आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं...:‘जनसंपर्क संकल्पनांचा’ महत्वाचा दस्तावेज

संतोष आंधळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात जनसंपर्काचे (पीआर) किती महत्व आहे हे सांगायला नको. परंतु जितका सोप्या पद्धतीने जनसंपर्क हा शब्द वापरला जातो तितका तो सोपा नाही. जनसंपर्क म्हणजे नेमकं काय असतं, ते कशा पद्धतीने करावे, त्याची शास्त्रीय मांडणी काय? त्याचा उगम कुठून झाला? याची माहिती इंग्रजी भाषेत उपलब्ध असली तरी मराठी भाषेत ह्या विषयावर फार कमी प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. याच विषयाशी संबंधित डॉ. रवींद्र चिंचोलकर यांचे विद्या बुक प्रकाशित 'जनसंपर्कांचे अंतरंग' हे पुस्तक बाजारात आले आहे.

सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात जनसंपर्काचे (पीआर) किती महत्व आहे हे सांगायला नको. परंतु अनेक व्यक्ती ज्या ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या व्यक्तींना नक्की जनसंपर्काबाबत शास्त्रीय माहिती असते का? कारण जितका सोप्या पद्धतीने जनसंपर्क हा शब्द वापरला जातो तितका तो सोपा नाही. अगदी राजकीय नेत्यांसपासून, विविध शासकीय-सामाजिक संस्था, महाविद्यालये, शाळा रुग्णायालये ते कोर्पोरेट जगतात जनसपंर्क विषयाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. दिवसागणिक त्याचे महत्व आणखी गडद होत आहे. मात्र जनसंपर्क म्हणजे नेमकं काय असतं, ते कशा पद्धतीने करावे, त्याची शास्त्रीय मांडणी काय? त्याचा उगम कुठून झाला? याची माहिती इंग्रजी भाषेत उपलब्ध असली तरी मराठी भाषेत ह्या विषयावर फार कमी प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. याच विषयाशी संबंधित डॉ. रवींद्र चिंचोलकर यांचे विद्या बुक प्रकाशित 'जनसंपर्कांचे अंतरंग' हे पुस्तक बाजारात आले आहे. जनसंपर्कांची ३६० अंशात परिपूर्ण माहिती ह्या पुस्तकात आहे. जनसंपर्क अधिकारी ते जनसंपर्क विषयाचे अध्यापन असा प्रवास करत असलेल्या डॉ. चिंचोलकरांची जनसपंर्क या विषयावर असलेली पकड या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला दिसून येते. पुस्तक वाचताना कुठलाही मुद्दा भरकटत न नेता अचूक शब्दात अवघड वाटणाऱ्या संज्ञाची माहिती त्यांनी पुस्तकात दिली आहे. ४०० पेक्षा अधिक पाने असलेल्या या पुस्तकात त्यांनी नऊ प्रकरणात या पुस्तकाची मांडणी केली आहे. जनसंपर्काचा उदय आणि विकास या बाबत लिखाण करीत असताना जनसंपर्काचा जागतिक उगमापासून ते भारतातातील जनसंपर्काचे इतिहासातील महत्त्वाचे टप्पे यामध्ये मांडले आहेत. विशेष म्हणजे पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ त्यांची माहिती दिली आहे. खरे तर जनसंपर्क विषयाचा एन्सायक्लोपीडिया असलेल्या ह्या ग्रंथात कमालीची माहिती आहे जी अनेकांना माहिती नसेल. खरे तर हे पुस्तक पाहिल्यावर हे पुस्तक पत्रकारिता, जनसंपर्काचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा ठेवा आहे. कारण इतकी शास्त्रीय आणि मोजक्या शब्दातली मराठी भाषेतील माहिती इंटरनेटवरही मिळणे शक्य नाही. पुस्तकाच लेखकाने जनसंपर्काची फक्त माहिती न देता जनसंपर्काची संकल्पना, त्यांची माध्यमे, साधने आणि त्यांचे लेखन तंत्र कसे असावे याचे तंत्रशुद्ध लिखाण केले आहे. तसेच जनसंपर्काचे काम करत असताना अनेकांना आचारसंहिता असते याची माहितीच नसते. मात्र या पुस्तकात जनसंपर्काच्या व्यावसायिक संस्था आणि आचारसंहितेवर संपूर्ण प्रकरण उपलब्ध करून दिले आहे. त्याचप्रमाणे जनसंपर्काचा आराखडा हे प्रकरण विस्तृतपणे मांडले असून यामध्ये जनसंपर्काचा आराखडा अमलात आणताना काळजी घेणे किती गरजेचे आहे हे नमूद केले आहे. जनसंपर्क विभागाने आराखडा तयार करताना कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे असून आरखडा तयार झाल्यानंतर व्यवस्थापनाची मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली पाहिजे, अशा महत्वपूर्ण गोष्टीचा गोषवारा या प्रकरणात त्यांनी घेतला आहे. प्राधान्यक्रम निश्चित करण्यापासून ते सतत पाठपुरावा किती गरजेचा असून नेमका संदेश देणे किती महत्त्वाचे आहे हे अतिशय व्यवस्थिपणे या पुस्तकात विषद करण्यात आले आहे. या पुस्तकात विविध क्षेत्रातील जनसंपर्क कशापद्धतीने असणे अपेक्षित आहे यावर विपुल लिखाण केले गेले आहे. आरोग्य जनसंपर्क, शासकीय जनसंपर्क, वित्तीय जनसंपर्क, शैक्षणिक जनसंपर्क, स्वयंसेवी संस्थांचा जनसंपर्क, संरक्षण जनसंपर्क, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनसंपर्क, राजकीय जनसंपर्क कशा पद्धतीने असावा याबाबतची इत्यंभूत माहिती दिली गेल्याने हे पुस्तक आणखीनच दर्जेदार झाले आहे. विशेष म्हणजे इंटरनेटमुळे जगभरात जे बदल घडले आणि त्यातून समाज माध्यमांचा जो उदय झाला त्याकाळात जनसंपर्काचा बदल हा देखील पुस्तकात देण्यात आला असून त्याचे फायदे आणि मर्यादा याबाबत अधिक स्पष्टपणे लिखाण झाले आहे. जनसंपर्कसाठी असणारी प्रचलित दूरचित्रवाणी, नियतकालिके, वृत्तपत्रे, रेडिओ यांच्यापलीकडे जाऊन जनसंपर्कची नवीन साधने समाज माध्यमाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने वापरता येतील याचा ठाव या पुस्तकात देण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात मराठीतून पत्रकारिता करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. जनसंपर्क या विषयाची माहिती इंटरनेटवर बरीच उपलब्ध असली तरी ती इंग्रजीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरते. पुस्तकाचे लेखक चिंचोलकरांचे प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जनसंपर्क विषयातील महत्वाचा दस्तावेज यानिमित्ताने उघडा झाला आहे. अनेकवेळा आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन हा शब्द ऐकून असतो. मात्र त्या शब्दाच्या व्युत्पत्ती कशी झाली आणि संस्थेची प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी लागणारे प्रयत्न याबाबत ह्या पुस्तकात संपूर्ण प्रकरण देण्यात आले आहे. कॉर्पोरेट हा शब्द 'Corpus' या लॅटिन शब्दापासून आला आहे, त्याचा अर्थ आहे पूर्ण. कम्युनिकेशन हा शब्द 'Communicare' या लॅटिन शब्दापासून आला आहे, त्याचा अर्थ सवांद. कॉर्पोरेट कम्युनिकेशन याचा अर्थ संस्थेचा संपूर्ण संवाद असा होतो. ही व्याख्या आपल्याला ह्या पुस्तकातून ज्ञात होते. या पुस्तकाची प्रस्तावना डॉ. सुरेश पुरी यांनी लिहिली असून त्यांनी स्वतः १९८४ साली 'जनसपंर्क : संकल्पना आणि सिद्धांत' हे जनसंपर्क विषयातील पहिले मराठी पुस्तक लिहिलेले आहे. विशेष म्हणजे डॉ. चिंचोलकर हे डॉ. पुरी यांचेच पत्रकारिता या विषयातील विद्यार्थी असून, एखाद्या प्राध्यापकला आपल्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना देताना किती आनंद झाला असेल हे या प्रस्तावनेतून दिसून येते. डॉ. चिचोलकरांची विद्यार्थी दशेत केलेली मेहनत सांगताना डॉ. पुरी हातचे काहीच न राखता कौतुकाचा वर्षाव करत जनसंपर्काचे ज्ञान देण्यास हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे नमूद करतात. डॉ. चिंचोलकर सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दहा वर्ष सेवा केल्यानंतर १२ वर्षापेक्षा अधिक काळ जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्या या सगळ्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ पाहता जनसंपर्क या विषयावर अधिकारवाणीने लिहिलेले पुस्तक नक्कीच वाचकांसाठी दिशादर्शक ठरेल.

पुस्तक : जनसंपर्काचे अंतरंग लेखक : डॉ रवींद्र चिंचोलकर प्रकाशक : विद्या बुक पब्लिशर्स, औरंगाबाद. पाने : ४४४, किंमत : रु. ५०० ------ santoshandhale.mmm@gmail.com

बातम्या आणखी आहेत...