आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:गझलेतील गाव

बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाच्या मनात 'गाव' नावाची व्याकूळ करणारी नदी सतत वाहत राहते./strong>. गझलकारांच्या भावविश्वात विविध आठवणींचा गाव वसलेलं असतं. त्या आठवणींची 'गावकरी' या नात्यानं त्यांनी शब्दचित्र, भावचित्र, गावचित्रं आपापल्या शेरांमधून कशी रेखाटलीय हे पाहाणंही औत्सुक्याचं ठरेल. कारण गझलकारांचं मूळगाव गझलेचंच असतं.

पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस जगाच्या पाठीवर कुठंही स्थायिक झालेला असला तरी तो त्याचं मूळगाव नाही विसरू शकत. गावात त्याला आपलं बालपण भेटतं. गावानं त्याला अंगाखांद्यावर खेळवलेलं असतं. रात्री झोपवताना आजीच्या तोंडून गोष्टी ऐकलेल्या असतात. इथल्या वाटांनीच त्याच्या पावलांना आधार दिलेला असतो. त्या वाटा त्याच्या सवयीच्या झालेल्या असतात. मातीत त्याचे पाऊलठसे शाबूत असतात. वडाच्या पारंब्यांना लोंबकाळत-लोंबकाळतच तो मोठा झालेला असतो. गावाची आठवण आली की माणूस कासावीस होतो. गावाविषयीची आत्मीयता आतून दाटून येते. माणूस आपल्या गावाशी संबंध नाही तोडू शकत. गावातली बालपणीच्या आठवणींची चित्रं त्याला पुन: पुन्हा दिसू लागतात. मनात साठलेलं, दाटलेलं गाव तो पुन: पुन्हा जगू लागतो. गाव सोडून महानगरीत आलेल्या प्रत्येकाच्या मनात 'गाव' नावाची व्याकूळ करणारी नदी सतत वाहत राहते.

गझलकारांच्या भावविश्वात विविध आठवणींचा गाव वसलेलं असतं. त्या आठवणींची 'गावकरी' या नात्यानं त्यांनी शब्दचित्र, भावचित्र, गावचित्रं आपापल्या शेरांमधून कशी रेखाटलीय हे पाहाणंही औत्सुक्याचं ठरेल. कारण गझलकारांचं मूळगाव गझलेचंच असतं. सुरेश भट म्हणतात.

मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे

सारीच माणसे अन् कोणीच संत नाही

प्रेमात उदात्तता, उदारता असली की प्रेमाचा परीघ आणखी रुंदावत जातो. व्यवहाराची सारी पुटं आपोआप गळून पडतात. त्यात उत्कट समर्पणशीलतेची भावना भरलेली असते. जी प्रियकराच्या मनाला भारून टाकणारी असते. गाव तर त्यालाही प्रिय असतंच. पण प्रेयसीनं आधी गावात सुखरूप पोहोचावं यासाठी तो तिची पायवाट बनतो. बरं मी गावात पोहोचल्यानंतर तिला त्याचा विसर पडला तरी प्रियकराची याविषयी काही एक तक्रार नसते. खऱ्याखुऱ्या प्रेमाची ही तर निशाणी असते. जी म.भा. चव्हाण यांनी त्यांच्या शेरातून ती निशाणी ठळक केलीय.

मी पायवाट आता तुडवून जा मला तू

येईल गाव तेव्हा विसरून जा मला तू

काही गावं अशी असतात की, ज्यांच्यावर पिढ्यांपिढ्या धनदांडग्या लांडग्यांचा खडा पहारा असतो. त्यांनी तयार केलेल्या चालीरीती ते गावावर लादत असतात. मग इथं कुणाला ना मोकळेपणा असतो ना बोलण्याची मुभा असते. त्यांना आखून दिलेल्या रिंगणातच गावकऱ्यांनी वावरायचं. मुकेपणानं जगायचं. आपले श्वास म्हणजे त्यांचीच जणू मालमत्ता. बोलायचं म्हटलं तर त्यांनी आपल्यासकट आपल्या शब्दांनाही त्यांच्या दावणीला करकचून बांधावं. हा कुठला न्याय? या कुठल्या चालीरिती? हे कसलं गाव? हा चीड आणणारा सवाल जयप्रकाश दगडे यांनी त्यांच्या शेरातून विचारलं.

कोणत्या चालीरितींचा गाव आहे

बोलण्यालाही इथं मज्जाव आहे

कितीतरी वर्षांनी तो आपल्या मूळ गावाला आस्थेनं भेट द्यायला येतो. परंतु गावात विपरीतच घडलेलं असतं जिथं पाहावं तिथं त्याला प्रेतंच प्रेतं दिसायला लागतात. स्मशानकळा गावभर पसरलेली असते. त्याची पावलं थबकतात. तो भेदरुन जातो. त्याला काहीच कळेनासं होतं. हे गाव किती सुंदर होतं. इथं माणसं गुण्यागोविंदानं राहात होती. आता कुणीच काही बोलत नाही. सगळी सामसूम. फक्त शांतता... नीरव शांतता... या गावाचं अचानक स्मशानात रूपांतर कसं झालं? उरात जीवघेणी कालवाकालव होते. ही कसली बला? हा कुठला घाला? याचं कोडं त्याला कितीतरी वेळ नाही सुटत. गावच्या या मरणकळा मुबारक शेख यांनी तितक्याच दु:खार्तानं मांडल्यात.

कोणास याद आहे, कोणास भान आहे

येथेच गाव होते जेथे स्मशान आहे

असं म्हटलं जातं की पाऊसपाणी ठीक झालं तर सुबत्ता येते. गावं सधन बनतात. पण हाच पाऊस जेव्हा रौद्ररूप धारण करतो. तेव्हा महापूर येतो. गावंच्या गावं माणसांसह उद्ध्वस्त होऊन जातात. दुःखाचा आरपार हादरा बसतो. सगळंच सुन्न करणारं, गावांना विछिन्न करणारं असतं. माणसांना फस्त करणारं, गावांना ध्वस्त करणारा असा विध्वंसक पाऊस येऊ नये सुबत्ता नाही आली तरी चालेलं 'पीक नको पण पाणी आवर' अशी ग्रामस्थांची अवस्था होऊन जाते. पावसानं आधी त्याचा मनसोक्त नंगानाच बंद करावा. असंच वाटायला लागतं. गावं गिळणारा असा पाऊस घृणेस पात्र ठरतो. ध्वस्त झालेल्या गावाचं दुःख प्रा. कैलास गांधी या़नी शेरातून प्रकट केलय.

नाचला मनसोक्त पाऊस रे सुबत्ता यायला

ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे

पाऊस अतिशय लहरी अन् मुडी असतो. त्याच्या विचित्र स्वभावाची नेहमीच चर्चा घडत आलीय. तो कुठं अमर्याद कोसळत राहातो तर कुठे पाण्याचा टिपूससुद्धा नसतो. जे गाव वैशाखाच्या ज्वाळा सोसत पेटत असतो. विहिरी ओस पडलेल्या असतात. नदी आटून गेलेली असते. जमीन फाटून गेलेली असते. अशा दुष्काळग्रस्त गावातील ग्रामस्थ 'येरे येरे पावसा' असं मेघराजाला आळवत असतात. अशा ठिकाणी तो कधीच वेळेवर नाही येत. अलीकडच्या काळात तर पाऊस महानगरीला धार्जिणा झालाय. जिथं पावसाची गरज नसते तिथं तो धुवांधार बरसतो. इकडं शेतकरी थेंबा थेंबाला तरसतो. त्याचा गाव आसवांचा होऊन जातो. गावातल्या दुष्काळकळा अन् महानगरीतला पावसाळा हा विरोधाभास टिपलाय शिवाजी जवरे यांनी…

गाव माझे सोसते वैशाख-ज्वाळा

मुंबई-ठाण्यात आला पावसाळा

प्रत्येक वाट ही गावाकडंच जाणारी असते. आपण निर्धारानं चालत राहिलं की कुठलं तरी गाव आपल्याला हमखास भेटतंच. भेटलेल्या गावाला 'आपलं गाव', म्हणून कवेत घेणं यातच खरं गावपण असतं. ही वाट कितीही खाचखळग्यांनी भरलेली असली तरी वळणावळणांनी गावाला वळसा घालता येतो. यात आप पर भाव नसतो. परकेपणा संपुष्टात आला की पावलांना चालण्याचं बळ मिळत जातं. वाट सुकर होत जाते. पुढं भेटलेलं गाव 'गझलेचं गाव' असू शकतं यासाठी गावाचा विचार न करता, गावाचा शोध न घेता आधी प्रवासाला निघणं यातच जगण्याची खरी मौज असते. प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांचा प्रवास असाच काहीसा दिसतोय.

मी न कधी कोणतेच गाव शोधले

वाटेला वळणांनी फुटत राहिलो

आजकाल गावोगावी साक्षरतेचं वारं वाहू लागलंय. कालचा निरक्षर गाव आज निरक्षर राहिलेला नाही. हा गाव लई न्यारं, इथं साक्षरतेचं देवारं असंच गावाचं वर्णन करावं लागेल. इथल्या प्रौढ ग्रामस्थांनाही आता अक्षराचा लळा लागलाय. इथं पिकासारखीच अक्षरंही फुलू लागलीत. बोलू लागलीत. साक्षरतेचा दिवा मनोमनी उजळू लागलंय अक्षरांचा आत्मा प्रसन्न झालाय. गावातील अज्ञानाचा अंधार विरळ होत चाललाय. गावात जागोजागी जशी डोलणारी फुलं आहेत तशीच लिहिता-वाचता येणारी मुलं आहेत. ही अक्षरांनी गजबजलेली गावंच उद्याच्या आशेची किरणं आहेत. गावाच्या आभाळालाही ज्ञानाचे डोळे फुटतील, साक्षरतेच्या प्रकाशानं गावं उजळून निघतील. अशी आशा रमण रणदिवे यांना वाटते.

होईल आशयाचा आत्मा प्रसन्न आता

गावात अक्षरांच्या सत्यास जाग आहे

गझलकारांना त्यांचा जन्मगाव कसा वाटला. गावाविषयीच्या भल्याबुऱ्या आठवणी, त्यांना आलेले अनुभव त्यांनी शेरांतून मांडलेत. काहींच्या मनात आजही गावाबद्दल आपलेपणा बरकरार आहे. तर काहींना जीवघेण्या घटनांमुळं गावाचं भय वाटतं. दुःख वाटतं. पण दुःखांची गझल होतेच.

contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...