आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Pune Corona Outbreak Ground Zero Report : Despite The Deployment Of 20 IAS Officers, The Corona Is Out Of Control In Pune District, Infiltrating 1053 Villages And 724 Gram Panchayats.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे तिथे सगळेच उणे:20 आयएएस अधिकाऱ्यांची फौज तैनात असूनही पुणे जिल्ह्यात कोरोना हाताबाहेर, 1053 गावे आणि 724 ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा शिरकाव

मंगेश फल्ले7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढण्याची दाट शक्यता
 • पुण्यातील वातावरण विषाणूंच्या प्रसारासाठी पाेषक - तज्ञ

ऑगस्ट महिन्यातील खडकवासला परिसरातील ही हदयद्रावक कहाणी. खानापूर येथील एका चाळिशीतील या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. स्मशानभूमीत नेण्याची वेळ आल्यावर गावातील कुणीही धजावेना. अंत्यसंस्काराची व्यवस्था होत नव्हती. मृतदेह सहा तास घराबाहेर पडून होता. अखेर ग्रामसेवक,सरपंचांनीच पीपीई किट घालून हातगाडीवर स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केले. पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे शहरातील आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासनासोबतच सामाजिक वातावरणही पार ढवळून निघाल्याचे हे उदाहरण. तर दुसरीकडे आधी रुग्णवाहिका व नंतर बेडच उपलब्ध न झाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांना जीव गमवावा लागला.

मार्च महिन्यात राज्यात सर्वप्रथम पुणे शहरातच पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ४ ते साडेचार हजार रुग्ण आणि ६० पेक्षा अधिक मृत्यूंची नोंद होते आहे. २० पेक्षा अधिक आयएएस अधिकाऱ्यांची फाैज पुण्यातील काेराेना परिस्थिती आटाेक्यात आणण्याकरिता कार्यरत असतानाही अद्याप हा आजार नियंत्रणात आलेला नाही. सहा महिन्यांत अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णसंख्या वाढणे हे प्रशासकीय व्यवस्थेचे अपयश आहे. एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान २० जणांचे ट्रेसिंग करणे आवश्यक आहे. परंतु ट्रेसिंगच हाेत नाही. शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा करून प्रतिबंधात्मक उपाययाेजना राबवल्या जात नाहीत. नागरिकही ठिकठिकाणी गर्दी करतात, मास्क वापरत नाहीत, फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, वैयक्तिक स्वच्छता राखत नाहीत. यामुळे रुग्णसंख्या वाढते. समूह संसर्गाचा धाेका सध्या निर्माण झाला असून आणखी रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणात वाढू शकते, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.

ही आहेत प्रमुख आव्हाने

 • मृत्युदराचे २.४ टक्के प्रमाण एक टक्क्यापर्यंत खाली आणणे
 • ऑक्सिजन सिलिंडर, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर वाढवणे
 • पुरेशा कार्डियाक रुग्णवाहिका वाढवणे
 • नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे
 • हाेम आयसाेलेशन करणाऱ्यांवर देखरेख पथके कार्यरत करणे
 • खासगी हाॅस्पिटलवरील भार कमी करून शासकीय रुग्णालये सक्षम करणे

या आहेत चुका : प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसणे

 • लाेकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रशासकीय निर्णय घेणे
 • तात्कालिक प्रश्न सोडवणूक करताना भविष्यातील गरजांचा विचार न करणे
 • उपचारात मनमानी करणाऱ्या, रुग्णांना वाढीव बिले लावणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा अंकुश नसणे
 • वैद्यकीय व्यवस्थापनात त्रुटी, बेड, रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेत एकसूत्रीपणा नाही
 • वेळेत पुरेशा प्रशिक्षित आराेग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता न करणे
 • स्वॅब तपासणी अहवालातील गाेंधळ, रुग्णालयांचा ढिसाळ कारभार

तीन-चार दिवस आजार अंगावर काढत असल्याने संसर्गात वाढ

रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील २० जणांचे ट्रेसिंग आवश्यक आहे. परंतु रुग्णाच्या संपर्कातील लाेकांचे ट्रेसिंगच हाेत नाही. रुग्णवाहिका मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, जास्त मृत्युदर यामुळे लाेकांच्या मनात भीती निर्माण झाली. सर्दी, खाेकला, ताप असलेले ५० टक्के काेराेना पॉझिटिव्ह येत आहेत. अनेक जण हे आजार तीन ते चार दिवस अंगावर काढत असल्याने संसर्ग वाढत आहे. प्रिस्क्रिप्शन नसूनही आैषधे दिली जातात. काेणतेही रेकाॅर्ड ठेवण्यात येत नाही. रुग्णसंख्या कमी व्हावी या दृष्टीने काेणतेही प्रयत्न हाेत नसून डाॅक्टर, रुग्णालय यांच्यावर आराेप करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न प्रशासन करते. डाॅ.अविनाश भाेंडवे ( अध्यक्ष, इंडियन मेडिकल असाेसिएशन, महाराष्ट्र राज्य)

ग्रामीण भागातही आराेग्य सुविधा वाढवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

शहरी भागाप्रमाणेच आराेग्य सुविधा ग्रामीण भागातही वाढवण्यात येत आहेत. ग्रामीण भागात काेविड केअर सेंटर व समर्पित काेविड सेंटरमध्ये सध्या साडेचार हजार बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढत असून त्या दृष्टीने रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पाइपलाइनची कामे पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३० तर पुणे शहरातील २० खासगी हाॅस्पिटलमधील बेड अधिग्रहित करण्यात आले आहेत. आराेग्य विभागातील दहा संवर्गातील ११०० पदे भरण्यात आली. जनआराेग्य याेजनेअंतर्गत साडेसात हजार रुग्णांना लाभ दिला आहे. खासगी रुग्णालयांकडून पिळवणूक हाेणार नाही याची दक्षता घेण्यात येते. मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने ही उपाययाेजनांकडे लक्ष दिले जाते. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

पुण्यात अधिक चाचण्या, फिरती पथके कार्यरत करणे महत्त्वाचे

१२ वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूचा विषाणू देशात आला त्या वेळी त्याचा प्रसार पुण्यातच सर्वाधिक झाला होता. त्याचप्रमाणे काेराेनाचाही प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झालेला दिसताे. कारण पुण्यातील वातावरण या विषाणूंच्या प्रसाराकरिता पाेषक आहे. देशात सर्वाधिक दैनंदिन चाचण्या पुण्यात हाेत असून मुंबईपेक्षाही चाचण्या करण्यात पुणे आघाडीवर आहे. काेराेना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील लाेकांना शाेधून त्यांचे नमुने तपासणे यावर अधिक काम महत्त्वाचे आहे. हाेम आयसाेलेशनमध्ये असलेल्यांची संख्या लक्षणीय असून त्यांच्यावर देखरेख ठेवणारी फिरती पथके कार्यरत करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रुग्णालयांवरील ताण कमी हाेऊ शकताे. डाॅ. प्रदीप आवटे (एकात्मिक राेग सर्वेक्षणचे राज्य सर्वेक्षण अधिकारी)

बातम्या आणखी आहेत...