आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण:नवे शिक्षणसम्राट...

नेहा राणे / हर्षाली घुले7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाचे खासगीकरण झाले तसे विद्यार्थी ग्राहक बनले पण आता त्यापुढे जाऊन ed tech या क्षेत्रावर मक्तेदारी प्रस्तापित करीत आहेत. त्यामुळे एकेकाळी मूल्य, समावेशीकरण, सार्वत्रिकीकरण या उदात्त हेतूने, शिक्षण महर्षींच्या अव्याहत साधनेने सुरु झालेल्या शाळांना समांतर अशी शैक्षणिक तंत्रज्ञानाचीअतिभव्य व्यवस्था उभी राहते आहे.

करोनानंतरच्या जगाचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाची वाढलेली गरज आणि पसारा. सर्वच क्षेत्रात त्याची कमी वेळात विक्रमी गरज आणि पोहोच निर्माण झाली. त्याचा सर्वाधिक मोठा बदल किंवा प्रभाव हा शिक्षण क्षेत्रावर पडला. तसे शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या दशकापासून डिजिटल तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. जगभरातील ज्ञान नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशिष्ट प्रदेश आणि भाषा यांची मक्तेदारी सोडून प्रवाहित व्हायला लागले होते. जगभरातील आणि भारतातील नामवंत विद्यापीठांनी त्यांचे ऑनलाईन कोर्सेस सुरु केले होते. अगदी दूरस्थ शिक्षणाचे नवे प्रयोग घडत होते. पण करोनामुळे सर्व स्तरावरील शिक्षण डिजिटल माध्यमातून देणे अपरिहार्य बनले. अगदी कमी वेळात, इतर पर्याय उपलब्ध नसल्याने शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना हा वेगवान बदल स्वीकारावाच लागला. यामुळे शिक्षण, शिक्षणाची प्रक्रिया, शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण पद्धती कुठलाही अदमास नसताना ढवळून निघाले.

करोनाच्या आधीच भारतात इंटरनेटची स्वस्त उपलब्धता वाढल्यापासून ऑनलाईन कोचिंग देणारे ed tech (शैक्षणिक तंत्रज्ञान) व्यवसाय वाढीस लागले होते. अर्थात शिक्षण माफक दरात, सर्वत्र उपलब्ध करणे या उदात्त हेतूने अनेक ed tech सुरु झाल्या होत्या. त्यात अचानक बदलाशी तात्काळ जुळवून घेत ed tech ने या संधीचा सुयोग्य फायदा उठवत ग्राहक, व्यवसाय आणि पोहोच वाढवली. त्यातही बारावीपर्यंत कोचिंग देणाऱ्या अॅप्लिकेशनने K12 पर्यंतच्या स्टार्ट अपचा व्यावसायिक नफा प्रचंड वाढला. स्वस्त इंटरनेट आणि स्मार्ट फोन यांमुळे लहान-मोठ्या शहरातून जाहिरातीद्वारे वाढलेला प्रसार, शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांच्या करोना काळात शिक्षणाविषयी वाढलेल्या चिंता आणि आपली मुले स्पर्धेत मागे पडू नये या काळजीने अनेक पालकानी हा पर्याय निवडला. परिणामी देशातील ed tech व्यवसायात अनेक पटींनी वाढ झाली. येणाऱ्या काळात म्हणजे २०२२ पर्यंत हा व्यवसाय ६.३ इतक्या पटीने म्हणजेच १.७ बिलियन डॉलर (१७० कोटी) इतका भव्य होणार आहे. तसेच बारावीनंतर ऑनलाईन शिक्षण देणारे उच्चशिक्षण, तांत्रिक कौशल्य, सरकारी परिक्षांची तयारी आणि नोकऱ्यांसाठी तयारी अशा चार विभागात ३.७ पटीने वाढून एकूण १.८ बिलियन डॉलर (१८० कोटी) इतक्या व्यावसायिक उलाढाली होणार आहे.हे आकडे डोळे विस्फारणारे आहे.

कुठलेही तंत्रज्ञान, सुविधा यांची उपयुक्तता ही तीन आधारावर ठरते. एक म्हणजे उपलब्धता, दुसरे म्हणजे मूल्य/खर्च आणि तिसरे म्हणजे पोहोच. डिजिटल शिक्षणाच्या संदर्भात नेमके हे निकष विद्यार्थी ,त्याची सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक पार्श्वभूमी, ठिकाण यानुसार बदलतात. ed tech चे फायदे सांगून त्याचं समर्थन करणाऱ्या व्यक्तींना,तज्ञांना असे वाटते की दृष्टीहीन, विकलांग विद्यार्थ्यांना, ग्रामीण,आदिवासी विद्यार्थ्यांना देखील काही प्रमाणात हे माध्यम फायद्याचे ठरू शकते. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य आहे. तरीही या विद्यार्थ्यांना हे उपलब्ध होण्यापलीकडे परवडणारे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणारे असणार आहे का? शिवाय एकीकडे आधीच्या शिक्षणात भाषा, संस्कृती आणि इतर अडथळ्यामुळे अनेक समाजसेवी संस्था आहे तेच अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण करण्यासाठी झटत असताना, राबत असताना या ed tech मुळे होणारे सरसकटीकरण त्यांना कितपत फायद्याचे ठरेल याचा विचार व्हायला हवा.कारण करोना काळात अनेक दुर्गम भागात, गावात इंटरनेट अभावी, किंवा स्मार्ट फोन उपलब्ध नसल्याने शिक्षणात अडथळे निर्माण झाल्याच्या कितीतरी बातम्या, रिपोर्ट प्रसिद्ध झाले होते.

अलीकडेच बाय्जूस नावाच्या अॅपने ने जवळपास नऊ इतर ऑनलाईन अॅप विकत घेतले. यात white hat jr,tynker सारखे शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक कोडींगसारखे प्रशिक्षण देणारे प्लॅटफॉर्मदेखील आहेत. सध्या देशात चार हजारपेक्षा अधिक ed tech स्टार्ट अप आहेत. रेडसीर आणि ओमिद्यार नेटवर्क यांच्या रिपोर्ट नुसार करोना आपत्तीच्या काळात ed tech वापरकर्त्याच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे, तसेच ८३% इतके पेड युझर सध्या आहे. भारतात २०२० मध्ये २.२. बिलियन डॉलर इतके फंडिंग ed tech ने उभे केले. त्यात एकट्या बाय्जूसचा वाटा १.३५ बिलियन डॉलर इतका आहे. नुकतेच नीती आयोगाने सुद्धा महत्वाकांक्षी जिल्हे या योजनेतील जिल्ह्यात बाय्जूसच्या माध्यमातून २००० विद्यार्थ्याना शिक्षण देण्याचा करार केला. नीती आयोगाने देखील यामागे तंत्रज्ञानाधारित शिक्षण देऊन नवनिर्मितीला चालना देणे हे उद्धिष्ट असल्याचे सांगितले. पण अनेक शाळेतील काहीच निवडक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे मग इतरांचे काय? म्हणजे टार्गेट हे व्यापक नाही निवडक आहे, जे आपल्या शिक्षणाच्या हक्क आणि आजवरच्या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या ध्येयाच्या विरुद्ध आहे. आणि हा सर्वात मोठा विरोधाभास सध्या शासकीय धोरणात सातत्याने दिसून येतोय. जो मुळात पोहोच, समानता आणि दर्जा यांना दुय्यम मानतो. अर्थात नवीन शिक्षण धोरणात देखील याला पूरक आणि प्रोत्साहित करणाऱ्या तरतुदी आहेत. ज्यात chalk आणि talk च्या पुढे जायचं अशी भाषा आहे पण याचा फायदा कुणाला, कोणत्या घटकांना आणि किती प्रमाणात हे मात्र स्पष्ट नाही.

शिक्षणाचे खासगीकरण झाले तसे विद्यार्थी ग्राहक बनले पण आता त्यापुढे जाऊन ed tech या क्षेत्रावर मक्तेदारी प्रस्तापित करीत आहेत. त्यामुळे एकेकाळी मूल्य, समावेशीकरण, सार्वत्रिकीकरण या उदात्त हेतूने, शिक्षण महर्षींच्या अव्याहत साधनेने सुरु झालेल्या शाळांना समांतर अशी ed tech चीअतिभव्य व्यवस्था उभी राहते आहे. यामुळे शाळाबाह्य कोचिंग, खासगी कोचिंग क्लास यांचा आजवरचा वाद संपुष्टात येऊन त्याला आता मान्यता मिळाली आहे . निरीक्षण, प्रयोग, अनुभव, चिकित्सा हे शिक्षणप्रक्रियेतील महत्वाचे घटक आहेत याचा विसर पडला आहे. अनुभावाधारित शिक्षण वैगेरेच्या व्याख्या स्क्रीन इतक्याच संकुचित झाल्या आहेत. विज्ञानाचे प्रयोग, क्रीडा, कला आणि कौशल्य आत्मसात करण्याच्या प्रक्रियेलाही स्क्रीन पुरते बंदिस्त केले गेले. प्रत्यक्ष शिक्षणातून सामाजिकीकरण,सामाजिक आंतरक्रिया, अननुभूती, सहानुभूती यांचा विकास होत असतो. त्या दररोजच्या प्रक्रियेतून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकसित होत असते. पण केवळ मार्केटसाठी कौशल्य हा एकच अजेंडा असणारी ed tech व्यवस्था मूल्याधारित,अनुभावाधारित शिक्षणाची जागा कधीच घेऊ शकणार नाही हे वास्तव आहे. आपल्या शाळा म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक शिक्षण प्रक्रियेचा राबवतात. पण तंत्रज्ञान,अनिमेशन यांचा वापर करून बनवलेले आकर्षित व्हिडीओ माहिती, संकल्पना नाविन्यपूर्ण मार्गाने समजावतील शिक्षक, शाळा आणि सहध्ययन यांची जागा घेऊ शकणार नाही. कारण ed tech ने शिक्षण प्रक्रियेला एक प्रॉडक्ट बनवून टाकल आहे. थोडक्यात ed tech ने भविष्यातील पिढ्यांना मार्केटसाठी तयार करण्याचे मार्केट उभ केले आहे. .

आता सरकार स्वत:ची जबाबदारी ढकलून ती अशा घटकावर सोपवते आहे ज्याला अजून सर्व सामाजिक पातळीवर स्वीकारलेले नाही. आणि त्याचा आवाका सुद्धा तितका नाही. यावर्षी शिक्षण क्षेत्रासाठी बजेटमध्ये ६ टक्क्यांची तरतूद केली आहे. ते गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी बजेट आहे. एकूण ६००० कोटींची तरतूद कपात करण्यात आली आहे ज्यात ५००० कोटी तरतूद कपात शालेय शिक्षणाची आणि १००० कोटी उच्च शिक्षणातील आहे. समग्र शिक्षा अभियानावर अर्थखात्याने ३१०५० कोटीची तरतूद वर्ष २०२१-२०२२ साठी केली होती पण मागील वर्षी म्हणजेच २०२०-२०२१ मध्ये ती ३८,७५० इतकी होती. तर सरकारने Higher Education Funding Agency (HEFA) या संस्थेला २१०० कोटीं वरून या वर्षी फक्त केवळ १ करोड रुपये इतकी नाममात्र तरतूद मान्यता दिली आहे. एकीकडे सरकारी बजेट कमी होत आहे परंतु यामुळे ed tech व्यवसाय गुंतवणूक मात्र वाढली आहे. पण पहिल्या पिढीतले शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आहे ज्यांना आजही शाळा आणि शिक्षक या व्यवस्थेचीच गरज आहे. शिवाय ed tech कडून शिक्षणातील आशयाचे सरसकटीकरण होणार तेव्हा या वंचित,दुर्गम घटकांचा विचार त्यात नसेल. तसेच विद्यमान व्यवस्थेसह त्यातील अंतर्भूत सर्वच घटकांच्या गुणवत्ता, दर्जा याविषयी साशंकता निर्माण करून ती मोडकळीस आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न यातून होतील. त्यातून खासगीकरणापलीकडे जाऊन अनुदान, शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्ती सुद्धा नष्ट होतील. म्हणजे केवळ भांडवल आधारित शिक्षणव्यवस्था उरेल. जी खर्चिक असेल आणि त्यातून शैक्षणिक दरी वाढत जाईल. शिक्षणावर खर्च वाढतोय, तो परवडणारा वर्ग ते घेईल म्हणजेच असमान शिक्षणातून विषम समजाची निर्मिती आणखी तीव्र होईल..

शिक्षण ही प्रक्रिया आहे पण ते आता विकले जाणारे प्रॉडक्ट बनलंय. जेव्हा आपण edu tech म्हणतोय तेव्हा शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचा सहसंबंध पडताळून बघण्याची गरज आहे. कारण’ तंत्रज्ञान वरचढ होताना शिक्षण मात्र दुय्यम होतंय. गुणवत्ता ,आशय किंवा त्यात असणारी मूल्य यांच्या दर्जाचे परीक्षण करण गरजेच आहे. शिवाय सरकारसह शिक्षण प्रक्रियेचे जे सर्व भागधारक आहे त्यांच्याकडून या विस्तारणाऱ्या मार्केटचे नियमन आणि नियत्रण करणे हे समताधिष्टीत आणि न्याय्य शिक्षणासाठी गरजेचे आहे. ज्याद्वारे शिक्षणहक्काच्या मौलिक तात्विक चौकटीची जाणीव कायम राहील.

nrane1507@gmail.com / ghuleharshali@gmail.com

बातम्या आणखी आहेत...