वाटेल असे! यापुढे जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी अभिनय, संगीत, कला, भाषेचा अर्थ यावर चर्चाही करेन. आणि मी ५२ वर्षांत जे काही शिकलो आहे, ती ही माझी संपत्ती जे उत्सुक आणि पात्र आहेत त्यांच्यासाठी असेल. जौहर कानपुरीच्या काही ओळींसोबत आजचा निरोप घेतो... तुम्हारा घर हमेशा रोशनी से जगमगाऊंगा, चिराग़ों की खुशामद मत करो मैं दिल जलाऊंगा! तुम्हें जिस दिन यक़ीं हो जाए मुझमें खूबियां भी हैं, मुझे आवाज़ दे देना मैं वापस लौट आऊंगा! मुझे बेघर किया तूने तो अब मेरी भी ये जिद है, मैं तेरे दिल तेरी आंखों में अपना घर बसाऊंगा!

जय हिन्द! वंदे मातरम!

अन्नू कपूर सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि सूत्रसंचालक

बातम्या आणखी आहेत...