आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Punjab Politics| Captain Amarinder Singh Master Plan; Amit Shah BJP Amrinder Singh And Farmers Protest Inside Story

कॅप्टनचा मास्टर प्लॅन:भाजपमध्ये जाणार नाहीत तर नवीन संघटनेची करणार घोषणा! मग शेतकरी आंदोलन मिटवून आगामी विधानसभेत बाजी मारण्याच्या तयारीत कॅप्टन अमरिंदर सिंग

मनीष शर्मा | जालंधरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता कॅप्टन अमरिंदर सिंग 2 ऑक्टोबर रोजी नवीन संघटना घोषित करण्याच्या तयारीत आहेत. ही संघटना एक बिगर राजकीय संघटना राहील. कॅप्टन यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या संघटनेच्या माध्यमातून दिल्ली सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन मिटवले जाणार आहे. त्यानंतर पंजाबमध्ये कॅप्टन यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली जाईल. अशा पद्धतीने शेतकरी आणि केंद्र सरकार अशा दोघांना आपल्या सोबत घेऊन कॅप्टन डबल माइलेज प्लॅनिंग करत आहेत.

विशेष म्हणजे, पुढच्या वर्षीच पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. अशात 2022 मध्ये कॅप्टन नव्या दमासह पंजाबच्या राजकारणात पुन्हा बाजी मारू शकतील. कॅप्टन यांचे राजकीय सल्लागार नरिंदर भांबरी यांनी नुकताच 'कॅप्टन फॉर 2022' या नव्या घोषवाक्यासह पोस्टर जारी करून हे संकेत दिले आहेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदावरून हटवले गेल्यानंतर कॅप्टन म्हणाले होते, की ते सैनिक आहेत, अपमानित झाल्यानंतर मैदान सोडणार नाही. मग ते मैदान राजकारणाचे का असेना.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तत्पूर्वी ते भाजपमध्ये सामिल होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, अशी शक्यता फार कमी आहे. कॅप्टन थेट भाजपमध्ये सामिल होणार नाहीत. भाजपमध्ये जाण्याची कॅप्टन यांची इच्छा नाही. मग, काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये न जाता पंजाब कसे साधणार हाच कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मास्टर प्लॅन आहे.

भाजपमध्ये न जाण्याची दोन कारणे

  • पहिले कारण म्हणजे, कॅप्टन भाजपमध्ये गेल्यास शेतकऱ्यांमध्ये नकारात्मक संदेश जाईल. कॅप्टन यांचा वापर भाजप राजकीय फायद्यासाठी करत असल्याचे शेतकऱ्यांना वाटेल. कॅप्टन भाजपमध्ये गेल्यास आधीच भाजपवर नाराज असलेले पंजाबचे शेतकरी कॅप्टन यांनाही लक्ष्य करतील.
  • दुसरे कारण म्हणजे, केंद्र सरकार कृषी कायद्यांवर ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीत कृषी कायदे मागे घेणार नाही असे केंद्राने आधीच स्पष्ट केले आहे. अशात केवळ पंजाबच्या निवडणुकीसाठी पक्षाने माघार घेतली असा संदेश भाजप देणार नाही. कॅप्टन यांना भाजपमध्ये घेऊन तसा निर्णय झाल्यास विरोधी पक्ष हा मुद्दा प्रचारात उचलतील आणि यामुळे भाजपचे नुकसान होऊ शकते.

अशी आहे प्लॅनिंग

  • कॅप्टन अमरिंदर सिंग औपचारिकरित्या काँग्रेस सोडतील. ते लगेच राजकीय पक्षाची घोषणा करणार नाहीत. त्या ऐवजी एक बिगर राजकीय संघटना स्थापित करणार आहेत. या संघटनेच्या माध्यमातून दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील. शेतकरी नेत्यांच्या भेटी घेतील. ही संघटना प्रत्यक्ष आंदोलन करणार नाही. तर केंद्र सरकारसोबत होणाऱ्या चर्चेत आघाडी घेईल.
  • याच चर्चेत कृषी कायदे परत घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात येईल. त्यात किमान आधारभूत किंमत MSP गॅरंटी कायदा आणण्याचाही पर्याय राहील. कॅप्टन यांनी पंजाबमध्ये आधीच जाट महासभा बनवलेली आहे. या संघटनेशी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग जोडलेला आहे. यावरही कॅप्टन विचार करू शकतात.

शेतकरी आंदोलन आणि कॅप्टन

कृषी कायद्यांच्या विरोधात सर्वात मोठे आंदोलन पंजाबमधूनच जन्माला आले. काहींच्या मते, या आंदोलनाला कॅप्टन यांनीच खतपाणी घातले. अनेकवेळा त्यांनी उघडपणे या आंदोलनाचे समर्थन केले. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करणाऱ्या सर्वांवरच कॅप्टन तुटून पडले. हरियाणात लाठीमार झाला त्यावेळी तेथील मुख्यमंत्री मनोहर लाल खट्‌टर यांच्यावर ते भडकले होते. केंद्र सरकावर सुद्धा हल्लाबोल केला.

कॅप्टन शेतकरी आंदोलनातील नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आता पंजाबचे मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांची गरज आहे. शेतकऱ्यांची सहानुभूती त्यांच्या सोबत असेल तर त्यांचा राजकीय प्रवास आणखी सुकर होईल. शेतकरी आंदोलनातील नेत्यांशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत. शेतकरी नेत्यांनी इतर राजकीय पक्षांना आंदोलनात बहिष्कृत केले. परंतु, कॅप्टन यांना लाडू भरवून आभार व्यक्त केले होते.

पंजाबच्या मतपेटीचे गणित

पंजाबच्या मतदारांचा विचार केल्यास येथील 75 टक्के कुटुंब शेतीवर अवलंबून आहेत. पंजाबची अर्थव्यवस्थाच कृषी प्रधान आहे. त्यातही अनेकांचा उद्योग आणि व्यवसाय शेतीच्या अवजारांवरच विसंबून आहे. 117 जागांपैकी 77 जागांवर शेतकरी मतांचे वर्चस्व आहे.

सद्यस्थितीला पंजाबच्या जवळपास प्रत्येक गावातील शेतकरी आंदोलनात सामिल आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विषयी ते सकारात्मक आहेत. त्यांनी घडवलेल्या चर्चेतून कृषी कायदे माघारी घेतल्यास पंजाबमध्ये कॅप्टन सर्वात मोठे नेते म्हणून समोर येतील. 2002 आणि 2017 मध्ये कॅप्टन अमरिंदर यांच्या याच शैलीने काँग्रेसला सत्ता मिळवून दिली होती.

BJP काय फायदा होणार?

राजकारणात झालेल्या भेटींमध्ये गुप्त संदेश लपलेले असतात. तेच दिल्लीत घडले. काँग्रेसने कॅप्टन यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून कॅप्टन यांचा काळ संपला असे गृहित धरले आहे. पण, भाजपचा वेगळा विचार आहे. कॅप्टन यांनी सीएम असतानाही शहा यांच्या भेटी घेतल्या. पण, बुधवारची भेट वेगळी होती. मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर कॅप्टन म्हणाले होते, की 52 वर्षांच्या राजकारणात अनेक मित्र बनवले. त्याच्या काही दिवसांतच त्यांची आणि भाजपची मैत्री दिसून आली.

कॅप्टन यांचा राजकीय प्लॅन यशस्वी ठरल्यास भविष्यात भाजप आणि कॅप्टन यांचा भावी पक्ष पंजाबमध्ये एकत्रित येऊ शकतात. कृषी कायद्यांच्याच मुद्द्यावर भाजपचा पंजाबमधील मित्र पक्ष अकाली दल दुरावला गेला. आता पंजाबमध्ये भाजपकडे गमावण्यासाठी काहीच नाही. पाकिस्तान सीमेशी लागून असलेला पंजाब राष्ट्रीय सुरक्षेसाठी देखील महत्वाचे राज्य आहे. त्यातही शेतकरी आंदोलन मिटल्यास भाजप त्याचा फायदा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या ठिकाणी सुद्धा घेणार यात शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...