आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला भान:रंगांच्या दार्शनिक चित्रभाषेच्या अवकाशात

रवीन्द्र लाखेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मीनाक्षी पाटील यांची प्रमुख ओळख आज महाराष्ट्राला कवी म्हणून आहे. कवी आपल्या कवितेत जसा शब्दांशिवाय आशयाचा अवकाश साधतो तसाच अवकाश त्यांनी आपल्या ’लाईट विदीन’ या एकल चित्रप्रदर्शनातून साधला आहे. माध्यम या गोष्टीचे महत्त्व त्या जाणून आहेत. माध्यम हे कलाकार आणि रसिक यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे अशी त्यांची कलाभूमिका आहे आणि ती आपल्याला त्यांच्या चित्रांच्या संकल्पनेतून स्पष्ट होते..

रंगाचा उगम शोधण्याच्या प्रयत्नात गवसणारे आत्मिक आणि पंचमहाभूती सौंदर्य या चित्रांतून प्रतीत होते. या सर्व चित्रांसाठी कॅन्व्हास वर्तुळाकार (पूर्णाकार) घेण्याची संकल्पना सखोल आहे.काहींना या वर्तूळात अनेक वर्तूळं निर्माण होतांना दिसतील काहींना त्या वर्तूळाभोवती अनेक वर्तूळं निर्माण होतांना दिसतील. ही नुसती पहायची चित्र नाहीयेत. प्रत्येक चित्राच्या समोर उभं राहून त्याच्याशी समानता साधण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी झाला तर हॉलमधील अवघं वातावरण ध्यानात्मक होऊन गेल्याचा प्रत्यय तुम्हाला येईल. हे मी बोलतोय ते सुप्रसिद्ध कवी आणि चित्रकार मीनाक्षी पाटील यांच्या ’लाईट विदीन’ या एकल चित्रप्रदर्शानाबद्दल.सदर प्रदर्शन दिनांक २१ डिसेंबर २०२१ला जहांगीर आर्ट गॅलरी येथे सुरू झाले आणि त्याची संपन्नता दिनांक २७ डिसेंबर रोजी झाली. एक कलाकार म्हणून मीनाक्षी पाटील यांच्या आतापर्यंत झालेल्या जडघडणीचे प्रतिबिंब या प्रदर्शातून प्रकर्षाने जाणवते आणि त्यांच्या एकूण जगण्याची संगती आपल्याला दृग्गोचर होते. मराठी भाषेच्या अभ्यासातली पदव्युत्तर पदवी त्यांच्या नावावर असल्यामुळे त्यांना माध्यम या विषयाचं आकर्षण असणं साहजिकाच आहे. किंबहुना निरानिराळ्या माध्यमातून स्वत:चा शोध घेणं हे त्याच्या जगण्याचे सूत्र आहे. त्याचा पाया त्यांच्या मनाच्या अध्यात्मिक बैठकीत आहे. त्यांनी चित्रपट माध्यम यशस्वीरित्या हाताळलं आहे. त्यांच्या या चित्रप्रदर्शनात आपल्याला कॅमे-याचा डोळा प्रतीत होत राहातो. त्यांच्या चित्रांची एकल आणि सांघिक अशी अनेक प्रदर्शनं भरविली गेली आहेत. त्यांना संगीतात रुची आहे तसे त्यांनी काही कार्यक्रमही केलेले आहेत. त्यांची प्रमुख ओळख आज महाराष्ट्राला कवी म्हणून आहे. कवी आपल्या कवितेत जसा शब्दांशिवाय आशयाचा अवकाश साधतो तसाच अवकाश त्यांनी आपल्या चित्रकलेतून साधला आहे. माध्यम या गोष्टीचे महत्त्व त्या जाणून आहेत. माध्यम हे कलाकार आणि रसिक यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे अशी त्यांची कलाभूमिका आहे आणि ती आपल्याला त्यांच्या चित्रांच्या संकल्पनेतून स्पष्ट होते.. जहांगिरच्या दालनातली मीनाक्षी पाटील यांच्या कॅन्व्हासची वर्तूळं पाहून माझ्या मनात ईशावास्योपनिषदाचे शब्द घुमू लागले. ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णमेवावशिष्यते। ॐ शांति: शांति: शांतिः विश्वेश्वर पूर्ण आहे. विश्व पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण निघाले आहे. उत्पत्तीने पूर्ण वाढत नाही. प्रलयाने झिजत नाही. अशा या पूर्णाचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन त्या अर्थी दार्शनिक आहे. चित्रभाषा कळण्यासाठी किंवा कुठल्याही कलेची भाषा कळण्यासाठी किंवा एखाद्या कलेच्या अंतरंगात शिरण्यासाठी ती कलाकृती अनुभवणाऱ्याच्या मनाची बैठक तत्त्वज्ञानात्मक असणे गरजेचे आहे. मग त्या कलेचे शास्त्र नाही कळले तरी चालेल. मीनाक्षी पाटीलांच्या चित्रांची भाषा कळण्यासाठी हे प्रदर्शन पाहणाऱ्याच्या मनाला पूर्वेकडील तत्त्वज्ञानाची बैठक असायला हवी अशी अटच आहे.जसे की बरवे, गायतोंडे यांची चित्र पाहतांना, आपल्या मनाची अशी बैठक असणे गरजेचे असते. त्याच बरोबर मला चिनी अध्यात्मिक संकल्पना आठवली. यीन-यांग. यीन म्हणजे पृथ्वी किंवा स्त्री किंवा स्त्रीतत्त्व किंवा गडदपणा किंवा अकर्मा कर्म किंवा विसर्जन आणि यांग म्हणजे स्वर्ग किंवा पुरूषतत्त्व किंवा प्रकाश किंवा कर्म किंवा सूक्ष्म प्रवेश. या प्रदर्शनाचा आत्मा कॅन्व्हासचा गोलाकार निवडण्यात आहे. हा गोलाकार पृथ्वीचा आहे, निसर्गचक्राचा आहे, मानवी मनाचा आहे.एस.एच.रजा यांच्या मते एक बिंदू वर्तूळाकार असतो तो आकार निर्माणशक्ती असलेला आहे किंवा तो एक नादबिंदू आहे. जलबिंदू आहे किंवा शांतीबिंदू आहे. अर्थात मीनाक्षी पाटील यांच्या चित्रातील प्रत्येक गोलाकाराचं केंद्र बिंदू आहे. कळत असेल किंवा नकळत असेल पण त्यांनी केलेल्या रंगांच्या वापरामुळं मी प्रत्येक चित्राच्या बिंदूत काय आहे हे शोधायला लागलो. या चित्रातल्या बिंदूत जल आहे, वायू आहे पृथ्वी आहे, तेज आहे आणि आकाशही आहे.या गोलाकारातील अमूर्त आकार निर्माण करणारे रंग आपल्याला या पाचही महाभूतांची आठवण करून देतात. या प्रदर्शनाचं नाव आहे ’लाईट विदीन’ म्हणजे आतला प्रकाश. आत्म्याचा प्रकाश किंवा आत्म्याची ज्योत. काळोखाच्या आकारापेक्षा ज्योतीचा आकार छोटा असतो. आत्म्याची ज्योत तर सूक्ष्म असते. तिच्या सूक्ष्मपणात व्यापक अशा विश्वमितींचा अवकाश असतो. मीनाक्षी पाटील यांच्या चित्रातील रंगरचनेतला कमी वापरातला रंग लक्ष अधिक वेधून घेतो. तो त्या अवघ्या चित्रातल्या अमूर्ततेच्या आत्म्याच्या ज्योतीसारखा भासतो. तिच्या प्रत्येक चित्रात असा रंग आहे गडद रंगातील त्या रंगाचं अस्तित्व जास्त लक्ष वेधून घेतं. या चित्रांतले प्रमुख रंग आहेत; हिरव्याच्या अनेक छटा, भगव्याच्या अनेक छटा, लालरंग, तपकीरी असा मातीचा रंग, निळ्या रंगाच्या अनेक छटा. हे सारे रंग निसर्गाचे आहेत. माती आकाश,पाणी, झाड किंवा जंगल. या सर्व चित्रांतून स्त्रीतत्त्वाचा उद्घोष ऐकू येतो. जे स्त्रीतत्त्व वर्षानुवर्षे माणूस ओरबाडतो आहे. नद्यांपासून ते जित्याजागत्या स्त्रियांपर्यंत. लाईट विदीनचा आणखी एक अर्थ मला लागला तो म्हणजे आपल्या शरीरात स्थित असलेली साडेतीन वेटोळ्यातली कुंडलिनी. ती जागृत झाल्यावर शरीरातल्या ज्या सात चक्रांतून ती शेवटच्या सहस्रार चक्रात जाऊन स्थिरावते. या प्रक्रियेत जे रंग दिसतात तेच मीनाक्षी पाटीलांच्या चित्रातून आपल्याला प्रतीत होत राहतात. अर्थात पाहणाऱ्याच्या नजरेला या चित्रातून वेगवेगळे दर्शन घडू शकते. मला एका चित्रात कालियामर्दन दिसले. कुणाला श्रीकृष्णाच्या मुकुटातले मोरपिस दिसले. कुठल्या चित्रात वादळ दिसते तर कुठल्या चित्रात पाऊस, किंवा कुठल्या चित्रात जंगल दिसते अमूर्त शैलीतली चित्रे ही अशी आशयबहुल आहेत. मी वर म्हटल्याप्रमाणे काहींना वर्तूळात वर्तूळं निर्माण होतांना दिसतील जी एकटक पाहात राहिल्यास वर्तूळं निर्माण होण्याच्या प्रक्रियेची अनंतता बिंदूपर्यंत जाऊन पोहोचते. हा अनुभव आंतरिक पर्यावरणाचे भान देतो. काहींना वर्तूळाच्या बाहेर वर्तूळातून वर्तूळं जन्म घेतांना दिसतील. हा अनुभव प्रत्यक्ष निसर्गातील पर्यावरणाचे भान देतो. या चित्रातल्या रंगांची दिशा खूप ठिकाणी उर्ध्वगामी आहे. किंबहुना काही चित्रातल्या रंगांची दिशा क्षितीजसमांतर असली तरी आपल्याला त्या रंगांचे दर्शन होते ते विहंगम. कारण आपल्या नजरेची दिशा अधोगामी राहाते. जणू आपण पक्षी आहोत. विहंगम दर्शन हा एक योग आहे. दु:खांमध्येही सुखपूर्वक जगण्याचा मार्ग दाखवणारा. या अशा दिशांच्या मिलनाचा बिंदू मात्र स्थित परंतू वेगवान आहे. त्यामुळे या चित्रातील आशयाला मिळणारी गती ही स्थितीशील आहे आणि या चित्रातील आशयाची स्थिती गतीशील आहे. अर्थात मीनाक्षी पाटील यांच्या असंज्ञ मनात हे सारं असेल आणि त्यांनी ते चित्रात येऊ दिलं असेल. कुठलीही अनुभूती तेवढी संपृक्त असेल तरच ती दर्शन देते. सजीवांप्रमाणे निर्जीव वस्तूतही गती असते. ती त्या वस्तूची चल अवस्था दर्शवते. गती म्हणजे कोणत्याही वस्तूच्या स्थितीत काळानुसार होणारा बदल होय.गती विविध भौतिक प्रणालींना लागू होते: कण, वक्रता आणि अवकाश-वेळ. एखादी प्रतिमा, आकार आणि सीमा हे देखील गतीची भाषा बोलू शकतात. परंतू स्थिती आणि गती मीनाक्षी पाटील यांच्या या चित्रात एकात्म होतात तेंव्हा ही चित्रे पाहणाऱ्याला आपल्यातल्या ’लाईट विदीनची’ दिशा दाखवतात आणि त्यांना त्या प्रकाशाचे दर्शन घडते. ------ lakheravindra@gmail.com

बातम्या आणखी आहेत...