आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनव:उत्तम लेखक बनण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी “शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती'

नीतीन रिंढे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेने मराठीतील युवा लेखक-लेखिकांसाठी ‘शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती’ ही योजना जाहीर केली आहे. कादंबरी, नाटक, चरित्र, विज्ञानसाहित्य व इतर ललितेतर विषय यांपैकी कोणत्याही एका प्रकारात पुस्तक लिहिण्यासाठी किंवा देशीविदेशी भाषेतून मराठीत पुस्तक भाषांतरित करण्यासाठी ही पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे. दरवर्षी पस्तीस वर्षांखालील दहा लेखक यासाठी निवडले जातील व त्यात लेखक व लेखिका यांना समान प्रमाणात संधी दिली जाईल.

थोर लेखकांभोवती जी अनेक ‘वलयं’ असतात, त्यांपैकी एक वलय असतं, प्रतिभेचं. लेखकाला जन्मतःच प्रतिभाशक्ती लाभलेली असते आणि अशी प्रतिभाशक्ती असलेला लेखकच दर्जेदार साहित्यनिर्मिती करू शकतो अशी आपल्याकडे सर्वसाधारण समजूत आहे. काही अंशी हे खरेही आहे. उत्तम लेखन करण्यासाठी लेखकाला लेखनाविषयीची कल्पना सुचावी लागते; या कल्पनाबीजातून कथानक, घटना-प्रसंग यांचा विस्तार सुचावा लागतो. हे सुचणं लेखकाच्या अंगी असलेल्या प्रतिभेवर अवलंबून असतं असं म्हणू. पण केवळ एवढ्याच भांडवलावर चांगला, दर्जेदार लेखक होणं शक्य नसतं. त्यासाठी लेखकाकडे जीवनाकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी असावी लागते, त्याचा स्वभाव चिंतनशील असावा लागतो, आणि त्याचं वाचन, निरीक्षण सखोल असावं लागतं. अनुभवाला चिंतनाच्या पातळीवर नेऊन त्याला अनुरुप अशा भाषेच्या कोंदणात बसवावं लागतं. हे सगळं साधण्यासाठी लेखकापाशी केवळ प्रतिभाशक्ती असणं पुरेसं नसतं. लेखकाने खूप वाचलेलं असावं आणि खूप जग पाहिलेलं, अनुभवलेलं असावं असं म्हटलं जातं. त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन ठरण्यास त्यामुळे मदत होते. शिवाय त्याचं भाषेच्या वापराविषयीचं भानही जागृत असावं लागतं. रोजच्या व्यवहारातलीच भाषा लेखक साहित्यनिर्मितीसाठी वापरत असतो. पण साहित्यात तिचा पोत, स्वर बदलतो. एरवीची परिचित भाषाच नवी, ताजी, अनोखी बनते. त्या भाषेमुळे लेखकाच्या लेखनाची परिणामकारकता वाढते.

चांगला लेखक हे सगळं कुठून मिळवतो? त्याच्या अंगी जन्मतःच या सगळ्या शक्ती असतात असं म्हणता येणार नाही. या शक्ती म्हणा वा गुण, आत्मसात करण्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागतात, अभ्यास करावा लागतो. लेखकाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच त्याला यासंदर्भात योग्य दिशा मिळाली, तर त्याचा लेखन-प्रवास पुढे वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो. मोठा लेखक व्हायचे असेल तर आपल्या अंगी लेखक होण्यास आवश्यक असलेले गुण आहेत का, नसतील तर ते आपण कोणत्या मार्गाने मिळवू शकतो याचा लेखकांनी विचार केला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे घोषित झालेली ‘शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती’ ही अशा, चांगले, दर्जेदार लेखक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुरू झालेली एक योजना आहे. निदान मराठीत तरी ही योजना अभिनव आहे. यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्र पवार ही दोन्ही नावे मराठी साहित्यविश्वाशी अगदी जवळून निगडीत आहेत. महाराष्ट्राच्या या दोन्ही महान नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या साम्यस्थळांपैकी ठळक साम्य म्हणजे त्यांचे वाचनप्रेम आणि एकंदर साहित्यविश्वाशी असलेली त्यांची मैत्री. यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्र पवार या दोघाही नेत्यांनी लेखकांना सन्मानाने वागवले, साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन आणि सर्व प्रकारचे साहाय्य केले, याचे कारण साहित्याचे समाजाच्या जडणघडणीत असलेले मोल त्यांनी जाणले. पवार साहेबांच्या आजवरच्या अत्यंत व्यग्र आणि धकाधकीच्या राजकीय जीवनात त्यांचे वाचन तर अद्ययावत आहेच, पण त्याचबरोबर त्यांचे नव्या-जुन्या लेखकांना भेटणे व प्रोत्साहन देणे, वेगवेगळ्या साहित्य व संशोधन संस्थांच्या कार्याची स्वतःहून दखल घेत त्यांना मदत करणे – हेही तितक्याच जोमाने सुरू आहे. मराठीतल्या काही ज्येष्ठ लेखकांशी असलेले पवार साहेबांचे मैत्र तर जगप्रसिद्ध कादंबरीकार गॅब्रिएल गार्सिया मार्खेज आणि राजकीय नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्यातल्या मैत्रीची आठवण करून देणारे आहे.

मराठी साहित्य व साहित्यिक यांच्याशी पवार साहेबांचे असलेले हे आत्मीय नाते लक्षात घेऊनच, यशवंतराव प्रतिष्ठानने युवा लेखकांसाठी सुरू केलेल्या पाठ्यवृत्तीला कृतज्ञताभावाने ‘शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती’ असे नाव दिले आहे. तरुण पिढीतल्या लेखक-लेखिकांना ग्रंथलेखनासाठी सर्वतोपरी साहाय्य आणि मार्गदर्शन देऊ करणारी ही योजना मराठी साहित्यक्षेत्रात अभिनव आहे.

प्रत्येक वाङ्मयीन संस्कृतीमध्ये दर्जेदार साहित्याला अधिमान्यता देण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे उपक्रम, योजना असतातच. ग्रंथ-पुरस्कार हा त्यापैकी एक रूढ उपक्रम. हल्ली मराठी साहित्याच्या क्षेत्रात ग्रंथ-पुरस्कारांची संख्या भरपूर आहे. लेखकाचे पुस्तक लिहून झाल्यावर त्याचा गौरव होणे त्याच्या पुढील लेखनासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरू शकते. पण प्रत्यक्षात पुरस्कारांमुळे चांगले लेखक घडले किंवा सर्वच पुरस्कारप्राप्त लेखकांकडून पुढे दर्जेदार लेखन झाले असे होताना दिसत नाही. बरेच मोठे पुरस्कार लेखक वयोवृद्ध झाल्यानंतर, त्यांची लेखकीय कारकीर्द उतरणीला लागल्यावर त्यांना दिले जातात. त्यामुळे नवे दर्जेदार साहित्य निर्माण होण्यासाठी अशा पुरस्कारांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर लेखकांना त्यांच्या लेखनासाठी पाठ्यवृत्ती देण्याचा उपक्रम मात्र चांगल्या लेखनाच्या निर्मितीला नक्कीच साहाय्यभूत ठरू शकतो.

लेखनासाठी पाठ्यवृत्ती भारतातही मुबलक आहेत. परंतु त्या प्रामुख्याने संशोधनपर लेखनासाठी विद्यापीठीय पातळीवर दिल्या जातात. त्यांचा लाभ प्रामुख्याने उच्चशिक्षित संशोधकांना आणि विद्यापीठीय अध्यापकांना घेता येतो. परंतु सर्जनशील लेखनासाठी अशा तऱ्हेच्या पाठ्यवृत्ती क्वचितच दिल्या जातात. वर म्हटल्याप्रमाणे कथा-कादंबऱ्यांसारख्या सर्जनशील लेखनाला प्रतिभाशक्ती असणे पुरेसे असते, असा समज रूढ असल्याने त्यासाठी आणखी काही गोष्टींची आवश्यकता भासू शकते याचा विचार फारसा कोणी केलेला दिसत नाही.

आज तरुण पिढी वाचनापासून दूर जाते आहे, असे म्हटले जाते. परंतु एकूणच वाङ्मयव्यवहारात तरुणांचे स्थान कमी होत चालले आहे. याचे मुख्य कारण, स्पर्धात्मक जीवनातली वाढती गुंतागुंत. जगण्याच्या प्रश्नांमध्येच तरुण पिढीची इतकी ऊर्जा खर्ची पडते आहे, की चिंतन करायला, लिहायला, वाचायला या पिढीला उसंतच मिळेनाशी झाली आहे. एकीकडे एकूण लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढत चाललेले असताना बुद्धिमान, चिंतनशील तरुण साहित्यापासून दुरावत चालल्याचेही चित्र दिसते आहे. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थिती ही देखील आपल्या समाजातील फार मोठी समस्या आहे. तिच्यामुळे लेखनाची इच्छा आणि कुवत असूनही अनेक तरुण लेखक होण्यापासून वंचित राहतात. अशा तरुणांना थोडाफार आर्थिक आधार हा लेखनासाठी आवश्यक असणारी उसंत मिळवून देऊ शकतो.

आजच्या पिढीत संवेदनशील तरुण आहेत. त्यांच्या संवेदनशीलतेला चिंतनाची, योग्य वाचनाची आणि प्रभावी लेखनकौशल्यांची जोड मिळाली, तर वर्तमान काळातल्या वास्तवाचे नव्या दृष्टीने आकलन मांडणारे साहित्य त्यांच्या हातून लिहून होऊ शकते. लेखक होण्याची इच्छा आहे, त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत, परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी चांगले लिहून होत नाही, लिहिलेले लोकांपर्यंत पोहोचत नाही, अशीही काही उदाहरणे आज दिसतात.

ही सर्व स्थिती लक्षात घेऊनच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेने मराठीतील युवा लेखक-लेखिकांसाठी ‘शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती’ ही योजना जाहीर केली आहे. कादंबरी, नाटक, चरित्र, विज्ञानसाहित्य व इतर ललितेतर विषय यांपैकी कोणत्याही एका प्रकारात पुस्तक लिहिण्यासाठी किंवा देशीविदेशी भाषेतून मराठीत पुस्तक भाषांतरित करण्यासाठी ही पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे. दरवर्षी पस्तीस वर्षांखालील दहा लेखक यासाठी निवडले जातील व त्यात लेखक व लेखिका यांना समान प्रमाणात संधी दिली जाईल. ही पाठ्यवृत्ती एका वर्षासाठी आहे. एका वर्षात पुस्तक लिहून झाल्यानंतर त्याच्या प्रकाशनासाठी योग्य प्रकाशनसंस्था सुचवणे तसेच त्यासाठी अंशतः आर्थिक सहकार्य करणे – याचीही तरतूद या पाठ्यवृत्तीमध्ये केलेली आहे. ही पाठ्यवृत्ती योजना अधिकाधिक परिपूर्ण व्हावी यासाठी मराठीतील जाणकार साहित्यिकांना सल्लागार म्हणून निमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांत प्रा. रंगनाथ पठारे, न्या. नरेंद्र चपळगावकर, प्रा. वसंत आबाजी डहाके, श्री. दिनकर गांगल, डॉ. रमेश वरखेडे, प्रा. प्रभा गणोरकर यांचा समावेश आहे.

शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्तीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाठ्यवृत्तीअंतर्गत लेखकांना देऊ केलेले मार्गदर्शन. सर्जनशील लेखनासाठीही विविध प्रकारचे मार्गदर्शन गरजेचे असते. पाश्चात्त्य देशांत अनेक विद्यापीठांतून सर्जनशील लेखनाचे वर्ग चालवले जातात. मराठीत सर्जनशील लेखनासाठी सुरू केलेल्या या पाठ्यवृत्तीमध्ये लेखनाविषयीच्या मार्गदर्शनाचा अंतर्भाव करण्यामागे एक निश्चित भूमिका आहे. सध्याच्या परिस्थितीत लेखन करू इच्छिणाऱ्या नवोदित लेखकाला त्याच्या उमेदवारीच्या काळात लेखनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळाल्यास त्याच्या लेखनाचा दर्जा तर सुधारतोच, पण त्याच बरोबर अशा लेखकाच्या हातून भविष्यात उत्तरोत्तर दर्जेदार साहित्यनिर्मिती होण्याचीही शक्यता असते. लेखनाची गुणवत्ता आणि त्यातील विचारांची, चिंतनाची, जीवनदर्शनाची सखोलता या दोन्हींची पातळी उंचावली जाऊ शकते. अशा लेखनाने लेखक तर मोठा होतोच, परंतु आपल्या मूल्ययुक्त लेखनाने तो समाजालाही समृद्ध, विचारशील करत असतो.

शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्तीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने एक साहित्यक्षेत्रातील तज्ज्ञांची एक निवड समिती गठित केली आहे. पाठ्यवृत्तीसाठी इच्छुक लेखक-लेखिकांनी www.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावरून अर्ज करताना आपली लेखनविषयाची कल्पना आणि नमुना लेखनाचे एक प्रकरण सादर करायचे आहे. त्यावरून तज्ज्ञ समिती दहा लेखक-लेखिकांची गुणवत्तेच्या आधारावर तटस्थपणे निवड करेल. सर्वप्रथम या लेखकांचा एक अभिमुखता कार्यक्रम (Orientation Program) घेतला जाईल. यात साहित्यक्षेत्रातील तज्ज्ञांचे लेखनासंदर्भात मार्गदर्शन लेखकांना मिळेल. त्यानंतर दर तीन महिन्यांनी लेखकांसोबत संवादसत्रे घेतली जातील. यात समकालीन यशस्वी लेखक पाठ्यवृत्तीप्राप्त लेखकांशी संवाद साधतील. तज्ज्ञांकडून त्यांच्या लेखनासंदर्भातल्या अडचणी जाणून त्या दूर केल्या जातील. याशिवाय पाठ्यवृत्तीप्राप्त लेखकांना आवश्यकता भासल्यास स्वतंत्र मार्गदर्शकाचीही नेमणूक केली जाईल. थोडक्यात, युवा लेखकांना केवळ आर्थिक साहाय्य देणे एवढाच या पाठ्यवृत्तीचा उद्देश नसून, त्यांच्या हातून अधिकाधिक दर्जेदार लेखन कसे होईल यासाठी प्रयत्न करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

एका वर्षात पाठ्यवृत्तीप्राप्त लेखकाने आपले पुस्तक लिहून पूर्ण करून तज्ज्ञ समितीकडे सुपूर्द करायचे आहे. अशा सर्व पुस्तकांचे मूल्यमापन करून, त्यासंदर्भातला अंतिम निर्णय ही समिती देईल. मूल्यमापनाच्या कसोटीला उतरलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. परंतु ज्या लेखकांचे लेखन तज्ज्ञ समितीला असमाधानकारक वाटेल, अशा लेखकांना पाठ्यवृत्तीची मुदत संपल्यानंतरही काही कालावधीत पुस्तकाचे पुनर्लेखन करून देण्याबाबत सूचना करण्यात येतील. असे पुस्तक तज्ज्ञांच्या पसंतीस उतरल्यानंतर त्याचीही प्रकाशनासाठी व्यवस्था केली जाईल.

२०२१-२२ हे शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्तीचे पहिले वर्ष आहे. या वर्षी निवड झालेल्या दहा युवा लेखक-लेखिकांना शरदचंद्र पवार यांच्या ८१व्या वाढदिवशी, १२ डिसेंबर २०२१ रोजी ही पाठ्यवृत्ती समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ नोव्हेंबर २०२१ ही आहे. www.sharadpawarfellowship.com संकेतस्थळावर या पाठ्यवृत्तीसंबंधीची संपूर्ण माहिती, संपर्काचा तपशील दिलेला आहे.

ज्या युवक-युवतींच्या मनात चांगला लेखक होऊन समाजासमोर जीवनाविषयीचे नवे आकलन, नवी दृष्टी मांडण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची ही ‘शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती’ एक योग्य संधी आहे.

neegrind@gmail.com

(लेखख शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. चे मुख्य समन्वयक आहेत)

बातम्या आणखी आहेत...