आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:स्वप्ने ‘अनलॉक’ करणारा प्रवास..!

कृष्णा बेलगांवकर (लेखक, अभिनेता)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीर्घ लॉकडाउननंतर अनलॉकचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु, तसं झालं तर काय काय होऊ शकतं, यावर मी एक काल्पनिक गोष्ट रचली होती. आमच्या मित्रांना ती ऐकवली. त्यांना खूप आवडली आणि तिथूनच ‘अनलॉक स्टोरी १.०’चा भन्नाट प्रवास सुरू झाला.

या गोष्टीला एक वर्ष झालं. २०२० मधील पहिल्याच लॉकडाऊनचा तो उत्तरार्ध होता. संध्याकाळी प्राची आणि ऐश्वर्या माझ्याकडे आल्या. लॉकडाऊन संपल्यावर काही तरी प्रोजेक्ट करायचा, यावर आम्ही एक दोन तास चर्चा केली. मधल्या काळात लिहिलेल्या ६/७ नवीन कथा त्यांना ऐकवल्या. ‘मोहोर’ त्यांना जास्त आवडली. शेवटी तीच करायचे ठरले. मात्र, निघण्यापूर्वी एक कागदावर न लिहिलेली, पण मनात सुचलेली गोष्ट मी त्यांना सहजच ऐकवली. ती प्रासंगिक होती. अनलॉकचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु, तसं झालं तर काय काय होऊ शकतं, यावर रचलेली कल्पनिक गोष्ट. हीच गोष्ट आपण करूया, असा विचार त्या दोघींनी मांडला आणि तिथेच ‘अनलॉक स्टोरी १.०’ चा भन्नाट प्रवास सुरू झाला.

शहरात अनेक निर्बंध होते. ठिकठिकाणी चेकपोस्ट. एकट्या व्यक्तीलाही फिरणं शक्य नव्हतं. अशा काळात हा प्रोजेक्ट करायचा म्हणजे महाकठीण. परंतु, लघुपटात कोरोनाबाबत जनजागृती करणारा विषय असल्यानं प्रशासन मदत करेल असं वाटलं. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला स्क्रिप्ट सादर केलं. त्यांच्याकडून प्रशंसा झाली. त्यासाठी फंड मिळतो, पण खूप वेळ लागेल असं कळलं. शेवटी नगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र लिहिलं. त्याच दिवशी त्यांनी नियम आणि अटींचे पालन करीत चित्रीकरण करण्याची परवानगी दिली. परंतु, पुढेही अनेक आव्हाने होतीच. कोविडचा प्रादुर्भाव जास्त असल्याने हवी तशी लोकेशन्स मिळत नव्हती. मिळाली तरी सकाळी दिलेली परवानगी दुपारपर्यंत नाकारल्याचा फोन यायचा. कित्येकदा तर आम्ही लोकेशन फायनल करून आलो की तो एरिया सील केल्याचं समजायचं. दररोज हिरमोड व्हायचा. एक दिवस आमच्या टीममधील कल्याणीने तिच्या नातेवाईकाचं घर बघितलं. तेही तयार झाले. दोन दिवसांत शूट ठरवलं. पण, लगेच फोन आला की त्यांच्या शेजारी कोविडमुळे एका व्यक्तीचं निधन झालं. त्यावेळी तिथे जाऊन आलेल्या आमच्या टीममधील सगळ्यांच्या पायातले त्राण गेले. आपले फिरणे जास्त होत असल्याने पुढील काही दिवस सगळं थांबवून आपण घरातच क्वारंटाइन राहू, असं ठरवलं. काही दिवस फक्त ऑनलाइन मिटिंग घेत राहिलो. चार-आठ दिवस गेल्यावर मित्र संदीप जाधव यांना मी सहज कॉल केला. त्यांच्या मोठ्या बहिणीचा बंगला उपलब्ध होता. अगदी आम्हाला हवं तसंच लोकेशन. दुसऱ्या दिवशी शूट करायचं ठरवलं. वेळेच्या मर्यादा आणि इतर निर्बंधांमुळे दोन दिवसाचं शूट एकाच दिवसात उरकलं.

पुढे पोस्ट प्रॉडक्शनसाठी दीड महिना गेला. एक दिवस स्टुडिओला कलाकारांचं व्हाइस डबिंग केलं. येताना विक्रांतला घरी सोडलं. त्याच दिवशी त्याला त्रास होऊ लागला. अचानक त्याला कोविड सेंटरला दाखल केलं, तो पॉझिटिव्ह होता. त्या पुढील काळात मी एकटाच पूर्णपणे क्वारंटाइन होतो. मनावर प्रचंड दडपण. अधूनमधून कोरोनाची भीतीही वाटायची, पण फिल्मचं एडिटिंग शेवटच्या टप्प्यात असल्याने त्या कामात वेळ निघून गेली.

या कलाकृतीनं मला खूप काही दिलं. सामान्य वाटणाऱ्या कित्येक गोष्टी आपण सहज नाकारतो, पण त्या किती महत्त्वाच्या असतात हे ‘एडिटिंग’च्या अगदी शेवटच्या प्रवासात टाइमलाइन डिलिट झाली तेव्हा समजलं. गोष्ट सांगताना केवळ शब्द आणि चित्र महत्त्वाचे नसून वेळ, तंत्र आणि माध्यम यांची सांगड घालणंही तितकंच आवश्यक ठरतं. या माध्यमातून एखादा संदेश आपण देत असू, तर आपणही तो विचार आणि त्यामागची भावना जपायला हवी, याचं भान मला या लघुपटानं दिलं. यापूर्वी मी कधीच कोणत्या लघुपटाचं दिग्दर्शन केलं नव्हतं. कॉलेजला असताना माझा प्रोजेक्ट नाकारला गेला आणि मला कॉलेजही सोडावं लागलं. तेव्हा आपण एखादा वैयक्तिक प्रोजेक्ट करावा, असं वाटत होतं. ‘अनलॉक स्टोरी’ने माझं ते स्वप्न पूर्ण केलं. मी कॉलेज पूर्ण करू शकलो नाही, पण परीक्षा न देता पास झालो, याचा मला मनापासून आनंद वाटतो. यात माझ्यापेक्षाही मोठा वाटा टीममधील प्रत्येकाचा आहे. विराज, उत्कर्षा, गौरव आणि वृषभ यांनी सुंदर अभिनय करत ही गोष्ट साकारली. भूषण गणूरकरने सुंदरपणे ती चित्रीत केली. विठ्ठल, कल्याणी, विक्रांत, ऐश्वर्या, रुपेश, प्राची, ज्ञानेश्वर या सगळ्यांचं यात मोठं योगदान आहे. शॉर्टफिल्म करताना आम्हाला पुरस्काराची अपेक्षा नव्हती. गावाकडे शेतात पाणी देणाऱ्या एखाद्या निरक्षर माणसाला माझी गोष्ट समजते आणि मध्यरात्रीला तो फोन करतो, आपल्या कथेचा आशय भावल्याचं सांगत एखादा एसटीचालक कॉल करतो, या शॉर्टफिल्मचा प्लॉट आवडल्याचं एखादा दिग्गज दिग्दर्शक कॉल करून सांगतो, तेव्हा आम्हाला पुरस्कार मिळाल्याचाच फिल येतो. बाकी काही चुकाही घडल्या असतीलच, त्या मी नाकारत नाही. गुणदोषांसह माझ्या स्वप्नांना ‘अनलॉक’ करणाऱ्या या कलाकृतीला मी जन्मभर पहिल्या प्रेमाइतकंच जपत राहीन...

कलारत्नने झाला...गौरव...

गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘अनलॉक स्टोरी १.०’ यूट्यूबवर प्रदर्शित केली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच काळात उत्तर प्रदेशातील झाशी येथे महाराजा अग्रसेन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘उत्कृष्ट दिग्दर्शका’चा पुरस्कार मिळाला. ‘दिव्य मराठी’ने आयोजित केलेल्या रसिक शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले. औरंगाबाद येथील रील्स आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात आणि केरळातील कोचीन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात पुरस्कार मिळाला. नाशिकच्या २२ व्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात दिला जाणारा ‘कलारत्न’ पुरस्कारही या लघुपटामुळे मला मिळाला.

संपर्क : ९८६०६७०१०६

बातम्या आणखी आहेत...