आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं...:व्यवस्थारुपी यंत्राला भिडण्याचा अन छेदण्याचा वस्तुपाठ: ‘भुरा’

डॉ. अनिल क्षीरसागर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील फ्रेंच भाषेचे प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘भुरा’ हे आत्मकथन लोकवाङ्मय गृहने नुकतेच त्यांच्या जिल्ह्याच्या गावी धुळे येथे प्रकाशित केले. सदरच्या आत्मकथनाचे वेगळेपण हे त्यास असलेल्या अनंत कोनांच्या निरीक्षणावरून लक्षात येते. प्रा. शरद यांनी त्यांच्या वयाच्या ४० वर्षातील गावगाडा ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या संघर्षाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील फ्रेंच भाषेचे प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘भुरा’ हे आत्मकथन लोकवाङ्मय गृहने नुकतेच त्यांच्या जिल्ह्याच्या गावी धुळे येथे प्रकाशित केले. सदरच्या आत्मकथनाचे वेगळेपण हे त्यास असलेल्या अनंत कोनांच्या निरीक्षणावरून लक्षात येते. प्रा. शरद यांनी त्यांच्या वयाच्या ४० वर्षातील, गावगाडा ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या संघर्षाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यांचा संघर्ष हा कुण्या एका तटस्थ संस्थेशी, किंवा समुदायाशी नसून तो बहुपदरी, अन सर्वव्यापी व्यस्थेविरुद्ध आहे. व्यवस्था तिचा खेळ वंचितांना, दुर्लक्षितांना, आणि दाबून ठेवलेल्यांना कळू नये याची पूर्ण खबरदारी घेत असते. या दुश्चक्रातून सुटका मिळविण्यासाठी बाबासाहेब डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या त्रिसूत्री; शिक्षण, संघर्ष आणि संघटन या मार्गाने शक्य आहे असा संदेश प्राध्यापक शरद यांच्या प्रवासातून अधोरेखित होतांना दिसतो. व्यवस्था जात, धर्म, वर्ग, लिंग, रंग इ. पासून प्रवास करत भाषा, प्रांत, आणि देश असे अनेक प्रदेश काबीज करत स्वतःला भक्कमपणे रोवत असते. या विविध लॅण्डस्केप्सवर उत्पादन पद्धत, आणि उत्पादन संबंध सुरक्षित राहावेत म्हणून वंचितांच्या आर्थिक, शैक्षणिक, भाषिक, अन सांस्कृतिक खुजीकरणाचे प्रयोग जागो-जागी होतांना दिसतात. वंचितांमध्ये मागासवर्गीयांसोबतच बहुजन, स्त्रिया, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि असे बरेच घटक येतात ही लेखकाची जाण, या आत्मकथनाचा परीघ अधिक व्यापक करते.

सदर आत्मकथन ढोबळ मानाने काही भागात विभागून पाहिल्यास वंचितांचे प्रतिनिधित्व करू शकेल अशा एका दृढनिश्चयी, परिवर्तनवादी, व्यवस्थेच्या डोळ्यात डोळे घालून दोन हात करू पाहणाऱ्या, चिंतनशील युवकाची ज्ञानप्रवासातील खडतर पण ऊर्ध्वगामी वाटचाल आहे असे लक्षात येते. भारतीय खेड्यात बहुतांश गरीब घरातील मुलांच्या वाट्याला येते तसे, धुळे नजीकचे रावेर येथील, उणिवेने साचून असलेले आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, अन शैक्षणिक आयुष्य प्राध्यापक शरद बाविस्कर यांना मिळाले. पुढे धुळे येथील प्रेरणादायी महाविद्यालयीन प्रवास, तदनंतर लखनौ येथे एम. ए. इंग्रजी करीत असतांना फ़्रेंच भाषा शिकण्याची अभिलाषा बाळगली म्हणून व्यवस्थेने मांडलेला छळ, जे. एन. यू. दिल्ली येथील फ्रेंच एम. ए. चा टप्पा, त्याकरिता घेतलेली अपार मेहनत, पुढे इरॅस्मस मुंडस ही परदेशी शिष्यवृत्ती घेऊन फ्रान्स, इटली, आणि इंग्लंड येथील वास्तव्य सोबतच तत्वज्ञान या विषयात केलेली साधना, आणि पुस्तकाच्या उत्तरार्धात जे. एन. यू. दिल्ली येथे प्राध्यापक म्हणून काम करीत असतांना २०१४ नंतर भारतीय राजकीय विश्वात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या अनुभवांचे घाव. या सर्वच शीर्षक नसलेल्या प्रकरणांमध्ये प्रा. शरद यांना बहुपदरी व्यवस्था ‘उभी’ अनुभवाला आली, उभी म्हणजे ताठर, आणि सहजा-सहजी प्रवेश न करू देणारी व्यवस्था.

ग्रामीण भागातील कमजोर शिक्षण व्यवस्था, भरीस-भर वंचितांचे आर्थिक, अन सांस्कृतिक मागासलेपण हे त्यांना शिक्षणापासून कसे दूर ठेवते?; हे घटक अज्ञानी राहण्यातच काही मूठभर लोकांचे स्वार्थ कसे काम करतात?; कामाच्या विभागणीत ज्ञान म्हणजे आपले काम नाही हे मानण्यात वंचित बहूजन, आणि मागासवर्गीय कसे दैववादी भूमिकांना बांधून असतात?; इत्यादी मूलभूत प्रश्नांना प्राध्यापक शरद सुरुवातीच्या काही प्रकरणात हात घालतात ते त्यांच्या ग्रामीण भागात झालेल्या शैक्षणिक अन सामाजिक अनुभवावरून. धुळे शहरातील जय-हिंद महाविद्यालयात शिकत असतांना इंग्रजी शिकण्याकरिता केलेले कठोर प्रयत्न हे कोणत्याही महाविद्यालयीन विद्यार्थ्याला त्याच्या वाटचालीत प्रकाश दाखवतील असेच आहेत. सध्याच्या अँड्रॉइड युगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली मात्र त्याचसोबत तरुणांची असंख्य शक्यतांनी भरलेली डोकी कुंठित केली आहेत, अशा टप्प्यावर प्राध्यापक शरद बाविस्कर यांचे प्रयत्नं आजच्या तरुण पिढीला दिशादर्शक ठरतील.

आपण एकाच परिघात रममाण झालो तर एक दिवस त्या परिघाचे गुलाम होतो आणि, त्या परीघा बाहेर अजूनही मोठे विश्व आपली वाट पाहत असते याची जाण होत नाही. अनंत शक्यतांनी भरलेल्या जगात केवळ एका परीघात फिरत राहिल्याने आपल्याला आपल्या शक्तींची खरी ओळखही पारखी राहते या तत्वाची उकल या महाविद्यालयीन तरुणाला वेळीच झाल्यामुळे त्याला त्याचे शहर सोडून हैद्राबाद, आणि लखनौ सारख्या मुलुखात जाऊन उच्चशिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होते. आपल्या देशातही काही उत्कृष्ट शैक्षणिक संस्था निश्चितच आहेत, मात्र त्यासोबतच बऱ्याच संस्था ह्या कुणी भोंदू बाबा चालवतोय कि काय असा भास होत राहतो. CIEFL चे लखनौ कॅम्पसवरील अनुभव शरदला व्यथित करतात. एम. ए. इंग्रजी करीत असतांना त्याला फ्रेंच शिकण्याची इच्छा होते. मात्र तेथील औपचारिक व्यवस्था पैसे नाहीत, कोर्सला ऍडमिशन नाही म्हणून, ‘वर्गात बसलास तरी कसा?’ असा प्रश्न विचारते. तो अनौपचारिक पद्धतीने फ़्रेंच शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, लायब्ररीतुन फ़्रेंच भाषेची पुस्तकं वाचतो हे पाहून त्याला त्या भाषेची पुस्तकंही तेथून देण्यात येऊ नयेत असे फर्मान निघते. व्यवस्थेच्या अडचणींची घनता त्याच्या फ्रेंच शिकण्याच्या इच्छेला अधिक धारदार बनवते. तीन वर्षातही असाध्य वाटावी अशी भाषिक प्रगती तो अवघ्या दहा महिन्यात कशी सध्या करतो हा प्रवास वाचकांनी, विद्यार्थ्यांनी, अन शिक्षकांनी देखील जरूर वाचावा. अनौपचारिक शिक्षण हे अधिक मोकळे अवकाश मिळवून देणारे प्रांगण आहे असा त्याचा अनुभव आपल्या शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक प्रश्न उभे करणारा आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर मेहनत, आणि मनाच्या दृढ निश्चयाने, प्रतिकूलतेला आव्हान देत, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एम. ए. फ्रेंच या वर्गात बाहेरच्यांकरिता असलेल्या आठ ऍडमिशन्स मध्ये शरद पहिले स्थान पटकावतो हे वाचतांना त्याच्याप्रती निखळ आदर वाटतो. जे. एन. यू. या भारतातील एका उत्कृष्ठ विद्यापीठातही व्यवस्थेच्या ठेकेदारांची कमी नाही असा अनुभव लेखकाला अधून मधून येत राहतो.

फ्रेंच भाषा आणि त्यातील तत्वज्ञान शरदला खुणावत राहते, असीम प्रयत्नांनी इरॅस्मस मुंडस शिष्यवृत्ती घेऊन फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशात तीन मास्टर्स पदव्या संपादित करतो. बाहेरील जगाच्या अनुभवात त्याचे वैचारिक विश्व हे अधिक व्यापक होत जाते, ग्रीक स्टॉइक्स, फ्रेंच तत्वज्ञान, प्रबोधन चळवळ इत्यादींच्या वाचनाने त्याचा चिंतनशील, अन वैश्विकतावादी व्यक्तिमत्त्वाकडे प्रवास सुरु होतो. प्राप्त केलेल्या तात्विक बैठकीमुळे आपल्या देशातील व्यवस्थांमधील भेद त्याच्या नजरेस येतात. आपण देश म्हणून अजूनही चांगल्या व्यवस्था उभ्या करू शकलो नाही याची त्याला तीव्रतेने जाणीव होते. दरम्यान लेखकाच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट होत जाते, त्यातच दिल्ली येथे एका अपघातात मणक्यांना झालेली दुखापत उफाळून येते. त्यावरही मात करत तो ठरविलेला अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात परत येतो. जे. एन. यू. मध्ये प्राध्यापक होण्यापर्यंत लेखक त्याची शैक्षणिक क्षमता सिद्ध करतो. लेखक म्हणतो तसे, जे. एन. यू. ची गुणवत्ता आणि नैतिकता टिकून होती म्हणून त्याच्या सारख्या विद्यार्थ्यांचा तेथे प्राध्यापक म्हणून विचार झाला. जे. एन. यू. मधील विद्यार्थी व्यवस्थेला सत्याचा आग्रह करतात, तेथील अनौपचारिक तथा मुक्त असे वातावरण, वैचारिक बैठक या बद्दल लेखक भरभरून लिहितो. रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या ‘व्हेअर द माईंड इज विदाउट फिअर’ या कवितेत अपेक्षित असलेला; भयमुक्त, ज्ञानाची इच्छा असलेला, स्वाभिमानाने मान ताठ ठेवत, न्यूनगंडाच्या गडद छायेपासून दूर जात, उजेडाच्या दिशेने निघालेला भारत जे. एन. यू. घडवू शकते हे तेथील जागरूक विद्यार्थी समुदाय पाहिल्यावर खरे वाटते, असंच काहीसं वर्णन लेखक या भागात करतो.

२०१४ नंतर केंद्रात झालेल्या बदलामुळे जे. एन. यू. चे स्वातंत्र्य आता पूर्वीसारखे राहिले नव्हते या बद्दल लेखक निर्भीडपणे लिहितो. २०१९ मध्ये वसतिगृहातील भाडे वाढीच्या नावाखाली केंदीय यंत्रणेने केलेली हिंसक घुसखोरी, विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले, आणि एकंदरीतच ‘सांगितले तसे ऐका’- ‘निमूटपणे राहा’- ‘सत्याग्रह टाळा’- ‘व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस करू नका’, अशी ताकीदच जणू काही या हल्ल्यांनी सर्वांना करून द्यायचे ठरवले होते असा थरारक मात्र वास्तव अनुभव लेखकाने या आत्मकथनाच्या शेवटच्या टप्प्यात पानांवर उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

दहावीत इयत्तेत इंग्रजी विषयात नापास झालेला विद्यार्थी मनाच्या दृढ निश्चयाने अन कठोर प्रयत्नांनी केवळ इंग्रजीच नव्हे तर फ्रेंच, आणि, इटालियन भाषा शिकतो, एका प्रतिष्ठित विद्यापीठात फ्रेंच भाषेचा आणि तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होतो हा प्रवास निश्चितच सोपा नाही मात्र अशक्यही नाही, म्हणून हे ३५४ पृष्ठांचे विस्तृत लेखन वाचकांना बांधून ठेवते. मोठं सर्वांनाच व्हायचं असतं मात्र जिद्द आणि प्रेरणेची कमतरता असते. प्राध्यापक शरद यांच्यात ती एका ध्येयवेड्या योद्ध्यात असावी एव्हढी आहे. त्यांचा थक्क करणारा प्रवास इतरांनाही कामी येवो या उद्देशानेच हे आत्मकथन डोक्याचे केस पिकण्याआधीच प्राध्यापक शरद यांनी लिहिले ते चांगलेच केले.

गावाकडील अबोल, अव्यक्त आणि उनाड भुरा, आपली मुलं याच्या संगतीत बिघडतील अशा अनेक माता-भगिनींच्या शंकेला कारण ठरलेला, दहावीत नापास झाल्यानंतर शिक्षण नको म्हणत घराला हातभार लावण्याकरिता पडेल ते काम; क्रेन सर्व्हिस, साबण कारखाना, मजुरांसाठी भाकऱ्या थापणे, दुकानावरील काम, गॅरेज काम ई. श्रम करून पुढे उच्चशिक्षण घेत असतांना कमवा व शिका योजनेत काम करून आपले आयुष्य नाही घडले तर व्यर्थ जाईल, व्यवस्था आपल्याला संपवेल याचे भान येऊन जिद्दीने ज्ञानमार्गाला लागतो. मोठा होऊन केवळ स्वतःला सिद्ध करून व्यवस्थारूपी यंत्रातील एक पार्ट न होता, व्यवस्थेशी होणाऱ्या संघर्षाला फुले-शाहू-आंबेडकरी प्रेरणेतून कसे हाताळावे, राखेतून उठत आकाशाकडे झेपावत, शिक्षण, स्वाभिमान, श्रमाप्रती आदरभाव बाळगत, संघर्ष करत व्यवस्थेच्या डोळ्यात डोळे टाकून प्रश्न विचारत बहुपदरी व्यवस्थेला कसे छेदावे याचा वस्तुपाठ मांडतो.

सदरचे आत्मकथन एक उत्स्फूर्त आत्मकथन असल्यामुळे ओघवत्या शैलीत प्रवाहित झाले आहे. त्याचा बँक अँड फोर्थ पॅटर्न प्राध्यापक शरद यांचा संघर्ष, मानसिक द्वंद्व, आणि त्यांच्या आयुष्यातील चक्राकार समस्या सामान्य वाचकांपर्यंत पोहचवण्यास मदत करतो. प्राध्यापक शरद यांच्या वाट्याला आलेल्या समस्या बऱ्याच मोठा वर्गाला हजारो वर्षांपासून भेडसावत आल्या आहेत म्हणूनच त्यांचे ‘भुरा’ हे आत्मकथन सर्व व्यक्तिनिष्ठ सीमारेषा ओलांडून बहुजन आणि उपेक्षितांच्या अपेक्षित वर्तन व्यवहाराचे दिग्दर्शन करते. फ्रेंच तत्वज्ञान, पोस्ट-स्ट्रक्चरल थेअरीजचे उत्तम ज्ञान, अन फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची घट्ट तात्विक बैठक असल्यामुळे पुस्तकात अनेक ठिकाणी वाचकाला थोडा वेळ थांबून विचार करण्यास भाग पडणारे प्राध्यापक शरद यांचे परिवर्तनवादी विचार ह्या आत्मकथनाची उंची अधिक वाढवतात: “शिक्षण हा स्वातंत्र्य ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.”; “शिक्षण जर सर्वसमावेशक आणि संमिश्र समाजाचं प्रतिबिंब नसेल, तर ते शिक्षण नसून बहुसंख्य समाजाच्या विरोधात चालणार षडयंत्र आहे”; “मला व्यवस्था आणि स्वातंत्र्य ह्या मानवी जीवनातील एकाच नाण्याच्या दोन वाजू वाटतात. व्यवस्था मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे, तर व्यवस्थेचं कुठल्याही क्षणी निरंकुश होणं मानवी स्वातंत्र्यावरील टांगती तलवार”; “फ्रान्स असू दे किंवा कुठलाही देश, संकीर्ण मानसिकता आणि इतरांविषयी असणारं अज्ञान, हा वैश्विक शाप असावा”; “आत्मसन्मान आणि स्वातंत्र्यासारख्या गोष्टी कुणी स्वतःहून देत नाही. ह्या मूलभूत गोष्टीविषयी जाणीव ठेवून सतत सतर्क राहावं लागत आणि समोरच्याला जाणीव करून द्यावी की, ह्या गोष्टी प्राणवायूसारख्या असल्यामुळे नॉन निगोशिएबल आहेत”. असे एक ना अनेक परिवर्तनाला चालना देण्याची प्रचंड क्षमता असलेले मौलिक विचार संपूर्ण आत्मकथनभर विखुरलेले आहेत.

या आत्मकथनात प्राध्यापक शरद यांनी अहिराणी, फ्रेंच, इटालियन, आणि इंग्रजी या भाषेतील संवादांचा मुक्तपणे केलेला वापर वाचकांसाठी अडसर न ठरता, भाषेबद्दलची त्यांची जाण अधिक सखोल करण्यात मदत करतो. प्राध्यापक शरद यांचे आत्मकथन वाचत असतांना त्यांचा आई, शिक्षक, मित्र, मैत्रीणीप्रती असलेला आदरभाव सहृदयी व्यक्तिमत्वाची साक्ष देतो. प्राध्यापक शरद बाविस्कर यांचे ‘भुरा’ हे आत्मकथन हे पारंपरिक धाटणीचे नाही. केवळ व्यवस्थेला दोष देत, व्यवस्थे विरुद्ध आक्रोश करत, सहानुभूती मिळविण्याच्या उद्देशाने संघर्षाचे भावनिक वर्णन न करता, वस्तुनिष्ठपणे व्यवस्थेच्या गुणदोषांचे तटस्थ विश्लेषण करते. सर्व सामान्यांनी आपल्या उत्थानाकरिता काय करावे याबद्दल विचार करायला प्रवृत्त करते. पुढे जाण्याची ताकत देते. सामाजिक डार्विनवादावर आधारित व्यवस्थेला क्रूर-कर्मा न संबोधता एक मोठी अडचण, जी पार करणे कठीण असले तरी असंभव मात्र निश्चितच नाही हा मूलगामी विचार मांडते, म्हणून हे आत्मकथन वेगळे आहे असे म्हणता येईल. या आत्मकथनाने मराठी साहित्य जगतासमोर वैचारिकदृष्ट्या कसदार, विस्तीर्ण सैद्धांतिक आवाका असलेले, तटस्थ, तरी देखील प्रेरणेने परिपूर्ण आत्मकथन लिहिण्याचे आव्हान उभे केले आहे.

---------------------

भुरा

लेखक: शरद बाविस्कर

प्रकाशक: लोकवाङ्मय गृह, मुंबई

मुखपृष्ठ: सिद्धार्थ

पाने- ३५४- किंमत: ५००/रुपये

anilfkshirsagar31@gmail.com