आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं...:उत्क्रांतीची ओळख

वासंती फडके6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विन./strong>. आज आपण सहजपणे त्यावर बोलतो, लेखन करतो इतकेच नव्हे अभ्यासक्रमातही त्याला स्थान देतो. चार्ल्स डार्विनला मात्र त्याच्या काळात या शोधाबद्दल टीकेचे धनी व्हावे लागले. धर्मग्रंथापलीकडचा कोणताही विचार वा बाब तत्कालीन समाजात निषिद्ध मानली जात असे. अनेकांना त्याबद्दल जिज्ञासा असते आणि ती डॉ. सुनीती धारवाडकरांनी 'मानवाचे अंती एक गोत्र!' या पुस्तकाद्वारे शमवली आहे.

आज आपल्या समोर पसरलेला मानव समाज देश, जात, धर्म, प्रदेश, भाषा इत्यादींमुळे वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असला तरी त्याची जनुकीय सामग्री (जिला जीनोम म्हणतात) ती ९९.९०% सारखी आहे हे "मानव जीनोम' प्रकल्पाने २००३ सालीच सिद्ध केले आहे. उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विन. आज आपण सहजपणे त्यावर बोलतो, लेखन करतो इतकेच नव्हे अभ्यासक्रमातही त्याला स्थान देतो. चार्ल्स डार्विनला मात्र त्याच्या काळात या शोधाबद्दल टीकेचे धनी व्हावे लागले. धर्मग्रंथापलीकडचा कोणताही विचार वा बाब तत्कालीन समाजात निषिद्ध मानली जात असे. अनेकांना त्याबद्दल जिज्ञासा असते आणि ती डॉ. सुनीती धारवाडकरांनी 'मानवाचे अंती एक गोत्र!' या पुस्तकाद्वारे शमवली आहे.

मानववंशविज्ञान, पुरातत्त्वविज्ञान, अनुवंशविज्ञान इत्यादी विज्ञानशाखांच्या साहाय्याने उत्क्रांतीचा अभ्यास वैज्ञानिक करतात. पृथ्वीवरील पहिल्या सूक्ष्म जीवनिर्मितीपासून ते आजच्या मानवापर्यंतचे रूप गाठण्यासाठी किती टप्पे व किती वर्षांचा-युगांचा कालावधी लागला ह्याचा आढावा ह्या पुस्तकात घेतला आहे.

पृथ्वीचा जन्म ४.८ अब्ज वर्षांपूर्वी झाला. तप्त गोळा असलेल्या पृथ्वीला थंड व्हायलाच ८५ कोटी वर्षे लागली. नंतरच्या काळात समुद्र, नद्या, पर्वत व अन्य भूभाग निर्माण झाले. कित्येक कोटींच्या रासायनिक व जीवरासायनिक उत्क्रांतीनंतर आणि नील-हरित शैवालाच्या रूपाने पहिली आदिपेशी निर्माण झाली. परिणामी वातावरणात प्राणवायू आला. त्याचवेळी ओझोनचाही थर तयार होत होता. आदिपेशी, एकपेशीय, पृष्ठवंशीय, खंडपर,भूजलचर, होमो हाबिलस, होमो इरेक्टस आणि निअँडरथाल व होमो सेपियन्स म्हणजे आपण सगळे असा मानवी उत्क्रांतीचा ढोबळ क्रम सांगता येईल. पृथ्वीवर सर्वत्र तो अगदी एकाच वेळी झाला असेल असे निश्चितपणे सांगता येत नाही.

आरंभी मानव एक नरवानरगणातील प्राणीच होता. तो प्राण्यांसमवेत व प्राण्यांसारखाच राहत होता. नरवानर (प्रायमेट्स) भूतलावर साधारणपणे ६.५ ते ५.५ कोटी वर्षांपूर्वी होते. कपि किंवा महावानर ३ ते २.५ कोटी वर्षांपूर्वी होते. त्यापासूनच २ लाख वर्षांपूर्वी आजच्या मानवासदृश असणारा मानव उत्क्रांत झाला. नरवानरगणाचे वैशिष्टय म्हणजे पुढच्या बाजूला असलेले डोळे, तीक्ष्ण नजर, रंग ओळखण्याची क्षमता आणि हाताने वस्तू पकडण्याचे कौशल्य. हे नरवानर झाडावर राहत. लीलया उड्या मारू शकत असत. ह्या नरवानरांच्या सुमारे ३०० जाती असाव्यात. कालौघात बऱ्याच नष्ट झाल्या. आशियामध्ये नरवानर दुकुलाचे दोन शाखात विभाजन होऊन एक शाखा माकडे म्हणून ओळखली जाऊ लागली. दुसरी शाखा महावानर (कपी) जातीत विकसित झाली. काही दशलक्ष वर्षांनी कपींच्या मूळ वंशाला शाखा फुटून त्यातून प्रारंभी गिबन, उरंगउटान (जंगलातील रानटी माणूस) नंतर गोरिला,बोनोबो,चिंपांझी आणि अखेरीस मानववंशाची शाखा वेगळी झाली. या विकासाच्या कालावधीत त्यांच्या मेंदूचे आकारमान वाढत होते तसेच तोंडात चर्वणाचे दातही येऊ लागले. या शाखा युरेशियातून आफ्रिकेत गेल्या व तिथेच त्यांच्या होमो प्रजातीपर्यंतची उत्क्रांती होत गेली. या आदिमानवाच्या काही जाती आफ्रिकेतून आतबाहेर करत राहिल्या. काही जाती युरेशियात गेल्या व तिथेच उत्क्रांत झाल्या.

सत्तर लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत चिंपांझी आणि माणूस यांच्या वंशावळीच्या विभाजनाच्या रेषेवरील साहेलांथ्रोपस या आदिपूर्वजांमध्ये चिंपांझी व मानव दोहोंची वैशिष्ट्ये होती. होमो हाबीलीस या ऑस्ट्रॅलोपेथिकसपासून उत्क्रांत झालेल्या मानवप्राण्याचे अवशेष टांझानियातील एका घळीतील खडकात सापडले आहेत. हे अवशेष २० ते ३० दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. हे आदिमानव दगडी हत्यारे करण्यात व भटकंती करण्यात पटाईत होते. नंतरच्या टप्प्यात वीस लक्ष वर्षांपूर्वी ताठ उभा राहणारा होमो इरेक्टस अरगेस्टर (कामसू माणूस) हा आदिमानव उत्क्रांत झाला. तो फळे-कंदमुळे गोळा करणारा व शिकारी होता. शिवाय अग्नीचा वापर करणेही त्याला उमजले होते.

होमो हैडलबर्ग होमो इरेक्टस पासून उत्क्रांत झाला ह्या मानवजातीने मृतांना पुरण्यास प्रारंभ केला. निवारा बांधण्यास व ऊनपावसापासून संरक्षण करण्यास सुरूवात केली. इरेक्टसच्या विविध जाती विविध भूप्रदेशावर एकाच वेळी नांदत होत्या. पृथ्वीवर सर्वाधिक काळ तग धरून राहिलेला आदिमानव होमो इरेक्टस होय. सहा लाख वर्षांपूर्वी होमो इरेक्टस पूर्व आफ्रिकेत होता. तसाच तो 'नर्मदा मनुष्या' च्या रूपात भारतातही होता. चीनमध्ये वास्तव्य करणाऱ्या इरेक्टसचचे नाव 'पेकिंग मॅन' होते. या आदिमानवाच्या वास्तव्याचे पुरावे वैज्ञानिकांना ज्या ठिकाणी सापडले त्या जागांवरून त्यांना नावे दिली गेली. उदा. होमो र्होडेन्सीअँन्सीस, होमो फ्लोरेसिएनन्सिस, होमो लुझोनसिस, होमो डेनिसोवन्स, होमो हैडलबर्गजेनेसिस इत्यादी. हे सर्व आपले भाईबंद होत.

हैडलबर्गपासून निएँडरथाल जन्माला आला.(उत्क्रांत झाला.) काहींच्या मते तो आफ्रिकेत निपजला आणि नंतर तो तेथून बाहेर पडला. निएंडरथाल आधीच्या आदिमानवांपेक्षा अधिक बुद्धिमान होता. त्याचा मेंदू आकाराने मोठा व लांबट होता. मेंदूमधील निओकॉर्टेक्सचीही वाढ झाली होती. परिणामी त्याची विचारक्षमता वाढली होती. होमो इरेक्टसपासूनच होमो सेपियन उत्क्रांत झाला. होमो सेपियन्स म्हणजे तुम्ही आम्ही सगळे. सेपियन्स त्याच्या लगतच्या पूर्वजांपेक्षा अधिक उंच व सडपातळ होते. त्यांच्या मेंदूतील चेतापेशींच्या संख्येत जशी वाढ जाली तसेच मेंदूच्या रचनेतही बदल झाले. स्वरनलिकेच्या स्थानात बदल झाल्यामुळे संमिश्र आवाज काढणे आणि संवाद करणे शक्य झाले. विचार करणे कल्पना करणे, भविष्याचा वेध घेणे, या बाबी त्याला शक्य होऊ लागला. भावनाही निर्माण झाल्या. अनुमान करणे, निरीक्षणाच्या नोंदी करणे शक्य झाले.

निएंडरथाल व सेपियन्स दोघेही युरोपमध्ये काही काळ एकत्रित वास्तव्य करीत होते. सेपिअन्सच्या आगमनानंतर सुमारे २० ते ३० हजार वर्षांपूर्वींच्या काळात निएंडरथाल हळूहळू नामशेष झाले. याचे निश्चित कारण अद्याप वैज्ञानिकांना सापडलेले नाही. बदलत्या हवामानाशी विशेषतः थंड हवामानाशी जुळवून घेणे त्यांना शक्य झाले नसावे. कदाचित अन्नाची कमतरता असावी अथवा सेपियन्सपुढे त्यांचा टिकाव लागला नसावा. मात्र त्यांचा सेपियन्सबरोबर संकरही झाला असावा. कारण आजच्या काही मानवात त्यांच्या डीएनएचे अंश सापडतात.

एका गृहीतकानुसार सुमारे ६५ हजार वर्षांपूर्वी सेपिअन्सचा एक समूह आफ्रिकेतून आशियात आला. दुसरा अंदमान व ऑस्ट्रेलियात पोहोचला. एक गट युरोपात गेला. भारतीय उपखंडात स्थलांतराच्या अनेक लाटा आल्या. हे समूह येथील लोकांत मिसळून जाऊन इथेच स्थिर झाले. २० हजार वर्षांपूर्वीही भारतीय उपखंड सर्वात जास्त लोकसंख्येचा प्रदेश होता. (भारताचे पुरातन काळापासूनचे दुखणे आहे!) एकूणच मानवाच्या उत्क्रांतीमध्ये अन्य जातींबरोबरच्या संकराची भूमिकाही महत्त्वाची ठरते. यावरून मानवी उत्क्रांती सरळ रेषेत झाली नसून तिने अनेक वळणे घेत प्रवास केला. अनेक शाखांनी बनलेल्या जाळ्याप्रमाणे ती आहे. प्रथम बोधात्मक क्रांती, नंतर कृषिक्रांती. कृषिक्रांतीनंतर मानव स्थिर आयुष्य जगू लागला. नंतर औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती आणि अगदी अलिकडची डिजिटल क्रांती. या सगळ्यांचा मानवी जीवनावर खूप प्रभाव पडला आहे तसेच निसर्गाचाही विध्वंस केला आहे.

उत्क्रांतीचा उकल कशी केली जाते याचाही ऊहापोह लेखिकेने केला आहे. त्यासाठी वैज्ञानिक कोणते पुरावे देतात त्याची उदाहरणेही दिली आहेत. सर्व उच्च पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हृदयाचे दोन,तीन वा चार कप्पे असतात. मानवी गर्भावस्थेत थोडा काळ असलेली शेपूट गर्भाशयातील विकसनाच्या काळात कण्यात विरघळून 'माकड हाड' बनते. अशा प्रकारचे वनस्पतीमधीलही दाखले पुस्तकात दिले आहेत. काही प्राण्यांमध्ये निरुपयोगी अवयव असतात. उदा. मानवातील अक्कलदाढ व टॉन्सिल्स. ह्यांना अनाहूत पाहुणे म्हणतात. पूर्वीच्या मानवाला आवाजाच्या दिशेने कान वळवता येत असे कारण कानाला एक विशिष्ट स्नायू होता. आज आपण संपूर्ण मान वळवतो.

मनुष्य प्राण्याने उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा गाठला आहे या गैरसमजाबाबत लेखिका स्पष्ट करते की उत्क्रांती आजही चालू आहे. नवीन जीवजाती निर्माण होण्यास लक्षावधी वर्षांचा कालावधी जावा लागतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात त्या आपल्या दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. मात्र लाखो वर्षापूर्वीच्या नोंदी जीवाश्मात साठवलेल्या सापडतात. उत्क्रांती तत्त्व निरुपयोगी आहे हा गैरसमजही लेखिकेने दूर केला आहे. याचा उपयोग कर्करोगावरील उपाययोजनेपासून ते जिवाणूंच्या अभ्यासापर्यंत केला जातो. संपूर्ण पुस्तकात चित्रे, आराखडे भरपूर दिल्यामुळे व भाषा सोपी वापरल्यामुळे विषयाचे आकलन होण्यास मदत होते. विद्यार्थी, शिक्षक जिज्ञासूंना पुस्तक उपयुक्त आहे.

मानवाचे अंती एक गोत्र!

लेखिका : सुनीती धारवाडकर ;

प्रकाशक : लोकवाङ्मय गृह, मुंबई-४०००२५

पृष्ठसंख्या : २००

किंमत : रु. २५०/

बातम्या आणखी आहेत...