आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकामागच्या गोष्टी:रेचल कार्सनच्या ‘पुढल्या हाका’

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखनात रंजकता आणताना वैज्ञानिकतेची कास सोडायलाच पाहिजे असं नाही आणि विज्ञानाबद्दल लिहिताना रुक्ष राहिलंच पाहिजे असं नाही. लेखमालेतील या आधीचा डबनर-लेविट जोडगोळीवरचा लेख हे याचं उत्तम उदाहरण. पण याहीपुढे जाऊन विज्ञान, रंजकता आणि सामाजिक भान यांची सांगड घालणारा लेखक फार विरळा.

रेचल कार्सन शिक्षणाने समुद्री जैववैज्ञानिक होत्या आणि अमेरिकी सरकारच्या मत्स्यविभागात काम करत होत्या. त्यांना लवकरच लक्षात आलं, की आपल्याकडे सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगण्याची क्षमता आहे. त्यांनी १९४१ मध्ये समुद्री जीवांवर एक पुस्तक लिहिलं. पण, त्या वेळी दुसरं महायुद्ध ऐन भरात होतं आणि त्यामुळेच की काय, त्यांच्या पुस्तकाला थंडा प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यांनी १९५१ मध्ये लिहिलेलं दुसरं पुस्तक ‘द सी अराउंड अस’ मात्र तुफान गाजलं. एक तर यातले बरेच भाग न्यूयॉर्क टाइम्समध्ये अगोदरच प्रसिद्ध झाले होते आणि नंतर ‘रीडर्स डायजेस्ट’सारख्या लोकप्रिय साप्ताहिकाने या पुस्तकाचा संक्षिप्त गोषवारा छापला. त्यामुळे दुसऱ्या पुस्तकाला तुडुंब लोकप्रियता मिळाली. पहिल्या पुस्तकालाही संजीवनी मिळाली आणि १९५५ मध्ये त्यांनी समुद्री जीवांवर तिसरं पुस्तक लिहून ‘समुद्री त्रिधारा’ पूर्ण केली. या समुद्री त्रिधारेच्या लेखनशैलीचं वर्णन समीक्षकांनी ‘काव्यात्म, तरी वैज्ञानिकदृष्ट्या अचूक’ असं केलं. डिस्कव्हरी किंवा अन्य संस्थांनी केलेल्या वैज्ञानिक माहितीपटांनी ही शैली आता पुरेशी मुख्य प्रवाहात आणली आहे. पुढे काही काळातच कार्सन यांचं लक्ष समुद्राकडून जमिनीकडे वळलं. त्याला कारणीभूत झाल्या काडमुंग्या. अमेरिकेच्या काही भागांतल्या शेतजमिनींवर काडमुंग्यांनी हल्ला करून पिकांची नासधूस करायला सुरुवात केली. त्यावर उपाय म्हणून अमेरिकी सरकारच्या शेती विभागाने ‘डीडीटी’ हे कीटकनाशक पेट्रोलसारख्या जैवइंधनांमध्ये मिसळून फवारणी करायला सुरुवात केली. डीडीटीच्या दुष्परिणामांबद्दल अगोदरच काही आवाज उठायला सुरुवात झाली होती. यांनी डीडीटीच्या मानवी दुष्परिणामांबद्दल संशोधन करायला सुरुवात केली आणि १९६२ मध्ये ‘सायलंट स्प्रिंग’ नावाचं पुस्तक प्रकाशित झालं.

हे पुस्तक डीडीटीविरुद्धच्या लढ्यातला आणि एकूणच पर्यावरण चळवळीतला एक महत्त्वाचा टप्पा मानलं जातं. काही समीक्षकांनी डार्विनच्या ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज’नंतरचं स्थान याला दिलं आहे. या पुस्तकातली पहिली लक्षवेधी गोष्ट म्हणजे, कार्सन यांचा बदललेला ‘आवाज’. समुद्री त्रिधारेतला काव्यात्म, स्वप्नाळू, प्रसंगी खेळकर सूर जाऊन त्या जागी खोल, गंभीर आणि काहीसा तीव्र असा सूर आला. प्राप्तकाल हा विशाल भूधर असला तरी त्यावरची जैवसंस्कृती टिकवण्यासाठी माणसाने नंगानाच घालू नये हे या सुरांतून थेट पोहोचतं. माणूस पर्यावरणाचा शत्रू आहे. डीडीटीसारखे रासायनिक पदार्थ कीटकनाशक नसून जीवनाशक आहेत आणि त्यामुळे काडमुंग्यांसोबत माणसंही मरू शकतात. डीडीटीच्या अतिरिक्त वापरामुळे कीटक त्याला सरावतील, त्यांचा नाश करण्यासाठी आणखी तीव्र रासायनिक पदार्थ वापरावे लागतील आणि त्या पदार्थांचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणखी घातक असेल. या निसरड्या उतारावरून एकदा घरंगळायला लागलो की त्याला अंत नाही.

‘सायलंट स्प्रिंग’ देत असलेले हे संदेश आज आपल्याला कदाचित सामान्यज्ञान वाटू शकतील, पण १९६२ मध्ये हे ठामपणे सांगणारा कार्सन यांचा आवाज काही मोजक्या आवाजांपैकी होता. पण, सुदैवाने तो लोकांनी ऐकला. ‘सायलंट स्प्रिंग’ला अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. डीडीटीविरोध प्रखर होत गेला. त्याबरोबर द्यूपॉसारख्या डीडीटी उत्पादक कंपन्यांनी (आणि त्यांच्या सरकारी पित्त्यांनी) कार्सन यांच्या पुस्तकाची विश्वासार्हता कमी करण्याची मोहीम उघडली. पण, अखेर तो सगळा बेत फिस्कटला आणि १९७२ मध्ये अमेरिकेत डीडीटी वापरण्यावर बंदी घालण्यात आली.

रेचल कार्सन यांची खरी आठवण राहील ती मात्र पर्यावरण चळवळीला पुस्तकातून रस्त्यावर आणल्याबद्दल. आधी समुद्र आणि नंतर पर्यावरण हा विषय जनसामान्यांच्या संभाषणात आणल्याबद्दल. सरकार नावाच्या हत्तीला हलवून जागं करून अमेरिकेत ‘पर्यावरण संरक्षण विभाग’ उघडायला लावल्याबद्दल. काही पुस्तकांच्या सावल्या येणाऱ्या काळात लांबवर पडतात. ‘संगीत शारदा’ या १८९९ मध्ये आलेल्या नाटकाने जरठकुमारी विवाहाविरोधात जनमत तयार केलं. इतकं की १९२९ मध्ये बालविवाहांवर बंदी घालणारा कायदा जनमानसात ‘शारदा कायदा’ म्हणून प्रसिद्धी पावला. रेचल कार्सन यांनी दिलेली ‘सावध ऐका पुढल्या हाका’ ही हाळी वाया गेली नाही.

बातम्या आणखी आहेत...