आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:गझलेतील कोजागरी

बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या मंगळवारी आपण लख्ख चांदण्यात कोजागरी साजरी करणार आहोत. कोजागरी पौर्णिमा म्हणजे गझलाकारांसाठी चमचमणाऱ्या चांदण्याची जणू पर्वणीच असते. गझलकार देहाच्या ओंजळीतून मनातलं प्रेमाचं चांदणं कसं उधळतात हे पाहणंही तितकंच लोभसवाणं आहे.

कोजागरी पौर्णिमेच्या अनेकविध कथा सांगितल्या जातात. कोजागरी पौर्णिमा! कोण जार्गति? कोण जार्गति? याचा अर्थ कोण जागं आहे? कोण जागृत आहे? अशी विचारणा करत दुर्गादेवी चौफेर हिंडते असं म्हणतात. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री उशिरापर्यंत गप्पागोष्टीची, मौज मजेची मैफल उजळून निघते. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेत रास अन् गरबा खेळत आठवणीतील, मनातील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून त्यात बदाम, केशर, पिस्ता आदि सुकामेवा घालून मसाला दूध प्राशन केलं जातं. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात पृथ्वीला न्हाऊ घालत असतो. सर्वत्र प्रकाशाची मुक्त उधळणं होते. चांदण्यात मधुर गारव्याची लहर असते. हवाही धुंद होते. चंद्रही आणखी देखणा होतो. रोजचाच चंद्र आज नवाकोरा भासायला लागतो. या रात्री कमालीची धमाल सुरू असते.

कोजागरी पौर्णिमा म्हणजे गझलाकारांसाठी चमचमणाऱ्या चांदण्याची जणू पर्वणीच असते. गझलकार देहाच्या ओंजळीतून मनातलं प्रेमाचं चांदणं कसं उधळतात हे पाहणंही तितकंच लोभसवाणं आहे. याकरिता त्यांचे शेर वाचावे लागतील.

कोजागरीच्या रात्री जागरण करण्याचा चांदण्यांचा तगादा असतो. साद आली की प्रतिसाद देण्याची ही जागृत रात्र असते. या रात्रीच देहाची कळी खुलते, फुलते. तिचा दरवळ चांदण्यानाही धुंद करणारा असतो. चंद्राचा कैफ वाढविणारा असतो. अशा उमलणार्‍या क्षणी मिटायचं नसतं. निद्रेपासून कोसो दूर राहायचं असतं. आजची रात्र मिटण्यासाठी नाही तर फुलण्यासाठी, फुलविण्यासाठी असते. अशा मंतरलेल्या रात्री आशिकीचा माहोल असताना तो झोपी गेला तर कोजागरीच्या चांदण्याला काय बरं सांगायचं, त्याची समजूत तरी कशी घालायची, हा प्रश्न तिच्यासमोर आवासून उभा ठाकतो. तेव्हा सुरेश भट म्हणतात.

सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू?

उमलते अंगांग माझे…. आणि तू मिटलास का रे?

कोजागरी पौर्णिमेला रात्र बहरू लागते. रात्रीला चांदण्याचा दुधी रंग चढतो. जुईची शुभ्रता कोजागरीला लाभते. ती बट मोगऱ्याचा साजशृंगार करून मंद चांदण्याच्या पावलानं येते. रात्र आणखीनच मुलायम होत जाते. जुईच्या पाकळ्या अलगद फुलतात. भोवताली गंध दाटतो. तिच्या शृंगारानं आसमंतही दरवळू लागतो. शारदीय चंद्रकळेनं बहरलेल्या आभाळकडं पाहात दोन बदामी डोळे, दोन आसुसलेल्या नजरा एकमेकांना साठवून ठेवतात. हा सुखद सहवास प्राणात जपतात. प्रेमाचं चांदणं एकमेकांनी तनामनावर शिंपून घेतलं की, जीवनाची कोजागरी झगमगीत होऊन जाते. मग जुईची शुभ्रता अन् कोजागरी यात फारसा फरक नाही उरत. प्रशांत वैद्य लिहितात.

जुईची शुभ्रता ही की तुझी कोजागरी आहे

जणू बट मोगऱ्याने देह हा शृंगारला आहे

पौर्णिमेच्या रात्री अंबराला चांदण्याचे झुपके लगडतात. त्या गच्च ओझ्यानं अंबरच जणू धरतीवर झुकल्याचा भास प्रेमी युगुलांना होत असतो. मुग्ध-स्निग्ध चांदण्याच्या सहवासात चंद्राचं रूप फुलतं. दुधातलं त्याचं प्रतिबिंब आपलसं होऊन जातं. ही सुंदर अनुभूती असते. चांदरात ढळू नये, चांदण्याची शुभ्र वाट मळू नये असंच सतत मनाला वाटत राहतं. अंबरानं असंच रोज बहरून यावं. मनाच्या अंबरात चंद्र खोलवर उतरावा अन् रोजच आपली कोजागरी व्हावी अशीच त्यांची मनोमन कामना असते. रोजच्या कोजागरीचं हेमलता पाटील यांनी केलेलं हे चित्रण.

चांदणे बहरून येते अंबरी

रोज असते आपली कोजागरी

कोजागरी साजरी करण्याच्या तऱ्हाही परिस्थिती अनुरुप वेगवेगळ्या असतात. ज्यांना रोजच्या पिठा-पाण्याची ददात असते. ते कोजागरीला दुधात चंद्र पाहू नाही शकत. त्यांच्या फाटक्या, विटक्या घराला कोजागरी नुसती छळत राहते. कोजागरीचं चांदणं सुद्धा त्याचा एकांत उजळू नाही शकत. मन प्रसन्न नाही करू शकत. कोजागरीला तो भाकरीचा चंद्र धुंडाळत असतो. पण त्याचा चंद्र ढगाआड गेलेला असतो. त्याला पिठापाण्यावरच कोजागरी साजरी करावी लागते. तिकडं तिच्या घरी मात्र धुमधडाक्यात, अमाप उत्साहात दुधावरती कोजागरी साजरी होत असते. चांदण्याची यथेच्छ बरसात होत असते. ही गरिबी अन् श्रीमंतीतील भयानक दरी असते. जशी ज्याची कुवत तशी त्याची कोजागरी साजरी होत असते. या विसंगतीकडं, विषमतेकडं विशाल राजगुरू लक्ष वेधतात.

तशी कोजागरी माझ्या घरीही साजरी होते

दुधावरती तुझी, माझी पिठा-पाण्यावरी होते

घरात लेक असणं ही बापाच्या दृष्टीनं केवढी भाग्याची गोष्ट असते. लेकाच्या तुलनेत लेक अधिक कोमलहृदयी, संवेदनशील, मायाळू असते. अधिक समंजस असते. जीव लावणारी असते. ज्या घरी लेक असते. त्या घरावर आनंदाच्या चांदण्याची बरसात होत राहते. बापालाही लेकीच्या जरा जास्तच लळा लागलेला असतो. ज्याला लेख नसते त्या बापाला विचारावं लेकीचं काय महत्व असतं ते. ज्या घरात गोड हासरी मुलगी असते त्या घरात रोजची हासरी कोजागरी असते. त्यासाठी कोजागरी पौर्णिमेची बापाला वाट पाहावी नाही लागत. हासऱ्या लेकीची तुलना कोजागरीशी करणारा संतोष कांबळे यांचा हा शेर पहा.

हासरी लेक माझ्या घरी दोस्त हो

हासते रोज कोजागरी दोस्तहो

तिची आठवण आली की तो पराकोटीचा व्याकूळ होतो. आठवणी बिनदिक्कतपणे खुलेआम येत असतात. तर कधी चोरपावलांनी. जराही चाहूल न देता येतात. आठवणी येतात मागल्या दिवसांना, घटनांना बरोबर घेऊन. आठवणी रोज सलणाऱ्या विरहाचे काटे तनामनात ठेऊन जातात. आठवणी जशा मन प्रसन्न करणार्‍या असतात तशा घायाळही. आठवणी एकांतात जागतात. त्याच्याशी बोलतात. आठवणी कायमच्या स्मृतिमंजूषेत कोरल्या जातात. विसरू म्हटल्या तरी विसरता नाही येत आठवणी. तिच्या आठवांचा चंद्र बारमाही उगवत असतो. त्याच चंद्राच्या साक्षीनं त्याची रोजच कोजागरी साजरी होत असते. दत्तप्रसाद जोग यांचा शेरही त्याला अपवाद नाही.

आठवांचा चंद्र असतो बारमाही

रोज करतो साजरी कोजागरी!

प्रत्येकाच्या मनात चंद्र असतो. या चंद्राशी त्याचं सख्य असतं. चंद्र हा उजेडाचा, शीतलतेचा प्रतीक असतो. त्याच्यामुळेच तर जीवनवाट उजळून निघते. चंद्र आपल्याला खूप जवळचा वाटतो. चंद्राशी निगडित कितीतरी उपमा आपण प्रियेला देतो. चंद्र नि:स्वार्थ, निर्लोभी असतो. कोजागरीला चंद्राचं रूपडं बघण्यासारखा असतं. त्याची मधुर प्रीत चांदण्यांवर असते परंतु अंधारभरल्या गावाकडं कोजागरी पाठ फिरवून असते. आपल्या गावातही कोजागरी साजरी व्हावी असं त्याला मनोमन वाटत राहतं. तरीही तो कोजागरीपाशी गाऱ्हाणं मांडत नाही. तो आपल्या मनातल्या चंद्रालाच विनवत असतो. चंद्रा तू माझ्या मनात राहतोस, हे वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाही. आमच्या अंधारलेल्या गावात कोजागरीचं चांदणं बरसावं. इथल्या झोपडी झोपडीत चांदणं पोहोचावं. गावातला कानाकोपरा लख्ख उजळून निघावा. उदासलेल्या मनामनात चांदण्याची पेरणी व्हावी. तू तरी कोजागरीला आमच्या गावात चांदणं घेऊन ये अशी साद सिद्धार्थ भगत चंद्राला घालतात.

माझ्या मनीचा चंद्र तू मी काय सांगू वेगळे

अंधार गावी माझिया घेऊन ये कोजागरी!

गझलकारांनी कोजागरीचं चांदणं मनसोक्तपणे लुटलंय्. ज्याच्या वाट्याला जशी कोजागरी आली तसं त्याचं यथार्थ दर्शन त्यांच्या शेरातून घडवलंय्. प्रत्येकाचं चांदणं निरनिराळं आहे. इतकं खरं!

contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...