आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:‘प्रतिमे’चे राजकारण अन् भाजपचे ‘मुंबई’ मिशन !

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे पक्ष असल्याची प्रतिमा तयार झाल्याने हिंदुत्वाच्या लाटेत भाजपला त्याचा अधिक लाभ होतो आहे. सोबतच हे पक्ष घराणेशाहीवाले, भाजप मात्र सामान्यांना नेतृत्व देणारा पक्ष ही जनमनातील प्रतिमा दृढ करून ही राजकीय लढाई लढली जात आहे. ती बऱ्याच प्रमाणात यशस्वीही होत आहे. विकासाच्या अजेंड्यापेक्षा ही प्रतिमाच अधिक निर्णायक ठरते आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि एकूणच चार राज्यांतील निकालांतून हे प्रतिबिंबित झाले आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील भाजपचे ‘मिशन’ही अशा प्रतिमेवरच आधारलेले असू शकते.

देशाच्या संसदेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जात असले, तरी देशाची आर्थिक राजधानी जिथे आहे, त्या “महा’राष्ट्रातील सत्तेचा रस्ता कोणत्याही राष्ट्रीय पक्षासाठी अत्यंत मानाचा आणि त्यामुळेच राष्ट्रीय नेतृत्वाला कायम असुरक्षित वाटणारा असा मानला गेला आहे. त्यात एकत्र निवडणूक लढल्यानंतरही राजकीय रणनीतीचा परमोच्चबिंदू गाठत स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकारचे सरकार हा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत दुखरा विषय. त्यात या सत्ता स्थापनेपूर्वीच्या, पहाटेच्या शपथविधी नाट्यामुळे भाजपची मान राज्यात नाही म्हटले तरी थोडीफार खाली गेलेली. त्यानंतर गेली दोन - अडीच वर्षे ‘येनकेनप्रकारेन हे सरकार कोसळणार,’ अशी भाकिते करणारे भाजपचे नेते अद्यापही सरकार कायम असल्याच्या वास्तवाने आतून दुखावलेले. अशा वेळी उत्तर प्रदेश आणि गोव्यातील विजय महाराष्ट्रातील भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची ताकद ठरला आहे. आणि ही ताकद राज्यातील सरकार पाडण्यापेक्षाही मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

उत्तर प्रदेश आणि गोव्यातील निकालानंतर मुंबईत देवेंद्र फडणवीसांचे करण्यात आलेले जंगी स्वागत, त्याच वेळी फडणीवसांनी जाहीर केलेले पुढील लक्ष्य यातून राज्यात येत्या काळात घडणाऱ्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. फडणवीस म्हणाले, “आजचा दिवस विजय साजरा करा आणि उद्यापासून कामाला लागा. पुढील लढाई मुंबई महापालिकेची आहे.’ त्याच दिवशी संध्याकाळी फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत वरळीत ‘मराठी कट्टा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या कामाची दिशा स्पष्ट आहे. उत्तर प्रदेशातील विजयाच्या जोरावर मुंबईतील उत्तर भारतीय मतांच्या आधारे शिवसेनेला टक्कर देणे. वरळीसारख्या सेनेच्या बालेकिल्ल्यात मराठी मतांसाठी भाजपने सुरू केलेले हे कार्यक्रम भाजपची तयारीच स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या सत्तेस हादरा देणे आणि मुंबई सेनेकडून ताब्यात घेणे, हेच भाजपचे आगामी काळातील प्रमुख आणि पहिले लक्ष्य आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता ही शिवसेनेच्या मुकुटातील कोहिनूर आहे. सेनेच्या राजकारणातील मानबिंदू आहे आणि परिकथेतील राजाचा जीव पोपटात असतो, त्याप्रमाणे सेनेचा आत्माही आहे. भाजपच्या येत्या काळातील साऱ्या खेळ्या शिवसेनेच्या या बलस्थानावर घाव घालून त्या पक्षाला नामोहरम करण्याच्या दृष्टीनेच असतील.

मुंबई महापालिकेची निवडणूक या अर्थाने राज्याच्याच नाही, तर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यात भाजपने शिवसेनेला हरवले, तर राज्यातील राजकारणाची दिशा बदलेल. भाजपचा हल्ला परतावून शिवसेना आपला मुंबईचा गड राखू शकली तर राज्याच्याच नव्हे, देशाच्या राजकारणातही शिवसेना महत्त्वाची भूमिका निभावू शकते. ही निवडणूक आता साधी-सोपी, सरळ राहिलेली नाही. ती शिवसेना विरुद्ध भाजप एवढीही राहिलेली नाही. तिला उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, आजी मुख्यमंत्री विरुद्ध माजी मुख्यमंत्री, एक पक्षप्रमुख विरुद्ध दुसरे विरोधी पक्षनेते असे अनेक पदर आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीचे रण जाहीर होण्याआधीच दोन्ही बाजूंनी तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढाईला सुरुवातही झाली आहे. सोबतच महाराष्ट्र सरकारला कसे कमजोर करता येईल, हे भाजपचे व्यापक उद्दिष्ट आहेच.

त्या दृष्टीने “महाविकास आघाडी सरकार पडणार” असे जनमत निर्माण करण्याची, लोकांच्या मनात तसा आभास निर्माण करण्याची भाजपची खेळी आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे, राज्यपालांचा वापर हे त्यातील मार्ग आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांनी तसे प्रयत्न करून पाहिले, पण यश आले नाही. विशेषत: उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला पुन्हा एकदा या दृष्टीने काही करण्यासाठी ताकद मिळाली आहे, संधी मिळाली आहे. त्यामुळेच तो पूर्ण ताकदीनिशी, नियोजनासरशी त्या दिशेने झेपावला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर सर्वात जास्त धक्का काँग्रेसला बसला. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासारख्यांच्या भूमिकेला बळ मिळाले आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी राजकारणाचे नेतृत्व करण्याची काँग्रेसकडे क्षमता नसल्याचे हे दोन्ही नेते कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्षपणे मांडत आले आहेत. या निवडणूक निकालांनी काँग्रेसच्या ना-निर्नायकी, नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे ममता आणि पवारांच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या शक्यतांची चाचपणी केली जाऊ शकते. काँग्रेस सर्व पक्षांना एकत्र आणू शकत नाही. त्यामुळे ममता आणि पवार हे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून प्रयत्न करतील. पण, ते तेवढं सोपंही नाही. काँग्रेसमध्येही अनेक जण गांधी परिवाराबाहेरचे नेतृत्व यावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यांनाही ते शक्य होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील कोविड संसर्गाच्या व्यवस्थापनात राज्य सरकारची निष्क्रियता जगजाहीर होऊनही मतांच्या राजकारणात त्याचा काही परिणाम झाला नाही. याचे कारण मोदींची प्रतिमा. मोदींची लोकप्रियता अजूनही कायम आहे. आणि ती मोदी सरकारच्या तिप्पट आहे. परिणामी, भाजप सरकारांच्या अँटी इन्कम्बन्सीपेक्षा मोदींच्या प्रतिमेचा मतांवर मोठा परिणाम होत असल्याचे या निकालाने सिद्ध केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस हे घराणेशाहीवर पोसलेले, भ्रष्टाचारात माखलेले पक्ष आहेत, अशी प्रतिमा रुजवतानाच मोदी मात्र नि:संग देशभक्त, कौटुंबिक पाश सोडून देशासाठी वाहिलेले, देशहितासाठीच कार्यरत असलेले नेते असल्याची प्रतिमा निर्माण करण्यात भाजपला यश आले आहे. दहा वर्षांच्या सत्तेनंतरही ती कायम आहे. किंबहुना, दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसते आहे. लोकांचा मोदींवरील विश्वास अद्याप कायम आहे.

काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे अशी प्रतिमा असल्याने हिंदुत्वाच्या लाटेत भाजपला त्याचा अधिक लाभ होतो आहे. सोबतच हे पक्ष घराणेशाहीवाले, भाजप मात्र सामान्यांना नेतृत्व देणारा पक्ष ही जनमनातील प्रतिमा दृढ करून ही राजकीय लढाई लढली जात आहे. ती बऱ्याच प्रमाणात यशस्वीही होत आहे. विकासाच्या अजेंड्यापेक्षा जनमनातील ही प्रतिमाच अधिक निर्णायक ठरते आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि एकूणच चार राज्यांतील निकालांतून हे प्रतिबिंबित झाले आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील भाजपचे ‘मिशन’ही अशा प्रतिमेवरच आधारलेले असू शकते.

‘आप’ला यश मिळण्यास वेळ लागेल
आम आदमी पक्षाचा प्रभाव दिल्ली आणि उत्तर भारतातील राज्यांत अधिक दिसतो आहे. पंजाबनंतर हा पक्ष हिमाचल प्रदेशात उतरेल. उत्तराखंडमध्येही अधिक रुजण्याचे प्रयत्न सुरू होतील. जिथे काँग्रेस एकदम कमजोर झाला आहे, त्या राज्यांमध्ये ‘आप’ वाढताना दिसतो आहे. महाराष्ट्रात मात्र तो फार काही करू शकेल, असे वाटत नाही. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरी मतदारसंघात तो प्रयत्न करू शकतो. पण, त्यासाठी आणखी वेळ लागेल. लगेच मोठे काही घडणार नाही. पंजाबमध्येही या पक्षाला सात-आठ वर्षे लागलीच. आम आदमी पक्षाचे पहिले चार खासदार २०१४ मध्ये पंजाबमधून निवडून आले होते, हे आपण विसरतो. तेव्हापासूनच्या कामाचे फलित आता मिळताना दिसते आहे. ‘आप’ची तेवढी शक्ती महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत सध्या दिसत नाही.

राजदीप सरदेसाई, ज्येष्ठ पत्रकार
शब्दांकन : दीप्ती राऊत

बातम्या आणखी आहेत...