आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुस्लिमबहुल इंडोनेशियात हिंदू २% हून कमी असले तरी येथील संस्कृतीत राम आणि शिव रुजलेले आहेत. येथे भारताप्रमाणेच सणोत्सव साजरे केले जातात. येथील बाली, सुमात्रा आणि सुलावेसी, पश्चिम पापुआत दिवाळी मुख्य पर्व आहे. दिवाळीच्या ३० दिवसांपूर्वीच विधी सुरू होतात. नागरिक ३० दिवसांपर्यंत व्रत ठेवतात. सुमात्रातील मेदानमध्ये राहणारे डी. सुरेशकुमार सांगतात की, ३० दिवसांच्या या व्रतामुळे स्वत:वरील नियंत्रण, स्वत:चा शोध, उणिवा दूर करणे आणि दिवाळीपासून नवीन सुरुवात करण्याचा मार्ग प्राप्त होतो. या ३० दिवसांत आम्ही घरे सजवतो. दिवे पेटवतो. दिवाळीच्या पहाटे स्नानानंतर सहकुटुंब मंदिरात जातो. नातेवाईक व मित्रांच्या घरी भेट देतो. रात्री पूजेनंतर आई-वडील, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतो. गर्व नाहीसा करण्यासाठी क्षमा मागतो. आतषबाजीही करतो.
जगभर भ्रमंती करणारे इटलीतील लेखक वर्थीमांनी १५०२ ते १५०८ दरम्यान दक्षिण अाशियाचा दौरा केला होता. त्यांनी या प्रवासवर्णनात भारतातील विजयनगरप्रमाणे सुमात्रात होणाऱ्या आतषबाजीचा उल्लेख केला आहे. काही ठिकाणी अधर्मावर धर्माचा विजय म्हणून दिवाळी साजरी केली जाते. स्थानिक भाषेत याला गलुंगन म्हणतात. हा सण दर २१० दिवसांनी येतो. जावातील योगाकार्ता शहरात हिंदूंचे सर्वात मोठे सांस्कृतिक केंद्र असलेले प्रम्बनन मंदिर वसलेले आहे. ८५० इसवी सनात उभारण्यात आलेल्या या मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश आहे. येथे ब्रह्मा, विष्णू व महादेवाची मंदिरे आहेत. हे संजय वंशाचे शासक रकाई पिकातन यांनी उभारले होते. येथील प्राचीन अॅम्फी थिएटर दररोज सादर केल्या जाणाऱ्या रामायणासाठी प्रसिद्ध आहे. १९७६ पासून येथे दररोज रामायणाचे सादरीकरण होते. हा जगातील सर्वाधिक काळ चालणारा स्टेज शोदेखील आहे. यातील कलाकारांपासून ते प्रेक्षकांमध्ये मुस्लिमधर्मीय मोठ्या प्रमाणात भाग घेतात. सीतेचे वडील राजा जनक यांची भूमिका साकारणारे अली नूर सांगतात, आम्ही केवळ मुस्लिम नव्हे तर जावावासीयही आहोत. येथे हिंदू-बौद्ध कथा ऐकून लहानाचे मोठे झालो. २० हजारांपेक्षा जास्त मंदिरे असणाऱ्या बालीत ८०% हिंदूधर्मीय आहेत. हिंदूंच्या धार्मिक शिक्षणात रामायणाचा समावेश केला आहे. येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणात रामायणाचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.