आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Rare Video Of 1st May 1960 Celebrations Of Inception Day Of Maharashtra The Celebration Was Held For Five Days

महाराष्ट्र दिन विशेष:62 वर्षांपूर्वी असा साजरा झाला होता पहिला महाराष्ट्र दिन, पाच दिवस सुरु होता राज्यनिर्मितीचा उत्सव

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खास व्हिडिओ आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत...

आज एक मे… राज्यभरात आज 62 वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. मागील दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने हा खास दिन साजरा झाला होता. पण यंदा कोरोनाचे सावट कमी असल्याने नेहमीच्याच उत्साहात हा दिवस साजरा केला जाणार आहे. पण आजपासून 62 वर्षांपूर्वी म्हणजेच 1 मे 1960 रोजी पहिला महाराष्ट्र दिन कसा साजरा झाला होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच प्रत्येकाला असेल. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला पहिला महाराष्ट्र दिन कसा साजरा झाला होता हे सांगणारा खास तीन मिनिटांचा व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत...

दोन वर्षांपूर्वी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 'हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिनी' दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक खास व्हिडिओ शेअर केला होता. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्वतंत्र राज्य म्हणून घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्थापना झाली त्यावेळी काय काय घडले होते हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 हुतात्म्यांचे बलिदान गेले होते. त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा निर्णय करुन घेण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले होते. दिल्लीतील प्रमुख नेत्यांची मान्यता मिळाल्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळच्या ऐतिहासिक कार्यक्रमात यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणून त्याचे पूजन केले होते. याच दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रामध्ये प्रगती घडवून आणण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले.

पाच दिवस साजरा झाला होता राज्यनिर्मितीचा उत्सव
या दुर्मिळ व्हिडिओत 1 मेच्या मध्यरात्री महाराष्ट्र राज्यच्या निर्मितीची तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी केलेली घोषणा बघता येतेय. लता मंगेशकर यांनी पहिल्यांदाच मंचावर बहु असोत सुंदर हे महाराष्ट्र गीत गायले होते. शिवाय देशातील प्रमुख धर्माच्या धर्मगुरुंनी मुंबईल क्रॉस मैदानात केलेल्या सामुहिक प्रार्थनांपासून ते कामगारांनी काढलेल्या जल्लोष यात्रेचे चित्रण या व्हिडिओत बघायला मिळतंय. यशवंतराव चव्हाण यांच्या शपथविधीपासून ते महाराष्ट्राचा नव्या नकाशाची पहिली झलकही येथे बघायला मिळतेय. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे अनावरण यावेळी करण्यात आले होते. याशिवाय मुंबईमधील इमारतींना पाच दिवस करण्यात आलेली रोषणाई अशा अनेक घटना या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...