आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:मरणासन्न ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ला वाचवण्याचा प्रस्ताव गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या इन्स्टिट्यूटने प्लेगविरोधी जगातील पहिली लस तयार करण्याचा मान मिळवला होता

प्लेगविरोधी जगातील पहिली लस तयार करण्याचा मान मिळवणारी मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट सध्या मरणासन्न अवस्थेतून वाटचाल करत आहे. सहा वर्षांपूर्वी हाफकिनचे प्रभारी कार्यकारी संचालक आणि तत्कालीन अन्न व औषध प्रशासन आयुक्त महेश झगडे यांनी हाफकिनच्या माध्यमातून जागतिक संशोधन संस्था उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला होता. मात्र, लालफितीचा कारभार आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे तो धूळ खात पडला आहे.

वैद्यकीय संशोधन आणि औषध निर्मिती यासाठी स्थापन झालेली हाफकिन संशोधन संस्था आणि हाफककन बायो फार्मा या दोन्ही संस्था सध्या शेवटची घटका मोजत आहेत. येथील बौद्धिक संपदा आणि मुंबई, पुणे, जळगाव येथील इमारत आणि जमीन याचा सदुपयोग करून जागतिक दर्जाची संशोधन संस्था उभारण्याचा प्रस्ताव अन्न व औषध प्रशासनाचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांनी सन २०१३-१४ च्या सुमारास दिला होता. हा प्रस्ताव आजही राज्य सरकारने मंजूर केल्यास कोविडसारख्या महाभयानक महामारीच्या संशोधनात माेलाचे याेगदान देऊन राज्याचे आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर नेण्याची शक्यता निर्माण झाली असती असे त्यांचे मत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे झगडे यांनी सांगितले.

जागतिक दर्जाच्या संशोधनाची क्षमता, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज

तत्कालीन मंत्री डॉ विजयकुमार गावित मंडळाचे अध्यक्ष असताना मी संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला होता. त्या पद्धतीने काम करण्याची मंडळाला सूचनाही दिली होती. परंतु, पुढे काय झाले याची कल्पना नाही. अजूनही त्यावर काम झाले तर कोविडसारख्या साथीच्या काळात या संस्थेचे महत्त्वाचे योगदान ठरू शकते. - महेश झगडे, निवृत्त सनदी अधिकारी

जमिनीचा लिलाव करून निधी उभारण्याचा प्रस्ताव

हाफकिनची जमीन तुकड्या तुकड्यात अन्य संस्थांना देण्यापेक्षा तिचा लिलाव करून ३० टक्के निधी जमवल्यास व त्यावर ७० टक्के निधी उभारल्यास जागतिक दर्जाचे संशोधन करणारी संस्था विकसित करण्याचा तो प्रस्ताव होता. हाफकिनचे प्रभारी संचालक या नात्याने हाफकीनचे प्रभारी संचालक म्हणून त्यांनी संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही हा मांडला होता.