आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदरांजली:अनाथांचा नाथ!

द्वारकानाथ संझगिरी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्कृष्ट वक्ते, संसदपटू आणि लोकाभिमुख, संवेदनशील नेते बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २५ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. नाथ पै ही फक्त व्यक्ती नव्हती. ती वृत्ती होती. प्रामाणिकपणा त्यांच्या लहानपणापासून रक्तात होता. तो राजकारणातही टिकून राहिला.

शाळेत मॅट्रीकला होतो मी! एक दिवस वडिलांनी मला सांगितलं," माझ्या बरोबर बॅरिस्टर नाथ पैं ह्यांच्या भाषणाला चल. चांगलं इंग्लिश कसं बोलतात ते कळेल."

मी निमुटपणे गेलो. माझं इंग्लिश तरखडकर, रेन अँड मार्टिन, आणि आमचे पाटणकर मास्तर ह्यांच्या चक्कीत तयार झालेलं. नाथ पै असे बोलले की त्यांचा जन्म, वेंगुर्ल्यात झाला नसून, वॉलसाॅल मध्ये झालायं.

त्यानंतर नाथ पै नावाने मी भारावून गेलो, ते भारावणं आजही तसंच आहे.

नाथ पै ह्याचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय.

मी शिवाजी पार्क येथे आयुष्य घालवलेला माणूस. एकाहून एक मोठे वक्ते मी ऐकले आहेत. पण मैदान असो किंवा लोकसभा किंवा विद्वानांची मैफल, ह्या सगळ्या फॉरमॅटमध्ये सचिन तेंडुलकरसारखी बॅटिंग करणारा सर्वोत्तम वक्ता म्हणजे नाथ पै. इंग्लिश शब्द त्यांच्या जिभेचे गुलाम होते. आवाजाची देणगी अशी की त्यांचं बोलणं "संगीतमय " बोलण्यात मोडायचं. त्यात आवेग होता. नाट्य होतं.पण ते सहज जमून गेलेलं. संजीव कुमारच्या अभिनया प्रमाणे नैसर्गिक. १९५७ साली ते प्रजा समाजवादी पक्षातून लोकसभेत गेले. पहिल्याच भाषणानंतर लोकसभेचे उप सभापती खाली उतरले आणि त्यांनी नाथ पैचं कौतुक केलं. त्यावेळी सभापती, उप सभापती, सत्तारूढ पक्षाचे मिंधे नसत.त्या काळात साम्यवादी पक्षाच्या डॉ .हिरेन मुखर्जींच्या इंग्लिशचा दबदबा लोकसभेत होता. नाथ पै आल्यानंतर मुखर्जींपेक्षा ते अंमळ जास्त चांगलं बोलतात असं मानलं गेलं.

भाषण हेच फक्त नाथ पै ह्याचं मोठेपण नव्हतं. ते हाडाचे समाजवादी होते. त्यांनी युरोप मधल्या समाजवादी चळवळीचं नेतृत्त्व केलं. १९४२ च्या चले जाव चळवळीत, त्यांनी नुसता तुरुंगवास नाही भोगला. त्यांना तुरुंगात जी मारहाण झाली त्यामुळे त्यांच्या हृदयाला सूज आली होती. त्याचा त्रास त्यांना आयुष्यभर झाला. ते लोकसभेवर कोकणातून १९५७, ६२ आणि ६७ असे तीनदा निवडून गेले. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी उडी घेतली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी हिरीहिरीने भाग घेतला. बेळगाव महाराष्ट्रात यावं म्हणून तर शेवटपर्यंत ते लढले. शेवटचं भाषण त्यांनी बेळगावात त्या लढ्याच्या संदर्भात केलं. आणि वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.

नाथ पै ही फक्त व्यक्ती नव्हती. ती वृत्ती होती. प्रामाणिकपणा त्यांच्या लहानपणापासून रक्तात होता. तो राजकारणातही टिकून राहिला. लहानपणी त्यांचं गणित कच्चं होतं. त्यावेळी शाळेत डेप्युटी येत. त्यांना" दिपोटी" म्हणत. ते मुलांची परीक्षा घेत. मुलं नापास झाली तर शिक्षकांना फैलावर घेत. त्यामुळे मास्तरांनी नाथला सांगितलं," तुझ्या पुढच्या आणि मागच्या मुलाच्या गणीताचं उत्तर पाहून तुझं उत्तर लिही."

छोट्या नाथाने स्पष्टपणे मास्तरांना सांगितलं, " मी खोटं करणार नाही".

टिळकांच्या शेंगांच्या टरफला सारखी ही गोष्ट. त्याकाळी एक टिळक निर्माण झाले की ते पुढच्या काही पिढ्यांमध्ये नाथ पै निर्माण करत.आता टिळकच निर्माण होत नाहीत.एकदा तरुणपणी त्यांना एका मीटिंग साठी घाईत जायचं होतं. त्यांनी मित्राला सायकलवर डबल सीट घेतलं. पोलिस मागे लागला. त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली. पण दुसऱ्या दिवशी ते पोलिस चौकीत हजर झाले आणि म्हणाले, " काल मी कायदा मोडला. मला पकडा."

कपोलकल्पित वगैरे वाटतं ना?

का नाही वाटणार,? हल्ली पोलिसांनी एखाद्या फालतू राजकीय नेत्याला अडवलं तर तो आकाश पाताळ एक करतो.

बऱ्याचदा काळ आणि परिस्थिती माणसं घडवते. वातावरण मनं पेटवतं. नाहीतर सोळा वर्षाचा शिरीषकुमार गोळी झेलण्यासाठी आपली छाती कशी उघडी करू शकतो.? १९४२ च्या चळवळीत नाथ पडले तेंव्हा ते १९ वर्षाचे होते. त्यांच्या आईला काळजी वाटली. ताडकन नाथ आईला म्हणाले," तू माझी एकटीच आई नाहीस.मला २० कोटी आया आहेत. म्हणून मला चळवळीत पडलं पाहिजे"

त्या काळात आयाही तशाच होत्या. नाथांना अटक होऊन, भयानक मार खाल्ल्यानंतर त्यांची आई त्यांना भेटायला तुरुंगात आली. आईला पाहिल्यावर नाथांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी आई म्हणाली, " तुला वीस कोटी आया होत्या ना? तुला योग्य वाटले ते तू केलंस.आता कशाला वाईट वाटून घेतोस?"

नाथ आठ महिन्याचे असतांना त्यांचे वडील गेले. पण त्यांची इच्छा म्हणून ते बॅरिस्टर झाले. त्यासाठी ते इंग्लंडमध्ये गेले. पण तिथे फक्त कायद्याचा अभ्यास केला नाही. त्यांनी इंग्लंडच्या लोकशाहीचा आणि ट्रेड युनियन चळवळीचा अभ्यास केला. समाजवादी युरोपियन तरुणांचं नेतृत्त्व केलं. साने गुरुजींच्या नावे एक वसतिगृह लंडनमध्ये सुरू केलं. कारण सानेगुरुजी हे मानवतेचं दुसरं नाव होतं. .तिथे भारतीय आणि इतर देशाचे विद्यार्थी राहत.नंतर शिष्यवृत्ती मिळाली, म्हणून ते व्हीएन्नाला गेले. क्रिस्टल मुशेल नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले. तिथल्या प्राध्यापकाने सांगितलं" डॉक्टरेट का नाही करत?" तर कुठला विषय त्यांनी निवडला असेल? उपनिषदांचा जर्मन तत्त्वज्ञानावर परिणाम!

वेगळाच माणूस होता हा!

१९५७ साली कोकणातून नाथ एक लाख दहा हजार मतांनी निवडून लोकसभेवर गेले. त्यानंतर त्यांना डॉक्टरेट पूर्ण करणं जमलं नाही. ते म्हणत," पण त्या निमित्ताने मी जे वाचन केलं ते माझ्या आयुष्याचा एक अमोल ठेवा आहे." नाथांनी संसद ही कुस्तीचा आखाडा मानला नाही. प्रतिस्पर्ध्यांची पाठ जमिनीला टेकवत उन्माद करण्याची जागा मानली नाही. त्यांना ती जागा म्हणजे प्रतिस्पर्ध्यांच्या मतपरिवर्तनाची जागा वाटली. समाजवादी लोहियां पेक्षा त्यांची ही भूमिका वेगळी होती. नाथांचे शब्द बाण जखमा करत नसत मतपरिवर्तन करत. त्यांनी कधी काँग्रेसला सोडलं नाही किंवा पंडित नेहरूंना. एकदा केंद्रीय सरकारी नोकरांच्या संपाच्यावेळी, नेहरूंनी विरोधी पक्षावर प्रचंड हल्ला चढवला. नाथांनी शांतपणे नेहरूंचा हल्ला परतवून लावला. ते म्हणाले," देशातल्या भुकेल्या जनतेने अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे, असं ज्यांनी सांगितलं, अर्धपोटी लोकांबद्दल ज्यांनी सहानुभुती व्यक्त केली. त्याच पंडित नेहरूंच्या शिकवणीचे आम्ही पालन करतोय.पंडित नेहरूंच्या संबंधाने आमचं चुकलंच. त्यांची शिकवण आचरणात आणून आम्ही फसलो. १९२६ साली ब्रिटिश मजुरांची दयनीय अवस्था पाहून नेहरूंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आज आमचे नोकर नेहरूंना विनंती करतायत. खरे नेहरू कुठले? १९२६ चे किं १९६० चे?"

आपल्या चेंबरमध्ये भाषण ऐकत बसलेले नेहरू सभागृहात येऊन बसले.

नाथांचा घटना, परराष्ट्र धोरण, संरक्षण, विषयीचा अभ्यास गाढा होता. घटनेच्या प्रत्येक पानात एक कोरं पान टाकून त्यांनी त्यावर त्या त्या कलमाबद्दल आपली मतं लिहिली होती. चिनी युद्ध, आणि चीन संबंधीची परराष्ट्र निती, ह्या बद्दल त्यांनी नेहरूंच्या धोरणावर सभ्य पण प्रखर हल्ला केला.पण वैयक्तिक कुचाळकी केली नाही. चिनी युध्दापूर्वी एका चर्चेत त्यांनी नेहरूंना सुनावलं होत, "आम्हाला युद्ध नको. पण लाजिरवाणी शरणागती नको. आशियातील कोणताही भाग चीनने बळकावला तरी त्याकडे कानाडोळा नको" तो काळ असा होता की राजकीय प्रतिस्पर्ध्याला शत्रू मानत नसतं. त्यामुळेच नेहरूंनी त्यांना पार्लमेंटरी परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकी साठी मॉस्कोला पाठवलं आणि सांगितलं, " मला तुझे मॉस्को बद्दल मत हवंय. तू पहा, ऐक , समजून घे आणि मला येऊन सांग."

नाथ पै नेहरूंच्या घरात आपल्या घरासारखे वावरत.

१९६५ला, पाकिस्तानने कच्छ मध्ये आक्रमणं केलं नाथांनी, लोकसभेत, सरकारला धारेवर धरलं.,"चीनचा कित्ता गिरवून पाकिस्तान भारताच्या भूमीवर हक्क सांगत असताना, आमची सौरक्षणाची तयारी काय आहे? कच्छच्या रणांत सध्या जमत नसेल, तर दुसऱ्या कुठे भारत प्रतिहल्ला करणार का?"

सभापतींनी नाथांशी सहमत असल्याचं सांगितलं. लगेच नाथ म्हणाले, "आक्रमणाचा प्रतिकार करायला आम्ही एकत्र आहोत. घोडचूक पुन्हा करण्यासाठी नव्हे, हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावं"

तेच युध्दात घडलं. त्यानंतर युद्ध बंदीचा प्रश्न आला. नाथ म्हणाले, "युद्धाबंदी बाबतींत देशाचा अनुभव वाईट आहे. हा सापळा आहे. त्यात सापडू नका."

आपण सापडलो.

घटना दुरुस्ती बाबतची त्यांची मतं गाजली. लोक आणि त्यांनी निवडून दिलेले त्यांचे प्रतिनिधी हे सर्वश्रेष्ठ अस त्यांचं मत होत. हा एक असा नेता होता , जो त्याग दिसला की नतमस्तक व्हायचा. वैचारिक मतभेद त्या गोष्टीच्या आड येत नसत. त्यांना क्रांतिकारकांचे आकर्षण होतं. मग ते नेताजी सुभाष चंद्र बोस असोत, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर. गांधीजी त्यांचं दैवत होतं, पण १९४२ च्या चळवळीत त्यांनी अहिंसा बाजूला ठेवली. राजकारणात त्यांनी नैतिकता जोपासली. १९६२ च्या निवडणुकीच्यावेळी त्यांना बिरलांनी ( त्यावेळचे अदानी) दहा हजारांचा चेक स्वतःहून पाठवला. त्यांनी तो परत केला.

कोकणात एकदा मोठं वादळ आलं. नाथ सरकारी नोकरांच्या आधी तिथे पोहचले. एक सरपंच आपल्या घरावरची कौलं शाळेच्या घरावर लावत होता. नाथ सुध्दा गहिवरले. आज शाळेची कौलं सरपंचाच्या घरावर दिसली असती. देशासाठी ते झटले , स्वातंत्र्यासाठी ते लढले पण,कोंकण हे त्याच्या कार्याचं हृदय होतं.कोकणचा विकास हे त्यांचं ध्येय होतं. कोकण रेल्वे, हायवेचं पहिलं स्वप्न त्यांनीच पाहिलं. ह्या धावपळीत ते आपलं हृदय नीट ठेऊ शकले नाहीत. आणि हृदयविकाराने त्यांना अकाली आपल्यातून ओढून नेलं.

मालवणच्या विमानतळाला त्यांचं नाव देणं, हे सत्ताधाऱ्यांसाठी पुण्यकर्म होईल.

नाथ पै, अटल बिहारी, पालखीवालां, सारख्या वक्त्यांना ऐकू शकलो. हे आमचं सुदैव. नाथ पैं सारखी माणसं आता राजकारणात सापडत नाही. ते तेजस्वी आत्मे पुन्हा ह्या देशाकडे फिरकत नाहीत. असा एखादा नाथ सापडला तर जरूर कळवा. त्यागी राजकीय पायावर डोकं टेकवण्यासाठी मन अधीर आहे.

त्यांना कविता भयानक आवडायची. कुसुमाग्रजांची एक कविता ते नेहमी गुणगुणत,

"विजयासाठी माझी कविता कधी नव्हती

म्हणून नव्हती भीती तिला पराजयाचीc

म्हणून नाही खंत तिला मरावयाची"

त्यांचं आयुष्य तसच होतं...

------

dsanzgiri@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...