आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं...:महाविद्यालयीन जीवनाचा सर्वस्पर्शी शोध : ‘झेंगट'

डॉ. दत्ता घोलप, सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशील गायकवाड हे भारतीय रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांची ‘झेंगट' ही पहिलीच कांदबरी राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या यशस्वीतेच्या कहाण्या सांगणाऱ्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांची खूप चलती सध्या आहे. अशा पुस्तकांमधून संषर्घमय वाटचाल नोंदवत यशाची पताका गौरवाने सांगितली जाते. अशा काळात गायकवाड यांनी ही लोकप्रिय वाट टाळून प्रगल्भ जीवनदर्शन करणारा आणि निर्मितीच्या पातळीवर दमणूक करणारा कादंबरीसारखा साहित्यप्रकार हाताळला आहे.

सुशील गायकवाड हे भारतीय रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांची ‘झेंगट' ही पहिलीच कांदबरी राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या यशस्वीतेच्या कहाण्या सांगणाऱ्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांची खूप चलती सध्या आहे. अशा पुस्तकांमधून संषर्घमय वाटचाल नोंदवत यशाची पताका गौरवाने सांगितली जाते. अशा काळात गायकवाड यांनी ही लोकप्रिय वाट टाळून प्रगल्भ जीवनदर्शन करणारा आणि निर्मितीच्या पातळीवर दमणूक करणारा कादंबरीसारखा साहित्यप्रकार हाताळला आहे. ‘झेंगट' ही कादंबरी २०२१ साली प्रकाशित झाली आहे. परंतु कादंबरीत चित्रित झालेला काळ हा नव्वदच्या दशकातील आहे. ‘मंदिर वही बनायेंगे'च्या घोषणा होत आहेत. मंदिर निर्माणासाठीची वीट गावागावात फिरवली जाते, त्याचेही पडसाद आहेत. जागतिकीकरणाच्या प्रवेशाचा असा हा संक्रमणाचा काळ ज्यामध्ये धामिर्कतेचा टोकदारपणाला सुरुवात झाली आहे. जागतिकीकरणाचा प्रत्यक्ष अंमल सुरू झाल्याचा हा काळ आहे. या काळाचा शैक्षणिक अवकाश कृषी पदवीची चार वर्षे शिक्षण घेणाऱ्या तरुणाच्या नजरेने न्याहळला आहे. स्वतःच्याच जगण्याचे उत्खनन करत प्रगल्भतेने हे साधले आहे. ही अनुभवसंपन्नता आई, भाऊ, मित्र-मैत्रिणी, कुटुंब, गाव, कृषिसंबंधित अनेक बाबी आणि परिसराशी असणारे जोडलेपण घेऊन येते. चाकोरीबद्ध जगण्याचे काच येथे नाहीत. त्यामुळे कादंबरीगत जीवनाशयाला अनेक दिशांनी असणारे पसरलेपण दिसते.

कृषी पदवी घेत असतानाचे प्रामुख्याने हे अनुभव आहेत. या अगोदर या पद्धतीचे अनुभव शेषराव मोहिते यांच्या कादंबऱ्यात आलेले आहेत. हे अनुभव फार वस्तुनिष्ठतेने नोंदवले आहेत. लेखकाच्या शोधक नजरेच्या प्रत्यय येतो. अंजिक्य मोहिते हा विद्यापीठाच्या सव्वीस वर्षांच्या इतिहासामध्ये बीएस्सी अॅग्रीचा पदवीचा विद्यार्थी पहिल्यांदाच भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा वरच्या रँकने पास झालेला आहे. यानिमित्ताने राज्यपालांच्या हस्ते त्याचा सत्कार होतो, या घटनेने कांदबरीचा प्रारंभ होतो. अंजिक्य मोहितेच्या प्रवासाचा जो परिपाक आहे तेच सुरुवातीला सांगून फ्लॅशबॅक पद्धतीने त्याच्या पदवी शिक्षणाची वाटचाल येते. ही वाटचाल पुढे मात्र एका वर्षातून दुसरे काळानुरूप एका वर्गातून दुसऱ्या वर्गात असे सरळथेट कथानक आकारले जाते.

वैद्यकीय शाखेचा प्रवेश हुकल्यानंतर आणि इतर शाखांच्या प्रवेशांची मुदत संपल्यानंतर पर्याय नाही म्हणून अजिंक्य कृषी शाखेला आलेला आहे. तिथेही त्याच्या कॉलेजची सुरुवात अपेक्षाभंगाने अपशकुनी पद्धतीने होते. कॉलेजच्या हॉस्टेलचे शिसारी आणणारे वातावरण, तरुणांची भंकस त्यांच्या स्लँगमधून चालते. सर्व आलबेल दिसणाऱ्या कॉलेजमध्ये जातीयवाद आणि प्रदेशवादाची घाणेरडी कीड लागलेली होती, जी या व्यवस्थेला अंतरंगातून अदृश्यपणे पोखरत होती. या सर्वांतून होणारी तरुण मनाची घालमेल अंजिक्य मोहितेच्या संवेदनशील नजरेने टिपली आहे. शेतीच्या अभ्यासाचे बहुंताश प्रॅक्टीकल शेतावर म्हणजे प्रत्यक्ष फिल्डवर न होता वर्गातच शिकविणे. विद्यार्थ्यांनी जर्नल्समधून राष्ट्रगीत लिहूनही बरोबर तपासणे. कोणतेही पुस्तक न वाचता नोटस्च्या वाचनातून कृषी शाखेची पदवी मिळणे. पुढे नायक उद्वेगाने म्हणतो, ‘‘मेन बिल्डिंगच्या समोरील लॉनवर असलेल्या चबुतऱ्यावरील जोतीराव फुलेंना खाली उतरवलं पाहिजे अन् कॉलेजात त्यांना सोबत घेऊन एक चक्कर मारली पाहिजे. शेतकऱ्यांचा आसूड चालेल मग सपासप. सावित्रीच्या लेकी कशा घाबरून बिळात राहतात कळू देत त्यांना''(पृ.२४३) अजिंक्य मोहिते स्वतःच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या वाटचालीतून दाखवून देतो की, मातीचं शिक्षण देता देता आपण शिक्षणाचीच माती कशी केली. विद्यार्थी, शिक्षक, मित्र यांच्या चर्चेतून एकाच विषयाच्या अनेक बाजू पुढे येतात. अभिव्यक्तीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे पात्रचित्रणाची खासपद्धत दिसते. अगदी काही काळ सहवासात आलेल्या मेसवाल्यापासून सर्व मित्र, प्राध्यापक, बिहारमध्ये भेटलेले लोक अशा अनेक व्यक्तिरेखा रेखाटल्या आहेत. शारीरवर्णन, कपडे अगदी केसांची ठेवण आणि बोलण्याच्या लकबीतून स्वभावविशेष रेखाटले आहेत.

वाचक म्हणून आपण अजिंक्य मोहितेच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतो, कारण साहित्याविषयी सजग भान असणारा, रोखठोक मतं असणारा असा तो विचारी संवेदनशील तरुण आहे. मुलींची छेड काढणाराला बेदम चोप देणारा, मित्रांसोबत टूरला गेल्यावर बिहारचे सामाजिक आकलन नोंदवणारा, बिहारचे खूप आतून दर्शन घडविले आहे ते मुळातून वाचण्यासारखे आहे. शिक्षणाबद्दल ठाम मतं असणारा, शिवाय उत्कट प्रेमात राहणारा, असे असंख्य पैलू त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे आहेत. हळुवारपणे उमलत जाणाऱ्या प्रेमकहाणीचे भारतीय समाजवास्तवात जे होते तेच येथे होेते. लेखक सफल प्रेमकहाणी टाळून दोन वेगवेगळ्या जातवास्तवातून आलेल्या तरुण-तरुणीच्या भावविश्वाचा संयमित आविष्कार करतो. कृषिविषयक शिक्षणक्रमातूनच लेखकाने भारतीय शेतीच्या परंपरागत व्यवस्थांसह नव्या-जुन्या पद्धती आणि प्रत्यक्ष बांधावरची वस्तुस्थिती नेमकेपणाने दाखवून देत कादंबरीचा पट व्यापक केला आहे.

अजिंक्य मोहिते या तरुणाच्या जीवनदृष्टीकोणातून कृषी महाविद्यालयातील हॉस्टेलचे अनुभवकथन येते. आपल्याला वाचक म्हणून ‘कोसला'च्या प्रभावखुणा कादंबरीत दिसतात. आत्मनिष्ठतेला वस्तुनिष्ठतेची जोड देत कादंबरी लिहिण्याचा ‘कोसला'चा प्रभाव या कादंबरीत दिसतो. शैक्षणिक अवकाशाचे विद्यार्थीकेंद्रित आकलन ‘कोसला'प्रमाणेच याही कादंबरीत येते. प्रोटॅगनिष्टने व्यक्त केलेले नैतिकतेचे परिमाण आणि व्यवस्थेचे मूल्यात्मक आकलन याही कादंबरीचा विषय झाले आहे. ‘कोसला'चा प्रभाव आहेच, प्रभाव ही गोष्ट साहित्यात नीटपणे घेतली जात नाही. संगीत, गायकीमध्ये घराण्यांची परंपरा गौरवाने मिरविली जाते. साहित्यामध्ये मात्र प्रभावातील लेखनाला कमअस्सल समजण्याकडे आपला कल असतो. मात्र प्रभाव किती अर्थवाही आहे हे महत्त्वाचे असते. अंजिक्य मोहितेचे पांडुरंग सांगवीकरशी असणारे नाते खोलवरचे आहे. हे फक्त अनुकरणाचे नाही, स्वतःची अशी वेगळी पाऊलवाट शोधणारे आहे. हे एकूण मराठी कादंबरीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. ‘कोसला'मधील पांडुरंग सांगवीकर स्वतःच्या अस्तित्व शोधाने पछाडला होता, अंजिक्य मोहितेही स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेतो आहे. ‘‘पांडुरंग सांगवीकर कुणाला भेटला तर जरुर कळवा रे मला. बरेच हिशोब चुकते करायचे आहेत त्याचे. उदाहरणार्थ, वगैरे म्हणत म्हणत मेंदूची सालटे हळुवारपणे काढून टांगून दिली आहेत, जाणीव-नेणीवेच्या पलीकडल्या दोरीवर ती उतरवायची कशी आता? ''(पृ. २४५) हे त्याचे पांडुरंगशी असणारे समानधर्मा नाते कांदाबरीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. या कादंबरीचे आणखी वेगळेपण असे की, तरुणांच्या अनेकविध अनुभवांचे सोलापुरी भाषेतील हे भरड गद्य समकाळाचे संचित जोरकसपणे व्यक्त करते.

लेखकाने वाचकाला ‘झेंगट'कमध्ये खुल्या शेवटाच्या बिंदूवर आणून सोडले आहे. पदवी पर्यंतचा प्रवास आणि थेट लोकसेवा आयोगातील निवडीचा संदर्भ येतो. वाचक म्हणून आपण पुढील भागाचे अनुमान काढायला लागतो. कांदबरीच्या ब्लर्बवरती आपल्याला सापडते, ‘एका संवेदनशील तरुणाच्या भावविश्वाचा टोकदार अन् धारदार वेध घेणाऱ्या दोन कादंबरीच्या मालिकेतील पहिली कादांबरी' पुढील भागात पदवी ते स्पर्धा परीक्षेतील यशाचा झगडा किंवा ज्या व्यवस्थेचा ते भाग आहेत अशा वास्तवाला फिक्शनमध्ये, गोष्टीत स्थानांतरीत करतील असे वाटते. लेखक म्हणून त्यांची येथे खरी कसोटी लागणार आहे. यामुळेच पुढील भागाची वाचकमनात उत्सुकता निर्माण होते.

झेंगट : सुशील गायकवाड

राजहंस प्रकाशन, पुणे

मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी

एकूण पृष्ठे : २६२

किंमत : ३५०/-

---------------------

dpgholap@gmail.com

बातम्या आणखी आहेत...