आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचाल तर वाचाल...:मालेगावचा नवा "वाचनीय' पॅटर्न

शंकर बी.वाघएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगावात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ऊर्दू भाषा विकास परिषदेने घेतलेल्या आठ दिवसांच्या ऑल इंडिया उर्दू किताब मेळ्यात सुमारे एक कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाल्याने या शहराची असलेली वाचनाची भूक अधोरेखित तर झालीच परंतु शैक्षणिक मागास समजल्या जाणाऱ्या मालेगावकरांच्या या पुस्तक खरेदीकडे राज्याचे लक्ष देखील वेधले गेले. मुळात उर्दू पुस्तकांचे प्रदर्शन असतांना यात हिंदू संस्कृतीच्या रामायण, महाभारत, वेद यासारख्या पौराणिक, धार्मिक साहित्याची मागणी झाली ही या पुस्तक मेळ्याची चर्चित घटना ठरली हे विशेष!

प्रत्येक शहराची एक विशिष्ट प्रतिमा जनमानसात ठसलेली असते. सकारात्मक असो वा नकारात्मक, त्या पलीकडे जाऊन शहराकडे क्वचित बघितले जाते. एखाद्या आउटसायडर माणसासमोर मालेगावचं नाव उच्चारलं, की त्याच्या भुवया उंचवतात. बॉम्बस्फोट आणि दंगल डोळ्यासमोर येते. त्यापाठोपाठ तिथला कपडा उद्योग आणि पावरलूम. चित्रपटप्रेमी असाल तर काहींना तिथली spoof फिल्म इंडस्ट्री म्हणजेच मॉलिवूड आठवते. आता तर या श्रमजीवी शहराची पुस्तकप्रेमी ही नव्याने ओळख ठरू पाहात आहे आणि त्याला कारण ठरले आहे गेल्याच आठवड्यात येथे झालेली तब्बल एक कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री... मालेगावात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ऊर्दू भाषा विकास परिषदेने घेतलेल्या आठ दिवसांच्या ऑल इंडिया उर्दू किताब मेळ्यात सुमारे एक कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाल्याने या शहराची असलेली वाचनाची भूक अधोरेखित तर झालीच परंतु शैक्षणिक मागास समजल्या जाणाऱ्या मालेगावकरांच्या या पुस्तक खरेदीकडे राज्याचे लक्ष देखील वेधले गेले. मुळात उर्दू पुस्तकांचे प्रदर्शन असतांना यात हिंदू संस्कृतीच्या रामायण, महाभारत, वेद यासारख्या पौराणिक, धार्मिक साहित्याची मागणी झाली आणि वाचकांची गरज म्हणून पुस्तक विक्रेत्यांनी हे ग्रंथ उपलब्ध करून दिले, ही या पुस्तक मेळ्याची चर्चित घटना ठरली हे विशेष! मालेगावात पहिले उर्दू पुस्तक प्रदर्शन हे जिल्हा उर्दू पत्रकार संघ व मालेगाव उर्दू मीडिया सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २०१७ मध्ये भरविण्यात आले होते. त्यावेळी ४० स्टॉल लावण्यात आले होते.उर्दू पुस्तक प्रदर्शन असले तरी त्यात हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेतील देखील देशभरातील विविध प्रकाशनांची पुस्तके होती. त्या पाच दिवसांच्या प्रदर्शनात त्यावेळी ८० लाख रुपयांची पुस्तके विकली गेली होती. फक्त मराठीची ओळख करून देणाऱ्या दहा हजार पुस्तकांची विक्री झाली होती. या नंतर आता १८ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ऊर्दू भाषा विकास परिषदेने आयोजित केलेला आठ दिवसांच्या ऑल इंडिया उर्दू किताब मेळा हे मालेगावतील दुसरे उर्दू पुस्तक प्रदर्शन. या प्रदर्शनात १३७ प्रकाशन संस्थांचा सहभाग व वीस हजार विषयांवरच्या पुस्तकांची मांदियाळी पाहायला मिळाली. देशभरातील प्रकाशन संस्थांचे १६४ स्टॉल लागले होते. हा पुस्तक मेळा म्हणजे निव्वळ पुस्तक प्रदर्शन नव्हते तर एक शानदार आकर्षक पुस्तक नगरीच होती.राष्ट्रीय ऊर्दू विकास परिषदेचा हा ऑल इंडिया २४ वा मेळा होता. सुटसुटीत स्टॉल, सुंदर हिरव्या पायदानचे कृत्रिम रस्ते, दरम्यान छोटे चौक व सेल्फी पॉईंट हे या पुस्तक नगरीचे आकर्षण होते. मालेगावकरांसाठी हे नावीन्य होतेच, मात्र लाखो पुस्तके देखील वाचकांना आकर्षित करतील, अशी अपेक्षा आयोजकांना होती. प्रदर्शनाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग भेट देणे स्वाभाविक होते मात्र मोठ्या संख्येने महिला व तरुणींनी प्रदर्शनाला भेट दिली. पुस्तके पाहिली, पुस्तके चाळली व विकत देखील घेतली. प्रदर्शनाच्या आठ दिवसांच्या कालावधीत सुमारे साठ हजारावर पुस्तकांची विक्री झाली, ती रक्कम एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. याच पद्धतीने उर्दू भाषेतील कथा, व्यक्तिरेखा, खाद्यपदार्थ मेनू, धार्मिक, वैचारिक, आत्मकथा, शेरो शायरी,इतिहास, जीवन चरित्र, मेहंदी कला या विषयावरील पुस्तकांची सर्वाधिक विक्री झाली. राज्यभरातील उर्दू साहित्य प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली. एसटी बसेस बंद असल्याने व कोरोना संक्रमण प्रतिबंधक नियमांमुळे प्रदर्शनाला मर्यादा पडलेल्या असल्या तरी औरंगाबाद, जालना, परभणी, जळगाव, नांदेड, धुळे, अहमदनगर, मुंब्रा, भिवंडी, पुणे या शहरातील पुस्तक प्रेमी व लेखकांनी भेट दिली. मालेगावचे साहित्यिक महत्व वाढवणारा हा मैलाचा दगड ठरला पाहिजे. मालेगाव मुस्लिम बहुल शहर आहे, त्यामुळे मदरशांना जितके महत्व दिले जाते, तितके महत्व शिक्षणाला दिले जात नाही, अशीच येथील ओळख सांगितली जाते. मात्र शहरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण व तरुणी, सुशिक्षित महिला यांना काय हवंय याचा शोध कधीच घेतला गेला नाही. शहरात उर्दू साहित्य संस्कृती रुजलेली असली तरी ती विशिष्ट साहित्यिकांपुरतीच. जगाच्या पाठीवर काय घडामोडी सुरू आहेत, त्या विविध वाहिन्यांच्या माध्यमातून कळतील तेव्हढ्याच. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण देखील बोर्ड व विद्यापीठांनी ठरवून दिलेले तितकेच. उर्दू शिक्षणाला प्रोत्साहन दिले जात असले तरी त्याची राष्ट्रीय पातळीवरील उपयोगिता कधीच तपासून पहिली जात नाही. असे अनेक प्रश्न उर्दू किताब मेळा मधून समोर आले आहेत. मुळात अशा पद्धतीचा उपक्रम साहित्यिक किंवा शैक्षणिक संस्थांकडून राबविला जाणे अपेक्षित आहे. परंतु तसे कधी झाले नाही. कोणीच शहराची बौद्धिक गरज लक्षात घेत नाही. म्हणून कधी उर्दू पत्रकार किंवा केंद्र शासनाच्या संस्थेकडून असा उपक्रम राबवला जातो तेंव्हा एकूणच सुधारणावाद्यांच्या अब्रूची लक्तरे टांगली जातात. उर्दू किताब मेळ्याला महिला, तरुणी, शालेय विद्यार्थी यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यातही महिला व तरुणींची संख्या सर्वाधिक पाहायला मिळाली. हा प्रतिसाद काय दर्शवितो? या घटकांची बौद्धिक भूक कोणाच्याच कधी का लक्षात आली नाही? शहरात पुढाऱ्यांनी सत्तेच्या संघर्षाच राजकारण करायचं. समाजधुरीणांनी फक्त परंपरा शिकवायच्या अन् जुनाट विचारसरणीच्या जोखडात महिला व तरुणांना बांधण्याचा प्रयत्न करायचा. यातून संघर्ष उभा राहिला तरी तो परंपरेच्या नावाने निपटून काढायचा हेच वर्षानुवर्षं सुरू आहे, हाच अलिखित अजेंडा ठरलेला.मात्र या पलीकडे शहराची गरज स्पष्ट करणारा उपक्रम ठरला तो 'उर्दू किताब मेळा'. ज्ञानाची जिज्ञासा शमवणारी दारेच कधी उघडली गेली नसतील त्या शहरातील महिला वर्ग व ज्ञानपिपासुंच्या झालेल्या मुस्कटदाबीचा हा स्फोट समजायचा का असा प्रश्न धाडसी आहे. प्रदर्शनात रीड अँड लीड फाऊँडेशन औरंगाबादद्वारा "मिशन मरयम मिर्जा मोहल्ला लायब्ररी' तर्फे कोणतीही दोन पुस्तके वाचा, त्यावर अभिप्राय लिहा व बक्षीस मिळावा हे अभियान राबविण्यात आले. विद्यार्थी व नागरिकांना पुस्तकांच्याप्रती रुचि निर्माण व्हावी या उद्देशाने ही मोहिम राबविण्यात आली. सुमारे पाचशे वाचकांनी यासाठी फॉर्म नेले आहेत. औरंगाबादच्या रीड अन्ड लीड फाऊँडेशन या संस्थेचे अध्यक्ष मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांची ही संकल्पना होती. मिर्जा अब्दुल हे व्यावसायिक असले तरी त्या पलीकडे वाचकांचे मित्र व पुस्तकप्रेमी आहेत. प्रदर्शनात अनेक स्टॉलवर हिंदू धार्मिक मात्र उर्दू भाषांतरित ग्रंथांची चौकशी केली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी या जिज्ञासू वाचकांची मागणी विचारात घेऊन तातडीने औरंगाबादहून भगवतगीता, तुलसी रामायण, महाभारत, शिव विष्णुपुराण या ग्रंथाचे उर्दू भाषांतरित संच मागवले. असे १५ संच विकले गेले. या विषयी मिर्जा अब्दुल कय्युम नदवी म्हणाले, प्रदर्शनात लोक रामायण, महाभारत, भगवतगीता, सुखसागर, वेद, उपन्यास यांची विचारणा करतांना दिसले. मालेगावतील उर्दू पुस्तक मेळा अाणि त्यात हिंदू धार्मिक भाषांतरित पुस्तकांची मागणी हे आश्चर्य होते. या वेळी काही नागरिकांनी ही पुस्तके का आणली म्हणून विचारणा देखील केली, मात्र समजावून सांगितल्यानंतर त्यांना ते समजले.औरंगाबादला २५ शाळांमध्ये रामायण, महाभारत या ग्रंथाचे उर्दू भाषांतरित संच दिले आहेत. अनेक उर्दू वाचकांना हेच माहीत नाही की हे ग्रंथ उर्दूत देखील आहेत.ज्यांना या साहित्याची माहिती मिळते, ते आता विकत घेत आहेत. मिर्जा वर्ल्ड बुक हाऊस मधून अशा २५ संचची विक्री झाली आहे.औरंगाबादच्या इंग्रजी, मराठी शाळांमध्ये कुराण ग्रंथांच्या प्रति द्यायच्या व उर्दू, मदरसा तसेच शाळांमध्ये रामायण, महाभारत भाषांतरित ग्रंथ मुलांना वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यायचे हा उपक्रम राबवला गेला आहे. कोहिनूर कॉलेजचे मजहर पठाण यांनी ३० संच घेतले व शाळांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. परस्पर धार्मिक संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी आता भाषेची अडचण राहिलेली नाही. शासनाने ग्रंथालयांना मदत दिली तर या ग्रंथाची विक्री अधिक वाढेल, असेही मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांनी सांगितले. -------------- shankar.wagh@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...