आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रसिक'ची दशकपूर्ती:​​​​​​​भटक्यांसाठी "रसिक'ने "जागा' मिळवून दिली... - प्रशांत पवार

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंगावर चाबकाचे फटके मारत कुटुंबासह फिरणारे पोतराज... पोटातल्या भुकेचा डोंब विझविण्यासाठी आयुष्याचा खेळ करून इतरांचे मनोरंजन करणारा डोंबारी... लाफ्टर थेरपीचा जमाना नसतानाही निरनिराळी वेशभुषा करून सतत हसवणारे पण चोर समजून सतत मार खाणारे बहुरुपी... जगण्याच्या संघर्षात गावगाड्यात कुठेच जागा न मिळालेला, मसणवाट हेच राहण्याचे ठिकाण असलेला आणि सरणावरची चैतन्य संपलेली कलेवर हाच जगण्याचा आधार असलेला मसणजोगी... आज ६९ पेक्षा जास्त वर्षे उलटून गेली. मात्र, भटक्या समाजाकडे पाहिल्यास आजही परिस्थितीशरण, पराभूत मानसिकता आणि गतानुगतिकता यात हा समाज अडकून पडलाय, असे दिसून येते. प्राण्यांना नाल मारतात तशी कायद्याची नाल आजही या जमातीच्या नशिबी आहेच.

महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या 52 जमाती आणि त्यांच्याही सुमारे 350 पोटजाती. कुठेच हक्काची जमीन नसलेल्या, पाठीवर बि-हाड घेऊन गावोगाव भटकणाऱ्या या समाजाची जगण्याची फरपट अजूनही थांबलेली नाही. याच भूमीचे पुत्र असूनही नागरिकत्वाची ठळक ओळख त्यांच्यापाशी नाही. समाजाचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन, राजकीय उपेक्षा, पोलिसांचा अतोनात जाच आणि याचबरोबर जात-पंचायतींसारख्या रूढी-परंपरा यांच्या कोंडीत हा समाज गेल्या कित्येक वर्षांपासून अजूनही भरडलाच जातोय. भटके असोत की विमुक्त, त्यांची दैना आजही कायमच आहे. रेशन कार्ड नाही, मतदार यादीत नाव नाही, बँकेत खाते नाही, घर नाही, कायदेशीर व्यवसाय नाही, भीक मागावी तर तेही कायद्यात बसत नाही.

खून-मारामाऱ्या, भुरटी वाटमारी, हुसकावले जाणे, अपमान गिळणे आणि अस्मितेपासून पारखे राहणे, आपसातल्या वैरात मरणे-मारणे, जात पंचायतीचा फास आणि कोर्टकचेऱ्या, पोलिस कस्टडीत अमानुष मारहाण आणि बिनबोभाट मरणे, जगण्याची चिवट शक्ती घेऊन वाट तुडवणे, सोबतीला गाढव, शेळ्या, मेंढ्या, कोंबडी, कुत्री आणि न थकणारे पाय, असे त्यांचे जगणे आजही तसेच आहे.

समाजाचा हाच पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन मेनस्ट्रीम मीडियानेही कायमच राखला अपवाद फक्त "दिव्य मराठी'दैनिकाचा. भटक्यांची ही अंधारयात्रा उजेडात आणण्यासाठी मेनस्ट्रीम मीडियामध्ये जी "स्पेस' हवी होती ती मला दिव्य मराठीच्या "रसिक'रविवार पुरवणीमध्ये मिळाली आणि मग सुरु झाल्या "पालांवरच्या गोष्टी' ही लेखमाला. जवळपास वर्षभर सुरू असलेल्या या पालांवरच्या गोष्टींचे मग "३१ ऑगस्ट १९५२' या पुस्तकात रुपांतर झाले. औरंगाबादच्या साकेत प्रकाशनतर्फे चार वर्षांपूर्वी "३१ ऑगस्ट १९५२' हे पुस्तक बाजारात दाखल झाले. "रसिक'ने ही "स्पेस' दिल्यामुळे भटक्या विमुक्तांच्या अनेक कहाण्या... लग्नाच्या पहिल्या रात्री होत असलेल्या कौमार्य चाचणीसारखी अमानुष प्रथा असो वा चोर समजून चार बहुरुप्यांचे दगडाने ठेचून केलेले मॉब लिंचिंग असो... अशा अनेक घटना उजेडात येऊ शकल्या.

आपल्याकडच्या अनेक नव्या कायद्यांनी भटक्या विमुक्तांना संरक्षण देण्याऐवजी त्यांचा रोजगारचं हिरावून घेतला आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऍक्ट आला आणि अस्वल, साप, माकड खेळवणारे गुन्हेगार ठरले, त्यांच्या पोटावर पाय आला. क्रुएलिटी टू ऍनिमल ऍक्टखाली नंदीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन गेले. मॅजिक अँड ड्रग्ज ऍक्टने जडीबुटी विकून पोट भरणाऱ्या वैदूंचा पारंपरिक व्यवसाय बंद पाडला. देवाधर्माच्या नावावर भिक्षा मागणाऱ्या वासुदेव, बहुरूपी, कडकलक्ष्मी, जोशी, गोंधळी, गोसावी व इतरांवर उपासमारीची पाळी आणणारा प्रिव्हेन्शन ऑफ बेगरी ऍक्ट करण्यात आला. करमणूक, कसरती, भविष्यकथन किंवा गोंधळ, नृत्य, गीते यांवर भटक्या-विमुक्तांचा उदरनिर्वाह चालतो. आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण यांच्यामुळे या घटकांवर कसे प्रचंड मोठे आघात झाले हे या लेखमालेतून मांडता आले.

"३१ ऑगस्ट १९५२' या पुस्तकामुळे मला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात एक ओळख मिळाली... माझ्या पत्रकारितेला एक नवी दिशा सापडली आणि आजही त्याच वाटेवरून माझा प्रवास सुरू आहे. हे शक्य झाले ते फक्त आणि फक्त दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीमुळे.

३१ ऑगस्ट १९५२
लेखक - प्रशांत पवार
साकेत प्रकाशन
मूल्य - १८० रु.
संपर्क - ९९३०८०३३२८

बातम्या आणखी आहेत...