आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातमाशा खऱ्या अर्थाने सजवणारे सोंगाडे, शाहीर, ढोल्या, नाच्या, नाचणारणी, मॅनेजर असे फडाचे मुख्य स्तंभ असतात. त्यांना अद्याप पुरेसा न्याय मिळाला नाही, अशी खंत मनाला सतावत असतांनाच के. जी. भालेराव यांचे 'तमासगीर माणसं' हे आश्वासक व मौलिक पुस्तक सुगावा प्रकाशनाने प्रकाशित करून काहीसा दिलासा दिला आहे.
नटरंग मराठी चित्रपटाच्या पडदयावर आला. तो गाजला आणि रसिकांचा त्याला अफाट प्रतिसाद मिळाला. आनंद यादवांच्या ज्या कादंबरीवर नटरंग बेतला होता. कादंबरीच्या अशा माध्यमांतरामुळे न वाचणाऱ्यालाही ही कादंबरी माहित झाली. नटरंगमुळे एक गोष्ट अत्यंत प्रखरपणे रसिकांच्या डोळयात भरली. ती म्हणजे सुमारे तीन शतकं तमाशा करून लोकांची मन रिझवणाऱ्या माणसांच्या आयुष्याचा झालेला तमाशा. स्टेजवरचा तमाशा प्रेक्षकांना रिझवतो तर स्टेजमागे तो तमासगीरांना खिजवतो. नटरंगनंतर तमाशातील लोककलावंतांची व्यथा-वेदना संवेदनशील मनांना नक्कीच व्यथीत करू लागली. काही काळापासून मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी एक लोककला म्हणून तमाशाचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यातून लोककला म्हणून महाराष्ट्राच्या कलाविश्वाला फुलवणारा तमाशा समाज प्रबोधन करून समाजाला चेतवण्याचा काम देखील करत आलेला आहे. हे वास्तव अलिकडच्या काळात तमाशाला हीन समजणाऱ्या तथाकथित प्रतिष्ठांच्या लक्षात आलेले दिसते. अण्णाभाऊ साठे, रा रं बोराडे, विश्वास पाटील यांच्या सारख्या लेखकांनी या कलेवर कांदबऱ्या लिहिल्या. योगिराज बागूल, गणेश चंदनशिवे, प्रकाश खांडगे,प ्रभाकर ओव्हाळ, मधुकर नेराळे आदिंनी फड मालकांचे चरित्रं लिहिली. तमाशावर संशोधनात्मक लेखन ही विपुल प्रमाणात झाले. मिलींद कसबे यांनी आपल्या संशोधनातून तर तमाशाच्या विद्यापीठीय संशोधनाला नवा आयाम दिलेला दिसतो. असे असले तरी तमाशातील सर्वात महत्वाचा घटक अद्यापही दुर्लक्षित होता. तो म्हणजे ज्याच्यामुळे तमाशा हा खऱ्या अर्थाने तमाशा बनतो त्याचे प्रत्यक्ष जगणं.
कोणताही तमाशा त्याच्या फड मालकाच्या नावाने ओळखला जातो; परंतु एक परिपूर्ण कलाविष्कार म्हणून त्याला साकार करणारे अनेक जण त्यामध्ये असतात. त्यांना चित्रपट-नाटकांच्या भाषेत कलावंत संबोधले जाते. येथे मात्र समाज त्यांना तमासगीर म्हणतो. हे हरहुन्नरी कलावंत काही अपवाद वगळल्यास दुर्लक्षितच राहिलेले दिसतात. तमाशाचा मालक स्वतः कलावंत असतो आणि फड त्याचा असल्याने उभा महाराष्ट्र त्याला ओळखतो. त्याचा तमाशा खऱ्या अर्थाने सजवणारे सोंगाडे, शाहीर, ढोल्या, नाच्या, नाचणारणी, मॅनेजर असे लोक फडाचे मुख्य स्तंभ असतात. त्यांना अद्याप पुरेसा न्याय मिळाला नाही, अशी खंत मनाला सतावत असतांनाच के. जी. भालेराव यांचे 'तमासगीर माणसं' हे आश्वासक व मौलिक पुस्तक सुगावा प्रकाशनाने प्रकाशित करून काहीसा दिलासा दिला.
'तमासगीर माणसं' हे तसे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक असले, तरी त्यातील बहुतांश व्यक्तिचित्रणे उत्कृष्ठ कथेची उंची गाठणारी आहे. संख्यने कमी असलेल्या दलित कादंबरीच्या दालनात आपल्या 'सूर्या' सारख्या वाचकांचे व समीक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कादंबरीचे लेखक,'भोगी' व 'अक्षरांचे भोई' या कथासंग्रहातून एक हटके कथाकार म्हणून ओळख निर्माण झालेले के. जी. भालेराव. आपल्या प्रत्येक ललिलकृतीतून आंबेडकरी जीवननिष्ठा आणि परिवर्तनाच्या क्रांतीची दाहकता धगधगत ठेवणारा, हा लेखक आहे. तो तमाशावर केवळ संशोधन करणारा नसून तमासगीरांच्या उपेक्षित व द्रारिद्रयाने गांजलेल्या जीवनाचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. तसाच त्यांच्या मनातील कलेची श्रीमंती अनुभवलेला तमाशा रसिक देखील आहे. त्यामुळेच त्याच्या लेखणीतून तमासगीरांच जीणं अत्यंत सहजपणे व उत्कटतेने अवतरल्यास नवल नाही. 'तमाशात रात्री असलेला राजा;सकाळी बिडीला महाग असतो.' या मनोगतातील एका विधानातच तमासगीरांच्या जीवनाचा प्रवास सांगण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आलेले दिसून येते.
मोजक्या दहा तमासगीरांच्या व्यक्तिचित्रणातून लेखकाने फड मालकापासून नाचणारीणपर्यंत तमाशातील प्रत्येक घटकाचे आयुष्य अत्यंत प्रभावीपणे उभे केले आहे. आयुष्याच्या सायंकाळी फड गमावून सरकारी पेंशनच्या कुबडयांवर जड झालेले आयुष्याच कलेवर घेऊन फिरणारा फड मालक यादवराव जोर्वेकर, स्वतःचा फड उभा करण्याचा 'फॅड' घेणारा आणि फडची वाट लागल्यावर 'मावशी' म्हणून इतरांच्या फडात रंगणारा फकिरराव खांबेकर, स्त्री पात्र करण्याची जन्मजात देणगी असलेला; परंतु पुरुषासारखा पुरुष असूनही केवळ तमासगीर म्हणून समाजाकडून स्त्रीचे प्रेम नाकारल्या गेल्याने दुःखी अंतःकरणाने तमाशाला रामराम ठोकणारा दामू नाच्या देशवंडीकर, कलेच्या वेडाने झपाटलेला सोंगाडया देवरामबुवा टाकळीकर,रात्रीच्या अंधारात रसिकांना मोहिनी घालणाऱ्या गोजर चिंचवणीकर, चंपा शिवणेकर,चित्रा सासवडकर यांच्या स्त्री म्हणून असलेल्या जीवघेण्या वेदना, असे सर्व दाहक वास्तव वाचकाच्या चाकोरीबद्ध भावविश्वाला हादरे देतात, काळाच्या ओघात तमाशाचे पारंपरिक स्वरूप बदलत गेले असले, तरी तमासगीरांचे जीवन बदलेले नाही. याची जाणीव वाचतांना सतत अस्वस्थ करते. भालेराव यांनी आपल्या लेखनात काळाचा उल्लेख केलेला नाही, तरी १९४० ते १९८० अशा पाच दशकातील तमाशाची वाटचाल या तमासगीर माणसांच्या जीवनाच्या वाटचालीतून अधोरेखित होते.
बैलगाडीपासून ते मोटारगाडी आणि टेंभ्यांपासून विजेच्या दिव्यापर्यंत झालेला तमाशाचा प्रवास देखील नकळतपणे पुस्तकात सामावलेला आहे. चार दशकांपूर्वीच्या महाराष्ट्रातील ग्रामीण लोकजीवन,प्रथा,परंपरा,जत्रा-यात्रा यांचे दर्शन तमाशाच्या फडावरून वाचकाला होऊ शकते. तत्कालिन ग्रामजीवनात तमाशासंदर्भातील अलिखित नियम,परंपरा,प्रथा,तमाशा कलावंतांचे स्थान लेखकाने नेमकेपणाने टिपलेले आहे. तमाशातील स्त्रीयांवर वाईट नजर ठेवणारा 'ऐंशी'च्या दशकातील 'सरपंच' येथे दिसतो, तर मोठया तामझामामुळे साध्या तमाशाचा गल्ला होऊ शकला नाही. त्यामुळे फडाच्या मॅनेजरची व्यथा जाणून गावाच्या जत्रेची २०० रुपये वर्गणी गावपुढाऱ्यांना दटावत माफ करणारा आणि फडासाठी पोत्याने धान्य देणारा साठच्या दशकातील 'पाटील' येथे भेटतो. 'बाई वाडयावर या' या गीताने आणि त्या आधी मराठी चित्रपटांनी रंगवलेल्या आजच्या पिढीतील पाटलाच्या प्रतिमेला येथे नक्कीच तडा देण्यात आलेला आहे. १९८० नंतर गाव बदलला आणि गावाचा प्रमुख बदलला हे सामाजिक व राजकीय चित्रण अत्यंत तरलपणे व सम्यकपणे लेखकाने केलेले दिसते. अतिरंजितपणासाठी वास्तवाला विनाकारण विकृत न करण्याचा लेखकाचा संयतपणा नक्कीच नजरेत भरल्याशिवाय राहत नाही.
व्यक्तिचित्रणात काळाचा नेमका उल्लेख नसणे, व्यक्तिचित्रणासाठी निवडलेल्या पात्रांच्या क्रमवारीत सुसंगतपणा नसल्याने भूत-वर्तमान यांच्यात होणारा गोंधळ,काही प्रमाणात व्यक्तिगत दोषांकडे कानाडोळा करून करण्यात आलेले उदात्तीकरण असे काही मोजके कलात्मक दोष वगळता, हे व्यक्तिचित्रणपर पुस्तक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक वारस्याचा महत्वपूर्ण दस्तावेज ठरणारे आहे, हे मात्र ठामपणे कबूल करावे लागते. एकेकाळी लोककलेच्या आकाशात चमकणारे हे लोककलावंत बदलेले समाजीवन,अभिरुची,मनोरंजनाच्या आधुनिक साधनांची रेलचेल अशा अनेक बाह्य कारणांनी उपेक्षेच्या अंधारात जगण्याची धडपड करतांना दिसतात. कलेच्या नादात न जमलेला आर्थिक शहाणपणा,व्यसनाधीनता,शारीरिक-मानसिक आरोग्य, कौटुंबिक-सामाजिक प्रश्न अशा नानविध व्यक्तिगत कारणांनी हे तमासगीर विस्मृतीत गेलेली दिसतात. घरदार सोडून कलेच्या नादात उमेदीचा काळ कैफात घालवलेल्या अशा अनेक लोककलावंतांना त्यांच्या घराची दारं बंद झाली आहेत. लेखकाच्या भाषेत सांगायचे झाल्यास,"ज्यांनी एकेकाळी रसिक मनावर गारुड केलं;त्यांच्याच जगण्याचं भिरूड झालं आहे." जीवनाचा तमाशा झाला तरी तमाशाच्या कैफात जगणारी ही सारी माणसं वाचकाच्या मनात खोलवर कळ उठवल्याशिवाय राहणार नाहीत.
तमासगीर माणसं
लेखक - के. जी. भालेराव
प्रकाशक - सुगावा प्रकाशन
मुखपृष्ठ - बुद्धभूषण साळवे
पृष्ठे - १००
किंमत -.g>१३० रु.
handerahul85@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.