आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी उमेद:सशक्त पिढीच्या शिल्पकार- अंगणवाडी ताया

स्नेहल बनसोडे- शेलुडकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी मुहुर्तमेढ रोवलेल्या अंगणवाड्या, त्यांचीच उद्दिष्टे पुढे चालवत आज देशभरात मोलाचं काम करीत आहेत. सप्टेंबर हा महिना 'पोषण मास' म्हणून देशभरात साजरा केला जातो. म्हणूनच या महिन्याच्या निमित्ताने 'संपर्क' या धोरणांचा अभ्यास करून, लोकप्रतिनिधी आणि माध्यमांशी संवाद चालू ठेवणाऱ्या मुंबईतील संस्थेने 'युनिसेफ' च्या मदतीने अंगणवाड्यांच्या कामावर एक विशेष अभ्यास अहवाल तयार केलाय. 'महाराष्ट्राने देशाला दिलेल्या अंगणवाडीची गोष्ट' हे त्या अहवालाचं नाव. याच अहवालातील या काही महत्त्वाच्या नोंदी...

परभणीतलं येलदरी गाव. सौ.शीलाबाई चव्हाण यांनी ३१ मे २०२१ रोजी एका बालकाला जन्म दिला. पण जन्मत: त्या बालकाचे वजन केवळ १८०० ग्रॅमच होते. इथं नवजात बाळाच्या आणि मातेच्या मदतीला धावल्या त्या अंगणवाडी सेविका मंगलाताई थिटे. त्यांनी शीलाबाईंच्या घरी भेट देऊन बाळाचे वजन वाढवण्यासाठी काही सूचना केल्या. जसं की बाळाला आईच्या दुधाशिवाय (स्तनपानाशिवाय) दुसरं काहीच देऊ नका, स्तनपान करण्याची योग्य पद्धत कोणती, तसंच बाळाला सध्या आंघोळ घालू नका, कपड्यात गुंडाळून उबदार कसं ठेवावं हे सगळं नीट समजावलं. शीलाताईंची घरची परिस्थिती तशी हलाखीचीच आहे,पण त्यांनी आणि घरातल्या सदस्यांनी या सूचना नीट ऐकल्या, मंगलाताईंनीही वारंवार घरी भेट देऊन मार्गदर्शन केलं. आज हे बाळ चार महिन्यांचं झालं असून त्याचं वजन सहा किलो आहे.

दुसरी घटना, राज्याच्या राजधानीतली, मुंबईतली. धारावीमधल्या एका महिलेला अगदी काही दिवसांच्या बाळासह कुटुंबाने घराबाहेर काढले. कारण कायतर, दुसऱ्यांदा मुलगीच झाली म्हणून! बाळ इतके कमी वजनाचे होते, की ते जगण्याची काहीच शाश्वती नव्हती. शिवाय, घराबाहेर काढलेल्या महिलेला बसलेला मानसिक धक्का मोठाच होता. शिवाय ती माता स्वत:च कमी वजनाची असल्याने बाळाचे स्तनपानाद्वारे पुरेसे पोषण होऊ शकत नव्हते. धारावी परिसरातल्या अंगणवाडी सेविकांना ही माहिती कळाली आणि त्यांनी तातडीने मातेला आणि बाळाला छोटा सायन रूग्णालयात दाखल केले. मातेचा आणि बाळाचा उपचार, योग्य पोषक आहार, शुश्रुषा, मानसिक आधार देणं हे सगळं सगळं अंगणवाडी तायांनी केलं. इतकंच नाही, तर केवळ मुलगी झाल्याने लहानग्या बाळाला आणि आईला घराबाहेर काढणं, किती चुकीचं आहे, हे त्यांनी त्या महिलेच्या नवऱ्याला आणि कुटुंबाला समजावलं. आज अंगणवाडी ताईंच्या प्रयत्नामुळे ते बाळ आणि आई आपल्या हक्काच्या घरी परतले आहेत आणि नव्याने हे जग पाहू शकतायेत.

अंगणवाडी तायांच्या कामाची, त्यांनी पुढं होऊन केलेल्या मदतीची अशी किती उदा.सांगावीत. आज राज्यभरातल्या १,२०,४८६ अंगणवाड्यातून काम करणाऱ्या सुमारे ९३,२६२ अंगणवाडी ताया आपापल्या वाडी- वस्तीत, कसल्याही प्रसिद्धीची आणि सत्काराची अपेक्षा न बाळगता, एकनिष्ठतेने कुपोषणमुक्तीसाठी आणि सशक्त पिढी घडवण्यासाठी झटतायेत. सांगायला अभिमान वाटतो की अंगणवाडी ही संकल्पना देशाला दिली ती महाराष्ट्रानेच. पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या प्रयत्नातून आधी मुंबईत नूतन बालशिक्षण संघ, शिशुविहार अश्या संस्थांच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली. पुढे, 'ग्रामीण आणि आदिवासी भागात लक्ष केंद्रित करा' या गांधीजींच्या सल्ल्याने ताराबाईंनी बोर्डी जि.ठाणे इथं १९४५ साली ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापन केले.

आदिवासी मुलं सर्वस्वी अपरिचित अश्या 'शाळा' नावाच्या संस्थेत येणार नाहीत, तेव्हा शाळेनेच त्यांच्या अंगणात, शेतात, शेळ्या- मेंढ्या चरण्याच्या कुरणात जाऊन त्यांना शिक्षणाची गोडी लावायला हवी, या विचारातून ताराबाईंनी अंगणवाडी, कुरणशाळा सुरू केल्या. या शाळेत प्राथमिक शिक्षण तर मिळेच, शिवाय या मुलांच्या भुकेसाठी साधेसुधे पोषक पदार्थ मिळत, अधूनमधून त्यांची आरोग्यतपासणीही केली जाई. हे सगळं पाहायला एकदा तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी आल्या होत्या आणि हे सगळं पाहून त्या भारावून नसत्या गेल्या, तरच नवल! इंदिराबाईंनी ही संकल्पना देशभर राबवण्याचा निर्णय घेतला- २ ऑक्टोबर १९७५ रोजीच्या गांधीजयंतीपासून अंगणवाड्या देशातल्या राज्याराज्यात गजबजू लागल्या, त्या आजतागायत सेवा देतच आहेत, अगदी कोविड काळातही न थकता!

ताराबाईंनी मुहुर्तमेढ रोवलेल्या अंगणवाड्या, त्यांचीच उद्दिष्टे पुढे चालवत आज देशभरात मोलाचं काम करीत आहेत. सप्टेंबर हा महिना 'पोषण मास' म्हणून देशभरात साजरा केला जातो. म्हणूनच या महिन्याच्या निमित्ताने 'संपर्क' या धोरणांचा अभ्यास करून, लोकप्रतिनिधी आणि माध्यमांशी संवाद चालू ठेवणाऱ्या मुंबईतील संस्थेने 'युनिसेफ' च्या मदतीने अंगणवाड्यांच्या कामावर एक विशेष अभ्यास अहवाल तयार केलाय. 'महाराष्ट्राने देशाला दिलेल्या अंगणवाडीची गोष्ट' हे त्या अहवालाचं नाव. या अहवालाचं प्रकाशन एक सप्टेंबर रोजी ICDS अर्थात एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या कार्यक्रमात महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते झालं. याच अहवालातील काही महत्त्वाच्या नोंदींवर आपण नजर टाकूया.

अंगणवाडी तायांची मुख्य कामं असतात ती: प्रत्येक गरोदर- स्तनदा मातेची नोंदणी, तिची आणि घरच्यांची वारंवार गृहभेट घेऊन पोषणाचे महत्त्व समजाविणे आणि समुपदेशन, ० ते ६ वयोगटातील मुलांची नोंदणी, त्यांचे वजन, उंची, आरोग्य याच्या नोंदी ठेवणे, त्यांना पोषक आहार पुरविणे, कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष ठेवून त्यांना विशेष पोषक आहार पुरविणे आणि कुटुंबाचे समुपदेशन करणे, मातांचे- बालकांचे वेळेवर लसीकरण करवून घेणे, बालकांच्या वयानुसार आजूबाजूच्या उपलब्ध गोष्टी, पशु- पक्षी यातून शिक्षणाची तोंडओळख करून देणे इ. पण यापलीकडे जात सुनेवर मुलगाच झाला पाहिजे म्हणून एखादे कुटुंब दबाव टाकत असेल, अथवा मुलगी झाल्याने छळ करत असेल तर त्यांना समजाविणे, समुपदेशन करणं, लसीकरणाने वंशच खुंटतो वगैरे अफवांना खोडून काढणे, पोषक आहार आणि वैद्यकीय तपासण्यांचे शास्त्रीय महत्त्व समजाविणे अशी 'सिलॅबस' बाहेरची पण अत्यंत मोलाची कामंही त्या करतात. या सगळ्यात आयसीडीएसच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन अंगणवाडी तायांना वेळोवेळी मिळत असते.

कोविडपूर्व काळात शून्य ते तीन वयोगटातल्या मुलांना घरपोच शिधा, तर ३ ते ६ वयोगटातल्या मुलांना ताजा पोषक आहार अंगणवाडी ताया अंगणवाडीत शिजवून द्यायच्या.त्या सोबत हसत- खेळत शिक्षणही व्हायचे. पण कोविडने लोकांच्या एकत्र येण्यावर बंधने घातल्यानंतर आता सरसकट सर्व मुलांना Take home ration दिले जाते.ज्यात तांदूळ, गहू, मूगडाळ, हरभरा, साखर, मीठ, मसाले इ.असते. याशिवाय कुपोषण निर्मूलनाकडे त्यांचे विशेष लक्ष असते. ० ते ६ वयोगटातील मुलांची उंची, वजन, दंडाचा घेर ही मोजमापं नियमित घेऊन Severe acute Malnutrition आणि Moderate acute Malnutrition या प्रकारात कुपोषित मुलांचे वर्गीकरण करण्यात येते. या दोन्ही गटातील अतिकुपोषित मुलांसाठी पोषण आहाराव्यतिरिक्त विशेष आहार मागवला जातो,तो या मुलांना देऊन त्यांच्या प्रगतीची सातत्याने नोंद ठेवण्याचे कामही अंगणवाडी ताई करतात. अंगणवाडी ताईंना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे, कुपोषणाची तीव्रता कमी करण्यासाठी योग्य सल्ला देण्याचे काम आयसीडीएस तर्फे बालविकास प्रकल्प अधिकारी करतात.

हे सगळं करत असताना अनेकदा अंगणवाडी तायांवर जास्त जबाबदारीची वाढीव कामं टाकली जातात. उदा. कोरोनाकाळात पालक गमावलेल्या अनाथ झालेल्या बालकांचे सर्वेक्षण इ. ही सगळी कामं करूनही अंगणवाडी तायांना मात्र महिन्याला केवळ ८३२५ रू.च मानधन दिले जाते. म्हणूनच, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे या अंगणवाडी तायांनी त्यांच्या जबाबदारी व्यतिरिक्त केलेल्या इतर जादाच्या कामांसाठी वेगळा मोबदला द्यायला हवा, असं मत मांडतात.

आता कोविडकाळातही जोखीम घेऊन घरोघरी जाऊन अंगणवाडी तायांनी हे गर्भवती,स्तनदा माता आणि लहान बालकांचे सर्वेक्षण आणि समुपदेशन सुरूच ठेवलंय. मात्र राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षणानुसार २०१५-१६ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये ग्रामीण भागात कुपोषित बालकांचा आणि बालमृत्यूंचा टक्का वाढलेला आहे. यातलं एक कारण मुलांना अंगणवाडीत आधीसारखा ताजा, गरम, पोषण आहार न मिळणं हे ही असू शकतं. कारण त्यांना घरी जो कोरडा शिधा दिला जातो, त्यात केवळ ते मूल नव्हे तर संपूर्ण कुटुंबच वाटेकरी असते. आजही ठाणे (पालघर), नंदुरबार, मेळघाट, गडचिरोली, चंद्रपूर इथल्या कुपोषणाचे प्रश्न तीव्र आहेत. मात्र या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी अर्थात एकात्मिक बालविकास प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मात्र गेल्या २०१९-२० च्या तुलनेत ४०० कोटींची कपात केल्याने समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (2019-20: 20532 कोटी आणि 2020-21: 20105 कोटींची तरतूद )

आता कोविडमुळे अंगणवाडीत जरी ताजे पदार्थ बनविणे शक्य नसले तरी अंगणवाडी ताई, पालकांना पोषक पदार्थांच्या रेसिपीज देऊच शकतात. काही वेळा प्रत्यक्ष भेटून तर अधूनमधून व्हॉटसअपद्वारे पालकांशी ही रेसिपीची देवाणघेवाण शक्य आहे. म्हणूनच संपर्क, नवी उमेद फेसबुक पेज, मुंबई स्वयंपाकघर फेसबुक ग्रुप आणि युनिसेफने 'शिदोरी' या आगळ्या उपक्रमाची सुरूवात केलीये. ज्यात अंगणवाडीतून घरपोच मिळणारा कोरडा शिधा आणि स्थानिक भाज्या, मसाले वापरून चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज अंगणवाडी ताई आणि 'मुंबई स्वयंपाकघर' या फेसबुक ग्रुपचे सदस्य शेअर करतायेत. ज्याचे व्हिडिओ एक- दोन महिन्यातून एकदा अंगणवाडी तायांना लाईव्ह दाखवले जातात. शिवाय रक्तक्षय, मासिक पाळीबाबतच्या अंधश्रद्धा यासारख्या विषयांवर त्यांना मार्गदर्शन केले जाते. आणि नंतर गावोगावच्या अंगणवाडी तायांपर्यंत हे व्हिडिओज व्हॉटसअप द्वारे पोहोचवले जातात.

तुम्हांलाही एखादी छान रेसिपी सुचवता येणार असेल,तर जरूर 'मुंबई स्वयंपाकघर' या फेसबुक ग्रुपला जॉईन करा. देशाची सशक्त पिढी घडवण्यात अंगणवाडी तायांना तेवढीच आपली खारूताईची मदत!

snehal@sampark.net.in

बातम्या आणखी आहेत...