आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:चला...बिबट्याचे सहजीवन स्वीकारू या!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन वाघ

पुण्याच्या मानवी वस्तीत शिरलेल्या रानगव्याला पकडल्यानंतर धावपळ आणि दमछाक झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्ू झाला... सोलापूर, नगर आणि बीड जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबळ्याला शार्प शुटरने अखेर ठार केले... देशभरासह महाराष्ट्रातही बिबळ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ... गेल्या पंधरवड्यात वन्यप्राण्यांसंदर्भात या तीन वेगवेगळ्या बातम्या घडल्या. घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यातून एक मात्र समान धागा दिसून येतो तो म्हणजे वन्यप्राणी, सरकरी यंत्रणा आणि आपण...

पुण्याच्या मानवी वस्तीत शिरलेल्या रानगव्याला पकडल्यानंतर धावपळ आणि दमछाक झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्ू झाला... सोलापूर, नगर आणि बीड जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबळ्याला शार्प शुटरने अखेर ठार केले... देशभरासह महाराष्ट्रातही बिबळ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ... गेल्या पंधरवड्यात वन्यप्राण्यांसंदर्भात या तीन वेगवेगळ्या बातम्या घडल्या. घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यातून एक मात्र समान धागा दिसून येतो तो म्हणजे वन्यप्राणी, सरकरी यंत्रणा आणि आपण... एकीकडे शासकीय पातळीवर २०२० हे वर्ष वन्यप्राणी आणि पर्यावरणासाठी चांगले ठरले. राज्याच्या महाविकास आघाडी सरकार या विषयाला अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. सरकारने दहा संवर्धन राखीव क्षेत्रांची घोषणा केली. वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्रासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. भारतात बिबट्यांची संख्या १९९८ ते २०१५ या १७ वर्षांच्या कालावधीत तब्बल ८२ टक्क्यांनी कमी झाली होती. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालात २०१४ ते २०१८ या कालावधीत बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले आहे. हे सगळं एकीकडे सकारात्मकपणे होत असताना दुसरीकडे राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षांच्या सतत वाढणाऱ्या घटना आणि त्यासंबंधीचे सरकारी यंत्रणेचे आणि नागरिकांचे अज्ञान याकडे मात्र गांभीर्याने पाहिले जात नाहीये.

पुण्याच्या कोथरुड भागात एक रानगवा चुकून आपला अधिवास सोडून नागरी वसाहतीमध्ये आला. त्याला पहाण्यासाठी हौशा गवशांनी गर्दी केली. घाबरलेला रानगवा आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा इकडून तिकडे पळत होता.मनुष्याप्रमाणे त्याचाही रक्तदाब वाढला आणि आपल्या जीवाला मुकला... या घटनेच्या तीन दिवस अगोदर करमाळा तालुक्यातील बीटरगाव येथे नरभक्षक झालेल्या बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात गिधाडांचा अधिवास असलेल्या अंजनेरी गडावर आता विकासाच्या नावाखाली रस्ता बांधणीचा घाट घालून त्यांच्यावर संक्रात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. निसर्गाची साखळी तोडण्याचा अधिकार या मानवरुपी गिधांडाना कोणी दिला हा प्रश्न मात्र कोणीच विचारत नाहीये. वन्यप्राणी, वन्यपक्षी यांच्या अधिवासात अतिक्रमण करुन आपली पोळी भाजणारे पावलापावलावर तयार होत आहे. त्यामुळे खरे हिंस्त्र मानव की वन्यप्राणी हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. कोथरुडमध्ये रानगव्याच्या मृत्यू झाल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तात्काळ वन्यप्राणी नागरी वसाहतीमध्ये आल्यास त्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(२) नुसार अधिकाराचा वापर करुन गर्दी करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड सहिंता १८६० चे कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्याचे थेट आदेश दिले. खरं म्हणजे हे असे निर्णय फक्त नाशिक जिल्ह्यापुरताच मर्यादित न राहता वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सबंध राज्यभरात लागू करण्याची खरी गरज आहे.

खरं तर बिबट्या, कोल्हा, तरस, रानगवा, काळवीट यासह आदी वन्यप्राणी हे आपला अधिवास सोडून नागरी वसाहतीकडे का येऊ लागले याचे उत्तर अतिशय सोपे आहे. विकासाच्या नावाखाली राखीव वनक्षेत्रातूून रस्ते तयार करणे, सर्रासपणे जंगलतोड करुन त्या ठिकाणी शेती, फार्म हाऊस वा रिसोर्ट सुरु करणे यामुळे वन्यप्राण्याची अन्नसाखळी तुटत चालली आहे आणि उदर भरण्यासाठी, आपल्या संरक्षणासाठी हक्काचा अधिवास सोडून अन्नाच्या शोधार्थ नागरी वसाहतीकडे मोर्चा वळवावा लागत आहे. यामुळेच राज्यात आतापर्यंत पावणे दोनशे (१७३) बिबट्यांनी त्यांचा जीव गमावला आहे. वर्तमानातील परिस्थितीशी मिळतेजुळते करुन आपला जीवनप्रवास आखणारा बिबट्या हा खरा तर भित्रा प्राणी आहे. जंगलातील तुटलेली अन्नसाखळी व सुरक्षित संरक्षण नसल्याने तो उसासारख्या पीकाचा आसरा घेतांना दिसून येतो.उसाच्या शेतात मानवाचा खुप कमी हस्तक्षेप असतो, तसेच मळेविभागात भटक्या कुत्र्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. आपल्या उंचीच्या आणि ताकदीच्या टप्प्यात येणारे सहजसोपे अन्न म्हणुन बिबट्या कुत्र्यांना सर्वाधिक पंसती देतो. एखादा व्यक्तीही वाकलेला किंवा झोपलेला असेल तर बिबट्या त्याला आपले भक्ष बनवितो. यात बालकांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. उसतोड सुरु झाल्यानंतर उसाच्या क्षेत्रात बिबट्याचे बछडे मोठ्या प्रमाणात मजुरांना आढळून येतात.मात्र मादी आपला जीव वाचवण्यासाठी या शेतातून त्या शेतात प्रवास करत असताना नकळत कधी शहरामध्ये येऊन पोहचते हे तिलादेखील कळत नाही. आणि इथूनच पुढच्या संघर्षाला सुरूवात होते. बिबट्या दिसल्याची वार्ता जंगलात वणवा पसरल्यासारखी सोशल मीडियावर पसरते. मग बिबट्याला पहाण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत जाते... बिथरलेल्या बिबट्या आपला जीव वाचविण्यासाठी हल्ला करत सुटतो... गर्दीत तीन-चार जखमी होतात...वनविभागाचे कर्मचारी हात जोडून, विनवण्या करुन लोकांना गर्दी कमी करण्यासाठी आवाहन करतात... यावेळी तरुणांची गर्दी वनविभागाला किंवा वन्यप्राण्यासाठी सेवा करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे काम करतात.

वन्यप्राणी नागरीवस्तीत आल्यानंतर परिस्थिती कशी हाताळायची याबाबत काही मार्गदर्शक सुचना २०१५ साली नमूद करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कृती केल्यास वन्यप्राणी आणि मनुष्य दोघेही जखमी कसे होणार नाहीत आणि त्या वन्यजीवाला कसे पकडता येऊ शकेल हे सगळं शासकीय नियमावलीत व्यवस्थितपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र गोम अशी आहे की प्रत्यक्ष जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा सरकारी यंत्रणा आणि नागरिक हतबल होत या नियमावलीला बासनात गुंडाळून ठेवतात.

हा संघर्ष अधिक टोकदार होऊ नये यासाठी समाज प्रबोधन आणि योग्य व्यवस्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. माणसाने बिबट्याचे सहजीवन स्वीकारणे हाच त्यावरचा मोठा उपाय आहे. पर्यावरण हे इतरांनी नाही तर स्वत: जपण्याची गरज आहे आणि त्यासाठी लोकसहभागातून ठोस कृती करण्यासाठी सगळ्यांनीच पुढे येणे अत्यावश्यक आहे.

अशी घ्यावी काळजी...
उसतोड करण्यापूर्वी मोबाईल मध्ये मोठया आवाजात गाणी वाजविणे किंवा शिट्या वाजवणे, मनुष्य संख्या अधिक आहे याचा बिबट्याला समज होईल असे जोराने बोलणे, किंवा फटाके वाजविणे, ताट वाजविण्यासारखे प्रकार केल्यास बिबट्या आपला अधिवास बदलू शकतो.
बिबट्या आला तरी लोकांच्या उत्सुकतेला आळा घाला. गर्दी करू नका. बिबट्याला जायला मार्ग मोकळा ठेवा. वनखात्याला त्यांचे काम शांतपणे करू द्या. असे प्रसंग खूप संवेदनशीलतेने हाताळायचे असतात. जंगल कमी कमी होत आहे. आपण त्यांच्या जागेवर राहात आहोत. तुम्ही बिबट्याला शिकवू शकत नाही पण मानवाला शिकवू शकता. त्यामुळे आपल्याला बिबट्यांबरोबर राहायला शिकावे लागणार आहे. हे कधीच विसरू नका.
बिबट्याला घाण, रस्त्यावर फेकलेले खरकटे खूप आवडते. कारण तिथे भटके कुत्रे, डुक्करे, घुशी जमा होतात. तुम्हाला बिबट्या तुमच्या वस्तीजवळ येऊ द्यायचा नसेल तर आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. खरकटे, अन्नपदार्थ. कचरा उघड्यावर फेकू नका. कुत्री, डुक्करे गोळा होणार नाहीत याची दक्षता घ्या. म्हणजे त्यांच्या ओढीने बिबट्या येणार नाही.

रॅपिड रेस्क्यु व्हँन
राज्यात नाशिक, नगर, नागपूर, अमरावती, सोलापूर, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यात बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या ही अधिक आहे. एखाद्या नागरी वसाहतीमध्ये बिबट्या आला तर त्याला त्वरीत पकडून जंगलात सोडण्यासाठी वनविभागाने पावले उचलण्याची गरज आहे. मात्र राज्याच्या वनविभागाकडे रॅपीड रेस्क्यु व्हँनची कमतरता आहे. तसेच बिबट्याला बेशुध्द करुन पकडता यावे यासाठी वनविभागाला "ट्रँन्क्युलाईज गन'ची गरज आहे. विशेष म्हणजे या बंदुकीपेक्षा ती बंदुक हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे.

spwagh2012@gmail.com

बातम्या आणखी आहेत...