आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुबंध:हंसध्वनी ऐकणारे आसामी साहित्यातील ऋषीतुल्य कवी

भरत यादवएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय ज्ञानपीठ साहित्य पुरस्कार विजेते आसामी कवी निलमणी फुकन हे हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे तिसरे आसामी साहित्यिक आहेत. नीलमणी फुकन हे आसामी भाषेतील सध्याचे सर्वात प्रतिष्ठित कवी मानले जातात. ते आग आणि पाणी, ग्रह आणि तारे,जंगल आणि वाळवंट,माणूस आणि पर्वत, काळ आणि स्थान,युद्ध आणि शांती,जीवन आणि मृत्यू यांचा विचार प्रामुख्याने करतात.

भारतीय ज्ञानपीठ साहित्य पुरस्कार विजेते आसामी कवी निलमणी फुकन हे हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे तिसरे आसामी साहित्यिक आहेत. नीलमणी फुकन हे आसामी भाषेतील सध्याचे सर्वात प्रतिष्ठित कवी मानले जातात.१९३३ ला आसामातील देरगाव येथे जन्मलेले कवी फुकन यांनी १९५० च्या दशकाच्या सुरूवातीस काव्यलेखनास प्रारंभ केला होता. आपले पूर्वसूरी साहित्यिक हेम बरूवा,अमूल्य बरूवा आणि महेश्वर निओग यांच्या लेखनातून प्रेरणा घेत त्यांनी आणि त्यांच्या इतर समकालीन कवींनी म्हणजेच नवकांत बरूवा,अजीत बरूवा यांनी आसामी आधुनिकतावादाच्या शक्यता शोधण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी कवितेमध्ये मुक्तछंद स्विकारला आणि वापरला.

कवी नीलमणी फुकन यांचे एकूण तेरा कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत आणि त्यांना आजवर दहा राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाले आहेत.ज्यामध्ये १९८१ मध्ये कवितेसाठीचा साहित्य अकादमी आणि १९९० साली भारत सरकारकडून दिला जाणारा पद्मश्री पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांनी १९६४ मध्ये एक प्राध्यापक म्हणून गुवाहाटीच्या आर्य विद्यापीठ महाविद्यालयात सेवेचा प्रारंभ केला आणि १९९२ पर्यंत आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी तिथेच सेवा बजावली. नीलमणी फुकन यांची आसामी साहित्यक्षेत्रातील उपस्थिती व कामगिरी ऋषीतुल्य मानली जाते. त्यांच्या लेखनाचा कॅनव्हास विशाल आहे.काव्यातील त्यांच्या कल्पना पौराणिक आहेत,त्यांच्या कवितेचा आवाज थेट आणि सुस्पष्ट आहे, त्यांच्या काव्यचिंता राजकारणापासून ते लौकिकापर्यंत,समकालीन घटनांपासून ते आदिम घटनांपर्यंत दिसून येतात.ते ज्या सामाजिक घटना व दृष्यांची उदाहरणे देतात त्या एखाद्या महाकाव्याइतक्याच महत्वाच्या ठराव्यात.

ते आग आणि पाणी, ग्रह आणि तारे,जंगल आणि वाळवंट,माणूस आणि पर्वत, काळ आणि स्थान,युद्ध आणि शांती,जीवन आणि मृत्यू यांचा विचार प्रामुख्याने करतात. कवीवर्य फुकन यांनी जपानी आणि युरोपीय भाषांमधील कवितांचा आसामी भाषेत अनुवाद करण्याची

उल्लेखनीय कामगिरी देखील बजावली आहे.

--------------

स्फटिकाच्या एका तुकड्यावर

स्फटिकाच्या एका तुकड्यावर

कोरून घेतलंय तुला

प्रेयसी आहेस की तू भगिनी

उजेड संपल्यानंतरदेखील

तुला पाहू शकेन

तुझ्या नसण्याच्या नंतरदेखील

आंधळासुद्धा हृदयात पाहू शकेल

धरित्रीच्या प्रथम दिवसाचा सूर्य

नित्य फुललेली तू

रोमांचक चित्कार

मदमत्त शुभ्रता

गारठलेल्या रात्रवेदीवर

एक ओंजळ तहान

पुष्पसुगंधीत

हे प्रिये! हे सुंदरी!

----------

हंसध्वनी ऐकतोय!

हंसध्वनी ऐकतोय

सकाळ झालीय की

रात्र झालीय

माझ्या हातांच्या बोटांमध्ये

पर्णांगे उगवलीयत

मी स्वतःला हरवून बसलोय

तू स्वतःला शोधतोयस

कुठे गोठून गेलोय की काय

किंवा गोठला जातोय

आकाश-पाताळ

अंधार-प्रकाश

एकाकार होऊन गेलेयत

हंसध्वनी ऐकतोय

दीर्घ काळानंतर या

पावसात भिजतोय

कालिदासासोबत चर्मन्वती

नदीत उतरलोय

रक्तबंबाळ छाया मुर्तींनी

शरीरास धारण केलेय

शेकडो हजारो हातांनी

शून्यात सरसावत

ब्रह्मांडाला पेललेय

हंसध्वनी ऐकतोय

आपल्या श्वासातच हरित वायूचा

एक झोत भरून घेतोय

माझ्या आतून मला

साद घातली गेलीय

हंसध्वनी ऐकतो आहे

संध्याकाळ झालीय

किंवा सकाळ झालीय

माझ्या संपूर्ण शरीरात

पर्णांगे उगवलीयत.

-----------

पाच लघुकविता

एक

अश्विन महिन्याच्या रात्री

इंद्रमालतीची फुलं रडत होती

उठून जाऊन पाहिलं

गावामधल्या गोरजा सारखं

तुझं हसू

लोंबकळत होतं सुपारीच्या

झाडावरती

दोन

चुकून तुला अंथरूणावर

चाचपडत फिरत होतो

तू तर

डोंगराच्या पायथ्याशी

तीळपुष्प होऊन

फुलला आहेस

तीन

आमच्या पहिल्या अपत्याच्या

मृत्यूदिवशी

आम्ही दोघे आसवे ढाळीत

विचार करीत होतो

पृथ्वीवरील सर्व लोकांना बोलवावे

एकाच ठिकाणी

जर आपण सोबत राहू शकलो असतो

चार

अंधवृद्धाने पहाटेच्या आकाशात

एका निळ्या पाखराला उडवून

भरल्या आवाजात आम्हांला

सांगितलं होतं,

'लोकांना सांगा--त्यांच्या विश्वात

कुणी कुणाला कधी ओळखू नाही शकला'

पाच

'इतके दिवस झाले पण

माघारी नाही परतले'

श्यामवर्णीय नावाड्यांबाबत

आम्ही बोलत होतो

पसरलेल्या केळींच्या पानांवरून

दवबिंदूंप्रमाणे थेंब थेंब

अंधार टपकत होता

--------

हिंदी अनुवाद

दिनकर कुमार

-----

मराठी अनुवाद

भरत यादव

--------------

yadavbh515@gmail.com

बातम्या आणखी आहेत...