आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:गंभीर आजार असलेल्यांनाच बूस्टर डोस देण्याची तयारी; जगात बूस्टर डोस दिला जात आहे, भारतात काय स्थिती ?

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका-ब्रिटनसह जगातील डझनभर देशांत कोरोनाविरुद्ध बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. इस्रायलमध्ये तर ४०% प्रौढ लोकसंख्येला बूस्टर डोस देण्यात आला आहे. भारतातही त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारतात बूस्टर डोस दिला जावा की नाही? दिला तरी योग्य वेळ कोणती असावी? तो कोणाला दिला जावा? यांसारख्या अनेक प्रश्नांवर ‘भास्कर’च्या पवनकुमार यांनी देशातील प्रमुख तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यातील प्रमुख मुद्दे...

बूस्टर डोस म्हणजे काय, तो का देतात?
डझनभर देशांत कोरोनाविरुद्ध इम्युनिटीला बूस्ट करण्यासाठी बूस्टर डोस दिला जात आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर किमान ६ महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जातो. लसीचा परिणाम संपू लागतो तेव्हा बूस्टर डोस अत्यंत आवश्यक आहे, असा दावा लस कंपन्या करतात. तथापि, देशातील-जगातील तज्ज्ञांना ते मान्य नाही.

भारतात बूस्टर डोस आवश्यक आहे?
तज्ज्ञांचे त्याबाबत एकमत नाही. भविष्यातही संसर्गाचा धोका असेल तेव्हाच बूस्टर डोस दिला जावा, असे काही जण म्हणतात. देशातील सध्याची स्थिती पाहता संसर्ग नियंत्रणात आहे, असे मानले जात आहे. त्यामुळे सर्वांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय करणे फायदेशीर ठरणार नाही.

बूस्टर डोसचा निर्णय कसा होईल?
भारतात बूस्टर डोसची गरज आहे की नाही, हे जाणून घेण्याआधी पुरेसे आकडे उपलब्ध करावे लागतील. ज्यांना आधी संसर्ग झाला होता, त्यापैकी किती जणांना संसर्ग होत आहे? ज्यांना संसर्ग झाला आहे, ते गंभीर आजारी पडत आहेत की साधारण फ्लूसारखी स्थिती आहे? हे पाहावे लागेल. कारण संसर्गाचे गांभीर्य कमी करण्यास लस प्रभावी आहे. गंभीर आजारी पडणाऱ्यांची सरासरी खूप कमी असेल तर संपूर्ण लोकसंख्येला बूस्टर डोस देणे योग्य ठरू शकत नाही.

संसर्ग वाढला तरीही सर्वांना बूस्टर डोसची गरज पडणार नाही का?
याच मुद्द्यावर केंद्र सरकारची तज्ज्ञ समिती चर्चा करत आहे. ती लवकरच पॉलिसी डॉक्युमेंट सादर करू शकते. पण सर्व लोकांना बूस्टर डोसची गरज भासत नाही, अशीच आरोग्यविषयक समजूत आहे. कारण सीरो सर्वेक्षणानुसार, देशातील बहुतांश लोकसंख्येला संसर्ग झालेला आहे, जवळपास अर्ध्या लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि आतापर्यंत ते बरे आहेत. ज्यांची प्रतिकारक्षमता कमकुवत आहे किंवा ज्यांना आधीपासून कुठला गंभीर आजार आहे त्यांना बूस्टर डोस देण्याबाबत विचार सुरू आहे. जानेवारीत लसीकरण सुरू झाले होते तेव्हा असे दोन कोटी लोक असल्याचे समोर आले होते.

गंभीर आजार असणाऱ्यांशिवाय आणखी कोणाला बूस्टर डोस देऊ शकतात?
ज्येष्ठांना. कारण ६० वर्षांवरील लोकांत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर सर्वाधिक आहे. लस गंभीर आजारी पडण्यापासून वाचवते, त्यामुळे ज्येष्ठांना सुरक्षित ठेवण्यासाठी बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. इस्रायल, तुर्कीसारखे लहान देश सोडले तर सध्या जगातील कुठल्याही देशात संपूर्ण लोकसंख्येला बूस्टर डोस देण्यात येत नाही. फक्त ज्येष्ठांना आणि गंभीर आजार असलेल्यांना बूस्टर डोस दिला जात आहे.

लस किती काळ सुरक्षा देते?
कोरोना झाल्यानंतर शरीरात जी अँटिबॉडी तयार होते, ती लसीनंतर तयार झालेल्या अँटिबॉडीच्या तुलनेत जास्त काळ राहते. संसर्ग झाल्यानंतर किमान एक वर्षापर्यंत अँटिबॉडी राहते, असे जगभरात आतापर्यंत प्रकाशित संशोधने सांगतात.

ज्यांना लस घेऊन ८-९ महिने झाले त्यांच्यात अँटिबॉडी कमी झाली का?
भारतात सध्या त्यावर अभ्यास झालेला नाही. तज्ज्ञ समिती अशाच प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. अँटिबॉडी ६ महिन्यांनंतर घटू लागते, असे सध्या मानले जात आहे.

{प्रा. संजय रॉय, कम्युनिटी मेडिसिन, एम्स दिल्ली { प्रा. जुगल किशोर, एचओडी कम्युनिटी मेडिसिन, सफदरजंग रुग्णालय दिल्ली { डॉ. नरेंद्र अरोरा, अध्यक्ष, कोविड-१९ वर्किंग ग्रुप, केंद्र सरकार.

बातम्या आणखी आहेत...