आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसंवाद फाउंडेशन आयोजित मराठवाडा साहित्य परषिदेचे ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन औरंगाबाद येथे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या भाषणाचा संपादित अंश...
मित्रहो, माझ्यापुरता प्रश्न - 'मी का लिहितो आहे?', 'कशासाठी लिहितो आहे?' आणि 'मला काय साध्य करावयाचे आहे?' आणि या पुढचा प्रश्न 'मी कादंबरीच का लिहितो आहे?' तर माझा जन्म आणि वाढ देगलूर तालुक्यातील काठेवाडी आणि धनगरवाडी येथे झाला. देगलूर हा कर्नाटक आणि तेलंगणा सीमेवरचा मराठी भाषिकांचा शेवटचा तालुका. कन्नड आणि तेलगू भाषेचा परिणाम जसा मराठी भाषेवर झाला त्याचप्रमाणे साऱ्या लोकव्यवहारावर आचार-विचारांवर झाला. जन्म, मृत्यू, सणवार, देव-देवता यांचे विधीमूळ महाराष्ट्रीयन किती? कन्नड, तेलंगणा प्रांतातून आलेले किती? यांचा संभ्रम पडावा अशी सरमिसळ या तीन प्रांतांची झाली. प्रत्येक घरातील एकतरी मुलगी तिकडे दिलेली अथवा सून म्हणून घरात आलेली. त्यामुळे चालीरीतीचा, बोलल्या जाणाऱ्या भाषेचा, देवदैवतांच्या प्रतिमांचा एक अभूतपूर्व संकर झाला. अनेक लोककथा, दंतकथा, म्हणी, वाक्प्रचार इथल्या लोकव्यवहारात आल्या. एवढेच नाही, तर कपाळावर लावण्याचे कुंकू, गंध, इबिताचे आडवे-उभे पट्टे या प्रकारापासून वेशभूषेपर्यंत हा परिणाम दिसून येतो. एवढेच नव्हे, तर पानावरील पदार्थ महाराष्ट्रीयन का कर्नाटकातील की तेलंगणातील हे कळणेही दुरापास्त आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील कर्नाटकात गेलेली लेक माहेरी कपाळावर इबिताचे पट्टे आणि तोंडात ‘बाबा’च्या ऐवजी ‘अप्पा’ हे संबोधन घेऊन येई आणि ती जर तेलंगणात गेली असेल तर मांसमच्छीची चव घेऊन येई. “कानडीने केला मऱ्हाटी भ्रतार” अशी तुकोबांची वाणी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कानडा विठ्ठल. त्याचप्रमाणे आपल्या अनुयायांना ‘तेलंग देशा न वचावे’ सावध सूचना देणारे चक्रधरस्वामी. हे तीन प्रांताचे ऋणानुबंध न तुटणारे आहेत.
निसर्गाने आणि ह्या लोककलावंताने हे आपले सृजनशील पारदर्शी रूप मला दाखवले नसते तर आज मी एक भुसा भरलेला माणूस उरलो असतो. पुढील आयुष्यात जेव्हा केव्हा संदर्भहीनतेची अवकळा अंगावर चढे. तेव्हा पक्षीभाराने वाकलेली ही झाडे समोर उभे राहत. वैराण वर्तमानाचे काटे जेव्हा असह्य होत, तेव्हा बसवण्णाच्या उघड्या माळावार हरणीला लुचणारे पाडस समोर उभा राही. या निसर्ग आणि ग्रंथाच्या अधिष्ठानावर लेखक उभा असेल तर माझ्या मते, सृजनाचे स्त्रोत अनेक अंगाने त्याला वाहते ठेवतात. तो निसर्ग वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या रूपाने येऊन त्याला अचंबित करीत असतो, प्रवाही करीत असतो.
प्रज्ञा असो प्रतिभा, लेखकाच्या ठायी गृहीत धरूनच म्हणावेसे वाटते, निसर्गाचे डोळसपणे आकलन आणि ग्रंथाचा जाणीवपूर्वक केलेला अभ्यास आवश्यक आहे. तरच त्याने चित्रित केलेल्या घटना, प्रसंगाला, व्यक्तिचित्रणाला अर्थवत्ता आणि वेगवेगळ्या शक्यता निर्माण होतात. आशयाला एक कालातीत शाश्वतता लाभते. लेखकाला जसा निसर्ग पाहिजे. नव्हे तर तो त्याच्या ठायी आहेच. तो फक्त जाणीवपूर्वक कवेत घेतला पाहिजे... तसाच सदैव ग्रंथाचा सहवास असला पाहिजे. ग्रंथ हे त्याची अधिष्ठात्री देवता झाली पाहिजे. आपण जीवनात तोलून मापून मार्गस्थ असू तर इप्सीत साध्य होण्याची शक्यता असते. थोडाही तोल गेला की जीवनाची शोकांतिका घडते मग ते स्थान परमार्थिक जीवनाचं असो की, लौकिक जीवनातील संसाराचं! वृक्षाच्या वाढीसाठी जसा निसर्ग अनुकूल पाहिजे. तसे मुळातच उर्ध्वगामी असणाऱ्या लेखकासाठी ग्रंथ आणि ग्रंथकाराचा सहवास पाहिजे.
माझ्या एका गुपिताची वाच्यता या ठिकाणी करावीशी वाटते. स्वच्छ सूर्यप्रकाशात माझे डोळे फार कमी प्रमाणात उघडतात. मात्र रात्रीच्या अंधारात सताड उघडे असतात. मला याचे कारण, रात्रीच्या अंधारात सृष्टीने लपविलेली गुपिते बाहेर येतात आणि नेमकी आपल्या दृष्टीस पडतात. तसे पाहावयास गेले तर ज्ञात विश्वापेक्षा अज्ञाताचे विश्व फार मोठे आहे. म्हणून तर लेखकाला अज्ञात विश्वाची ओढ असावी. म्हणूनच तो दृष्ट जगतात सहीसलामत जगण्यापेक्षा अदृष्ट जगाचा प्रवासी होऊन अंगभर जखमा करून घेतो.
जग सुंदर करण्याचा विडा घेऊनच कलावंत जन्म घेत असतो. सर्व अमंगलाचा नाश होऊन मंगलाची, शुभाची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी त्याची साद असते, हाक असते. सर्व चराचराला याचेच संकेत तो देत असतो; पण वास्तवाच्या विपरीत स्थितीने त्यांच्या तनामनाचा दाह होत असतो. कलावंताला वाटत असलेली ही अस्वस्थता, वेदना, दुःख, त्रास, अंतःकरणाला आलेली खिन्नता, उदासीनता, यातून वाङ्मयाची निर्मिती होत असते. ही निर्मिती काही प्रश्नांना उत्तरे देते. काही प्रश्न निर्माण करून अनुत्तरीत ठेवते. आपण नेमके कोण आहोत? आपले साध्य काय आहे? असे प्रश्न स्वतःला जसे विचारते, तसेच आपण नेमके कसे जगतो आहोत? याची विचारणा, चिकित्सा करायला भाग पाडते.
अशा कवी, लेखकांच्या आविष्कारातून समाजाची सांस्कृतिक जडणघडण होत असते. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, विकास दोन प्रकारचा असतो. एक भौतिक विकास, दुसरा सांस्कृतिक विकास. या दोन्ही विकासाचे महत्त्व सारखेच आहे. यात कोणताही विकास दुसऱ्यावर आक्रमण करायला नको आहे. भौतिक प्रगती होत असताना आपली सांस्कृतिक प्रगती होत आहे की, नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे आपले सामाजिक दारिद्य्र कळून येते, राजकीय व आर्थिक दारिद्र्य कळून येते. कारण साहित्य व सांस्कृतिक प्रगतीच्या आधारस्तंभावरून राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रगतीचा मूल्यात्मक भाव अवलंबून असतो. जनसामान्य आणि लेखक यांच्या जगण्याच्या पद्धतीत, आयुष्य समजून घेण्याच्या पद्धतीत, अनुभव घेण्याच्या पद्धतीत, आणि तो अनुभव व्यक्त करण्याच्या पद्धतीत मूलतः फरक असतो. वरपांगी हा फरक जाणवत नाही. लेखकाला मात्र जाणीव असते. हे मिळालेले आयुष्य अमूल्य आहे. अपूर्व आहे. असाधारण आहे. त्यामुळे त्याचा विनीयोग त्याच तोलाने. त्याच मापाने केला पाहिजे म्हणून तो या विविधांगी सृष्टीकडे पाहताना तिला अनुभवताना आपल्या संवेदनशीलतेचा उत्कटपणे वापर करतो. प्रत्येक घटना, प्रसंग, दृश्य पाहताना त्याचे सामान्यीकरण न करता ती घटना, प्रसंग, व्यक्ती असाधारणच म्हणून तो पाहतो. या त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीला मिळालेल्या वरदानामुळे प्रत्यक्षातील वस्तू वेगळेच परिमाण घेऊन त्यांच्यासमोर जाते. त्या दर्शनाने वेगवेगळे अर्थ त्याला प्रेरित होत असतात.
मित्रहोऽ, जीवन एवढं समजून घेण्याएवढं सोपं नाही. त्यात जाणीव नेणिवांच्या प्रवाहाची एवढी गुंतागुंत झालेली असते की, खरा माणूस हा की तो असा प्रश्न महर्षी व्यासांसारख्या प्रज्ञावंतालाही पडावा! आता अशा जीवनाला समजून घेणाऱ्या... त्याला बोलतं करणाऱ्या लेखकाच्या मनोभूमिकेबद्दल काही भाकिते करू.
लौकिक व्यवहारात एखादा पाहुणा यजमानाच्या घरी आपल्या चांगल्या स्मृती ठेवून निरोप घेतो. तसा लेखक आपल्या अलौकिक वाङ्मयकृती येथे ठेवून जगाचा निरोप घेतो. त्याला जाणीव असते या भौतिक जगातील प्रत्येक वस्तू क्षय पावणारी आहे. नाश पावणारी आहे. पण ज्या शब्दाला त्याने अक्षरत्व दिलेले आहे.... स्वतःमधलं चैतन्य ओतलं आहे... ते शब्दब्रह्म नाश पावणारे नसते. म्हणून त्यांच्या जाण्याने तो जात नाही... त्यांच्या वाङ्मयकृतीद्वारा तो इथल्या चराचरासी सदैव संवाद करत असतो. पाण्याच्या साध्या थेंबाला मोत्याचं रूप देण्याचं कार्य शिंपला करत असतो... सामान्य माणूस आणि लेखक दोघेही जगाचा अनुभव घेत असतात, पण सामान्याचा अनुभव त्यांच्या सामान्य पातळीवरचाच व्यक्तिनिष्ठच राहतो; मात्र लेखकांनी घेतलेला तो अनुभव वैश्विक होतो, त्याचं कारण लेखकाच्या ठायी असणारी त्याची अलौकिक प्रतिभा! लेखकाचं जग जेवढं मोठं तेवढीच त्याची साहित्यकृती मोठी. तो समाजाच्या अथवा सृष्टीच्या वेगवेगळ्या स्तरावर जेवढा जगेल तेवढी अनुभवाची विविधता त्याच्या ठायी बांधली जाईल. हे खरे की, एक व्यक्ती म्हणून त्याला काही मर्यादा पडतात, पण कल्पनेने का होईना तो अनुभव घेता पाहिजे.
माणसाची सनातन सुखदुःखे काही समान असली तरी काही काळानुसार, धर्मानुसार, जातीनुसार, प्रांतानुसार, लिंग आणि वर्णभेदानुसार त्याची तिव्रता कमीजास्त होत असते. लेखकाचा केंद्रबिंदू माणूस असल्यामुळे माणूस ज्या पर्यावरणात जगतो. त्या पर्यावरणाचा विचार करणे लेखकाला अपरिहार्य ठरते. माणूस एकदा साहित्याचा केंद्र झाला की, लेखकाला त्याच्या सुखदुःखाचे, हर्षखेदाचे, कार्यकारणभाव शोधावे लागतात. त्यांच्या वाढीला... विकासाला... प्रतिबंध करणाऱ्या गोष्टींचा जसा धिक्कार करावा लागतो तसा त्यांच्या वाढीला अनुकूल असणाऱ्या बाबींना बळ द्यावे लागते. अर्थात हे सर्व कलात्मक पातळी सांभाळून! म्हणून लेखकाला माणसाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी येतात. त्याचा विचार, अभ्यास, व्यासंग, मनन, चिंतन, आवश्यकच नाही तर अपरिहार्य आहे. त्यात माणसाचे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही सनातन दुःखे जशी आहेत तसेच माणसाच्या जगण्यासाठी अन्न, पाणी, निवारा, वस्त्रप्रावरणे आहेत याचाही विचार लेखकाठायी पाहिजे. याअनुषंगाने समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, अध्यात्मशास्त्र, नैतिकशास्त्र इत्यादी आणि हा माणूस ज्या समाजात राहातो त्या समाजाला नियमन करणारी राजसत्ता या सर्वांचे स्थूलमानाने का होईना लेखकाला ज्ञान पाहिजे. तरच तो शोधीत असणारा माणूस त्याच्यापुढे उभा राहील. लेखकाचा धर्म एकच, जीवनदर्शन घडविणे. स्वतःला आलेल्या अनुभवाचा प्रत्यय वाचकाला आणून देणे. त्याची आंतरिक ईर्ष्या एकच स्वतःच्या ज्या अनुभवाच्या दर्शनाने तो रोमांचित झाला तोच रोमांच वाचकाच्या अंगावर पाहणे.
एवढा अट्टाहास लेखक का करतोय? माझ्या मते, लेखकाला खात्री असते. आपल्याला आलेला जीवनाचा हा अनुभव अनपेक्षित आणि अपूर्व आहे. अलौकिक आणि अनन्यसाधारण आहे. ह्या निमिषार्धात झालेले जीवनदर्शन अद्वितीय आहे आणि हा मांडणीचा, रचनेचा क्षण हुकला तर संपूर्ण मानवजातीला हे जीवनदर्शन दुर्लभ, अलभ्य आहे. म्हणून लेखक आपली संपूर्ण क्षमता पणाला लावतो आणि तो जीवनानुभव निखळपणे उभा करतो. सत्यावरचे आवरण त्या क्षणापुरते निखळून पडते.
शेवटी, महात्मा गांधीचे वैचारिक गुरू हेन्री डेव्हीड थोरो यांचं एक वचन उद्धृत करतो, “या जगात दोनच अशी स्थळे आहे की, ज्यांच्यावर आपला माथा टेकवावा... एक भरड माळाला वाहीत करून धान्य पिकविणारा शेतकरी आणि दुसरा समाजधारणा करणारा विचारवंत साहित्यिक!” म्हणून साहित्यिकांची जबाबदारी मोठी आणि महत्त्वाची आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.