आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपोर्ताज:काळवंडलेलं आळवंडची कैफियत

आशय येडगेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या उशाशी असणारा आळवंड हा परिसर अजूनही विकासाच्या संकल्पनेपासून मैलोनमैल दूर आहे. खरंतर तो दूर ठेवला गेलाय कारणं तसं न केल्यास प्रस्थापित शहरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल हे मात्र नक्की. धरण भरलेलं असून पाणी नाही, वीजनिर्मिती केंद्र असून वीज नाही.. खरंतर सगळ्या भौतिक गरजा निर्माण करणाऱ्या या सगळ्या आदिवासी भागांच्याच साध्या साध्या गरजा आपण पूर्ण नाही करू शकलो हे वास्तव दिसत होतं. दिवसभर या उजाड गावाचा दौरा केल्यानंतर जेंव्हा शेवटी त्या गावातून आम्ही परत निघालो तेंव्हा समोर दिसणाऱ्या अथांग पाण्याचा राग येत होता आणि माणसाची हतबलता जाणवत होती....

आळवंड...

मुंबईची तहान भागवणारं पण स्वतः आयुष्यभर तहानलेलं,

मुंबईला घास पुरवणारं, पण स्वतः उपाशी राहिलेलं,

शहरांना वीज पुरवणारं पण कित्येक महिने अंधारात चाचपडणारं एक गाव.....

एमजीएम पत्रकारीता महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्राच्या "समृद्ध' आदिवासी परंपरांची, समस्यांची जाण व्हावी म्हणून अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. खरंतर आदिवासी पाड्यांची लोकसंस्कृती, लोककला आणि रोजचं आयुष्य जाणून घेण्याची ओढ आम्हाला तिकडे घेऊन गेली आणि प्रत्यक्ष त्या गावांमध्ये जे दिसलं, जे अनुभवलं, तिथल्या गावकऱ्यांनी जे सांगितलं ते ऐकून किमान एक दिवस तरी पाण्याचा तिरस्कार करावा इतका विध्वंस तिथे दिसून आला.

नाशिक शहरात असलेल्या "प्रगती अभियान' या संघटनेच्या कार्यालयातून डॉ. अश्विनी कुलकर्णी यांनी त्र्यंबकेश्वर दौऱ्यातील प्रस्तावित भागांच्या समस्या, तेथील पिके आणि इतर गोष्टींची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीमधून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ज्या गावांमध्ये आम्ही अभ्यासासाठी जाणार होतो तेथील प्रमुख पीक नागली असल्याची माहिती मिळाली आणि मग आम्हा शहरवासीयांच्या चारचाकी गाड्या वळल्या त्र्यंबक आणि नाशिक जिल्ह्यातील काही आदिवासी पाड्यांकडे. विस्थापन, विद्रुपता आणि उद्विग्नता काय असते याचा जवळून प्रत्यय देणारी ही भेट ठरली. आळवंड या सात आठशे घरं असलेल्या छोट्याशा गावाला दिलेली भेट काय काय सांगणार होती याची काही कल्पनाच नव्हती. नाशिक-त्र्यंबक रोडवरून डाव्या हाताला वळलेल्या शहरी चारचाकी गाड्यांनी वेग घेतला आणि हळूहळू सह्याद्रीच्या कुशीत प्रवास सुरु झाला. वळवळणाचे सुंदर घाटरस्ते, पाणवठे आणि जागोजागी आढळणारं निसर्गाचं सुंदर रूप कित्येकदा थांबून फोटो घेण्याच्या मोहात टाकत होते पण वेळ कमी असल्याने आम्ही थेट गेलो आळवंडला.

आळवंड हे महादेव कोळी या आदिवासी समाजाचं गाव. काही दलित कुटुंब आणि महादेव कोळी अशा बहुजन बांधणीत बसलेलं हे गाव. गावाबद्दल आणि गाव जिथे आहे त्या सुंदर परिसराबद्दल कितीतरी पानं लिहिता येतील असं गावात जाताना आणि तिथे उतरल्यावर वाटत होतं. गावाच्या टेकडीवरून दिसणारा विस्तिर्ण जलाशय गावाला अधिकच टुमदार बनवत होता. मराठवाड्यातून आलेल्या एमजीएम संस्थेच्या चमुला या अशा जलाशयांचं प्रचंड आकर्षण आणि त्यामुळे आळवंडच्या गावकऱ्यांनी बोलण्याआधीच त्यांना त्यांचा हेवा वाटू लागला.

कुठल्याही संस्थेमार्फत तुम्ही एखाद्या भागाचा दौरा करायला जाता तेंव्हा त्या संस्थेचे कार्यकर्ते जे दाखवतील ते प्रमाण मानून मुकाट्यानं सगळं बघावं लागतं आणि त्या माहितीच्या आधारे आपला अभ्यास करावा लागतो. परंतू प्रगती अभियान ही सामाजिक संस्था नेमकी तिथेच वेगळी भासली. त्यांनी अभ्यासासाठी केलेली मदत अगदी त्यांच्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आमच्या कामात कुठेही ढवळाढवळ न करणारी आणि नेटकी होती. त्यांनी आम्हाला मोकळेपणाने गावकऱ्यांशी बोलू दिलं, सबंध गाव फिरू दिलं आणि कदाचित त्याचमुळे त्या गावाच्या भयंकर वास्तवाशी आमची भेट झाली.

प्रत्येक नवीन नाव ऐकलं की गुगल करणाऱ्या आपल्या समाजात आजही गुगल वर 'आळवंडी धरण' अस सर्च केलं की हे धरण केवळ सिंचनासाठी बांधलं गेल्याची प्राथमिक माहिती आपल्याला दिसते. चार महिने प्रचंड पाऊस पडणाऱ्या या परिसरात भात हे प्रमुख पीक घेतलं जातं. पावसाळ्याच्या चार महिन्यानंतर मात्र जे काही या लोकांसोबत घडतं त्याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. होतं असं की, पावसाळ्यानंतर साधारणतः जानेवारी महिन्यात एक आदेश 'वरून' येतो आणि पाण्याने गच्च भरलेलं आळवंडी-वैतरणा धरण हळू हळू रिकामं होऊ लागतं आणि मग सुरू होते आळवंडी आणि परिसरातील विस्थापित खेड्यांची पाण्यासाठीची हेळसांड. पाणी कमी झाल्यामुळे मग कमी पाण्यात येणारी नागलीसारखी कणखर पिकं घेण्याशिवाय इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना पर्याय नसतो. पोटापूरती नागली पिकविणे, कापणे आणि तिला व्यवस्थित साठवून परत आठ महिन्यांनी येणाऱ्या पावसाची वाट बघत नागलीवर गुजराण करण्याशिवाय या लोकांकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो. आजकाल नागली किंवा नाचणीला शहरातल्या "डाएट' सांभाळणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड मागणी आहे पण आळवंडला नागली हे आरोग्य सुदृढ करणारं साधन नसून त्यांचा जीव वाचविणार खाद्य आहे.

धरणं, विस्थापन आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीपासूनच माहिती आहेत पण कोण्या एका शहरासाठी अडाणी लोकांच्या लोकवस्त्यांचा कसा हळू हळू जीव घेतला जातो याची जाणीव मला सगळ्यात पहिल्यांदा आळवंडला जाऊन झाली. तेथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 1976 च्या आधी म्हणजे आळवंड धरण बनण्याच्या आधी हे गाव अतिशय समृद्ध शेतीप्रधान गाव होतं. त्यांच्या जमिनी खरोखर भातरुपी सोनं पिकविणाऱ्या होत्या. आज धूळ खात पडलेलं त्यांचं गोडाऊन एकेकाळी भाताने खचाखच भरलेलं असायचं. भात खरेदी करण्यासाठी मुंबईच्या मारवाडी व्यापाऱ्यांचा राबता असणाऱ्या आळवंडीत आज कित्येक वर्षानंतर कुणीतरी पहिल्यांदाच कॅमेरा, माईक घेऊन आलं होतं हे सांगताना काही माणसांच्या डोळ्यात आलेलं पाणी खूप काही बोलून जात होतं. मुंबईची तहान भागविण्यासाठी नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील आदिवासी भागांमध्ये धरणं बांधण्याचं ठरविणारे लोकं खरंच खूप दूरदृष्टी ठेऊन काम करणारे असतील याबद्दल काही शंकाच नाही कारण तेथील स्थानिक लोकांना आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आपल्या हक्कांची, अधिकारांची जाणीव तशी कमीच आहे आणि सत्तरच्या दशकात तर धरण बांधण्याची स्वप्न विकण्यासाठी हा परिसर अतिशय सुपीक असेल यात काहीच शंका नाही. आम्ही तुम्हाला पाणी देऊ, वीज देऊ, सगळा परिसर सुजलाम सुफलाम आणि सिंचित करून टाकू अशी आश्वासनं देऊन कुठे प्रेमाने तर कुठे बळजबरीने आदिवासी खेड्यांच्या सुपीक, समृद्ध जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या. आळवंडी धरणाचा विचार केला तर या छोट्याशा धरणासाठी जवळ जवळ अठरा खेड्यांची शिवारं घेण्यात आली आणि तिथे राहणाऱ्या स्थानिक लोकांना काही मोबदला देऊन डोंगरावर जागा दिली गेली. या सगळ्या गावाचं पुनर्वसनच नेमकं अशा ठिकाणी केलं गेलं की तिथे शेतीसाठी पाणी धरणातून वर उचलूनच आणावं लागेल. सिंचनाची कसलीही माहिती नसलेल्या या सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांना जमिनी देखील मिळाल्या पण डोंगरावर... ज्या जमिनी शेती करण्यासाठी दिल्या गेल्या त्या जमिनींची प्रत अतिशय सुमार होती कारण हा सगळा परिसर प्रचंड खडकाळ आणि अतिशय कठीण आहे. इथे पाणी थांबवणं जवळ जवळ अशक्य आहे कारण पाणी साठविण्याची तर सुविधा नाहीच पण जिरवलेलं पाणी सुद्धा उतरंडीमुळे मुंबईला नोकरीसाठी धावणाऱ्या तरुण पोरांसारखं पळून जातं हे वास्तव आहे.

त्यामुळे जसजसा उन्हाळा येतो तसतसा दुष्काळ दिसायला लागतो आणि कोरड्या पडलेल्या बोअरवेल, विहिरी हे या लोकांच्या सवयीच्या होऊन बसतात. कुठल्याही शेतात पाणी दिल्यावर किंवा पाऊस पडल्यावर त्या शेतात लगेच जाता येत नाही कारण शेतात असलेल्या मातीमुळे त्या शेतांमध्ये प्रचंड चिखल होत असतो पण आळवंडच्या शेतांची एक खासियत आहे इथे कितीही पाणी दिलं तरीदेखील तुम्ही त्या शेतात आरामात फिरू शकता आणि तुमच्या पायांना त्या जमिनीत एक इंच चिखल देखील लागणार नाही कारण चिखल तयार होण्यासाठी लागते ती माती, पिके घेण्यासाठीसुद्धा लागते ती माती या शेतांमध्ये अस्तित्वातच नाही. नुसता खडक, खडक , खडक.... या खडकात मग नाईलाजाने नागलीच घ्यावी लागते.

समोर दिसणारा विस्तीर्ण जलाशय आणि त्या पाण्याने गिळलेल्या आपल्या परंपरागत जमिनी पाहत पाहत आळवंडचे लोकं आपलं आयुष्य जगत आहेत. शेतीसाठी लागणार पाणी धरणातून उचलून वर शेतात आणणं प्रचंड जिकिरीचं आणि खर्चिक काम असल्याने आणि तेवढा पैसाच या लोकांकडे नसल्याने या पाण्याचं ते नेमकं काय करत असतील असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

मुंबईच्या उशाशी असणारा हा परिसर अजूनही विकासाच्या संकल्पनेपासून मैलोनमैल दूर आहे. खरंतर तो दूर ठेवला गेलाय कारणं तसं न केल्यास प्रस्थापित शहरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल हे मात्र नक्की. धरण भरलेलं असून पाणी नाही, वीजनिर्मिती केंद्र असून वीज नाही.. खरंतर सगळ्या भौतिक गरजा निर्माण करणाऱ्या या सगळ्या आदिवासी भागांच्याच साध्या साध्या गरजा आपण पूर्ण नाही करू शकलो हे वास्तव दिसत होतं. दिवसभर या उजाड गावाचा दौरा केल्यानंतर जेंव्हा शेवटी त्या गावातून आम्ही परत निघालो तेंव्हा समोर दिसणाऱ्या अथांग पाण्याचा राग येत होता आणि माणसाची हतबलता जाणवत होती.

yedgeashay@gmail.com