आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक आठवण:रहस्यमयी वाटेवरील मंतरलेल्या प्रवासाचा अंत

महेश जोशी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुनाथ विष्णू नाईक यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी बुधवारी पुण्यात अखेरचा श्वास घेतला./strong>. चार दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अनिभिक्त लेखन सम्राटाचा अखेरचा प्रवास अत्यंत खडतर गेला. १२ वर्षे ते अंथरूणाला खिळून होते. मेंदूचा पक्षाघात झाल्यानंतर त्यांचे लिखाण थांबले. हातात काम नाही. उत्पन्नाचे साधन नाही. रहायला हक्काचे घर नाही. यामुळे उपचारासोबतच दररोजच्या जगण्यासाठीही पैशांची चणचण निर्माण झाली. ती अखेरपर्यंत कायम राहिली. त्यांच्या जाण्याच्या वृत्ताने एकिकडे हळहळ निर्माण झाली. तर १७ वर्षांपूर्वीचे गुरूनाथ नाईक आठवण रूपात पुन्हा जिवंत झाले.

दिवाळीचा उत्साह शिगेला पोहचला असतांना ज्येष्ठ रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांच्या निधनाची बातमी समजली आणि मन अस्वस्थ झाले. खरंतर गुरूनाथ नाईक आणि चाळीशीत असणाऱ्या आमच्या पिढीचा फारसा संबंध असण्याचे कारण नाही. त्यांनी लिखाण थांबवले त्या काळात खाजगी दूरचित्रवाहिन्यांचा उदय झाला होता. त्यामुळे नाईकांच्या रहस्यकथा वाचण्यापेक्षा त्या टीव्हीवर पाहण्यातच आमची पिढी धन्यता मानत आली. पण गुरुनाथ नाईक हे काय व्यक्तिमत्त्व आहे, हे त्यांच्यासोबत काही काळ घालवल्यानंतर लक्षात आले. शब्द, प्रसंग आणि अजोड कल्पनांना घेवून रहस्यकथा घडवणारा तो अनोखा जादूगार होता. त्यांच्या लिखानाचा प्रवासही कमी रहस्यमयी नव्हता.

गुरुनाथ विष्णू नाईक यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी बुधवारी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. चार दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अनिभिक्त लेखन सम्राटाचा अखेरचा प्रवास अत्यंत खडतर गेला. १२ वर्षे ते अंथरूणाला खिळून होते. मेंदूचा पक्षाघात झाल्यानंतर त्यांचे लिखाण थांबले. हातात काम नाही. उत्पन्नाचे साधन नाही. रहायला हक्काचे घर नाही. यामुळे उपचारासोबतच दररोजच्या जगण्यासाठीही पैशांची चणचण निर्माण झाली. ती अखेरपर्यंत कायम राहिली. त्यांच्या जाण्याच्या वृत्ताने एकिकडे हळहळ निर्माण झाली. तर १७ वर्षांपूर्वीचे गुरूनाथ नाईक आठवण रूपात पुन्हा जिवंत झाले.

२००७ चा हा प्रसंग. बीडमधून नव्यानेच सुरू झालेल्या "लोकाशा' या दैनिकात मी रूजू झालो. ज्येष्ठ पत्रकार आणि विद्यमान माहिती आयुक्त दिलीप धारूरकर आमचे संपादक तर गुरुनाथ नाईक समन्वय संपादक होते. गुरुनाथ नाईक यांचे नाव ऐकून होतो. पण त्यामागील वलयाची कल्पना नव्हती. दररोज त्यांचे नाव घेऊन किमान पाच-सहा लोकं भेटायला यायचे, त्यावेळी एवढ्या मोठ्या माणसाच्या हाताखाली काम करायचे आहे हे लक्षात आले. यामुळे चांगलेच दडपणही आले होते. ते आठवडाभर सुटीवर होते. एक दिवस सकाळच्या बैठकीत ते हजर झाले आणि काही क्षणातच त्यांच्याबद्दलची भिती दूर झाली. त्यावेळी सत्तरी गाठलेल्या नाईक यांनी अगदी उत्साहात माझे स्वागत केले आणि आता कामाला मजा येईल, असे म्हणाले. आमच्यातील अनोळखीपणा त्याच बैठकीत संपला. नंतर नेहमीच्या प्रघाताप्रमाणे बैठक संपल्यावर त्यांनी माझ्यासह सर्व सहकाऱ्यांना टपरीवर चहा-भजेच्या पार्टीसाठी नेले. त्यांनी गोल्डफ्लेक शिलगावली आणि गप्पांचा फड सुरू झाला. प्रत्येक वाक्य, प्रत्येक कृतीतून त्यांचा मोठेपणा समोर येत गेला. गुरुनाथ नाईक यांच्या त्या सुमारास १०७० कादंबऱ्या लिहून झाल्या होत्या. हा रहस्यकथा लिखानाचा विक्रमाच्या वाटेवरील प्रवास होता.

‘हे बघ मी काही विक्रम वगैरे करण्यासाठी लिहिले नाही. जे आवडले, जे मनाला पटले ते लिहीत गेलो आणि वाचकांनी त्यास डोक्यावर घेतले. हे विक्रमी लिखाण ठरेल, असे कधीच वाटले नव्हते,’ नाईक सर सांगू लागायचे. रहस्यकथा लिखाणाचा ४० वर्षांचा काळ त्यांना अगदी तोंडपाठ होता. अगदी कालपरवा घडल्याप्रमाणे ते बोलत होते. मूळ पत्रकार असणारे नाईक यांची पुण्यात नेहमीच ये-जा सुरू असायची. एकदा सदानंद प्रकाशनचे खाडीलकर त्यांना भेटले आणि दोन रहस्यकथा लिहून देण्याची मागणी केली. त्यांचे इतर विषयांवर लिखाण सुरू होते. पण रहस्यकथा हा नवीन प्रांत होता. नाईक सहजच हो म्हणाले. हो म्हंटलय तर लिहावे लागणार, या विचाराने कामाला लागले. नेमका त्या वेळी अलका टॉकीजमध्ये ‘किस द गर्ल्स अँड मेक देम डाय’ हा इंगजी रहस्यपट लागला होता. कथा लिहिण्याचा विचार घेऊन ते अलकात बसले. पण चित्रपट अर्धवट सोडून लॉजवर पोहोचले आणि रात्री दोन वाजेपर्यंत जागून ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन’ ही पहिली रहस्यकथा लिहून टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळ ते संध्याकाळच्या बैठकीत ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ ही दुसरी रहस्यकथा हातावेगळी केली. दोन्ही कथा खाडिलकरांकडे सोपवून ते घरी बेळगावला रवाना झाले. आठवडाभरात खाडिलकरांचे पत्र आले. ‘गजाननाच्या कृपेने तुमच्या दोन्ही कथा कादंबरीरूपात छापत आहोत. कृपया निघून यावे.’

येथून सुरू झालेला रहस्यकथांचा प्रवास १२ वर्षे अगदी मंतरल्यागत सुरू होता. या काळात प्रसिद्ध रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकरांनी लिखाण पूर्णपणे थांबवल्यामुळे नाईकांच्या कादंबऱ्यांना चांगलीच मागणी वाढली. महिन्याकाठी ते १००-१२५ पानांच्या सात-आठ कादंबऱ्या हातावेगळ्या करायचे. प्रत्येक कादंबरीच्या पाच-सहा हजार प्रती विकल्या जायच्या. १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबऱ्या होत्या. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कादंबऱ्या लिहिल्या. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांच्या कथेतील पात्रे एवढी प्रभावीपणे मांडली होती, की वाचकांना ती खरोखरची वाटू लागली होती.

गप्पांच्या ओघात एव्हाना चहाचा कप आणि भज्यांची प्लेट रिकामी व्हायची. दोन-तीन सिगारेटींची राख झालेली असायची. भोवताली ‘गुरुनाथ’ परंपरेतील चार-पाच भक्त गोळा झालेले असत. पण इतिहासात शिरलेले नाईक त्यातून बाहेर पडण्याच्या मूडमध्ये नसायचे. ऑर्डर रिपीट करून बोलणे सुरू ठेवत ते सांगायचे, १२ वर्षे कादंबऱ्या लिहिण्याचा प्रचंड ताण आला. सतत विचारात मग्न राहावे लागायचे. रात्री अचानक झोपेतून दचकून जागा होत असे. वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागायची. या तणावामुळे ऐन फार्मात असतांनाही १९८२ मध्ये रहस्यकथांचे लिखाण थांबवण्याचा निर्णय घेतला. याचा वाचकांना मोठा धक्का बसला. पण एक फायदा झाला. यशाच्या शिखरावर असताना लिखाण बंद केल्यामुळे ही जागा रिक्तच राहिली. या काळात ७२४ रहस्यकथा त्यांच्या नावावर जमा झाल्या. अजूनही कोणीच या संख्येच्या जवळ पोहोचलेले नाही.

रहस्यकथाकार अशी त्यांची ओळख असली तरी रहस्यकथा लिहिण्यापूर्वी १९५७ ते १९६३ या काळात त्यांचे हेमचंद्र साखळकर आणि नाईक या टोपण नावांनी विविध विषयांवर लिखाण सुरु होते. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगितिका तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या. प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक किर्ती मिळविणारे मनोहर माळगावकर हे नाईक यांच्या वडिलांचे -विष्णू नाईक- यांचे जवळचे मित्र. माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच नाईक यांच्या मनात लिखाणाचे बीज रूजले.

गुरूनाथ नाईक हे मूळ गोव्याचे. गोमंतकातील सत्तरीजवळ आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा कॅ. दादा राणे यांनी १९०१ मध्ये पोर्तुगीजांविरूद्ध बंड पुकारले होते. १९०३ मध्ये त्यांना अटक हाेवून २८ वर्षांची शिक्षा झाली. यावेळी गुरुनाथ यांच्या आजी गरोदर होत्या. पोर्तुगिजांचा ससेमिरा चुकवित त्या साखळीत आल्या आणि नाईक नाव धारण केले. १९४० मध्ये त्यांच्या वडिलांकडे शस्त्रास्त्रे सापडल्याने नाईक कुटुंबीय गोवा सोडून बेळगाव जिल्हातील लोंढा येथे आले. लोंढ्यात प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी उच्चशिक्षणासाठी बेळगाव गाठले.

बेळगावात बाबूराव ठाकूर यांच्या ‘तरुण भारत’मध्ये कंपोजिंग, मुद्रितशोधन ते वार्तांकन अशी सर्व प्रकारची कामे केली. १९५६ मध्ये पुण्यात ‘सकाळ’मध्ये कामाला लागले. नंतर साप्ताहिक स्वराज्य, पुणे तरुण भारत, मनमाडमध्ये दैनिक गावकरी, औरंगाबादेत दैनिक अजिंठा, जालना येथे दुनियादारी, गोव्यात दैनिक गोमंतक, नवप्रभा अशा विविध दैनिकांत कामे केली. १९७० मध्ये कादंबऱ्यांसाठी नोकरी सोडून स्वत:ची शिलेदार प्रकाशन संस्था सुरू केली. नंतर स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आग्रहावरून लातुर येथे दैनिक एकमतच्या संपादकपदाची १२ वर्षे धुरा सांभाळली. "लोकाशा' त्यांचे अखेरचे वृत्तपत्र ठरले. यानंतरही गुरूनाथ नाईक सातत्याने संपर्क असायचा होते. ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याशी नियमीत बोलणे व्हायचे.

रहस्यकथा थांबवल्यानंतर नाईक यांनी चालू घडामोडींची कल्पनेशी सांगड घालून कथा लिहिल्या. युद्धशास्त्राचे जनक छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराजांवरील नरकेसरी, कृष्णाचा नातू अनिरूद्ध आणि मेसोपोटामीयाच्या राजाची मुलगी उषा यांचे नाते सांगणाऱ्या अनिरूद्ध उषा या कादंबऱ्यांनतर त्यांनी पूर्णपणे लिखाण थांबवले. अखेरचे बोलणे झाले त्यावेळी त्यांना आत्मचरित्र लिहायचे होते. पण प्रकृती साथ देत नव्हती. काहीही करा पण आत्मचरित्र लिहाच, असे म्हंटल्यावर नाईक सांगायचे, एवढे लिहिले की आता पुस्तकाची नावे, प्रकाशनाचे वर्षही आठवत नाहीत. अनेक पुस्तके आऊट ऑफ प्रिंट आहेत. त्याची एक प्रतही उपलब्ध नाही. मिळतील त्या पुस्तकांची जुळवाजुळव करून २०१४ मध्ये त्यांनी १२०८ कादंबऱ्यांसह लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव मिळवले. गिनीज बुकातही नाव नोंदवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आत्मचरित्र लिहिण्याचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.

एवढ्या कादंबऱ्या लिहूनही नाईक यांचा खिसा कायमच रिकामा राहिला. वाचकांनी भरपूर मान दिला, मात्र धनासाठी संघर्षच करावा लागला. आयुष्याच्या अखेरपर्यंत हक्काच्या घराचे स्वप्नही अपूर्णच राहिले. लोकाशातील नोकरीनंतर त्यांनी लातूरला मुक्काम हलवला. मणक्याचा त्रास वाढला. मेंदूला रक्तपुरवठ्याची तक्रार जाणवू लागली. दोनदा शस्त्रक्रिया झाली, पण फार फरक पडला नाही. ही माहिती गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यापर्यंत पोहचली. पर्रीकर यांनी त्यांना पणजीत सरकारी वसाहतीत दोन वर्षांसाठी एक घर उपलब्ध करून दिले. येथे सहा वर्षे राहिल्यावर घर सोडावे लागले. २०१९ मध्ये काही काळ वसईत राहिले. मार्च २०२० मध्ये त्यांच्या रक्तवाहिनी फुगल्याने उपचारासाठी मुंबईत केईएम रुग्णालयात दाखल करावे लागले. नंतर ते मुलाकडे पुण्यात रहायला गेले. येथेच ३ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांनी अंतीम श्वास घेतला.

त्यांच्या पत्नी गीता नाईक म्हणतात, गुरूनाथ यांनी आयुष्यभर साहित्य सेवा केली. पत्रकारितेत झोकून दिले. त्यांच्या साहित्यावर प्रकाशकांनी रग्गड कमाई केली. पण गुरूनाथ यांची झोळी रितीच राहिली. अखेरपर्यंत स्वत:चे घर नाही करू शकले. महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने त्यांना कायमस्वरूपी घर द्यायला हवे होते.

आणि हे खरंच आहे. गोमंतकाच्या सुपुत्राने उभ्या महाराष्ट्रात केलेली साहित्य आणि माध्यमसेवा दोन्ही राज्याच्या सरकारकडून दुर्लक्षित राहिली. साहित्य परिषदा, साहित्य मंडळ, साहित्य संघ, पत्रकार संघ अशा कोणीही त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचे औदार्य दाखवले नाही. मात्र, गुरुनाथ यांना याची खंत नव्हती. कोणी दखल घेवो किंवा नाही, मायबाप वाचक आपल्या कादंबऱ्यांची दखल घेतात, त्यांची वाट बघतात, हे त्यांना नोबेलपेक्षा मोठे वाटायचे. ताठर बाणा आणि स्वाभीमान जपत ते कधीच कोणाच्या व्यासपीठाची, हारतुऱ्याची वाट बघत बसले नाहीत. कोणाला शरणही गेले नाहीत. चार दशके त्यांचा मंतरलेल्या वाटेवरील रहस्यमयी प्रवास सुरूच राहिला. आता ताे थांबल्याने "गुरूनाथ' परंपरेतील रहस्यकथांच्या लिखाणावर काळाचा पडदा पडला आहे.

mahitri@gmail.com

बातम्या आणखी आहेत...