आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Ram Temple Will Be Built In December; Ram Mandir In Ayodhya Update | Golden Throne For Ramlalla | Ram Mandir

अयोध्येत सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होणार रामलल्ला:डिसेंबरमध्ये राम मंदिराचा गाभारा तयार होईल, वाचा, मंदिर उभारणीविषयी सर्वकाही

लेखक: धर्मेन्द्र झा / गौरव पांडेयएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या…. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची अयोध्या. सध्या येथे रामलल्लाच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. मंदिराचे काम 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल. यामध्ये गर्भगृह म्हणजेच गाभाऱ्याचाही समावेश आहे. जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी रामलल्ला या गर्भगृहात विराजमान होतील.

गर्भगृहातील देवाचे आसन सोन्याचे असेल. मंदिराचे शिखरही सोन्याचे असू शकते. महाराष्ट्रातील एका व्यावसायिकाने जन्मभूमी ट्रस्टला सुवर्णजडित शिखर दान करण्यासाठी विनंती केली आहे. मात्र ट्रस्टने याला अद्याप कोणतीही संमती दिलेली नाही.

राम मंदिराच्या उभारणीसोबतच रामपथ, भक्तीपथ, रेल्वे स्टेशन, विमानतळ, राम की पैडी यासह 50 हून अधिक विकास प्रकल्पांवर अयोध्येत काम सुरू आहे. अयोध्येला सर्वात मोठे धार्मिक पर्यटन स्थळ बनवण्यासाठी केंद्र सरकारने ब्लू प्रिंट तयार केली आहे.

नवीन वर्षात वाचा अयोध्येहून खास ग्राउंड रिपोर्ट, जाणून घ्या मंदिर बांधून किती तयार झाले आहे? श्रीराम विमानतळ आणि रेल्वे स्टेशन किती प्रमाणात बांधले गेले आहे?

गर्भगृहात रामलल्लाची आणखी एक मूर्ती बसवणार, रेखाचित्रे मागवली

रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य आणि अयोध्येचे राजे विमलेंद्र प्रताप मिश्र यांनी सांगितले की, बालरुपातील रामाची मूर्ती खूप लहान आहे. त्यामुळे गर्भगृहात विराजमान झाल्यावर भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी बालस्वरूपाची मोठी मूर्तीही तयार केली जात आहे. जी अभिषेक झाल्यानंतर गर्भगृहातच स्थापित केली जाईल. ही मूर्ती 2.5 ते 3 फूट उंचीची असू शकते. यासाठी देशातील बड्या शिल्पकारांना स्केचेस बनवण्यास सांगण्यात आले असून त्यात पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त कलाकारांचा समावेश आहे.

ही मूर्ती संगमरवरी असेल, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी राजस्थानमध्ये दोन शिळाही खरेदी करण्यात आल्या आहेत. गर्भगृहाचा दरवाजा सागवान लाकडाचा असेल. हे लाकूड महाराष्ट्रातून येणार आहे. याशिवाय गर्भगृहात कर्नाटकातून आणलेले ग्रॅनाइटचे दगड वापरण्यात येत आहेत.

नवीन वर्षात अष्टकोनी गर्भगृहासह 5 मंडप तयार होतील.

रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र सांगतात की, डिसेंबर 2023 मध्ये तळमजला तयार होईल. या मजल्यावर गर्भगृहासह 5 मंडपही असतील. ज्यांची नावे गुढी मंडप, नृत्य मंडप, रंगमंडप, कीर्तन मंडप अशी असतील. यासोबतच मंदिरात प्रवेश करण्यासाठी सिंह द्वार बांधण्याचे कामही पूर्ण होणार आहे. मंदिराचे गर्भगृह अष्टकोनी असेल. यामध्ये मध्यभागी मागच्या बाजूस प्रभू रामलल्लांचे विराजमान होण्याचे आसन असेल.

नागर शैलीत मंदिर बांधले जात असल्याचे ते सांगतात. उत्तर भारतातील प्राचीन मंदिरे या शैलीत बांधलेली आहेत. यासोबतच मंदिराच्या गाभार्‍यात प्रभूंच्या बालस्वरूपाची मोठी मूर्तीही बसवण्यात येणार आहे. जेणेकरून भक्तांना दुरूनच देवाचे दर्शन घडेल. त्यासाठी देशभरातील दिग्गज शिल्पकारांकडून स्केचेस मागवण्यात आले आहेत. ही मूर्ती लहान मुलासारखी कोमल दिसावी आणि देव कमळावर विराजमान असावे, अशा दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

रामनवमीच्या दिवशी भगवान रामांचा सूर्य तिलकाने अभिषेक केला जाईल

डॉ.अनिल मिश्र सांगतात की, मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचे काम 2024 मध्ये सुरू होईल. या मजल्यावर राम दरबार असेल. मंदिरात तिसरा मजलाही बांधण्यात येणार असून, त्यावर भाविकांना प्रवेश मिळणार नाही. मंदिराचे शिखर 161 फूट उंच असेल. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामाला सूर्यतिलकाने अभिषेक केला जाईल. म्हणजेच सूर्याची किरणे थेट देवावर येतील. ही किरणे कशी येतील यासाठी आयआयटी रुरकीचे प्राध्यापक काम करत आहेत.

गर्भगृहाभोवती 14 फूट रुंद परिक्रमा कॉरिडॉरही असेल, असे मिश्र सांगतात. मंदिरापासून 25 ते 27 मीटर अंतरावर एक मंडप बांधण्यात येणार आहे. त्याची उंची सुमारे 16 फूट असेल. या तटबंदीवर आग्नेय दिशेला विष्णु पंचायतन मंदिर, ईशान्येला दुर्गाजींचे मंदिर, ईशान्य कोनात गणेशजींचे मंदिर, अग्निकोनात भगवान शंकर, उत्तरेला अन्नपूर्णा माता आणि गर्भगृहाच्या दक्षिण बाजूला हनुमानजींचे मंदिर असेल. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेला आणि बाहेर पडण्याचा मार्ग दक्षिणेला असेल.

350 मजूर आणि कारागीर रात्रंदिवस मंदिर उभारणीच्या कामात गुंतलेले

डॉ.अनिल मिश्र सांगतात की, मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. जन्मभूमीवर सध्या 350 मजूर आणि कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत. यासोबतच राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील वंशी पहाडपूरमध्ये सुमारे एक हजार मजूर आणि कारागीर काम करत आहेत. येथे मंदिरात वापरले जाणारे दगड कोरण्याचे काम सुरु आहे. येथून मंदिरात गुलाबी दगड आणले जात आहेत.

डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले की, मंदिर परिसरात एक प्रवासी सुविधा केंद्रही बांधण्यात येणार आहे. 25 हजार प्रवाशांचे सामान ठेवण्याची व्यवस्था यात असेल. यावेळी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 2 लाखांहून अधिक भाविक येऊ शकतात. 2022 मध्ये पहिल्याच दिवशी 1.47 लाख लोक आले होते. त्यापैकी सुमारे 85% तरुण होते.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवतांना गुलाबी वस्त्र परिधान केले जाईल.

राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास सांगतात की, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रभू राम गुलाबी वस्त्रे परिधान करतील. त्यांना विशेष भोग अर्पण केला जाणार आहे. त्यात पुरी, हलवा, खीर, भाज्या, फळे आणि पंच मेवा असेल. देवाला अत्तराचा अभिषेक केला जाईल. पूजेदरम्यान देशात आणि जगात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. पूजेदरम्यान ही कामना नेहमीच केली जाते. मात्र नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे.

सत्येंद्र दास सांगतात की, मी 1992 पासून रामलल्लाची पूजा करत आहे. तेव्हा ही जबाबदारी तत्कालीन आयुक्तांनी माझ्यावर सोपवली होती. त्यानंतर प्रभु सुमारे 27 वर्षे ताडपत्रीमध्ये राहिले. पूर्वी देवाच्या भोगसाठी दरमहा 10 हजार रुपये मिळत होते, आता एक लाख रुपये मिळतात. आम्ही वैष्णव परंपरेनुसार देवाला भोग अर्पण करतो.

नवीन मंदिरात देवाच्या मुख्य मूर्तीप्रमाणेच मोठी मूर्ती बसवण्याचा विचार आहे. सध्या देव खूप लहान आहे, त्यामुळे त्यांना दुरून पाहणे अवघड आहे. देवाची प्रतिबिंब मूर्ती कशी असावी? यावर ट्रस्टसोबतच ऋषी-मुनींची मतेही घेतली जात आहेत. अष्टधातूची मूर्ती बसवली तर बरे होईल असे माझे मत आहे. ही मूर्ती देवाच्या बालरूपात असावी, कारण हे देवाच्या जन्मस्थानाचे मंदिर आहे.

आता 9 ग्राफिक्सद्वारे राम मंदिराबद्दल जाणून घ्या सर्वकाही-

आता 3 ग्राफिक्समध्ये श्रीराम विमानतळ आणि रेल्वे स्टेशनविषयी जाणून घ्या

आता फोटोंमधून बघा राम मंदिराचे निर्माण कार्य

सीएम योगी यांनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या आसपासच्या भागात कॉमन बिल्डिंग कोड लागू करण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत राम मंदिराच्या आजूबाजूची सर्व मंदिरे, इमारती आणि प्रतिष्ठानांचा आकार आणि रंग सारखाच असेल.
सीएम योगी यांनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या आसपासच्या भागात कॉमन बिल्डिंग कोड लागू करण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत राम मंदिराच्या आजूबाजूची सर्व मंदिरे, इमारती आणि प्रतिष्ठानांचा आकार आणि रंग सारखाच असेल.

इनपुट सहयोग - रमेश मिश्र, ग्राफिक्स - राजकुमार गुप्ता.

बातम्या आणखी आहेत...