आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रसिक'ची दशकपूर्ती:"रसिक'ने केला वेटरचा रायटर...

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दै. दिव्य मराठीची रसिक पुरवणी वाड्ःमयीन मूल्य असलेली महत्त्वाची पुरवणी आहे. संपादकीय टीमच्या डोळस संपादनातून या पुरवणीने संपूर्ण महाराष्ट्रभर आपला वाचकवर्ग निर्माण केला आहे. ही पुरवणी काही जिल्ह्यांमध्ये जरी प्रसिद्ध नसली तरी तिचा ऑनलाईन वाचकदेखील भरमसाठ आहे. यात लिहिणारे लेखक आणि एकंदरीत लेखांचा दर्जा पाहता संदर्भ पुरवणी म्हणून तिचा उपयोग व्हावा, इतकं महत्त्व "रसिक' ने निश्चितच मिळवलंय. जो लेखक या पुरवणीचा भाग होतो, त्याच्या वाट्याला वाचकांकडून जो प्रतिसाद मिळतो, तो अभुतपूर्व असाच असतो. २०१७ मध्ये रसिक पुरवणीत मी "टिश्यू पेपर' हा हॉटेल जीवनानुभवावरचा आत्मशोधनपर कॉलम लिहिला. त्या कथात्म लेखांची पुण्याच्या राजहंस प्रकाशन संस्थेकडून "टिश्यू पेपर' ही माझी पहिलीच कादंबरी प्रसिद्ध होते आहे.

यापूर्वी मी कविता लेखन करायचो.कवी म्हणून काही मोजक्या लोकांना माझं नाव माहीत होतं; पण रसिक पुरवणीतल्या या सदराने मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लेखक म्हणून पोहचवलं व ओळख दिली. थोडक्यात "रसिकने केला वेटरचा रायटर' असेच म्हणावे लागेल. खरे तर तो कॉलम बंद होऊन तीन वर्षे उलटलीत पण आजही अधूनमधून मला वाचकांचे फोन येतात,की तुम्ही आता रसिक पुरवणीत लिहीत का नाही? इतके वर्षे सुद्धा वर्तमानपत्रातल्या पुरवणीचे वाचक एखाद्या लेखकाला लक्षात ठेवतात,मला वाटतं हे त्या दैनिकाच्या पुरवणीचे निर्विवाद यश आहे.

मी जवळपास दीड तप हॉटेलमध्ये नोकरी करत होतो. माझं शिक्षणदेखील हॉटेल लाईननेच पूर्ण केलं. हॉटेलमधली खरकटी भांडी धुणं, किचन हेल्पर म्हणून काम करणं, टॉयलेट, फरशी, टेबल पुसणं, टेबलवरचे खरकटी ताटं उचलणं, कस्टमरला सर्व्हिस देणं यासह मी हॉटेल बारबालांसोबतही काम केलं. वेळेप्रसंगी क्षुल्लक कारणांवरून कस्टमर सोबत भांडणं व्हायची ते अत्यंत घाणेरड्या शिव्या द्यायचेत. आम्ही वेटर,हेल्पर सहन करायचं तेवढं करायचो एकदा डोक्यावरून पाणी गेलं, की एकजण खर्रकन शटर खाली ओढायचा. मग मस्त बारीक तिंबायचो आम्ही कस्टमरला. हॉटेलात काम करताना, शिकण्याची भूक कधीच कमी झाली नाही.नोकरी करत करत मराठी विषयात एम.ए.,बी.एड्.,पीएच्.डी. केली. प्राध्यापक पदाला आवश्यक नेट परीक्षा पास झालो. प्रख्यात कादंबरीकार राजन गवस यांच्या सांगण्यानुसार हॉटेलमधले अनुभव लिहून काढले. रसिक पुरवणीत हे अनुभव ' टिश्यू पेपर ' या नावाखाली छापले गेले आणि बघता बघता एका सामान्य वेटरला रसिक पुरवणीने लेखक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख मिळवून दिली.

रसिक पुरवणीचा वाचक हा निमशहरी आणि ग्रामीण आहे. चहाची टपरी, पानाचा ठेला, पेट्रोलपंप, गॅरेज ,उपाहारगृहे यांच्याबरोबरीने अनेक नामवंत साहित्यिकांच्या घरोघरी ही पुरवणी नियमित वाचली जाते. त्या सगळ्या वाचकांनी रसिकला आपलंसं करून टाकलंय. "टिश्यू पेपर' लिहिताना हेल्पर, वेटर, बारबाला,मोरीवाली बाई ,कॅप्टन,कूक, हॉटेल मॅनेजर, हॉटेल मालक या व्यक्तिरेखांवर रसिकच्या वाचकांनी प्रचंड प्रेम केलं. हे सगळे कॅरेक्टर त्यावेळी या लोकांच्या घरादारात वावरत होते. कदाचित म्हणूनच जेथे जेथे रसिक पोहोचत होती तिथून मला आठवडाभर फोन कॉल यायचेत. बारबालांच्या दुःखाचा पाढा मांडताना तर अनेक स्त्रियांनी फोन करून आपल्या मनातला कढ मोकळा केला. अनेकींना मी कोणी समाजसुधारक आहे, असाही संभ्रम झाला होता. यामुळे कित्येक स्त्री वाचकांनी घराघरातील कौटुंबिक कलह, स्त्रियांच्या बाबतीतले प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवले; आणि यासाठी काही करण्याजोगे आहे का,अशीही विचारणा केली. वाचकांच्या ह्या अतोनात प्रेमानं क्षणभर मला हुरळून गेल्यासारखं व्हायचं.

दुसऱ्या बाजूला आपण जबाबदारीनं लिहिलं पाहिजे, ह्या गोष्टीची मला जाणीव झाली. सुरुवातीला "टिश्यू पेपर' लिहिताना आपलं कोण वाचेल, असाही मनात एक संशय होता; मात्र व्हाट्सअप व ई-मेल पाहिल्यावर मी आवाक् झालो. येणारे फोन कॉल्स बघून बायकोदेखील आश्चर्यचकित व्हायची. वर्तमानपत्राच्या एखाद्या पुरवणीचा इतका प्रभाव पडावा, असं खचितच घडतं. रसिक पुरवणी त्याला अपवाद म्हणता येईल. यामागचं कारण म्हणजे संपादकीय टीमने पुरवणीचा सांभाळलेला दर्जा होय. लिहिणारा लेखक कोण्या जातीपातीचा,गटातटाचा आहे हे ही टीम कधीच बघत नाहीत. लेखक कोणत्या पदावर आहे, याला महत्त्व न देता, त्याच्या लेखणीत दम आहे ना, हे संपादकीय टीम चटकन ओळखते आणि त्याला लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. रसिक बाबतचा असाच अनुभव माझ्या पुढ्यात आहे.

नवलेखकांना हल्ली नामांकित प्रकाशक मिळत नाही अशी सर्व स्तरातून ओरड ऐकायला मिळते, पण रसिकमुळेच मला राजहंस प्रकाशन ही अत्यंत महत्त्वाची प्रकाशनसंस्था मिळाली आहे. या अनुषंगाने संपादक,वाचक व रसिक पुरवणीचा मला लेखक म्हणून घडविण्यात खूप मोठा वाटा आहे.

रमेश रावळकर
संपर्क - ९४०३०६७८२४

बातम्या आणखी आहेत...