आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबीररंग:ऐसा रंग रंगा रंगरे ने...

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रं गपंचमी म्हणजे केवळ रंगांची उधळण नाही तर एखाद्या रंगात तुमचं सारं अस्तित्व विरघळून टाकणं आहे, असं कबीर सांगतात. तुमच्या सगळ्या भावना, वासना नि धारणा विसर्जित करून टाकल्या की मग भक्ती, प्रेम, जिव्हाळा यांसारख्या एकाच रंगात असं पूर्ण विरघळता येतं. तुम्ही म्हणजे तो रंग नि तो रंग म्हणजे तुम्ही बनून जाता... कबीर हे चादर विणणारे होते. ते त्यांच्या उपजीविकेचं साधन. त्यातल्या प्रतिमा नि रूपकं घेऊन त्यांनी रंगांना आध्यात्मिक उंची दिली. त्यांची एक रचना सुप्रसिद्ध भजन म्हणून आपण नक्की ऐकली असेल. ती म्हणजे ‘चदरिया झीनी रे झीनी...’ त्यातल्याच या काही ओळी... जब मोरी चादर बन घर आई, रंगरेज को दीन्ही। ऐसा रंग रंगा रंगरे ने, के लालो लाल कर दीन्ही॥ इथं कबीरांनी मानवी देहाला चादरीची उपमा दिली आहे. चदरिया झीनी याचा अर्थ ही चादर अत्यंत नाजूक आहे, असा होतो. उभे-आडवे धागे विणून चादर तयार झाली, की विणकर ती चादर रंगाऱ्याकडे (रंगरेज) रंगवण्यासाठी देतो. कबीर म्हणतात की, त्यांनी आपली ही देहरूपी चादर परमोच्च अस्तित्वाकडे, ज्याला आपण ईश्वर, देव म्हणतो त्या रंगाऱ्याकडे सोपवली आणि त्याने ती त्याच्याच रंगात आकंठ बुडवून टाकली. इथे लालो लाल म्हणजे लाल रंग हा प्रतीकात्मक वापरला आहे. त्या रंगाऱ्याने असा काही रंग दिला, की ही चादर त्याच्याच रंगात, त्याच्याच स्मरणात, त्याच्याच नेणिवेत रंगून गेली. याच रचनेत... अष्टप्रहर का चरखा बनाया, पाँच रंग की बुनी। नौ-दस मास बुनन को लागे, मुरख मैली किन्ही।। असाही उल्लेख कबीरांनी केला आहे. कबीरांनी मानवी देहाचा जन्म ही प्रक्रिया चादरीचे विणकाम, रंगकाम आणि कलाकुसरीशी अत्यंत खुबीने जोडली आहे. वरच्या ओळींत कबीर सांगतात, आठ प्रहरांचा चरखा बनवला आणि त्यावर पंचतत्त्व म्हणजे पाच रंगांच्या धाग्यांनी मानव देहाच्या रूपाची ही चादर विणली आहे. मानवी देह आईच्या गर्भात वाढत असतो. तिथे तो नऊ महिने आणि काही दिवस पूर्ण वाढ होईपर्यंत असतो आणि त्यानंतर तो गर्भातून बाहेरच्या दुनियेत येतो. त्यालाच.. नौ-दस मास बुनन को लागे, म्हणजे ही चादर विणायला नऊ-दहा महिन्यांचा काळ लागला आहे. इतकी नाजूक, पंचतत्त्वाच्या धाग्यांनी बनवलेली आणि नऊ-दहा महिने कष्ट घेऊन निसर्गाने विणलेली ही देहरूपी चादर आपण मानवी देह धारण केल्यानंतर मूर्खासारखी मळवतो. सहा विकार, विविध वासना आणि व्यसनं यांच्या नादी लागून ही चादर मळवू नका, असा संदेश कबीर देतात. याच रचनेच्या शेवटी कबीर लिहितात... दास कबीर ने ऐसी ओढ़ी, ज्यूँ की त्यूं धर दीन्ही। के राम नाम रस भीनी, चदरिया झीनी रे झीनी॥ ही चादर कबीराने अशी पांघरली की तिला विकार, वासना, व्यसनाचा कणभरही स्पर्श झाला नाही. उलट रामनामाच्या रसात ओतप्रोत भिजवून ही चादर अंतिम श्वासापर्यंत अधिक उत्तम, उदात्त बनवली, असं ते सांगताहेत. मानवी देहासाठी (अर्थात त्यात मनदेखील समाविष्ट आहे) चादरीची उपमा अद्वितीयच. अशा चपखल, कौशल्यपूर्ण उपमा, प्रतिमा हीच कबीरांची ओळख आहे. विनामूल्य मिळालेल्या देहाला आपण लहानपणापासून अनेक इच्छा, वासनांची चटक लावतो. चादररूपी देह मलिन करून टाकतो. आपल्या मनात तर क्षणाक्षणाला बऱ्या-वाईट विचारांच्या लाटा उसळत असतात. कधी वाटतं ईश्वरचरणी लीन व्हावं, तर कधी वाटतं प्रचंड संपत्ती गोळा करावी. क्षणात वाटतं आपण त्या सर्वात्मक ईश्वराचेच अंश आहोत, तर क्षणात वाटतं, काय या जीवनाचा उपयोग? आहार, निद्रा, भय, मैथुन यात रत होऊन काय मिळणार? सगळ्या प्राण्यांसारखंच शिकार (संपत्ती), गुहा (घर), मादी (संसार), पिल्लू (संतती) आणि पुन्हा तेच ते, यातून काय साध्य होणार? अशा प्रश्नांनी मेंदू त्रासून जातो. मानवी मनाबद्दल तर बोलावं तेवढं थोडंच आहे. कबीरांच्याच शब्दांत सांगायचं तर... मन के बहुतक रंग है, क्षण क्षण बदले तोय। एक ही रंग में रहे, ऐसा बिरला कोय।। मानवी मनाचे अनेक रंग आहेत. रंगपंचमीच्या दिवशी बाजारात अनेक रंग उपलब्ध असतात तसे. मनाचे हे रंग क्षणाक्षणाला बदलत जातात. परंतु, एकाच रंगात, एकाच ध्येयात रंगून गेलेली व्यक्ती क्वचितच सापडते, असं कबीर या दोह्यातून सांगताहेत. या रंगपंचमीला जीवनाचा एक रंग निश्चित करून त्याच रंगात ओतप्रोत रंगण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे बाह्यरंग कितीही बदलला, तरी आतला रंग कधीच फिका पडणार नाही.

डॉ. भालचंद्र सुपेकर bhalchandrasauthor@gmail.com संपर्क : ९८८१०९८४३५

बातम्या आणखी आहेत...