आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परतीचा मान्सून दक्षिण गुजरातच्या वेशीवर अडकला आहे. सोमवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. परिणामी या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वतर्वली आहे. जळगाव, नाशिक, नगरसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तर विदर्भासाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. ला निना सक्रिय झाला असून त्यामुळे दिवाळीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता हवामानतज्ञांनी वर्तवली आहे. दिवाळीनंतर कडाक्याची थंडी पडणार असून जानेवारीत राज्यात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचा मुक्काम लांबला आहे. एरवी १० ऑक्टोबरपर्यंत राज्यातून निरोप घेणारा मान्सून परतीच्या प्रवासात दक्षिण गुजरातेत येऊन थबकला आहे. त्यातच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मान्सून अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने पावसाचा मुक्काम नोव्हेंबरपर्यंत लांबणार असा अंदाज हवामानतज्ञांनी व्यक्त केला. अमेरिकेच्या नॅशनल प्रिडिक्शन सेंटरच्या ताज्या अहवालानुसार, ला निना सक्रिय झाला आहे. ला निना स्थितीत भारतात मान्सून जास्त सक्रिय राहून चांगला पाऊस होतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अहवालानुसार, ला निनाची स्थिती आहे. यामुळे कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.
आता उत्तर महाराष्ट्रात पाऊस :
कुलाबा वेधशाळेनुसार १८ ते २२ ऑक्टोबर या काळात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. वेधशाळेने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
यलो अलर्ट :
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर व पुणे या जिल्ह्यांत ६४.५ ते ११५.५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता.
ग्रीन अलर्ट : संपूर्ण विदर्भासाठी. विदर्भात या काळात १५.५ ते ६४.५ मिमी पावसाची शक्यता आहे.
कडक हिवाळा जाणवणार
राज्यात यंदा कडक हिवाळा जाणवणार आहे. जानेवारीत काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. राज्यात या आठवड्यात मध्य महाराष्ट्रासह विदर्भ व मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. - डाॅ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ञ
थंडीची लाट, गारपीट शक्य
राज्यात डिसेंबरमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात जानेवारीत गारपीट होण्याचा अंदाज आहे. विदर्भात हिवाळ्यात किमान तापमान सरासरीपेक्षा २ अंशांनी कमी राहण्याची शक्यता आहे. यंदाचा हिवाळा कडाक्याच्या थंडीचा राहील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.