आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी वरील मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला एक हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मात्र, खैरे यांचे वक्तव्य नैराश्यातून असल्याची टीका करत शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी खैरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत खैरे यांचे काम आरोप करायचे आहे, आरोप करणे हेच विरोधकांचे काम असते आणि ते त्यांचे आरोप करत आहेत. जर एक हजार रुपये देऊन गर्दी जमा करण्याची वेळ आमच्यावर आली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आम्ही जमाच करू शकलो नसतो. मात्र त्यांचे जे कार्यक्रम चालू आहे, त्या कार्यक्रमाला गर्दी नाही. त्यामुळे भविष्यात त्यांना पैसे देऊन माणसे आणण्याची गरज भासू शकते, असा टोला राजेंद्र जंजाळ यांनी लगावला.
अनेक लोकांची इच्छा असून देखील आम्ही त्यांना सभेसाठी घेऊन येऊ शकलो नाही. कारण तेवढी साधने किंवा वाहनेच उपलब्ध नाहीत, असे देखील जंजाळ यांनी सांगितले. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना नैराश्य आले आहे आणि त्या नैराश्यातूनच ते अशी बेताल वक्तव्ये करत आहेत, असा टोलाही जंजाळ यांनी लगावला. 'आमच्या सभेसाठी आलेले सर्व कार्यकर्ते स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत. हिंदूह्दयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार दिला आहे, त्या विचारांना पुढे घेऊन जाणारे आमचे कार्यकर्ते आहेत.' असे देखील ते म्हणाले. हे कार्यकर्ते पैशाने विकले जाणारे कार्यकर्ते नाही आणि पैशाने विकत घेण्याची सवय देखील आम्हाला नाही, असा दावाही त्यांनी केला.
गद्दाराची परिभाषा काय?
बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आम्ही युती करणार नाही आणि युती करायची गरज भासल्यास माझे दुकान मी बंद करेल. मग बाळासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते कोणते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करून गेल्या पंचवीस वर्षापासून ज्यांच्या सोबत आमची युती आहे त्यांच्यासोबत सत्तेत बसलो आहे. खरे गद्दार कोण याचा विचार त्यांनीच करायला हवा आणि गद्दाराची परिभाषा काय? हे देखील आम्हाला सांगायला हवी, असा दावा देखील त्यांनी केला.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा होत आहे. यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. या दोन्ही मिळवण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. यादरम्यान दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.